नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

एक एप्रिल १९५५..

chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे

या दिवसाला मराठी संगीताच्या इतिहासात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. रेडिओच्या स्पीकरमधून भूप रागातील एक सुरावट ऐकू आली आणि समस्त महाराष्ट्रातील काव्य आणि संगीतप्रेमी रसिकांच्या आयुष्यात एका समृद्ध अध्यायाची सुरुवात झाली. त्यानंतर जवळजवळ वर्षभर या काव्य-संगीताच्या मैफिलीने रसिकांना इतक्या मोठय़ा प्रमाणावर मोहित केले की त्यासारखा योग त्यानंतरच्या ६५ वर्षांमध्ये आजपर्यंत जुळून आलेला नाही. या अभूतपूर्व कलाकृतीचे जनक होते महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. माडगूळकर आणि महाराष्ट्रातील भावसंगीत आणि चित्रपट संगीताच्या इतिहासातील सर्वात मोठे नाव- अर्थात सुधीर फडके म्हणजेच बाबूजी. आणि हे भव्य संगीत-काव्यशिल्प म्हणजे महाराष्ट्राचे लाडके ‘गीत रामायण’!

पुणे आकाशवाणीचे स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांच्या संकल्पनेतून गीत रामायणाचा जन्म झाला. वर्षभर दर शुक्रवारी रामायणाच्या कथेतील प्रसंगांवर आधारित एक गीत सादर करायचे, ही कल्पना प्रत्यक्षात आणणे ही अत्यंत अवघड गोष्ट होती. गदिमांनी हे आव्हान स्वीकारले. गदिमा हे नुसतेच प्रतिभावान कवी नव्हते, तर ते एक उत्तम पटकथालेखकही होते, हे ‘गीत रामायण’ नजरेखालून घातले की जाणवते. कुश आणि लव हे दोघे कुमार रामाच्या दरबारात येतात आणि फ्लॅशबॅक पद्धतीने सारे ‘रामायण’ श्रीरामासमोर गाऊन दाखवतात, ही कल्पना एखाद्या उत्तम पटकथालेखकालाच सुचू शकते. ‘कुश-लव रामायण गाती’ या गीतापासून सुरू होऊन ‘गा बाळांनो श्री रामायण’ या गीतावर हे वर्तुळ पूर्ण होते. गीत रामायणातील बहुतेक गाण्यांमध्ये कथा तशा अर्थी पुढे जात नाही. घडून गेलेल्या प्रसंगांवर त्या- त्या संबंधित पात्रांनी केलेले भाष्य असे गीत रामायणाचे स्वरूप आहे. त्यामुळे गीत रामायणातील बहुतेक गाणी ही तशा अर्थी action packed स्वरूपाची नाहीत. त्यामुळेच त्या गाण्यांना एक स्थिरभाव आहे. म्हणजे सर्वच गाणी शांत वा करुण रसातली आहेत असं नव्हे; वीर रस, क्रोध आणि भय या भावनासुद्धा या गाण्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. गाण्यांची संगीतरचना करताना बाबूजींनी गदिमांच्या काव्यातील हे मर्म अतिशय उत्तम पद्धतीने जाणलेले दिसते. बहुतेक गाणी ही त्यामुळे एका तालात आणि एका रागात बांधलेली आपल्याला दिसतात. ‘गीत रामायण’ आले त्या काळात चित्रपटांचा प्रभाव मराठी रसिकांवर आजच्या इतका प्रबळ नव्हता आणि दूरदर्शनचा जन्मही त्यावेळी झाला नव्हता. त्यामुळे या स्थिर प्रकृतीच्या गाण्यांनी मराठी भाविक रसिकांच्या मनाचा ताबा घेतला आणि कधीही लोप न पावणारी लोकप्रियता गीत रामायणाला मिळाली.

‘गीत रामायण’ हे श्रीरामाचे चरित्र सांगणारे काव्य असले तरीही त्याला संगीतबद्ध करताना ते कुठल्याही अर्थाने पठडीतले भक्तिसंगीत होऊ नये याकरता बाबूजींनी अतिशय कल्पक पद्धतीने यातील संगीत योजलेले दिसते. भजनी तालात गीत रामायणातील बरीच गाणी आढळतात. परंतु यातली कुठलीही गाणी अभंग वाटणार नाहीत याची पुरेपूर काळजी बाबूजींनी घेतली आहे असं पदोपदी जाणवतं. भक्तिगीतांपेक्षा ही गाणी भावगीत म्हणून जास्त योग्य आहेत हे त्यांनी जाणलं व त्यानुसार गाण्यांची संगीतरचना केली.

पहिल्याच गाण्याकरता बाबूजी भूप राग वापरतात. आपल्या दिवसाची सुरुवात भूपाळीने होते आणि भूपाळीचे स्वर कानी पडले की मंगलमय वातावरण तयार होत आहे याची जाणीव सवयीने आपल्याला होते. वास्तविक पाहता भूप हा प्रभातकालीन राग नव्हे, तर तो कल्याण थाटातील संध्याकाळचा राग आहे. परंतु तरीही पहाटेची भूपाळी म्हणजे भूप राग असा समज जनमानसात खोलवर रुजलेला आहे. त्यामुळेच भूप राग हा एक आरंभाचा राग आहे असं सगळीकडे मानलं जातं. हीच रसिकांची मानसिकता लक्षात घेऊन पहिलं गाणं भूप रागात बांधण्यात आलं आणि पहिल्याच प्रसारणात पुढील लोकप्रियतेचं बीज रोवलं गेलं! गीत रामायणातील पुढील बहुतेक सर्व गाण्यांत बाबूजींनी वेगवेगळ्या रागांची योजना केली आहे. मराठी नाटय़संगीताने बहुतेक उत्तर हिंदुस्थानी रागांची ओळख मराठी रसिकांना करून दिली होतीच; परंतु तरीही नाटय़संगीत गाणे किंवा आपल्याला ते गाता येत आहे असे वाटणे ही सर्वसामान्यांच्या कक्षेतील गोष्ट नव्हती. परंतु साध्या, सोप्या वाटणाऱ्या चाली आणि त्याकरता झालेली साधी-सोपी वाटणारी तालाची योजना यामुळे गीत रामायणातली गाणी व पर्यायाने त्या गाण्यांचे राग मराठी रसिकांना सहजपणे गुणगुणावेसे वाटू लागले आणि नकळत का होईना, पण शास्त्रीय संगीत सामान्य रसिकांच्या ओठी खेळवण्याचं मोठं श्रेय गीत रामायणास जातं. ‘गीत रामायण’ ही सर्वसामान्य रसिकांकरिता त्यांना समजेल अशा पद्धतीने बांधली गेलेली एक रागमालाच आहे असं निश्चितपणे म्हणता येईल.

भूपप्रमाणेच विशेषकरून मराठीजनांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला एक राग म्हणजे भीमपलास. मराठी नाटय़संगीतामध्येही हा राग मुबलक प्रमाणात वापरला गेला. पहिलं गाणं आहे ‘दशरथा घे हे पायसदान..’ अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात हे गाणं सादर होतं. परंतु हाच भीमपलास आपल्याला ‘मज सांग अवस्था दूता रघुनाथांची’ या गाण्यामध्ये अत्यंत अस्वस्थ करून टाकतो. सीतेला रामाची वाटणारी काळजी आणि भय हे टोकाचे परिणाम याच भीमपलासने अत्यंत उत्कटपणे या गाण्यात सादर केलेले आढळतात. त्याच काळजी आणि भयामध्ये ‘कधी रामबाण का घुसेल रावणवक्षी’ या ओळीत सीतेला रावणाविषयी वाटणारा राग आणि तिरस्कार हे भाव अचानकपणे प्रकट होतात. वेगाने वरच्या गंधाराला जाऊन भिडणारी चाल इतक्या सुंदरपणे आपल्या अंत:करणाला भिडते की बाबूजींना दाद दिल्यावाचून राहवत नाही.

भैरवीचाही फार सुंदर वापर बाबूजींनी गीत रामायणात केलेला आढळतो. भैरवीतील गाणीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे भाव व्यक्त करणारी आहेत. ‘अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम-रावणाचे’मधील वीरश्रीयुक्त भैरवी, ‘लक्ष्मणा, तिचीच ही पाऊले’मधील सीतावियोगाने उद्ध्वस्त रामाचे दर्शन घडवणारी भैरवी आणि शेवटच्या ‘गा बाळांनो श्री रामायण’मधील अत्यंत प्रसन्नपणे कथेचं वर्तुळ पूर्ण करणारी भैरवी या भैरवीच्या भिन्न भिन्न छटा आपल्याला ऐकू येतात. परंतु हे राग सोडून बाबूजींनी अनेक वेगवेगळे राग वापरलेले आपल्याला दिसतात. ‘लाडके कौसल्ये राणी’मधला देस, ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’मधला सोहनी, ‘जेथे राघव तेथे सीता’मधील मधुवंती, ‘थांब सुमंता थांबवी रे रथ’मधील तोडी, ‘माता न तू वैरिणी’मधला अडाणा, ‘तात गेले माय गेली’मधील पुरिया- धनाश्री, ‘धन्य मी शबरी श्रीरामा’मधला शुद्धसारंग, ‘सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला’मधील वृंदावनी सारंग, ‘असा हा एकच श्री हनुमान’मधला मुलतानी, ‘आज का निष्फळ होती बाण’मधला जौनपुरी आणि ‘लीनते चारुते सीते’मधला यमनी बिलावल असे विविध प्रकृतींचे राग बाबूजींनी गीत रामायणात वापरले. समूहस्वरांचा वापर करून आकारास आलेलं उत्तर हिंदुस्थानी लोकगीतांच्या वळणाचं ‘नकोस नौके परत फिरू’, ‘सेतू बांधा रे सागरी’ आणि रावणवधानंतरचं ‘भूवरी रावणवध झाला’ ही गाणी तर लाजवाबच. ‘स्वयंवर झाले सीतेचे’ आणि ‘राम जन्माला ग सखी’मधील मिश्र मांडचा प्रयोग हाही अतिशय रोमांचित करणारा! परंतु बाबूजींच्या प्रतिभेचा अत्यंत श्रेष्ठ आविष्कार म्हणजे ‘मरणोन्मुख त्याला कारे मारीसी पुन्हा रघुनाथा’ या गीताकरिता योजलेला मारुबिहाग आणि ‘सुग्रीवा हे साहस असले’साठी अतिशय चपखलपणे रचलेला पंचम मालकंस.. हे राग मराठी संगीतामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने वापरल्याचे दुसरे उदाहरण नाही.

परंतु गीत रामायणातील गीत-संगीताचा परमोच्च बिंदू म्हणून ज्या गाण्याचा उल्लेख केलाच पाहिजे ते म्हणजे ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गाणे. असं म्हणतात की, बाबूजींनी या गाण्याची चाल सुरुवातीला दरबारी कानडा या रागात केली होती. परंतु त्या गाण्यातल्या तत्त्वज्ञानाची व्याप्ती, त्याची वैश्विकता आणि गदिमांची शब्दकळा दरबारी कानडा या रागात तितकीशी नीटपणे व्यक्त होत नाही असे लक्षात आल्यावर बाबूजींनी रेकॉर्डिगच्या अर्धा तास आधी ती चाल बदलून यमनकल्याण या रागाची योजना केली. जेवढा व्यापक या गाण्याचा अर्थ आहे, तितका मोठा पट स्वरांतून उलगडून दाखवण्याकरिता यमन कल्याणसारखा उत्तुंग रागच उपयोगी ठरू शकतो, हे बाबूजींनी जाणले आणि आयत्या वेळेस काहीही चाल न ठरवता वादकांना फक्त ध्रुवपदाच्या चालीची कल्पना देऊन ते दहा कडव्यांचे गाणे डायरेक्ट रेकॉर्ड केले आणि त्यावेळच्या पद्धतीनुसार ते त्याच वेळेला प्रसारितसुद्धा झाले! शास्त्रीय संगीताच्या मैफलीमध्ये अशी उपज निष्णात गायक करीत असतो. परंतु सुगम संगीताच्या थेट प्रसारणामध्ये या पद्धतीने गाणे त्याच वेळेस म्हणता म्हणता संगीतबद्ध करून ते सादर होणे व ते इतक्या वरच्या दर्जाचे होणे ही भारतीय संगीतातील एकमेव घटना असावी!

गीत रामायणाकरता विविध निष्णात आणि प्रसिद्ध गायकांची योजना केली गेली होती. रामाच्या आवाजाकरिता आणि कधी कधी सूत्रधाराच्या भूमिकेतसुद्धा स्वत: बाबूजी, सीतेसाठी माणिक वर्मा, लक्ष्मणासाठी सुरेश हळदणकर, भरतासाठी पं. वसंतराव देशपांडे, यांखेरीज ललिताबाई फडके, कुमुदिनी पेडणेकर, मालती पांडे, योगिनी जोगळेकर, गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, चंद्रकांत गोखले आणि राम फाटक अशा मातब्बर गायकांची फौज गीत रामायणाकरता सज्ज होती. परंतु खरा मणिकांचन योग जुळून आला तो या शृंखलेतील शेवटून दुसऱ्या- म्हणजे पंचावन्नाव्या गाण्याच्या निमित्ताने! काही कारणास्तव माणिक वर्मा यांना ध्वनिमुद्रणाकरिता उपलब्ध असणे जमले नाही म्हणून ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ हे गीत लता मंगेशकर यांनी गायले आणि गीत रामायणाच्या एकूणच परिणामावर कळसाध्याय चढवला. जोगियामध्ये बांधलेली अत्यंत व्याकूळ करणारी चाल, लताजींचा आर्त स्वर, शेवटच्या adlib अंतऱ्यातील अत्यंत व्याकूळ करत जिव्हारी लागणारा शुद्ध रिषभ आणि शेवटी केलेला श्रीरामनामाचा जप या साऱ्याचे वर्णन शब्दांत होऊ शकत नाही. ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे.

गायक आणि संगीतकार यांव्यतिरिक्त आणखी दोन महान व्यक्तींचा उल्लेख केल्याशिवाय ‘गीत रामायण’ पूर्ण होऊ शकत नाही. एक म्हणजे संगीत संयोजक.. स्वत: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेले अप्रतिम व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग आणि ज्यांच्या तबलावादनामुळे या गाण्यांना एक दर्जेदार लयबद्धता प्राप्त झाली असे चित्रपटसृष्टीतील अत्यंत ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व अण्णा जोशी! खरं तर गीत रामायणातील बरीचशी गाणी ही केरवा भजनी तीनताल किंवा ज्याला सांगीतिक भाषेत ४/४ पद्धतीच्या ठेक्यामध्येच बांधलेली आहेत. ‘जोड झणिं कार्मुका’साठी झंपा, ‘राम जन्मला ग सखी’साठी दादरा, ‘तात गेले माय गेली’साठी रूपक आणि ‘सन्मित्र राघवाचा’साठी एकताल यांसारखी दहा-बारा गाणी सोडली तर इतर सर्व गाणी ४/४ मध्येच आहेत. परंतु अण्णांनी ज्या ढंगदार पद्धतीने ही गाणी आपल्या तबल्याने सजवली आहेत त्याला तोडच नाही. जोगसाहेबांचा आणि अण्णांचा सहभाग नसता तर गीत रामायणाला इतकी उंची प्राप्त झाली नसती, हे निश्चित.

आकाशवाणीच्या प्रसारणानंतर स्वत: बाबूजींनी गायलेल्या गीतांच्या ध्वनिमुद्रिकासुद्धा उदंड गाजल्या. कितीही निष्णात गायकाने गायलेले असले तरी संगीतकाराच्या तोंडून एखादे गाणे ऐकणे यासारखा ताजा अनुभव दुसरा नसतो. त्यातही बाबूजींसारखा कसलेला गायक असेल तर ती एक पर्वणीच. गीत रामायणातील गीतांचे भारतातील इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले, नृत्यनाटय़ांचेही प्रयोग झाले. गीत रामायणावर अनेक कलावंतांच्या पिढय़ांनी भरभरून प्रेम केले. कुठलीही सांगीतिक सजावट न करता, वाद्यवृंदाचा भव्य ताफा न मिरवता, केवळ शब्द आणि शुद्ध संगीत यांच्या जोरावर एवढी अफाट लोकप्रियता मिळाल्याचे दुसरे उदाहरण या देशामध्ये सापडायचे नाही! श्रीरामाप्रमाणेच इतर महापुरुषांचे आणि देवदेवतांचे चरित्र संगीताच्या माध्यमातून सादर करण्याचे अनेक प्रयत्न त्यानंतर आणि त्याआधीही झाले असतीलच; परंतु गीत रामायणाची उंची त्यापैकी कोणीही गाठू शकले नाही. इतके उत्तुंग आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत-काव्यशिल्प या मराठी मातीत रुजले आणि जोमाने वाढले यासारखे भाग्य मराठी रसिक म्हणून आपल्या पदरी पडले यापरते दुसरे सुख नाही.

Story img Loader