रघुनंदन गोखले
हा लेख वाचेपर्यंत जगज्जेतेपदाची लढत संपली असेल आणि विश्वनाथन आनंदनंतर प्रथमच आशियाला जागतिक विजेता मिळाला असेल. वाचकांना माझ्या भूगोलाच्या ज्ञानाविषयी शंका येण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, बुद्धिबळापुरता रशियाचा समावेश नुकताच युरोपातून काढून आशिया खंडात केला गेला आहे. युरोपीय देशांच्या बहिष्काराच्या धमकीमुळे ही राजकीय चाल करण्यात आली आहे.. आजच्या लेखात जगज्जेतेपदासाठी चालणाऱ्या खेळाडूंच्या मानसिक युद्धांविषयी.
जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेसाठी आपला जीव पणाला लावून खेळाडू तयारी करतात. त्यानंतर स्पर्धा सुरू असतानाच ताण वेगळाच तयार होतो. उगाच नाही माजी जगज्जेता मिखाईल बोटिवनीक सांगून गेला आहे की, ‘‘एका जगज्जेतेपदाच्या सामन्यामुळे खेळाडूचे आयुष्य १० वर्षांनी कमी होईल एवढा ताण त्याला सहन करावा लागतो.’’ हाच बोटिवनीक पुढे म्हणतो- ‘‘पण कोणताही खरा बुद्धिबळपटू आपल्या आयुष्याची १० वर्षे यासाठी कुर्बान करण्यास कचरत नाही.’’
निव्वळ मिळणारा भरपूर पैसा हेच विजेत्यांचे एकमेव ध्येय नसते. तसे पाहिले तर हरणाराही भरपूर कमावून जातोच; पण बुद्धिबळ हा खेळ मानसिक युद्ध असते. बॉबी फिशर म्हणून गेला आहे, ‘‘मी प्रतिस्पर्ध्याचे मनोबल धुळीला मिळवण्यासाठी खेळतो.’’ साधी आंतरशालेय स्पर्धा घ्या. कोटय़धीश कुटुंबातील मुले गल्लीतील साध्या अजिंक्यपदासाठीच्या स्पर्धेचा सामना हरला तर ओक्साबोक्शी रडतात. हीच मुले महत्त्वाच्या क्रिकेट सामन्यात सहज चेंडूवर विकेट गेली तर स्वत:च्या मूर्खपणावर हसतात. बुद्धिबळाच्या पटावरील हार ही जिवाला लागणारी असते.
इम्यानुएल लास्कर याने आपला आव्हानवीर जोस राउल कॅपाब्लांका याच्याशी स्पर्धेआधीच लिहून दिले होते की, त्याचा प्रतिस्पर्धी कॅपाब्लांका हा सध्या इतका चांगला खेळत आहे की, मी स्वत:हून त्याला माझे जगज्जेतेपद बहाल करत आहे; परंतु याला क्युबाचे नागरिक (आणि स्वत: कॅपाब्लांका) तयार झाले नाहीत आणि त्यांनी जागतिक अजिंक्यपदाचा सामना हवानामध्ये आयोजित केला. लास्करला पैशाची गरज होती. म्हणून तो सामना खेळला.
आता आपण जगज्जेतेपदादरम्यान झालेल्या वेगवेगळय़ा घटनांकडे बघूयात. इटलीमधील मेरानो येथे १९८१ साली झालेल्या जगज्जेतेपदाच्या सामन्यादरम्यान अनातोली कार्पोवचे सर्व जेवण मॉस्कोमधून रोज विमानाने येत असे. त्याचा प्रतिस्पर्धी व्हिक्टर कोर्चनॉय ‘कॅव्हियार’ नावाची माशाची अंडी इराणवरून मागवत असे. खरे तर जगात ‘रशियन कॅव्हियार’ प्रसिद्ध मानली जातात; पण कोर्चनॉयला भीती होती की त्याला कॅव्हियार आवडतात म्हणून सोव्हिएत संघराज्याची कुप्रसिद्ध गुप्तहेर संस्था केजीबी मेरानोमधील सर्व कॅव्हियार दूषित करून ठेवेल. गेल्या कार्लसन- नेपोमेनाची सामन्यात कार्लसनला विचारण्यात आले होते की, त्याचा वाढदिवसाचा केक तो नेपोमेनाला देणार का? त्याला कार्लसन म्हणाला की, एकमेकांनी दिलेले अन्न कोणताही स्पर्धक खाणार नाही.
जगज्जेतेपदाच्या सामन्यासाठी एक महत्त्वाचा नियम असतो की, कोणत्याही बदलासाठी दोघेही प्रतिस्पर्धी तयार असले पाहिजेत. मी स्वत: पाहिलेली गोष्ट सांगतो. न्यूयॉर्कमधील वल्र्ड ट्रेड सेंटरच्या १०५ व्या मजल्यावर झालेल्या कास्पारोव्ह-आनंद सामन्याच्या वेळी १५ व्या डावात त्यांच्या काचेच्या खोलीतले वातानुकूलित यंत्र बिघडले. नियमाप्रमाणे दोघे जर तयार झाले नसते तर कास्पारोव्हला २५ डिग्रीच्या (त्याच्या दृष्टीने) भयानक उकाडय़ात खेळावे लागले असते. चेन्नईमध्ये राहणाऱ्या आनंदने फक्त आपला कोट काढून ठेवला की काम झाले असते; पण आनंदने दोन तास डाव पुढे ढकलण्यास मान्यता दिली .
आनंदच्या खिलाडूवृत्तीच्या उलट टोपालोव्हने आनंदला २०१० साली कोणतीही सवलत देण्यास नकार दिला होता. ती पण एक असहिष्णू वागणूक होती. जगज्जेतेपदाचा सामना होता टोपालोव्हच्या मायदेशात. बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे २४ एप्रिलला सामन्याची सुरुवात होणार होती. आनंद आणि त्याचे साहाय्यक आनंदच्या स्पेन येथील घरी जोरदार तयारी करत होते. अचानक आइसलँड बेटावर ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्याची राख इतक्या मोठय़ा प्रमाणात हवेत पसरली की महिनाभर युरोपमधील विमान उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. आनंद आणि साहाय्यकांनी रस्त्यामार्गे माद्रिद ते सोफिया हे ३००० किलोमीटर जाण्याचे ठरवले, कारण जर वेळेत पोहोचले नाहीत तर त्यांना जगज्जेतेपद गमवावे लागले असते.
मजल दरमजल करत आनंद ऐन वेळेस सोफियाला पोहोचला आणि त्याने सामना एक दिवसाने पुढे ढकलण्याची विनंती केली. टोपालोव्हच्या मॅनेजरने ती धुडकावून लावली. आनंदला दमलेल्या अवस्थेत पहिला डाव खेळावा लागला आणि तो त्यात हरला; पण अखेर आनंदने जोरदार खेळ करून सामना ६.५- ५.५ जिंकलाच!
यापेक्षा मजेदार गोष्ट घडली होती पेट्रोस्यान-हुबनर यांच्यातील १९७१ सालच्या सामन्यात. सामना होता स्पेनमध्ये सॅव्हिल या शहरात. जवळच फ़ुटबॉलचे स्टेडियम होते. ज्या वेळी सामन्याची तयारी झाली त्या वेळी वातानुकूलित यंत्राचा आवाज येतो, अशी तक्रार पाहणी करणाऱ्या जागतिक संघटनेच्या संघाने केली. ताबडतोब त्या यंत्राची दुरुस्ती करण्यात आली; पण मुख्य संकट त्यांच्या लक्षातच आलेले नव्हते.
सामना सुरू झाला आणि एकापाठोपाठ एक बरोबरी करून पेट्रोस्यानने हुबनरला थकवले. सातव्या डावाच्या वेळी तर जवळच फुटबॉलचा सामना होता आणि त्यांच्या आवाजाने हुबनरला काही सुचेना. त्याने पेट्रोस्यानकडे पाहिले आणि सामना पुढे ढकलायची विनंती केली. पेट्रोस्यानने शांतपणे आपले श्रवणयंत्र काढून ठेवले आणि म्हणाला, ‘‘आपण खेळू या!’’ बिचारा हुबनर डाव हरला आणि मग सामना सोडून निघून गेला.
मानसिक दबाव आणण्यासाठी खेळाडू काय काय करतात, हे ऐकले तर आपण थक्क व्हाल. कोर्चनॉय-कार्पोव सामने तर खेळापेक्षा इतर गोष्टींनी जास्त गाजले. त्यांची पार्श्वभूमीपण तशीच होती. कोर्चनॉय आपल्या बायकोमुलांना मॉस्कोमध्ये सोडून सोव्हिएत संघराज्यातून पळून गेला होता. त्याने एकाहून एक मुलाखती देऊन सोव्हिएत संघराज्याला जेरीस आणले होते. त्याउलट अनातोली कार्पोव हा कम्युनिस्ट पक्षाचा लाडका! त्यांच्यामधील १९७८ साली झालेल्या सामन्यात एका डावात कोर्चनॉयने प्रतििबबित गॉगल वापरला, जेणेकरून कार्पोवने वर पाहिले की त्याला स्वत:चे प्रतििबब दिसावे. त्याच सामन्यात पहिल्या रांगेत कोर्चनॉयचे खास पाहुणे म्हणून आनंदमार्ग या संघटनेचे अमेरिकन सदस्य त्यांच्या खास वेशात बसवण्यात आले. हे पाहुणे म्हणजे मनिला येथील एका खून खटल्यात जामिनावर होते. कार्पोवच्या संघाने त्यांना बाहेर काढले. याउलट कार्पोवच्या संघात झुखार नावाच्या एका प्रख्यात संमोहनतज्ज्ञाचा समावेश होता. कोर्चनॉय हा ५० वर्षे सोव्हिएत संघराज्यात राहिलेला असल्यामुळे त्याला ओळखत होता. हा संमोहनतज्ज्ञ पहिल्या रांगेत बसून कोर्चनॉयकडे एकटक बघत असे. विचार करा- एखादा माणूस तुमच्याकडे एकटक बघतोय आणि तुम्हाला माहिती आहे की, हा संमोहनतज्ज्ञ आहे. तुम्ही जसे विचलित व्हाल तसेच कोर्चनॉय पण विचलित होत असे.
त्या सामन्यादरम्यान साध्या साध्या गोष्टींमध्ये वाद होत असत. सामना चालू असताना कार्पोवला खाण्यासाठी ब्लूबेरी घातलेले दही पाठवण्यात आले. झाले! कोर्चनॉयच्या संघाने लगेच निषेध नोंदवला! त्यांना संशय आला की हा काही कोड आहे. उदाहरणार्थ – ब्लूबेरी म्हणजे तुझी परिस्थिती चांगली नाही, स्ट्रॉबेरी म्हणजे तुला जिंकायची संधी आहे. कार्पोव-कोर्चनॉय सामने म्हणजे पटाबाहेरील करमणूक होती.
कास्पारोव्ह-आनंद सामन्यात नववा डाव हरून पाठीमागे पडलेल्या गॅरी कास्पारोव्हने दहाव्या डावात अ-खिलाडू वर्तनाचा कहर केला. आनंदसाठी खास तयार केलेल्या स्पॅनिश प्रकारच्या सुरुवातीत कास्पारोव्हने आनंदला पकडले. तरीही आनंद विचार करून योग्य तो बचाव करत होता. अशा वेळी कास्पारोव्हने सतत खुर्ची सोडून बाहेर जाण्यास सुरुवात केली. खेळताना मोहरी आपटणे आणि बाहेर जाताना (आणि येताना) खोलीचे दार जोरदार आदळणे यामुळे आनंदच्या विचारमालिकेत व्यत्यय येत होता. अखेर आनंदने चूक केली आणि कास्पारोव्ह डाव जिंकला.
व्लादिमिर क्रॅमनिक विरुद्ध वॅसेलीन टोपालोव्ह हा सामना बाथरूमच्या वादामुळे गाजला! २००६ साली हा सामना कास्पारोव्हची फुटीर प्रॉफेशनल चेस असोसिएशन आणि जागतिक बुद्धिबळ संघटना यांच्यातील समेट म्हणून खेळला गेला. रशियातील काल्मीकिया प्रांताची राजधानी एलिस्ता येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पहिले दोन डाव जिंकून क्रॅमनिकने आघाडी घेतली. टोपालोव्हच्या समर्थकांनी खोड काढायला सुरुवात केली. क्रॅमनिक हा १४ वेळा बाथरूमला गेला, अशी एक तक्रार आली. आता बाथरूमची पूर्ण तपासणी झाली होती. क्रॅमनिकचीही मेटल डिटेक्टरने संपूर्ण तपासणी झाली होती. अखेर दोन्ही पक्षांत समझोता झाला आणि जरी सामना बरोबरीत सुटला तरी टायब्रेक जलद सामन्यात क्रॅमनिक जिंकला आणि टोपालोव्ह जगज्जेतेपद गमावून बसला.
बॉबी फिशरने बुद्धिबळाला प्रसिद्धी मिळवून देण्याआधी खेळाची किती वाईट अवस्था होती याची गोष्ट सांगतो. स्पास्की आणि कोर्चनॉय यांच्यामध्ये १९६८ साली युक्रेनमधील कीव गावी जगज्जेतेपदाच्या आव्हानवीर निवडीचा सामना झाला होता. जरी या सामन्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसली तरी एक आख्यायिका बुद्धिबळ क्षेत्रात प्रसिद्ध आहे. हा सामना विमानतळाजवळ खेळवला जात होता. दोघेही खेळाडू सोव्हिएत असल्यामुळे सामन्याला जास्त बडेजाव ठेवण्यात आला नव्हता. ते एका खोलीत खेळत होते. त्यांचा प्रसाधनगृहाकडे जाण्याचा रस्ता वळसा घालून होता. त्यांना जवळचा रस्ता होता, पण तो महिला प्रसाधनगृहातून होता. परंतु त्या सामन्याच्या वेळी कोणीही महिला ते वापरत नसल्यामुळे दोघेही बिनदिक्कतपणे शॉर्टकट वापरायचे. एकदा स्पास्की महिला प्रसाधनगृहातून बाहेर येत असताना अचानक एका महिलेने पाहिले आणि तिने किंचाळून स्पास्कीला आत ढकलून बाहेरून कडी लावली. स्पास्की अजून का येत नाही म्हणून काळजीने स्पर्धेचे पंच शोध काढत असताना त्यांना दार ठोठावण्याचा आवाज आला. त्यांनी स्पास्कीची सुटका केली.
लेख संपत आला तरी यात अजून विक्षिप्तपणाचा मेरुमणी बॉबी फिशर याचे नाव कसे नाही? बॉबीच्या सुरस रम्य कथांसाठी आपल्याला वेगळा लेख लिहावा लागेल. इतरांबरोबर त्याची सांगड घालणे बरोबर होणार नाही. बॉबीवर पुन्हा कधी तरी!
gokhale.chess@gmail.com