बाळकृष्ण कवठेकर

कोणत्याही मानसशास्त्रज्ञापेक्षा साहित्यिकाला मानवी मनाची अधिक चांगली जाण असते असे जे म्हटले जाते, त्याचे प्रत्यंतर गाडगीळांच्या कथेतून उत्तमपणे येते. या साऱ्या जीवनानुभवांकडे गाडगीळ कधी मिश्किलपणे, तर कधी गंभीरपणे, कधी उपहासाने, तर कधी उपरोधाने, कधी कनवाळूपणाने, तर कधी तिखट भेदकपणाने पाहतात.. येत्या २५ ऑगस्ट रोजी साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने..

Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
importance of stability in life
सांधा बदलताना : मैत्र जीवांचे…
treatment personality disorders
स्वभाव-विभाव : विकारांतून मुक्ती
Sanjeev Abhyankar, Sanjeevan Samadhi Sohala, Mahasadhu Shree Moraya Gosavi Maharaj Sanjivan Samadhi Mandir, pimpari,
पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वररंजन भक्तिरसात’ रसिकश्रोते तल्लीन
UPSC Preparation Methods of Changing Attitude Through Behavior career news
UPSCची तयारी: वर्तनाद्वारे वृत्ती बदलण्याच्या पद्धती
Loksatta  kutuhal Synthetic Intelligence Many Unanswered Questions
कुतूहल: संश्लेषित बुद्धिमत्ता : अनेक अनुत्तरित प्रश्न

गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या साहित्याविषयी लिहिताना अत्यंत आनंद होत आहे, याचे मुख्य कारण माझ्या आणि माझ्या पिढीच्या वाचकांच्या वाङ्मयीन अभिरुचीची आणि काही प्रमाणात वाङ्मयीन दृष्टिकोनाचीही जडणघडण गाडगीळ यांच्या विविध प्रकारांतील साहित्यकृतींच्या वाचनातूनच झालेली आहे, हे आहे. गाडगीळांनी एका मुलाखतीत असे म्हटलेले आहे की, त्यांना चतुरस्र माणसे (लेखक) आवडतात. गाडगीळांच्या साहित्यसृष्टीकडे नजर टाकल्यास सहजच लक्षात येते की ज्या चतुरस्रपणाची अपेक्षा ते लेखकांकडून करतात, तो त्यांनी स्वत:च्या लेखनातून समर्थपणे सिद्ध केला आहे. साहित्याच्या सर्वच दालनांत त्यांनी डौलदारपणे संचार केला असून, आपल्या लेखनाने त्या, त्या दालनाची श्रीमंती वाढवली आहे.

गाडगीळांनी विविध प्रकारची विपुल साहित्यनिर्मिती केली असली तरी ते प्रामुख्याने ओळखले जातात ते मराठी नवकथेच्या निर्मात्यांपैकी एक म्हणूनच! मराठी कथेला खऱ्या अर्थाने ‘नवं’ केले ते गाडगीळांनीच. फडके-खांडेकरांच्या कथेच्या तुलनेतच नव्हे, तर गोखले, माडगूळकर, भावे या गाडगीळांच्या समकालीन नवकथाकारांच्या तुलनेतही गाडगीळांची कथा एकदम नवी, निराळी वाटते. मराठी नवकवितेच्या संदर्भात मर्ढेकरांचे जे स्थान आहे, तेच नवकथेच्या संदर्भात गाडगीळांचे आहे. म्हणूनच मराठी नवकथा घडवली ती मुख्यत: गाडगीळांनीच. इतरांनी त्यांना हातभार लावला असे म्हणणेच वस्तुस्थितीला धरून होईल. किंबहुना असेही म्हणता येईल की, नवकथाकारांमधील नवता टिकून राहिली ती बहुतांश गाडगीळांमुळेच! भाव्यांसारखा आग्रही राजकीय, सामाजिक मते असणारा लेखक जीवनाविषयीच्या विशुद्ध कुतूहलातून दीर्घकाळ दर्जेदार कथानिर्मिती करत राहिला, माडगूळकरांच्या सरळ-साध्या कथेला नवतेचे तेज प्राप्त झाले, एक पाय जुन्या कथेत ठेवून उभ्या असणाऱ्या गोखले यांच्या कथेचा दुसरा पाय नवकथेच्या प्रांगणात राहू शकला याचे श्रेय बहुतांश गाडगीळांच्या कथालेखनालाच द्यावे लागेल. गाडगीळांच्या कथालेखनाने त्यांच्या समकालीनांचे कथालेखनही विकास पावत गेले. 

मराठी लघुकथेला नवकथेने कथानकाच्या चौकटीतून मुक्त केले. हेतूपूर्वकतेतून मुक्त होऊन मराठी कथा केवळ कुतूहलातून जीवनचित्रण करू लागली. गुंतागुंतीच्या भावानुभवांचे किंवा विचारानुभवांचे क्षणचित्रे मराठी कथा रेखाटू लागली. स्थूल, गोचर वास्तवाकडून मानवी मनातील अतिवास्तवाचे चित्रण करण्याकडे मराठी कथा वळली. व्यक्तीच्या मनातील भावना, विचार यांचे वर्णन करण्याऐवजी ती खऱ्या अर्थाने मानवी मनाचे विश्लेषण करू लागली. समकालीन सामाजिक वास्तवाशी मानवी मनाच्या असणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियात्मक नात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न ती करू लागली. अनुभवाच्या बंदिशीप्रमाणे तिच्या आविष्कारात, रूपातही बदल होत गेले. कोणत्याही अनुभवाला वर्ज्य न मानता ती त्याच्या विविध अंगांची विविध पातळ्यांवरून चित्रे रेखाटू लागली. त्याद्वारे तिने कथानक आणि व्यक्तिचित्रण ही दोनच परिमाणे असणाऱ्या मराठी कथेला बहुपरिमाणात्मक संपन्नता प्राप्त करून दिली. ही आणि यासारखी मराठी नवकथेच्या संदर्भात केली जाणारी विधाने खरे म्हणजे गाडगीळांच्याच कथेची वैशिष्टय़े दाखवणारी आहेत. म्हणूनच मराठी नवकथा असे म्हटल्याबरोबर चटकन् गाडगीळांचीच कथा सार्थपणे आपल्या नजरेसमोर येते. मानवी मनाचा विविध क्रिया-प्रतिक्रियात्मक व्यापार हा गाडगीळ यांच्या कथेचा केंद्रिभूत विषय झालेला आहे. एखाद्या अनुभवाच्या निमित्ताने मानवी मनात निर्माण होणारे विविध भावतरंग, मानवी वर्तनाच्या दृश्य स्वरूपाशी संवादी किंवा विसंवादी असणाऱ्या मानसिक प्रतिक्रिया, विविध संज्ञाप्रवाह यांची अनेकविध चित्रे गाडगीळांच्या कथेत रेखाटलेली आहेत. असे मनोदर्शन हा गाडगीळांच्या कथेतून प्रकट होणाऱ्या जीवनदर्शनाचा अविभाज्य भागच असतो. किंबहुना हे मनोचित्रण हाच मुळात त्यांचा जीवनानुभव आहे हे त्यांची कथा वाचताना सतत जाणवते. क्षुद्र, रोगट, किडलेली, खुरटलेली, कुढणारी अनेक मने आणि त्यातून जन्माला येणारे विकृत जीवनव्यवहार जसे गाडगीळांनी साकार केले आहेत, तसेच उमलणारी, फुलणारी, तृप्तीचे समाधान उपभोगणारी मानवी मने आणि त्यांचे सुखद जीवनाविष्कारही त्यांच्या कथेतून साकार झालेले आहेत. ‘किडलेली माणसे’ दाखवणारे गाडगीळ ‘तलावातले चांदणे’ही शब्दांत पकडू शकतात. ‘भागलेला चांदोबा’ चित्रित करणारे गाडगीळ ‘अखेरचे सांगणे’ही शब्दांकित करू शकतात. क्षणोक्षणी नवी रूपे धारण करणाऱ्या मानवी मनाचा अकल्पित, अफाट, असीम, गुंतागुंतीचा आविष्कार जीवनव्यवहारातून कसा होतो हे दाखवणे हा गाडगीळांच्या कथेचा सततचा विषय राहिलेला आहे.

गाडगीळांच्या कथेतून तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष या साऱ्यांचे कसल्याही साच्यात न बसणारे मनोव्यापार सजीवपणे साकार होतात. कोणत्याही मानसशास्त्रज्ञापेक्षा साहित्यिकाला मानवी मनाची अधिक चांगली जाण असते असे जे म्हटले जाते, त्याचे प्रत्यंतर गाडगीळांच्या कथेतून उत्तमपणे येते. या साऱ्या जीवनानुभवांकडे गाडगीळ कधी मिश्किलपणे, तर कधी गंभीरपणे, कधी उपहासाने, तर कधी उपरोधाने, कधी कनवाळूपणाने, तर कधी तिखट भेदकपणाने पाहतात. त्यातूनच त्यांच्या कथेची वृत्ती, रूप आणि भाषा यांची निश्चिती केली जाते.

गाडगीळांच्या कथेतील सामाजिकतेकडे मात्र अभ्यासकांनी द्यावे तितके लक्ष दिलेले दिसत नाही. महाराष्ट्रातील शहरी, पांढरपेशा समाजाचे जीवन त्यांनी नाना परींनी चित्रित केले आहे. अनेक पांढरपेशा व्यक्ती आणि मध्यमवर्गीय कुटुंबजीवन यांची चित्रे त्यांच्या कथेतून आली आहेत. व्यक्तींची मनोरचना घडविण्यात आणि त्यांच्या वर्तनाचे नियंत्रण करण्यात त्यांच्या आर्थिक स्थितीचा फार मोठा वाटा असतो याचे भान गाडगीळ यांनी अनेकदा प्रकट केले आहे. माणसाचे अनेक मनोगंड त्याच्या आर्थिक स्थितीमुळे त्याला प्राप्त होणाऱ्या स्तरामुळे निर्माण होतात याची जाणीव असणे हे गाडगीळांच्या कथेतील सामाजिकतेचे स्वरूप आहे. हे जसे त्यांच्या कथेतील सामर्थ्य आहे, तसेच तीच त्यांच्या कथेच्या सामाजिकतेची मर्यादाही आहे. भारतीय समाजजीवनात जातीव्यवस्थेने निर्माण केलेले ताणतणाव, त्यातून निर्माण झालेले समाजघटकांचे परस्परसंबंध, या घटकांचे प्रातिनिधिक मनोधर्म इत्यादीकडे त्यांचे लक्ष गेलेले दिसत नाही.

गाडगीळांच्या जीवनानुभवांच्या स्वीकारातील या मर्यादेमुळेच ते कादंबरीलेखनाकडे फारसे वळलेले दिसत नाहीत. ‘लिलीचे फूल’ या त्यांच्या कादंबरीत हे स्पष्टपणे लक्षात येते. त्यांच्या कथालेखनाची उपर्युक्त वैशिष्टय़ेच या कादंबरीत ठळकपणे दिसून येतात. ‘दुर्दम्य’ या लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील कादंबरीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. टिळकांच्या विकसनशील, बहुपरिमाणात्मक व्यक्तिमत्त्वाचे जिवंत चित्रण करणे, टिळकांचा काळ सामर्थ्यांने उभा करण्याचा सुजाण प्रयत्न करणे, त्यांच्या समकालीन व्यक्तींची चित्रे समर्थपणे व्यक्त करणे.. या वैशिष्टय़ांमुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. ‘गोपुरांच्या प्रदेशात’ आणि ‘सातासमुद्रापलीकडे’ ही गाडगीळांची दोन प्रवासवर्णने त्यांच्या वेगळेपणामुळे मराठीतील प्रचलित प्रवासवर्णनपर लेखनापेक्षा वेगळी व वैशिष्टय़पूर्ण झाली आहेत. ‘फिरक्या’ या विनोदी ललित लेखसंग्रहाचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. बंडू-स्नेहलता यांच्या गोष्टींमधून त्यांनी उत्तम विनोदनिर्मिती केली आहे. उपहास, उपरोध, अतिशयोक्ती, विक्षिप्ततेचे दर्शन ही विनोदनिर्मितीची अवजारे त्यांनी येथे यशस्वीपणे वापरली आहेत. गाडगीळांचे समीक्षालेखनही त्यांच्या ललित लेखनाइतकेच मराठी साहित्यसृष्टीत महत्त्वाचे ठरले आहे. नवकथेविषयीच्या वादात तिची बाजू मांडण्यासाठी गाडगीळ हिरीरीने समीक्षालेखनाकडे वळले. समकालीन साहित्याच्या संदर्भातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांचे समीक्षालेखन झालेले आहे. असे असले तरी ते सर्वकालीन साहित्याचा विचार करण्यासाठी आवश्यक अशी मूल्यव्यवस्था मांडणारे ठरले आहे. साहित्याचे मानदंड गाडगीळ दाखवू शकले ते या मूल्यदृष्टीमुळेच. ‘खडक आणि पाणी’ यासारखा महत्त्वाचा समीक्षालेखसंग्रह त्यामुळेच निर्माण होऊ शकला. जुनी मूल्यकल्पना नाकारून नवी मूल्यकल्पना उभी करणे आणि प्रत्यक्ष समीक्षेतून तिचे यशस्वी उपयोजन करून दाखवणे असे द्विविध कार्य गाडगीळांच्या समीक्षेने केले आहे. म्हणूनच ते मर्ढेकरोत्तर काळातील एक श्रेष्ठ समीक्षक म्हणून ओळखले जातात. गाडगीळ हे पढीक समीक्षक नाहीत. त्यामुळे त्यांच्या समीक्षालेखनात विद्वत्ताप्रदर्शनाचा हव्यास नसून एक प्रकारचा मुक्तपणा आहे. ते स्वत: एक सर्जनशील लेखक असल्यामुळे केवळ समीक्षकांना न उमजणाऱ्या साहित्यकृतीतील कितीतरी अनाकलनीय बाबी गाडगीळांना नेमकेपणाने ओळखता येतात. निर्मितीप्रक्रियेतील बारकावे त्यांना सहजपणे हेरता येतात. त्याबरोबरच त्यांच्या समीक्षालेखनात एक प्रकारचा सहज सुबोधपणाही येतो. ते संदिग्ध किंवा दुबरेध होत नाहीत. समीक्षेच्या पारिभाषिक जंजाळात न अडकता सहजपणे मूलभूत स्वरूपाचे विचार त्यांच्या समीक्षेतून ठाशीवपणे मांडले जातात. तेही जिवंत, शैलीदारपणाने!

गाडगीळांच्या समीक्षालेखनातून प्रकट होणारी भूमिका कलावादी आहे. मराठी साहित्यसृष्टीत कलावादी भूमिका प्रतिष्ठित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कलावादाला रंजनवादापासून अलिप्त करण्याचे आणि कलाकृतीच्या तंत्राची चर्चा म्हणजे कलावादी समीक्षा नव्हे, हे स्पष्टपणे सांगण्याचे कार्य गाडगीळांनी केले. कलेच्या स्वायत्ततेचा पुरस्कार त्यांनी ठामपणे केला. कलाकृतीतून भावना, संवेदना आणि विचार या घटकांनी युक्त असा विशिष्ट अनुभव प्रकट होतो. हा अनुभव सजीव आणि संघटित स्वरूपाचा असतो. तो कोणत्याही नैतिक मूल्यांची मांडणी करत नाही, तर तो मूल्यनिरपेक्ष असतो. म्हणूनच कलाकृतीचे रसग्रहण करताना तिच्यातील मूल्यांचा स्वीकार करण्याची वाचकांना गरज नसते. कलाकृतीतील आशय आणि अभिव्यक्ती यात अभिन्नता असते. कलाकृती नैतिक उपदेश करत नाही. समाजसुधारणा करणे किंवा समाजाबद्दलचे सिद्धांत मांडणे हे कलेचे उद्दिष्ट असत नाही. अनुभवाच्या विशिष्ट संगतीतून सौंदर्यनिर्मिती करणे, भावसत्ये सांगणे आणि त्यांच्या प्रतीतीतून होणारा आनंद वाचकांना देत असतानाच त्याची जीवनजाणीव प्रगल्भ करणे हा कलेचा हेतू असतो, अशी साहित्यविषयक भूमिका गाडगीळांनी मांडली आहे. कलाक्षेत्रात घुसलेले कलाबा हीन झटकून टाकून हे क्षेत्र शुद्ध करण्याचे महत्त्वाचे कार्य गाडगीळांच्या या कलावादी भूमिकेने निश्चितपणे केले आहे. अर्थात गाडगीळ मानतात तितकी त्यांची भूमिका शुद्ध कलावादी नाही, हेही इथे नोंदवले पाहिजे. मराठीतील एकूण कलावादी समीक्षेप्रमाणे गाडगीळांच्या समीक्षेनेही जीवनमूल्यांचा स्वीकार केलेला आहेच. विशेषत: त्यांच्या रसग्रहणात्मक लेखांत त्यांनी जीवनमूल्यांचा स्पष्टपणे उपयोग केलेला दिसतो.

गाडगीळांच्या साहित्यसृष्टीचे असे विहंगमावलोकन केल्यावर आपल्या मनावर ठसा उमटतो तो त्यांच्या अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाचा! जीवनाविषयीचे उदंड आणि अभंग कुतूहल, साहित्यकलेविषयीची प्रगल्भ व निष्ठावान अभिरूची, वादकुशल विचारशक्ती इत्यादी गुणांनी युक्त अशा गाडगीळांच्या अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाचा आनंददायी प्रत्यय त्यांच्या लेखनातून ठायी ठायी येतो. म्हणूनच मराठी साहित्याची श्रीमंती सर्व अंगांनी वाढविणाऱ्या गाडगीळांना अष्टावधानी लेखक असे म्हणणे यथार्थ ठरते. असा अष्टावधानी लेखक मराठी साहित्यसृष्टीत होऊन गेला हे तिचे भाग्यच होय. अशा अष्टावधानी लेखकाच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करून नव्या-जुन्या वाचकांनी गाडगीळांचे लेखन यानिमित्ताने पुन्हा एकदा बारकाईने वाचावे असे आवाहन करणे यासमयी उचित ठरेल.         

lokrang@expressindia.com

Story img Loader