समीर गायकवाड

अलीकडे राऊताच्या घरी सकाळपासूनच भांडण लागायचं. तिन्ही सुनांच्या कालव्याला म्हातारी गंगू कातावून जायची. घरी बायकांचा धुरळा उठायचा तेव्हा ज्ञानू राऊत कुठंतरी उलथलेला असे. आपणच तिन्ही सुनांच्या तोंडाला लागतो, आपला कारभारी आपली बाजू घेत नाही असं गंगूला वाटायचं. तिच्यालेखी ज्ञानू ‘अंडं म्हणजे उंबर आणि ससा म्हणजे सांबर’ अशा बलबुद्धीचा माणूस होता. ज्ञानू भोळसट होता. व्यवहारात कमी होता, मनानं मात्र सच्चासीधा होता. लोकांची भांडणं मिटवायला जाणं हा त्याचा आवडता उद्योग. पण व्हायचं असं की, तो जायचा तंटा मिटवायला आणि गव्हाची कणीक करून यायचा. लग्न झाल्यापासून ज्ञानू गंगूच्या पदराला बांधून होता. तिच्या तोंडाची टकळी चालू झाली की आढय़ाला नजर लावून मुकाट बसायचा. ‘चूक झाली, इथून पुढं गप राहतो,’ असं म्हणणारा ज्ञानू बदलत नव्हता.

ज्ञानूचं खानदान नावाजलेलं होतं. शिवाय, जमीनजुमलाही भरपूर होता. पोरंदेखील मेहनती होती. दिवसभर राबराबून त्यांनी मातीतून सोनं पिकवलं होतं. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. त्यामुळं मुलांना चांगल्या सोयरिकी आल्या. थोरल्याचं, मधल्याचं लग्न एका मांडवात थाटात लावून दिलं. तिन्ही मुलांच्या पाठीवर काहीशा उशिराने झालेली अनुसूया ही ज्ञानूची एकुलती पोर. त्यामुळं गंगूबाईचा जीव तिच्यावर अंमळ जास्तीच होता. धाकटय़ा पोराचं आणि अनुसूयेचं लग्न एकाच मांडवात झालं. अनुसूयेनं आपल्या आईचे सगळे गुण घेतले होते, त्यामुळे ज्ञानूला तिची काळजी असायची. बक्कळ हुंडा देऊन गोरख भोसल्यांच्या तालेवार श्रीमंत घरात तिला दिलं होतं. ती भोसल्यांची लाडाची सून झाली होती. जवळच्याच गावात राहणारा गोरख हा ज्ञानूचा चांगला मित्र असल्यानं ज्ञानूची चिंता मिटली होती. तर लाडकी लेक जाऊन धाकटी सून घरात आली तेव्हा गंगूबाई काहीशी चिडखोर झाली होती. या दोन्ही लग्नांत ज्ञानू निव्वळ भालदार-चोपदारागत उभा होता. सगळा कारभार वरमाईच्या हाती होता. गावालाही हे ठाऊक असल्यानं नवल वाटत नव्हतं. कजाग, हेकेखोर स्वभावाच्या गंगूबाईला ज्ञानूनं कधी दुखावलं नव्हतं. त्याची मुलंदेखील त्याच्याच वळणावर गेली होती. आईच्या शब्दापुढं जायची त्यांची मजल नव्हती. खरं तर त्यांना आपल्या बापाबद्दल सहानुभूती वाटायची.

अनुसूयेचं लग्न झाल्यावर तिचं माहेरी ‘येती-जाती’ करून झालं. द्य्ोव द्य्ोव झालं. ‘धोंडय़ा’चं कौतुक झालं. दिवाळसणासह हरेक सणवाराला चोळी-बांगडी देऊन झाली. बघता बघता अनुसूयेच्या लग्नाला पाचेक वर्ष उलटून गेली. तिला दोन अपत्यं झाली. दोन्ही बाळंतपणाला माहेरी आल्यावर आईसोबतचं तिचं मेतकूट पक्कं झालं. कुठल्या न कुठल्या कारणानं अनुसूया माहेरी यायची. आईच्या कानाला लागायची. माजघरात खेटून बसत चोरटय़ा आवाजात दोघी मायलेकी कुचूकुचू करत बसायच्या. रडक्या तोंडानं माहेरी आलेली अनुसूया परत जाताना खूश दिसायची. मधल्या काळात गोरख भोसल्यांनी दोन-तीन वेळा ज्ञानूला बोलवून घेतलं, नंतर एकेक करून ज्ञानूच्या पोरांनाही भेटीचे सांगावे धाडले. ज्ञानूची मुलंही त्यांच्याकडं जाऊन आली. तिकडून येताच त्यांचे चेहरे पडलेले असायचे. अनुसूया माहेरी आल्यावर तिला बगलेत घेऊन बसणारी, गोडधोड खाऊ घालणारी गंगूबाई सुनांना मात्र हिडीसफिडीस करायची. त्याही बापडय़ा ऐकून घ्यायच्या. सासूच्या, नणंदेच्या पुढंपुढं करायच्या. पण यंदाच्या वर्षांत काही तरी बिनसलं. गंगूच्या सुनांची आपसात कळवंड लागायची. अंगावर धावून जात झिंज्या उपटायच्या. त्यांचा रौद्रावतार पाहताच गंगूबाईची बोबडी वळायची. इच्छा असूनही ती मधे पडू शकत नव्हती. चुकून तिनं मध्यस्ती केलीच तर तिचेच भुस्कट पडे. पुढे जाऊन सुनांचा कज्जा इतक्या विकोपाला गेला की त्यांनी वायलं काढून द्यायचा धोसरा लावला. ज्ञानूच्या घुम्या स्वभावानं घर तुटतं की काय या भीतीनं गंगूबाईला पुरतं ग्रासलं. मेंदूचा गरगटा झालेली गंगूबाई कावून शेताकडं निघून जायची.

गंगूची पावलं मोजत ज्ञानू शेताकडे जायचा. धोंडीच्या माळावर लिंबाच्या झाडाखाली गुडघं दुमडून बसलेल्या गंगूजवळ अल्लाद जाऊन बसायचा. वारं सूऽसू करत कान भरायचं, गरम धुरळा पाला पाचोळ्यासंगं उडत इकडून तिकडं घुमायचा. नवरा आल्याची जाणीव होताच गंगू त्याच्याकडं न बघता पदर ठीकठाक करत त्याचं एक टोक दातात धरत दुसरीकडनं कपाळावरून खाली ओढायची. गुडघ्याभोवती हाताची मिठी करायची, जोडवी मातीत रुतली तरी बोटांनी माती टोकरायची. ज्ञानू घसा खाकरायचा. हात झटकून सभोवताली पाहत ठस्कून बघायचा. पण गंगू बधत नसायची. काही क्षण शांततेत जायचे. ज्ञानूने हळूच स्पर्श करताच मोठय़ा फणकाऱ्याने तोंड फिरवायची. ‘एव्हढा राग बरा नव्हं’ म्हणत तो गोडीगुलाबी करायचा. मग ती म्हणायची, ‘‘एक टाचकं कुठल्या सुनंला उचलाया लावू नगासा. कडबा कुट्टी दिकून मी करीन पर कुटल्या सुनेला अन् कोणत्या लेकाला वाडं कापाया सांगू नका. सगळी कामं मी करीन. अजून मी मोप धडधाकट हाय. मला इतक्यात धाड भरत नाय. रक्ताचं पानी करीन, पर तुमी माझं ऐका. एक गुंठा दिकून कुणाच्या नावावर करू नका. आपण इथंच वस्तीवर राहू.’’ एका दमात काळजातलं ओठावर आणायची. ज्ञानू सुस्कारा सोडत होकार द्यायचा. पण त्याच्यानं काहीच होणार नव्हतं. आणि झालंही तसंच. सुनांचं भांडण विकोपाला गेलं. एका घरात चार चुली झाल्या. भिडस्त स्वभावाचे नवरे आणि सासरा निव्वळ बघे झाले. अखेर वाटणी करायचं ठरलं. गंगूनं लाख बोंब मारून बघितली, पण तिच्याकडं कुणी लक्ष दिलं नाही. भावकीकडून सांगून झालं. पाव्हण्या रावळ्यांनी शब्द टाकून बघितला, पण सगळं व्यर्थ! अखेर गंगूनं सरपंचांकडे धाव घेऊन पंचायत बसवून घरातला तंटा मिटवायला सांगितलं.

संक्रातीच्या दिवशी पंचायत बसायची ठरली. आपल्या घरात चाललेल्या घडामोडींनी अनुसूयादेखील भांबावून गेली होती. संक्रातीच्या आदल्या रात्रीच ती माहेरी आली. ती येताच गंगूनं सगळा पाढा तिच्यापुढे वाचला. पण आता वेळ टळून गेली होती. गंगूला हा आपला पराभव वाटत होता. आता गाव आपल्याला घाबरणार नाही. आपल्याला किंमत नसणार याचं तिला शल्य वाटू लागलं. अखेर तिनं एक निश्चय केला. पहाटेच उठून तिनं सगळ्यांच्या आधी आवरलं. सुना झाडलोट करत असताना तिची वेणीफणी उरकली. सडा सारवण करणाऱ्या सुनांपाशी जाऊन ती उपहासाने हात जोडत म्हणाली, ‘‘बायांनो, आता खुशाल भांडत बसा. मी जात्ये जीव द्यायला..’’ तिला वाटलं की, हे ऐकताच सुना आपल्याला अडवतील. गयावया करतील. मग आपण तंटा मिटवू. पण झालं उलटंच. सुनांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. गंगू चडफडत निघून गेली. ती गेल्याचं कळताच अनुसूया उर बडवून घेऊ लागली. जीव द्यायचा म्हणून गंगू घरातून निघून गेली खरं, पण तिची पावलं रेटत नव्हती. वाटेतल्या वस्त्यांवर थांबत, नजर मागं ठेवत बऱ्याच वेळानं ती रवाना झाली. आपल्याला अडवायला कुणी तरी येईल ही तिची आशा फोल ठरली. उदास मनानं जड पावलांनी ती चालत राहिली. वाटंतला फुफुटा पायावर साचला. पाठीवरून वाहणारे घामाचे ओघळ कंबरेपर्यंत आले. केस विस्कटून गेले. वाऱ्यावर फडफडणारा पदर आवरायचं भानही तिला राहिलं नव्हतं. अंगं थरथरत होतं. श्वास वेगानं होत होते. मान लटपटत होती. रोजची पायाखालची वाट असूनही शेताच्या निसरडय़ा बांधावरून जाताना ती घसरत होती. आपल्याच तंद्रीत होती ती. एकाएकी ज्ञानूचा आवाज कानी आला आणि तिची तंद्री भंग पावली, ‘‘कारभारीण बाई, औ कारभारीण बाई.’’ तिच्या समोरच ज्ञानू आणि व्याही गोरख भोसले उभा होता. असं अवकाळी वख्ताला आपल्या व्याह्यला शेतात पाहून गंगूबाई वरमली. पदर डोईवरून घेत, पावलं चोरून घेत ती जागीच थबकली. प्रश्नार्थक मुद्रेने तिने ज्ञानूकडे पाहिलं. काही क्षण नि:शब्द गेल्यावर गोरखच बोलला, ‘‘अवो ताईसाब, जीव द्य्ोयाची काहीच जरूर नाही, सगळं नाटक होतं े! तुमच्या सुना तुमच्या शब्दाबाहेर नाहीत. पण मीच त्यास्नी गळ घातली.’’ गंगूबाई आता पुरती चक्रावून गेली. पाव्हणा कोडं का घालतोय हे तिला उमगत नव्हतं. तिचा प्रश्नांकित चेहरा पाहून गोरख म्हणाला, ‘‘अनुसूयेने आमच्या घरात ोच कुटाणा क्येला. तिला वायलं काढून पायजे होतं. तिच्या डोस्क्यातली माती टोकरून बघितली तर तुमचं नाव म्होरं आलं. तवा आधी ज्ञानूशी बोललो मग तुमच्या मुलास्नीबी बोललो. मंग हे सगळं ठरलं. तुमच्या पेरणीचा फेरा तुमच्याकडं येणारच की! आता तुमचं घर फुटतंय याचं अनुसूयेला वाईट वाटतंय नव्हं, तसं आमचं घर फुटताना आमाला बी वाईट वाटतं. तकलीफ हुत्ये. तवा तिला चार शब्द समजावून सांगा. तिला उद्याच सासरी लावून द्या. मी आल्या पावली माघारी जातो. उगाच चर्चा नको व्हायला.’’ एका दमात गोरख बोलला. खाली मान घालून उभ्या असलेल्या गंगूला मेल्याहून मेल्यासारखं झालं.

दुसऱ्याच दिवशी आपला बाड-बिस्तरा गुंडाळून अनुसूया सासरी गेली ती लवकर आलीच नाही. इकडे राऊतांच्या घरी ज्ञानूच्या शब्दाचं वजन आस्ते कदम वाढत गेलं.

sameerbapu@gmail.com