समीर गायकवाड
काळाच्या भट्टीत आयुष्याचं पोलाद जोरदारपणे शेकून घेतलेल्या दादूचा चेहरा एकसारखं विस्तवापुढं बसून रापून गेला होता. विस्तवातून उडणाऱ्या धुरांतल्या कणांमुळे त्याच्या अंगांगावर राखाडी काळसर लेप चढला होता. एका हातानं भाता हलवत मध्येच एका हाताने भट्टीतल्या विस्तवातले लोखंडाचे जुने तुकडे सांडशीने वरखाली करताना त्याची नजर ठिणग्यांकडं होती. चित्त मात्र जालिंदरकडं होतं. आकडी यावी तसं तोंड करून हातवारे करत जालिंदर त्याला तावातावानं बोलत होता. भात्याला लागून मागं बसलेली गोदाकाकू भांबावलेल्या मुद्रेनं दोघांकडं बघत होती. नवरा आणि पोरगा यांच्या कात्रीत ती सापडली होती. जालूचं कर्कश्य बोलणं वाढत चाललं तशी दादूच्या भात्याची गती वाढत होती. परिणामी भट्टीतल्या विस्तवात आगीच्या ज्वाळा उठू लागल्या, त्याची धग जाणवू लागली.
बाप आपलं ऐकत नाही याचा संताप आलेल्या जालिंदरच्या आवाजाची पट्टी हळूहळू वाढत होती. दादू लोहाराच्या ओसरीत बापलेकाची भांडणं लागलीत ही बातमी टोळधाड यावी तशी गावगन्ना पसरत गेली. उन्हाखाली वाळवण पसरून ठेवावं तसं मोकळ्या अंगानं दुपारच्या वक्ताला झोपी गेलेलं, आळसावलेलं गाव खाडकन् जागं झालं. तरीदेखील आडकित्त्यात कांडरून ठेवलेल्या सुपारीसारखी सगळी सांदीलाच बसून राहिली. आपलं घर सोडून कानोसा घ्यायला लोहाराच्या दारात कुणीच गेलं नाही. तिथं काय घडत असंल, याचा जो-तो अंदाज बांधू लागला. जाणार तरी कसं? कारण दादू लोहाराचा दरारा होताच तसा!
अंगानं आडमाप. एखादा मस्तवाल वळूच जणू! घणाचे घाव घालून घालून दांडरून गेलेले मजबूत हात, बलाच्या वशिंडाएवढे मोठाले खांदे, चरवीसारखी गच्च मानगुट, टच्च भरलेली पाठ आणि कातळासारखी ऐसपस छाती. त्याच्या अंगात नुसतीच परण असली, की त्याची बलदंड देहयष्टी पाहणाऱ्याच्या नजरेत भरे. माणसं त्याच्या भल्यामोठय़ा दंडाकडे खुळ्यागत बघत राहायची. लोखंडाचंच जाडजूड कडं चढवलेलं टणक मनगट लक्ष वेधून घेई. तांब्या हातात धरला तर त्याचा कानवला करणारा अन् एका बुक्कीत नारळ फोडणारा गडी अशी त्याची ख्याती. राठ दाट भुवयांखालचे बदुलासारखे डोळे, विस्तीर्ण भालप्रदेश, लंबोडकं नाक, रुंद ओठ आणि पसरट चेहरा असलेला दादू त्याच्या खर्जातल्या आवाजानंही स्मरणात राहील असा होता. धोतराचा कासोटा वरतून आवळलेला असला, की केळीच्या बुंध्यासारख्या त्याच्या पिंडऱ्या दिसत. राखट धुळीत माखलेले मोठाले पाय बघून माणूस गार होई. दादू मूळचा गोरातांबूस रंगाचा, पण भात्यासमोर बसून त्याचा रंग बदललेला. त्याच्या गळ्यातला काळ्या दोऱ्यात गुंफलेला सोन्याचा बदाम लक्ष वेधून घेई. तांब्याच्या बाळीनं त्याच्या कानाची पाळी ओघळून गेली होती. पल्लेदार मिशा, कानावरती आलेले मोठाले कल्ले असलेला पिळदार अंगयष्टीचा तो भरभक्कम गडी काळजाचा ठोका चुकवे.
आगीपुढं काम करणारा दादू स्वभावानं मात्र नरम होता. कोल्ह्यवर मेंढी हुरळावी तसा तो कधी कुणावर उगेच भाळला नव्हता, की कुणासाठी झुरला नव्हता. त्यानं कधी कुणाचं वाईट चिंतलं नव्हतं, की कधी कुणाच्या भल्यासाठी त्यांनं कधी देव पाण्यात घातले नव्हते. कुणाच्या पंचायती करायला तो पारावर चकाटय़ा पिटत बसलेला दिसला नव्हता, की कुणाची निंदानालस्तीही त्यानं केली नव्हती. कुणाच्या दारात हात पसरले नव्हते, की आपलं कुठलं गाऱ्हाणंही मांडलं नव्हतं. अगदी साधासुधा माणूस होता तो. गावगाडय़ाशी एकजीव झालेला सच्चा माणूस होता तो. त्याच्यात एकच दोष होता- जोवर शांत तोवर शांत; पण एकदा का संतापानं त्याचा ताबा घेतला, की त्याचा स्वत:वर ताबा राहत नसे.
पांडुरंग काळा सावळा असला तरी बुक्का हीच त्याची ओळख! तसंच दादूचं झालेलं. मागच्या काही वर्षांत वाहतुकीची साधनं वाढली, वाटा जाऊन रस्ते झाले. गावजीवनातली कामं सुलभ झाली, बदलली. बलुत्याची कामं करणाऱ्या सगळ्याच जिवांना याचा जसा फटका बसला तसाच दादूलाही बसला. हाता-तोंडाची गाठ लागणं मुश्कील झालं. तरीही त्याचं भात्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं. आपला भाता हीच आपली ओळख असं त्याच्या भाबडय़ा मनाला वाटे. थोरल्या मुलाच्या पाठीवर त्याला चार मुली झालेल्या. जमंल तसं त्यांना शिकवत गेला, गावकीचं लोखंड घडवताना अप्रत्यक्षपणे आपल्याच कुटुंबाच्या पाठीपोटी घाव घालत राहिला. कुणाकडूनही फुटका मणी न घेता त्यानं मुलींची लग्नं केली. पोटाला चिमटे घेत पोराला आयटीआयचं शिक्षण घेऊन दिलं.
दादूच्या लग्नाला तीन दशकांहून अधिक काळ आता लोटून गेला होता. शिवंवरचा पिंपळ जसा पानमोकळा होऊनही अंगातली रग कायम ठेवून ताठ उभा होता, तसं आता दादूचं झालं होतं. घराची रया गेली होती. भिंतीवरच्या रंगाचे पोपडे उडाले. इथं-तिथं ठोकलेल्या खिळे-खुंटय़ांच्या माना मुरगाळून पडल्या. दगडी भिंतीच्या बांधकामाचे चिरे ढिले होण्याच्या गतीत आले. त्यातल्या देवळ्या धुळीनं, जाळ्या जळमटीनं माखून गेल्या. जागोजागी गंजून गेलेल्या जुनाट लोखंडी चीजवस्तूंचे मातकट ढीग अस्ताव्यस्त पडले. घरावर घातलेले पत्रे झिरायच्या बेतात आले, पत्र्याखालचे वासे कुजून कोसळायच्या अवस्थेत आले. एकापुढं एक असलेल्या दोन खोल्यांनंतरच्या अंगणातील आगीशी संघर्ष करून दादूसारखाच खंगून गेलेल्या अवस्थेतला भाता अन् त्याला जोडून असलेली भट्टी, वापर कमी झाल्यानं कोरडीठाक झालेली अवजारं असा दादूचा संसार उरला. याच अंगणात त्याच्या पोरी खेळलेल्या, इथंच त्याची नातवंडं रांगलेली, कोवळ्या तळव्यात लोखंडी र्छे घुसून इथंच जालिंदर रडलेला. दादूचं सगळं विश्वच तिथं होतं. याशिवाय त्याचं जीवन अधुरं होतं. आता याच अंगणात तरणा जालिंदर आपल्या बापास अद्वातद्वा बोलत होता.
आपलं शिक्षण झालंय, आई-वडिलांच्या इच्छेप्रमाणे ते म्हणतील त्या मुलीशी आपण लग्नही केलंय, खेरीज आपल्या पिढीजात व्यवसायावर भागत नसल्यानं गावाबाहेरच्या मुख्य रस्त्याला टाकलेलं गॅरेजही बऱ्यापैकी चालतंय याचं त्याला समाधान होतं. पण आपले वृद्ध आई-वडील आपल्यासोबत राहत नाहीत याचं त्याला शल्य होतं. शिवाय यावरून गावातले लोक ताने मारतात याचंही त्याला वाईट वाटे. गावासाठी आगीशी झटून रक्ताचं पाणी केलेल्या पहाडाएवढय़ा दणकट बापाचे बुरुज आता ढासळू लागलेत याचीही त्याला चिंता होती. आयुष्यभर बापाची सावली बनून राहिलेल्या आईच्या पदरात नुसत्या ठिणग्याच पडल्या होत्या; तिनं कुठलं सुख अनुभवलं नव्हतं, की ती कधी नटली-सजली नव्हती. आपला बाप स्वत:सोबतच आपल्या आईचीही फरफट करतोय हे त्याला उघडय़ा डोळ्यानं बघावं लागत होतं. बापानं आता गावातलं घर सोडून देऊन आपल्यासोबत सडकेला नव्या घरात राहायला यावं असं त्याला वाटे. यावरून बाप-लेकात अलीकडे सारख्या चकमकी झडत. पण त्या दिवशीचा रागरंग वेगळाच होता. ‘अंगाचा कोळसा झाला तरी इथंच मरायच्या’ गोष्टी करणारा दादू जालिंदरच्या डोक्यात गेला होता. संतापानं बेभान होऊन तो एकेक आसूड ओढत होता.
आपल्या किती पिढय़ा गावात होत्या, हे दादूलाही ठाऊक नव्हतं. पण या गावाचं आणि आपलं नातं रक्ताचं आहे हे त्याच्या डोक्यात फिट बसलेलं. आताशा आपली आबाळ होतेय, पण आपण उपाशी मेलेलो नाही; गावानं जिथं आपल्या कैक पिढय़ा जगवल्या तिथं आता आपली उपासमार होत्येय म्हणून गाव सोडून जावं हा विचारच त्याला सहन होत नव्हता. भाता बंद पडला तरी हरकत नाही, पण काळजाचा भाता जोवर चालतोय तोवर इथनं हलणार नाही असा त्याचा ‘पण’ होता. तर आपल्या नवऱ्याच्या सोबतीनं आपलं जिकडं उजडेल तिकडं उजडेल, त्याला सोडून राहायचं नाही असं गोदूबाईचं म्हणणं.. (पूर्वार्ध)
sameerbapu@gmail.com