समीर गायकवाड

सलग तीन साल बिनपावसाचं राहिल्यानं रान धुमसत होतं. आषाढातल्या त्या दिवशीही नुसतंच आभाळ भरून आलं होतं. गजूनानाच्या भकास वस्तीवरची गर्दी सकाळपासूनच वाढली होती. अख्खं गाव तिथं लोटलं होतं. फक्त दौलत भोसल्यांचं कुटुंब आलेलं नव्हतं. आणि गावाला त्यांचीच प्रतीक्षा होती. गेली कित्येक वर्ष अंथरुणाला खिळून असलेला गजूनाना आता शेवटच्या घटका मोजत होता. त्याच्या खांद्यापाशी बसून कुणी ‘हरिपाठ’ म्हणत होतं.. ओसरीवर बसलेल्या मंडळींनी ‘पलतोगे काऊ कोकताहे’चा सूर धरलेला. काही नुसतीच टाळ वाजवत होती, तर काही ओठातल्या ओठात पुटपुटत होती. गजूनानाची बायको सुनंदा त्यांचं मस्तक आपल्या मांडीवर ठेवून शून्यात नजर लावून बसली होती. हनुवटीपाशी येऊन थबकलेले सुरकुतलेल्या गालावरचे अश्रूंचे सुकलेले ओघळ तिच्या वेदनांची जाणीव करून देत होते. गच्च दाटून आलेल्या पर्जन्योत्सुक दिवसांत मधूनच एखादी पावसाची सर यावी तसा सुनंदा नानीबाईच्या काळजातून मधेच गहिवर दाटून येई. मग हुंदके बाहेर पडत. नानीबाई रडू लागताच आजूबाजूच्या सगळ्या बायका रडत. मग पोरीबाळीही त्यांच्या सुरात सूर मिसळत. या कोलाहलाने घाबरलेली पोरं मोठय़ाने भोकाड पसरत. भावनांचे आवेग अधूनमधून बाहेर पडत तेव्हा गजूनानाच्या बाजूला बसलेल्या त्याच्या पोरी, सुना मोठमोठय़ाने गळा काढत. रडण्याचा आवाज वाढला की घराबाहेरची गडीमाणसं आत डोकावत. त्यांना वाटे, नाना गेला की काय! आत डोकावणारा माणूस सांगे, ‘‘आजूक ग्येला नाही नाना! थोडी धुगधुगी हाय!’’

नानाच्या देहात थोडी धग असल्याचं कळताच माणसं सुस्कारे सोडत. नानाची तरणी पोरं मनातल्या मनात धुमसत. मग कुणी काहीही शंका काढे. लोकांच्या सूचनांनी बायकांचा जीव कातावून जाई. मग हळूच आतली एखादी ढालगज बाई बाहेरच्या बाप्यांना झापे.. ‘‘काय तमाशा लावलाय? हे क्येलंय का आन् ते क्येलंय का? इतकीच काळजी आसंल तर दौलतभाऊंना आणा की हिकडं! उगी किरकिर लावलीया कवाच्यानं!’’ दौलतचं नाव निघताच सगळा माहौल थंडा पडे. आतल्या बायकांचा आवाजदेखील काही क्षण बंद होई. नंतर पुन्हा गडीमाणसांची चुळबूळ सुरू होऊन कुजबुज वाढे. ज्याच्या त्याच्या तोंडी दौलतचं नाव येई. ‘‘भाऊनं आता यायला पायजे. भाऊनी लच ताणून धरलं..’’ अशा प्रतिक्रिया उमाळ्यासह बाहेर पडत. मग कुणीतरी पुढाकार घेत सांगे, ‘‘मारुतीअण्णा गेलेत भाऊला आणायला. येतीलच आता!’’ मग ‘अमका गेलाय, तमका गेलाय’ अशी अनेक नावे कानावर पडत. कुणीतरी लक्षात आणून देई की, नावं घेतलेली माणसं इथंच गावगर्दीत उभी आहेत. पुन्हा उसासे बाहेर पडत. खरं तर दौलत भोसल्यांना आणायला कुणी गेलंच नव्हतं. त्यांच्यासमोर उभं राहण्याची हिंमत कुणातच नव्हती. कारण अख्खं गावच त्यांचं अपराधी होतं. नकळत वस्तीवरची माणसं कासावीस होत होती. आभाळात मेघांच्या काळजातलं पाणी जागीच थिजत होतं.

दौलत भोसले हे गजेंद्रचे मोठे भाऊ. गावातलं एकेकाळचं तालेवार घराणं. दोघा भावांची मिळून चाळीस एकर जमीन होती. दहा एकर कोरडवाहू, तीस एकर बागायत. दौलतला एक मुलगा आणि तीन मुली होत्या. तर गजेंद्रला दोन पोरं आणि दोन पोरी. काळानुरूप दौलतच्या पोरींच्या लग्नाचा विषय निघाला आणि गजूनानाच्या हावऱ्या स्वभावानं उचल खाल्ली. दौलतनं बायकोच्या अब्रूवर हात टाकल्याचं कुभांड त्यानं रचलं. सुनंदानं याला विरोध केला तर तिला पोराबाळांसह घराबाहेर काढायची धमकी देऊन तिचं तोंड बंद केलं. या धक्कादायक आरोपाचा निवाडा करायला पंचायत बसली. पोलिसांत जाण्याऐवजी मामला आपसात निपटायचं ठरलं. दौलतला शिक्षा म्हणून गजेंद्रने मनाजोगती जमिनीची वाटणी मागितली. बागायत आपल्याला आणि गावाच्या दुसऱ्या शिवंला धोंडीच्या माळाला लागून असलेली जिरायत दौलतला द्यायची मागणी केली. गजेंद्रच्या कांगाव्याने बिथरलेल्या पंचायतीनं दौलतची बाजू नीट ऐकूनदेखील घेतली नाही. मितभाषी, परोपकारी स्वभावाच्या दौलतने भावाविरुद्ध, गावकीविरुद्ध न जाता तडजोडीस होकार दर्शवला. मात्र, त्या दिवसापासून त्यानं गावात कधी पाऊल टाकलं नाही. आपला सगळा बाडबिस्तरा त्यानं रानात हलवला.

आपल्या तिन्ही मुलींची लग्नं त्याने कशीबशी केली. कष्टकऱ्यांच्या कुटुंबांत मुली दिल्या. गावकी आणि भावकीला लग्नाचं निमंत्रण टाळणाऱ्या दौलतला लग्नाचा खर्च भागवण्यासाठी मुरमाड रानात काहीच पिकत नसल्यानं पाच-सहा एकर जमीन विकावी लागली होती. असं असूनही तो आणि त्याचं पोरगं मातीस भिडत. गजेंद्रच्या हिश्शात आलेल्या रानाचा कस जोमदार होता. शिवाय विहिरीला बारमाही पाणी होतं. पोरींची लग्नं त्यानं थाटामाटात करून दिली. पण पुढं जाऊन त्याचं गणित बिघडलं. पोरी विधवा होऊन माहेरी परतल्यानंतर एके दिवशी रानात कुळव धरायला गेलेला गजूनाना जागेवरच कोसळला. त्या दिवसापासून गजूनानानं अंथरूण धरलं. कारण त्याच्या शरीराची डावी बाजू लुळी पडली होती. तेव्हादेखील मारुतीअण्णांनी दौलतला बोलावून घ्यायचा सल्ला दिला होता. पण दौलतच्या स्वाभिमानानं दुखावलेली पंच मंडळी राजी नव्हती. बरीच वर्षे झाडपाल्याची औषधे खाल्ल्यानंतर गजूनाना अर्धमुधर्ं बोलू लागला. आपला अपराध त्यानं मान्य केला. दौलतची क्षमा मागण्यासाठीच आपण जिवंत आहोत असं त्यानं सुनंदाला सांगितलं तेव्हा तिच्या अश्रूतून एकाच वेळी सुख आणि दु:ख वाहत होतं.

सुनंदेच्या दोन्ही मुलांनी दौलतच्या शेतावर जाऊन माफी मागितली. आजारी पित्याचा पश्चात्ताप कानी घातला. पण दोन दशकं अपमान आणि अवहेलनेसोबतच दारिद्र्य आणि विवंचनेच्या छायेत जगणाऱ्या दौलतने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याचं मन द्रवलं नाही. आपल्या आयुष्याची धूळधाण केलेल्या भावाची भेट काही त्याने घेतली नाही. यानंतर गजूनानाची तब्येत ढासळतच राहिली. त्याला फक्त भावाच्या भेटीची आस उरली होती. गजूनानात झालेला फरक दौलतच्या लक्षात यावा म्हणून सुनंदेनं आणि तिच्या मुलांनी गावासाठी कंबर कसली. विहिरीतलं पाणी गावासाठी उपलब्ध केलं. दुष्काळात गुरांसाठी कडब्याची गंज रिकामी केली. जमेल ती मदत केली. काळ तसाच वेगाने पुढे जात राहिला. गजूनानाच्या पोरांनी हरेक प्रयत्न करूनही दौलतचा निर्णय बदलला नाही.

आणि अखेर तो दिवस उगवलाच.. जेव्हा गजूनानाचे मोजके श्वास उरले होते. सगळ्यांच्या काळजात कालवाकालव होत होती. प्रत्येकास वाटत होतं की आता दौलतभाऊंनी यायला हवं, पश्चात्तापाच्या आगीत होरपळणाऱ्या आपल्या भावाला आता माफ केलं पाहिजे. दरम्यान, घरातला आक्रोश हळूहळू वाढू लागला. गजूनानाच्या छातीचा भाता आता वेगाने हलत होता. नजर आढय़ाकडे वळत डोळे पांढरे होऊ लागले होते. ओठातून वाहणारी लाळ हनुवटीवरून ओघळत होती. जबडा बंद होत नव्हता. हातपाय दांडरत होते. डोळ्यांतून पाणी पाझरत होतं. तोंडातलं पुटपुटणं जवळपास बंद झालं. त्याच्या तोंडातून घूंघूं आवाज येऊ लागताच बायकांनी एकच कालवा केला. आता काही क्षणात गजूनानाचा श्वास थांबणार हे सर्वानी ओळखलं. त्याच्या विधवा मुलींनी एकच टाहो फोडला. सुनंदाने त्यांना कुशीत घेतलं. तिच्या सुनांना रडताना पाहून साऱ्यांना गलबलून येत होतं. आवाजाने तिची मुलंदेखील घरात आली. एखाद्या इच्छेत अडकून पडल्यागत गजूनानाचा जीव काही केल्या जात नव्हता. त्याची जीवघेणी घालमेल पाहून मुलं ओक्साबोक्शी रडू लागली. इतका वेळ केवळ कुजबुजणारी गर्दी गडीमाणसांच्या रडण्यानं घायाळ झाली. अनेकांनी सदऱ्याच्या बाहीने डोळ्यांच्या ओल्या कडा पुसल्या. सरपंच मारुतीअण्णांना राहवलं नाही. ते तरातरा आत गेले. अंगाचं चिपाड झालेल्या गजूनानाच्या अस्थिपंजर देहाकडे पाहत त्यांनी स्वत:च्याच गालावर थपडा मारून घेत टाहो फोडला- ‘‘माफ कर रे विठ्ठला, त्या पापात मी पण सामील होतो रे! आता तरी माझ्या गजूला मोकळं कर बाबा!’’ कंबरेत वाकलेल्या, आयुष्यभर ताठय़ात जगलेल्या मारुतीअण्णांचा हा पवित्रा गावाला नवा होता. त्यांच्या आवाजाने गजूनानाचे डोळे क्षणभर किलकिले झाले. इतक्यात बाहेर गलका उठला. मारुतीअण्णा मागे वळेपर्यंत दौलतभाऊ आत आले होते. आत येताच त्यांनी आपल्या भावाकडे झेप घेतली. गजूनानाच्या गालावरून हात फिरवताना त्यांच्या डोळ्यातून पाझरलेले अश्रू कपाळावर पडत होते. भावाच्या स्पर्शाने गजूनानाला काहीशी तरतरी आली. हाताची बोटे थरथरली. ती हालचाल पाहताच दौलतनं त्याचा हात हातात घेत घट्ट आवळला. एक क्षणासाठी गजूनानानं अंधुकसे डोळे उघडून दौलतकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणाला त्याचा हात दौलतच्या हातातून निसटला. घरात एकच कल्लोळ झाला. भोसल्यांचं सगळं घरदार दौलतच्या गळ्यात पडून रडू लागलं. मायेच्या ओलाव्यास उधाण आलं. आणि एकाएकी घराबाहेर विजा चमकत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊसथेंबांत दाटलेला गजूनानाच्या मायेचा ओलावा मातीच्या कुशीत झिरपू लागला.

sameerbapu@gmail.com