अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com
‘चेतासंस्थेच्या रुग्णांसाठी संगीत व उद्यान हे दोन अतिशय महत्त्वाचे औषधाविना उपचार आहेत असा माझा चाळीस वर्षांचा अनुभव आहे.’ – डॉ. ऑलिव्हर सॅक्स (चेतासंस्था शास्त्रज्ञ व लेखक)
पृथ्वीवर उपलब्ध नाहीत अशी कल्पनेपलीकडील सर्व सुखे बहाल करणारी जागा म्हणजे स्वर्ग! सर्व धर्मानी अशा मिथ्यकथा लिहून ठेवल्या आहेत. अडचण एवढीच, की तो स्वर्ग मेल्यावरच दिसण्याची काही अंशी शक्यता सांगितली गेली होती. त्यामुळे मग तो स्वर्ग भूतलावरच प्राप्त करून घेण्याचे यत्न माणसांनी सुरू केले. अर्थात ते भाग्य केवळ राजे, सम्राट व संपत्तीचं काय करावं अशी विवंचना असणाऱ्या लक्ष्मीपतींनाच लाभत आलेलं आहे. ‘हरवलेला स्वर्ग पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न म्हणजे राज्याचा कारभार!’ असंही सतत सांगण्यात येतं. (तसं पाहता मिर्झा गालिब यांनी तर केव्हाच सांगून ठेवलंय.. ‘हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकीन, दिल बहलाने को गालिब, ये खयाल अच्छा है.’) काही कनवाळूंनी इतरेजनांनाही त्या स्वर्गातील सुखांपैकी काही वाटा द्यावा या हेतूनं उद्यानं तयार केली. सर्व राजे व सम्राटांनी त्यांचं ऐश्वर्य दाखवण्यासाठी (वा त्यांचं स्मारक म्हणून!) महाल व उद्यानं रचून ठेवली आहेत.
मध्ययुगात वाटसरूंना विसाव्यासाठी वृक्षांची सावली करणं हे राजांचं कर्तव्य मानलं जात असे. त्या काळापासून अनेक संस्कृतींमध्ये सुरेख उद्यानांची निर्मिती करण्यात आली. विसाव्या शतकात ब्रिटनमधील उद्यानविद्यावेत्त्या, लेखिका, कलावंत, छायाचित्रकार गर्ट्रुड जेकिल यांनी ४०० उत्तम उद्यानांची रचना केली. (नवी दिल्लीचे अभिकल्पक व वास्तुशिल्पी सर एडवर्ड ल्युटेन्स यांनी त्यांच्यासमवेत काही काळ काम केलेलं आहे.) चित्रकलेची उत्तम जाण असणाऱ्या जेकिल बाईंवर दृक्प्रत्ययवादाचा (इम्प्रेशनिझम) प्रभाव होता. निसर्गापासून तुटत चाललेल्या माणसांना निसर्गाचा आनंद घेता यावा या उद्देशाने उद्याने निर्माण करताना त्यांनी फुलांचे व पानांचे रंग, वृक्षांचे आकार यांचा सूक्ष्म विचार केला होता. त्यांच्या उद्यानविषयक विचारांचा प्रभाव अमेरिका व ब्रिटनवर जाणवतो. पुढे हाच विचार घेऊन जगात अनेक नितांतसुंदर उद्याने निर्माण केली गेली.
आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उद्याने हा लोकजीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे, हे नागरिकशास्त्र सर्वमान्यच होतं. अमेरिकेतील मानसोपचाराचे पितामह डॉ. बेंजामिन रुश यांनी १७९० साली ‘मनोरुग्णांना निसर्गाच्या सान्निध्यात नेल्यास ते अधिक खुलतात, मोकळे होतात व त्यांच्यावर मानसोपचार सुलभ होतात,’ असा सिद्धांत मांडला. त्याचा अधिक गांभीर्याने विचार होऊन मानसोपचारासाठी उद्यानांसह रुग्णालये तयार होऊ लागली. यातूनच मनोरुग्णांकरिता उद्यानोपचारांनी (गार्डन थेरपी) वेग घेतला. १८६० नंतर अमेरिकेत क्षयरोगावरील उपचारांसाठी नागर वसाहतींपासून काही अंतरावर निसर्गरम्य आरोग्यभुवन (सॅनेटोरियम) निघू लागले. (त्याकाळी क्षयरुग्णांना अलगीकरणात ठेवलं जात असे.) विस्तीर्ण अवकाश, शुद्ध हवा व निसर्गाच्या जवळ गेल्याने शारीरिक विकारांनी मानसिक दुबळेपण आलेल्या रुग्णांच्या चित्तवृत्ती उद्यानांच्या सहवासात खुलू लागतात, हे नव्याने सिद्ध होत होतं.
शहरीकरण वाढू लागल्यानंतर शेतीपासून दूर गेलेल्यांना शहरस्वास्थ्यासाठी प्रशस्त व उत्तम उद्याने आवश्यक वाटू लागली. त्यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही असत. या बागा आबालवृद्धांना विरंगुळ्यासाठी हक्काचं ठिकाण असे. चित्रकार, कवी, लेखक व गायक यांना स्फूर्ती मिळवण्यासाठी, तर कलावंतांना सादरीकरणासाठी हीच जागा असे. पाहुणे आल्यावर त्यांची करमणूक करण्यासाठी बागेचा क्रमांक पहिला होता. अशी बहुगुणी व सर्वोपयोगी बाग निर्माण करण्यात नगराध्यक्षांना अभिमान वाटत असे.
पहिल्या महायुद्धानंतर सर्व राष्ट्रांनी युद्धसज्जतेसाठी रस्ते तयार करण्यावर भर दिला. अत्यल्प काळात सीमांवर लष्कर नेण्याकरिता वेगवान वाहनं आली. त्यापाठोपाठ रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ वाढू लागली. शहरीकरण व व्यापारीकरणाच्या विस्तारात पहिला बळी हा उद्यान व मैदानांचा दिला गेला. जगभर ‘बघ मोकळी जागा आणि काढ व्यापारी संकुल!’ असा ‘विकास मंत्र’ जपला गेला. शहरे ही वाहनकेंद्री होऊन माणसांचं महत्त्व कमी होत गेलं आणि शहरांमधील जीवविविधता झपाटय़ानं नष्ट होत गेली. शहरांचं बकालीकरण अस होत गेलं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विभागाचं ‘२०५० साली जगातील दोन-तृतीयांश लोकसंख्या ही शहरांत असेल’ असं भाकीत आहे. हवा व पाण्याच्या प्रदूषणानं शहरी जीवन रोगट होऊन गेलं. अनेक शहर नियोजनकार व वास्तुशिल्पी शहरांचा हा घाणेरडा चेहरा बदलण्याच्या गरजेवर भर देऊ लागले. १९८७ साली रिचर्ड रजिस्टर यांनी ‘इकोसिटी बर्कले : बिल्डिंग सिटीज् फॉर फ्युचर’ या पुस्तकातून पर्यावरणसंवादी शाश्वत शहरांची संकल्पना मांडली. ही निकड सर्वाना भासत होतीच. त्यातून प्रदूषणाची आरोग्यातून किंमत मोजणाऱ्या अमेरिका व युरोपमध्ये हरित शहरांची लाट आली. शहरांमध्ये जागोजागी झुडपं, वेली दिसू लागल्या. वृक्षांना इजा न करणाऱ्या बांधकामांना चालना मिळाली. शहरांना निसर्गाच्या जवळ नेण्याकरिता शहर नियोजन करताना निसर्गचित्र वास्तुकलेचा (लँडस्केप आर्किटेक्चर) समावेश करण्यात आला. त्यामुळे काही शहरांचा तोंडवळा सुंदर झाला. शहरांतील कानाकोपऱ्यात हिरवेपणाच्या अनेक छटा दिसू लागल्या. कमीत कमी वीज व पाण्याचा वापर करणाऱ्या हरित इमारतींचा प्रसार होऊ लागला. वास्तू व शहर हरित करण्याच्या स्पर्धेमुळे सर्जनशील कल्पनांना बहर आला. त्यामुळे कित्येक शहरांमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण झालं. युरोप, सिंगापूर, अमेरिका आदींनी पुढील पिढय़ांची काळजी घेत उद्यानोपचार ते हरित शहर असे सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. भारत आणि महाराष्ट्र या साऱ्यापासून कित्येक मैल दूर होता.. आजही आहे.
१९८० च्या दशकात श्रीमंत राष्ट्रांमध्ये विकास आणि संपत्ती यांचे प्राबल्य वाढत असताना मनोरुग्णांच्याही संख्येत वाढ होत गेली तेव्हा अनेकविध विचार सुरू झाले. १९८० च्या सुमारास जपानमध्ये मनोशारीर व्यायामासाठी अरण्यानुभव वा अरण्यस्नान (फॉरेस्ट बेदिंग) सुरू झाले. माणसाचे अरण्याशी पुन्हा नाते जोडणे व निसर्गात रमणे सुरू झाले. १९९० पासून त्याला पर्यावरणोपचारांची (इकोथेरपी) जोड मिळाली. काही काळ अरण्यात ध्यान करा, झाडे-वेलींना मनापासून पाहा, पक्ष्यांचे आवाज ऐका; तो गंध, हवेचा व वृक्षांचा स्पर्श यात रमा.. असं सांगत निसर्ग पर्यटन सुरू झालं. पर्यावरणापासून फारकत व निसर्गाचा अव्हेर यातूनच ठसठसणारी वेदना सुरू होते, हे बिंबवण्यात येऊ लागलं.
परंतु अमेरिकेत व युरोपात मुलांचं बागेत खेळण्याचं प्रमाण काही वाढत नव्हतं. काळाच्या ओघात घरातील सर्व सभासदांचं वास्तव्य हे चार भिंतींतच बंदिस्त झालं. लहान मुलं खेळताना बाहेर दिसेनाशी झाली. पाहता पाहता सर्वच जण घरकोंबडे व एकलकोंडे होऊन गेले. अमेरिकी पत्रकार व लेखक रिचर्ड लुव्ह हे तर मुलांचं उद्यानप्रेम नाहीसं होत आहे हे पाहून कमालीचे दु:खी झाले. त्यांनी बालक, पालक आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्याशी सलग दहा वर्षे संवाद साधला. अति दक्ष पालकांना मुले बागेत एकटी गेल्यास त्यांच्या सुरक्षिततेची भीती वाटते. त्यामुळे मुले निसर्गापासून पारखी होऊ लागली. लुव्ह यांनी ‘लास्ट चाइल्ड इन वुड्स : सेव्हिंग अवर चिल्ड्रेन फ्रॉम नेचर डिफिसिएट डिसऑर्डर’ या पुस्तकात ‘निसर्गापासून फारकत घेतलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होत असून ती घाबरट होत आहेत. त्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमता अतिशय मर्यादित असतात. त्यांच्यात होणाऱ्या अनेक मनोविकारांची पायाभरणी ही बालपणातच होते,’ असं निदान केलं आहे. त्यांनी या अवस्थेला ‘निसर्ग कमतरतेचा विकार’ अशी संज्ञा दिली आहे. याचं गांभीर्य ओळखून इंग्लंडमध्ये ‘पर्यावरणीय विद्यालय’ ही संकल्पना राबवली गेली. मुलांमध्ये निसर्गाविषयीची आवड निर्माण करण्यासाठी उद्यानयुक्त विद्यालये सुरू केली गेली.
वाढत्या पर्यावरणीय संकटांना साथीला घेऊन आपण एकविसाव्या शतकात प्रवेश केला आणि मानसिक तणावांचे अस प्रताप प्रकर्षांनं जाणवू लागले. त्याचवेळी विज्ञान हे संगीताची महती नव्याने अधोरेखित करीत होते. असंख्य शब्दांना आपल्या काळजाचा ठाव घेता येत नाही, पण एखादा सूर आत जाऊन का भिडतो? या प्रश्नाच्या खोलात न जाता आपण संगीताचा आस्वाद घेत असतो. परंतु अशा प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचे कष्ट काही शास्त्रज्ञ घेत असतात. डॉ. ऑलिव्हर सॅक्स (१९३३-२०१५) यांनी संगीताचा आपल्या मनावर काय, कसा व किती परिणाम होतो, या रहस्याचा उलगडा करून घेण्याचा ध्यास घेतला होता. ‘म्युझिकोफिलिया : टेल्स ऑफ म्युझिक अँड द ब्रेन’ या ग्रंथात ते म्हणतात, ‘‘अतिशय उच्च भावनिक अवस्था प्राप्त करून देण्याची क्षमता ही केवळ संगीत आणि संगीतामध्येच आहे. विषण्णता दूर करणे, स्मृती जागी करणे; इतकेच नाही तर आनंदाने नाचायला लावण्याची किमयाही संगीत करू शकते. थोडक्यात, मनुष्य ही एक सांगीतिक प्रजाती आहे.’’ हे विधान ते विनाकारण करत नाहीत. असाध्य रोगांनी ग्रासलेल्या व्यक्ती, सामान्य व्यक्ती आणि संगीततज्ज्ञांशी प्रदीर्घ चर्चा, निरीक्षण व त्यावर चिंतन आणि संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचे हे विश्लेषण आहे. ‘‘कंपवात, विस्मृती, निद्रानाश यांसारख्या आजारातून बाहेर काढण्याची विलक्षण शक्ती संगीतामध्ये आहे. संगीत ही मानवजातीची मूलभूत व आदिम अभिव्यक्ती आहे. आपल्या मेंदूचा अधिकाधिक भाग हा संगीताने व्यापलेला असतो; भाषेने नव्हे.
अमूर्त वाटणारे संगीत थेट हृदयाला भिडत असल्यामुळे ते हे रसायनाविना प्रभावी औषध आहे..’’ डॉ. सॅक्स यांचा हा सिद्धांत आता जगाने स्वीकारला आहे.
निसर्गाविना संस्कृतीला अस्तित्व असणार नाही. आदिमकालापासून चालत आलेलं लोकसंगीत व लोकनृत्य हे निसर्गाच्या मुशीतच घडत गेलं. निसर्गाला बाजूला ठेवून साहित्य, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, चित्रपट या कलांची निर्मिती होऊच शकत नाही. कोणत्याही भावभावना व्यक्त करताना आकाश, चंद्र, सूर्य, फुलं, पक्षी, वेली यांच्याच प्रतिमा अटळपणे येत असतात. अति संवेदनशील मन हेच निसर्गाला सूक्ष्मपणे टिपू शकतं. विदुषी दुर्गाबाई भागवत व पं. कुमार गंधर्व यांनी घडवलेलं ‘ऋतुदर्शन’ हे अभिजात असतं, ते त्यामुळेच! निसर्ग, काव्य व संगीत यांची प्रगल्भ अभिव्यक्ती चित्रपटांतूनही दिसते. चित्रपटातून निसर्ग दाखवण्यासाठी परदेशात जावं लागत नव्हतं अशा काळी आलेल्या १९५७ मधील ‘प्यासा’च्या आरंभी आपल्याला एक सुंदर तलाव, विस्तीर्ण वृक्ष आणि बहरलेलं उद्यान दिसतं. झाडाखाली पहुडलेल्या विजयच्या (गुरुदत्त) अंगावर फूल पडतं. त्याकडे मन भरून पाहणाऱ्या विजयचं कविमन गुणगुणू लागतं. सचिन देव बर्मन यांनी दिलेल्या संगीतविरहित चालीवर मोहम्मद रफी यांच्या आर्त स्वरातून साहिर लुधियानवी यांचं निसर्गकाव्य ऐकू येतं..
‘ये हंसते हुए फूल, ये महका हुआ गुलशन
ये रंग में और नूर में डुबी राहें
ये फुलों का रस पीके मचलते हुए भंवरे’
आपल्याला फुलांतील मध शोधणारे भुंगे दिसू लागतात. रुणुझुणु करीत केवळ मध गोळा करणाऱ्या भुंग्यांच्या मधुकर वृत्तीस ‘विराट ज्ञानी’ असं संबोधन लाभलं आहे. काही क्षणांत मध नसणाऱ्या फुलास सोडून गुंजारव करीत तो भुंगा मधयुक्त फुलाचा शोध घेतो. विजय डोळे भरून ही किमया पाहत असतो. तेवढय़ात पडद्यावर एक अज्ञात बुटाचा अजस्र पाय येतो आणि त्या टाचेखाली भुंग्याला चिरडून निघून जातो. ते पाहून विजय कळवळतो. ती निर्दयी व क्रूर जागा सोडून निघताना मागे पाहत खिन्नपणे म्हणतो..
‘मैं दूं भी तो क्या, तुम्हें ऐ शोख नजारों
ले दे के मेरे पास है कुछ आंसू हैं, कुछ आहें..’
एका भुंग्याच्या नष्ट होण्यानं तळमळून अश्रू येणारा कवी व त्यातून काळजाला भिडवणारं त्याचं काव्य हे साहिर यांचं मनस्वी अंतरंग होतं. असं असतं निसर्गावर प्रेम!
‘प्यासा’मधील बुटाची ती टाच! काही वर्षांत त्या टाचेतून अनेक बलाढय़ टाचा निर्माण होत गेल्या. त्यांचा गुणाकार होत गेला. त्या टाचांनी भुंग्यांपाठोपाठ फुलपाखरं, चिमण्या व इतर पक्षी सर्रास चिरडून टाकले. झुडपं, वेली, वृक्ष, तलाव आणि उद्यानं सारं काही उद्ध्वस्त करून टाकलं. शहरांतील जागा कमी पडल्या आणि टाचांचा जोर कमी पडल्यावर राक्षसी यंत्रं अरण्यांकडे गेली. तिथली जीवसृष्टी नष्ट केली. यथावकाश निसर्गावर प्रेम करणारे कवी, गायक, संगीतकार व दिग्दर्शक निघून गेले. कैफी आझमींनी म्हटलं आहेच- ‘बिछडे सभी बारी बारी’!
करोना टाळेबंदीच्या या काळात काही पक्षी, मासे पुन्हा दिसू लागले आहेत. कोकीळ, पावश्या, चिमणी, साळुंकी यांचा किलबिलाट कानावर पडतो आहे. करोनोत्तर काळात पुन्हा आपण नव्या जोमानं प्रदूषण करत पुढील पिढय़ांना फुलं, पानं, पक्षी यांच्याशिवायच्या रखरखाटात ढकलून द्यायचं का? करोनानंतर तरी धोरणकर्त्यांना तातडीच्या आर्थिक फायद्यापलीकडे विचार करणं जमेल? शहर नियोजन व वास्तुरचना ही कला आहे (निव्वळ वाणिज्य नाही!) हे पटेल? करोना टाळेबंदीच्या काळात शहरी जीवनातले भयंकर दोष त्यांना जाणवले असतील? बेसूर, भेसूर, यांत्रिक व मठ्ठ इमारती आपल्याला खुपतील? उष्ण कटिबंधात काचेच्या भिंती बांधून, त्या थंड करण्यासाठी वातानुकूलन यंत्रणा वापरत, अंगात कोट घालून बसण्यात अधिकाधिक वीज जाळणे याला ‘अभिजन’ असे म्हणतात. असला पर्यावरणीय, शारीरिक आणि मानसिकच नव्हे, तर तार्किक अविचार सोडणं आपल्याला शक्य होईल?
यापुढे येणाऱ्या बालकांच्या वाटय़ाला निसर्ग येऊ द्यायचा आहे की नाही आपल्याला? त्यावरूनच आपण आपल्या बालकांचे शत्रू आहोत की मित्र, हे ठरणार आहे. पाहा- सगळी बालगीतं ही प्राण्यापक्ष्यांच्याच गमती सांगतात. विंदा करंदीकर यांनी लिहिलेल्या बालकवितांनी वयाची साठी ओलांडली आहे. त्यांच्या ‘स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग’ या कवितेत त्यांनी प्राण्यांना गमतीदार खेळ करायला लावले आहेत. मलबार हिलसारख्या पराकोटीच्या श्रीमंत भागात भायखळ्याचं जिजामाता उद्यान, पुण्यातील पेशवे पार्क हे ‘विकासातील अडथळे’ हलवायचे बेत अधूनमधून जोर धरत असतात. या बागांना स्वप्नापुरतंच ठेवायचं की पुढील पिढय़ांना अशा अनेक राणीच्या बागा द्यायच्या? निसर्गातील फुलांचा रंग दिसू नये, त्यांचा गंध येऊ नये, पक्ष्यांची गाणी कानी पडू नयेत अशा रंगहीन, गंधहीन, प्राणहीन पर्यावरणात आपल्या मुलांना ढकलायचं? बालकांचं बालपण अधिक सुखद करायचं की त्यांना आभासी जगातच ठेवायचं? हे ठरवण्याची अंतिम वेळ आज आली आहे. बालकांना स्पष्ट बोलता आलं असतं तर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील घोषणा नव्या अर्थाने दिली असती.. ‘करा किंवा मरा!’