चंदू माझा बालमित्र. त्याच्या घरी दोन दिवसांकरता राहायला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. त्यानं नवीन वॉटर फिल्टर घेतला होता. जुना फिल्टर कामवालीला दिवाळीत बोनस म्हणून देण्याचा फतवा गृहखात्याकडून निघाला. तोपर्यंत जुन्या उपकरणाची उच्चासनी- म्हणजे माळ्यावर प्रतिष्ठापना करण्याचा उप-फतवासुद्धा निघाला. चंदू टेबलावर चढून माळ्यामध्ये डोकावला.  
माळा हाऊसफुल्ल! पाण्याचा फिल्टरच काय, पण चहाची गाळणीही तिथं शिरू शकली नसती.
चंदू खाली उतरला. हे कसं झालं, तेच त्याला उमजेना. तिरमिरीत त्यानं वरचा माळा तात्काळ खाली करण्याचा निर्णय घेतला. माझी करसेवा घेऊन त्यानं झपाझपा सगळ्या वस्तू उतरवल्या आणि म्हणाला, गेली पाच र्वष माळा साफ केला नव्हता. त्याचं हे फळ!
तितक्यात चंदूपत्नी स्नानबिन आटोपून आली आणि प्रचंड कातावून करवादली, कोणी हा पसारा मांडून ठेवलाय?
मी समोर असल्यामुळे चंदू त्यापेक्षाही वरचा आवाज काढून डाफरला, कोणी ही अडगळ माळ्यावर साठवून ठेवली?
अडगळ नाहीय. माझ्या संसाराच्याच वस्तू आहेत त्या.
‘‘मग त्या संसारात का नाहीत? माळ्यावर का टाकल्या?
चंदूपत्नीनं रखुमाईच्या पोजमध्ये कमरेवर हात ठेवून युद्धसमाप्तीची घोषणा करून टाकली- बडबड बंद करा आणि मुकाटय़ानं हे सगळं आत्ताच्या आत्ता परत ठेवून द्या जागच्या जागी.. माळ्यावर.
‘‘जागच्या जागी? अरे! माळा ही काय जागा आहे संसाराच्या वस्तू ठेवण्याची? आणि ही सगळी अडगळ परत वर ठेवली तर तुझ्या चालू संसारातल्या जुन्या वॉटर फिल्टरला जागा उरणार नाही.
ही मात्रा मात्र लागू पडली. चंदूपत्नीनं अडगळीतल्या संसाराचं एका तीक्ष्ण नजरेत स्कॅिनग केलं आणि हरवले ते गवसले’ मूडमध्ये येत ती अत्यानंदानं चित्कारली, अय्या! हा बघा माझा फेशिअल स्टीमर! तो जपून ठेवा.
‘‘कशाला जपून ठेवायचा? दर आठवडय़ाला ब्यूटी पार्लरमध्ये चेहऱ्याला पॉलिश करून घेतेस ना? म्हणूनच तर त्याची रवानगी वर झाली असणार.
‘‘हो, पण दादानं भाऊबीजेत घातला होता. तो असूंदे.
एकेक करून चंदूपत्नीनं सगळ्या वस्तू समक्ष तपासल्या. तिची प्रत्येक चीज तिला कोणत्या ना कोणत्या कारणानं हवी म्हणजे हवीच होती. इतर वस्तू तिनं कोपऱ्यात सरकवल्या. तितक्यात बेडरूमचं दार उघडून चंदूची सुगंधित सून आली आणि किंचाळली, हे काय? चिंटू-बंटीची खेळणी इथं का टाकलीयत कोपऱ्यामध्ये?
चंदू उत्तरला, अगं, मुलं मोठी झाली आता. कॉम्प्युटर गेम्स खेळतात. आणि या खेळण्यांपकी एकही धड नाहीय.
‘‘तरी असूंदे.
चंदूपत्नीनं विचारलं, कोणासाठी? दोन मुलांनंतर तिसरं नको असं तुम्हीच ठरवलंय ना? मग? की बेत बदललाय आता?’’
सून फणकारली, ऑफ कोर्स नॉट! पण आता मी ऑफिसात जायच्या घाईत आहे. संध्याकाळी नीट बघून सांगेन. आमच्या घरी तर माझ्या सगळ्या बार्बी डॉल्स अजून जपून ठेवल्या आहेत मम्मी-डॅडींनी.
तितक्यात चंदूला चिरंजीवांच्या इंजिनीअिरगच्या पुस्तकांखाली शोभा डेची चार पुस्तकं दिसली. झडप घालून त्यानं ती हस्तगत केली आणि म्हणाला, वा! ही पुस्तकं आपल्या घरी होती ते ठाऊकच नव्हतं.
ती चाळून मी म्हटलं, जाऊंदे रे. कशाला या वयात स्टारी नाइट्स’, स्ट्रेंज ऑब्सेशन’, सल्ट्री डेज्’, सोश्ॉलाइट इव्हििनग्ज’ असली सनसनाटी पुस्तकं वाचायची?
चंदूपत्नीनं शोभेची पुस्तकं हिसकावून घेतली आणि अडगळीत भिरकावून दिली. वर पतिदेवांना समज दिली, ऐका जरा मित्राचं. बाबांनी तुमच्या पन्नाशीला दिलेली सटीप ज्ञानेश्वरी’ उघडायचं राहून गेलंय. ते पुण्यकर्म करा आता तरी म्हातारपणात.
सारांश- माळ्यावरचा खजिना जैसे थे परिस्थितीत जमिनीवरच पडून राहिला. संध्याकाळी चंदूचा सुपुत्र घरी आला. चंदूपत्नीनं त्याच्याकडे संसार विरुद्ध अडगळ’ केस दाखल केली. कोणत्याही साठ वर्षांच्या पतिव्रतेला तिच्या पासष्ठ वर्षांच्या पतिदेवापेक्षा पस्तीस वर्षांच्या कुलदीपकाला सगळ्याच बाबतीत अधिक अक्कल आहे असं ठामपणे वाटत असतं. चंदूपत्नी या वैश्विक नियमाला अपवाद नव्हती. कुलदीपकानं त्या पसाऱ्यावर नजर फिरवून निर्णय दिला- सगळ्या वस्तू टाकून द्या.’’
घरातले तीनही पर्मनंट मेंबर कोरसमध्ये किंचाळले, काय?
मी विचारलं, सगळ्या वस्तू न पाहताच टाकून द्यायच्या?
तो म्हणाला, हो काका. त्यांच्यावाचून घरातल्या कोणाचं काहीही अडलं नव्हतं. त्या अस्तित्वात आहेत हेच मुळात कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. हा कचरा लवकरात लवकर घराबाहेर काढलाच पाहिजे.
चंदूच्या सुनेनं चवताळून विचारलं, कचरा? चिंटू-बंटीची खेळणी आणि माझ्या पस्रेस म्हणजे कचरा?
‘‘नॅचरली कचराच! त्या वस्तू उपयोगी असत्या तर वापरात राहिल्या असत्या. त्यांना घरात एक विशिष्ट जागा ठरवून दिलेली असती. तिथं त्या नसल्या तर लगेच त्यांची गरहजेरी जाणवली असती. पण तसं झालं नाही. म्हणजेच या वस्तूंची उपयुक्तता संपलेली आहे. डर्ट इज मॅटर आऊट ऑफ प्लेस. कळलं?
चंदूनं गुळमुळीत स्वरात भाषांतर केलं, हो. कचरा म्हणजे जागच्या जागी नसलेली वस्तू!
त्याची मातोश्री कळवळून म्हणाली, अरे, पण काही जिनसांमध्ये आपल्या भावना गुंतलेल्या असतात.
‘‘मग त्या वस्तूचा फोटो काढून लॅपटॉपमधल्या माय पिक्चर्स फोल्डरमध्ये कॉपीपेस्ट करून टाकायचा.
चंदूनं जनहित याचिका दाखल केली, पण ग्रंथांनी घराला शोभा येते. काही चांगली पुस्तकं वाचायची राहून गेलेली असतात रे. ती ठेवून द्यायची ना?
‘‘बाबा, तुम्हाला हवं ते पुस्तक मी किंडलवर डाऊनलोड करून देतो. पण नको झालेल्या वस्तू घरातच ठेवून त्यांचं लोणचं घालण्याची सवय आता आपण बदलली पाहिजे. आपला फ्रीझच घ्या ना! सतत खचाखच भरलेलाच असतो.
माझ्या तोंडून तात्काळ प्रतिसाद उमटला- आमचासुद्धा. कारण फ्रीझ म्हणजे शिळे पदार्थ फेकून देण्यापूर्वी काही दिवस ठेवायचं शीतकपाट आहे असं आपण मानतो.
‘‘पण हा चालू स्थितीतला व्हॅक्यूम क्लीनर टाकून कसा द्यायचा?
‘‘फेकून द्या असं नाही म्हणत मी. तो विकत घेतला ही आपली चूक झाली, हे मान्य करून इंटरनेटवरच्या एखाद्या ई-कॉमर्स वेबसाइटवर सगळ्यात जास्त बोली लावेल त्याला तो द्यायचा.
काही म्हणा, पण पोरगा पोटतिडिकेनं बोलतोय त्यात तथ्य आहे, हे आता मला पटायला लागलं. आज-उद्याच्या रोखठोक समाजसंस्कृतीत गरज संपलेली, बिघडलेली किंवा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिलेली वस्तू घराबाहेर घालवून द्यायलाच हवी.
माणसांना मात्र हे तत्त्व लागू करू नका म्हणजे झालं!

Story img Loader