हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com
इतिहास म्हणजे साधारण तपशिलांची जंत्री, सनावळ्या, राजेरजवाडय़ांचे, सरदारांचे पराक्रम, धार्मिक-ऐतिहासिक-सामूहिक अस्मितांतून प्रेरणा घेण्याचा विषय अशी एक साधारण धारणा आपल्या समाजात आहे. गेल्या काही काळातील आपल्या भवतालातल्या चर्चा पाहता इतिहास शिकताना, त्यावर संशोधन करताना, त्यातील वेगवेगळ्या पैलूंचा विचार करताना साधारणत: त्यातून ‘अमुकांनी केलेले आक्रमण, तमुकांच्या राज्यांचा- संस्कृतीचा- धर्माचा विध्वंस, अमुक माणसाने तमुक माणसाचा केलेला वध व त्या वधाचे समकालीन धारणांच्या दृष्टीने औचित्य/ महत्त्व’ या व यांना समांतर अशा मुद्दय़ांभोवती या इतिहासविषयक चर्चा केंद्रित झालेल्या दिसतात. बहुसंख्याक समाजात रूढ असलेल्या इतिहासविषयक धारणाही अशाच चर्चाविश्वातून आकाराला आलेल्या दिसतात. लोकप्रिय किंवा रूढ अशा इतिहासाच्या संस्करणांची प्रकृती ही मनोरंजन आणि अस्मिताकेंद्री राजकारण/ संस्कृतीकरणाच्या अंगाने जात असली तरी इतिहासाकडे ज्ञानशाखेच्या अंगाने पाहताना त्याकडे केवळ अस्मितारंजन किंवा राजकीय विचारसरणींच्या अंगाने पाहण्याच्या सवयीपलीकडे जाऊन विविध पद्धतीच्या अंगांनी पाहायची दृष्टी विकसित करावी लागते. त्यासाठी चिकित्सेच्या अंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक तपशील-संभाषितांचा योग्य चष्म्यांच्या आधारे परामर्श घ्यावा लागतो. इतिहासाच्या चष्म्यांचा परामर्श घेताना ज्या फ्रेम्समधून ऐतिहासिक वास्तवांकडे पाहतो त्या फ्रेम्सच्या वाढत्या व्याप्ती आणि त्यांचे आंतरविद्याशाखीयत्व यांच्याविषयीच्या जाणिवा सतत जागत्या ठेवणे अत्यावश्यक असते. ठरावीक प्रकारच्या पात्रांच्या व राजकीय- सामरिक तपशिलांच्या पलीकडे जाऊन इतिहासाकडे पाहण्याचे वेगवेगळे चष्मे आणि दृष्टी हळूहळू विकसित होत जाते.
दक्षिण आशियाई संदर्भात जातीय उतरंड आणि लिंगभाव या महत्त्वाच्या गोष्टी हाताळल्याशिवाय इतिहासाचे अध्ययन करणे अशक्यप्राय होऊन बसते. भारतीय समाजरचनेचा पाया हा जात, लिंग आणि वर्ग यांचे नियमन करणाऱ्या प्रक्रियेभोवती केंद्रित असलेला दिसतो. अभ्यासकांनी दाखवून दिल्यानुसार, भीमबेटका येथील भित्तिचित्रांमध्ये फळे व इतर वन्य वस्तू गोळा करण्याच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी होण्याची मुभा होती. आपल्या मातृत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत हे काम करण्यात त्या बिनदिक्कत सहभागी होत असे दिसून येते. एका हातात मुले बसवलेली झोळी व डोक्यावर जनावर, मासे पकडणारी स्त्री, शिकार केलेले हरीण ओढत घेऊन जाणारी स्त्री अशी काही महत्त्वाची चित्रे (इ. स. पूर्व पाच हजार) या भिंतींवर दिसून आली. या चित्रांवरून त्या काळात तरी शिकार, अन्नसंचयन इत्यादी कामांत संबंधित समूहातील स्त्रियांना स्थान होते. गेर्डा लेर्नर या मानववंशशास्त्रज्ञ अभ्यासक स्त्रीने दाखवून दिल्यानुसार, प्राचीन वन्य अवस्थेत जगणाऱ्या जमातींमध्ये अन्नसंकलन, शिकार इत्यादी गोष्टींमध्ये लिंगभावदृष्टय़ा परस्परावलंबित्व होते. तिथे लिंगभावाविषयी भिन्नत्वाच्या जाणिवा असल्या तरी सामाजिक स्थानाच्या दृष्टीने उच्च-नीचता प्रकर्षांने दिसून येत नाही. श्रद्धाप्रणालीच्या उन्नयनाचा विचार केल्यासही आपल्याकडे प्राचीन श्रद्धांच्या उगमाशी मातृदेवतांची चित्रणे मेसोपोटेमिया किंवा दक्षिण अमेरिकेतील समूहांमध्ये व उपखंडाच्या संदर्भात योनिपूजा व पुढील काळात लज्जागौरीच्या रूपात पुढे येताना दिसतात. त्यातून स्त्री-पुरुष या दोघांची पुनरुत्पादनाची शक्ती मिथकात्मतेत ओवून त्याभोवती संबंधित श्रद्धाविश्वे केंद्रित झालेली दिसतात. या काळात संबंधित चित्रांशी उपासनाविश्वांशी संबंधित असलेल्या समाजातील स्त्रीचे स्थान पुरुषसत्ताक नियमावलीच्या जोखडात अडकले नसावे असा कयास बांधता येतो.
थोडे पुढे ऋग्वेद काळामध्ये येताना आपल्याला ऋग्वेदाशी संबंधित भौतिक, पुरातत्त्वीय पुराव्याचा अभाव जाणवत असला तरी ग्रंथांतील संदर्भानुसार ‘दास’ या शब्दापेक्षा ‘दासी’ हा स्त्रीलिंगी शब्द ऋग्वेदात अधिक आढळून येत असल्याचे उमा चक्रवर्ती यांनी दाखवून दिले आहे. स्त्रीधन किंवा दासींचे राजन्य या वर्गासाठी असलेले महत्त्व इत्यादी ऋग्वेदातील संदर्भ स्त्रीलिंगी व्यक्तीवरील पुरुषांच्या अधिकाराचे सूचन करतात. स्त्रियांच्या लैंगिकतेविषयीचे काही महत्त्वाचे संदर्भदेखील ऋग्वेदात सापडतात. ऊर्वशी अप्सरेचा संदर्भ या ठिकाणी रोचक ठरेल. पुरुरवा या राजाला आपल्या प्रेमपाशात ओढून त्याचा त्याग करणारी ऊर्वशी पुरुरव्याला जेव्हा भेटते तेव्हा ‘न वै स्त्रणानि सख्यानि सन्ति सालवृकाणां हृदयान्येता:’ (स्त्रियांशी सख्य, स्नेह वगैरे होत नसतो, त्यांची हृदये लांडग्याची असतात.) अशी टिप्पणी ऋग्वेदकारांनी केलेली दिसते. ऋग्वेद- काळातील समाजधारणेत पुरुषांचे स्वामित्व मान्य न करणाऱ्या, त्यांच्याशी दीर्घकालीन संबंध ठेवण्यास फारशा उत्सुक नसणाऱ्या अप्सरांसारख्या काहीशा उन्मुक्त म्हणाव्या अशा स्त्रीसमूहांविषयी काहीशी नकारात्मक धारणा अशा रीतीने लांडग्याच्या हृदयाच्या उपमेतून व्यक्त झालेली दिसते. त्याचप्रमाणे विवाहपूर्व संततीचा त्याग करणाऱ्या स्त्रियांविषयीचे काही ऋग्वेदातील संदर्भ पुरुषसत्ताक विवाहपद्धतीतून आलेल्या मर्यादांच्या जाणिवा स्पष्ट करतात. आणखी एक लक्षणीय उदाहरण यानिमित्त आठवले ते ‘जैमिनीय ब्राह्मण’ या सामवेदाशी संबद्ध असलेल्या ‘ब्राह्मणग्रंथा’तील. दीर्घजिव्ही नामक लांब जीभ असलेल्या, सोमरसाचे पान करणाऱ्या (‘भद्र/ सभ्य’ समाजात लांब जीभ हे बडबडेपणाचे किंवा आगाऊपणाचेही लक्षण मानले जाते.) ‘राक्षसी’चा बंदोबस्त करण्यासाठी इंद्र सुमित्र नामक देखण्या युवकाला तिला प्रेमपाशात ओढण्यासाठी पाठवतो. त्याला पाहून ती म्हणते, ‘तुला एकच पौरुष अवयव (लिंग) आहे. माझ्याकडे मात्र अनेक जननेंद्रिये आहेत.’ त्याच्या प्रत्येक अवयवावर लिंग निर्माण करून त्याला इंद्र पुन्हा तिच्याकडे पाठवतो व त्यांच्या रतिक्रीडेच्या वेळी ती झोपली असतानाच इंद्र तिच्यावर आघात करून तिला मारतो अशी ती कथा. कथेतील दीर्घजिव्ही, तिची कामुकता आणि सुमित्र हे पात्र पाहून ही कथा शूर्पणखेच्या कथेची आठवण करून देणारी असली तरी मूळ ‘जैमिनीय ब्राह्मणा’तील कथा लिंगभाव, जातिव्यवस्था, स्त्रियांची लैंगिकता आणि पुरुषसत्ताकता यांविषयी काय सूचित करते याचा अदमास सुज्ञ वाचकांना येऊ शकतो. रामायणात येणारी, पण ‘षड्विंशब्राह्मण’, ‘शतपथब्राह्मण’, ‘लाटय़ायन श्रौतसूत्र’ इत्यादी ग्रंथांत दिसून येणारी अशीच दुसरी कथा अहल्या नामक ऋषीपत्नीचे इंद्र नामक ‘जार’ब्राह्मणाने केलेले शोषण स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दल आणि पौरुष धारणांबद्दल विशिष्ट प्रकारचे सूचन करते. ‘शतपथब्राह्मण’सारख्या महत्त्वाच्या ग्रंथात (१४.११.३६) तर स्त्री, शूद्र यांची तुलना कावळा व कुत्रा या असत्य,पाप आणि अंध:काराचे प्रतीक मानल्या गेलेल्या प्राण्यांशी केलेली दिसते. ब्राह्मण ग्रंथांचीच री ओढलेली दिसते बौद्ध जातकांनी. स्त्री ही असत्याचे प्रतीक, वाळूप्रमाणे चंचल, निसरडी, सत्यासत्यतेचा संभ्रम निर्माण करून फसवणाऱ्या असल्याचं सरधोपट विधान जातककार सहज करतात. दुसरे एक जातक स्त्रियांना बिनदिक्कतपणे आक्रस्ताळ्या, काडय़ा लावणाऱ्या असल्याचं घोषित करून टाकतं. बौद्ध साहित्याची प्रकृती साधारणत: वैदिकविरोधी, समताप्रवण असल्याचे मानले जात असले तरी लिंगभावविषयक, सरंजामी पुरुषसत्ताकतेचे अनेक संदर्भ जातकांमधूनही सहज मिळून जातात. ‘बंधनमोक्खजातक’ या जातकामध्ये उन्मुक्त विवाहबाह्य़ संबंध ठेवणाऱ्या व ते बिंग फुटू नये म्हणून संबंधित पुरुषाविषयी राजाकडे खोटे आरोप नोंदवणाऱ्या राणीच्या कथेत तिच्या उदाहरणावरून सरसकट स्त्रीजातीवर केलेलं भाष्य अशाच धारणांचे प्रतिनिधित्व करते. स्मृतिग्रंथांतील स्त्रीविषयक धारणा आणि आखून दिलेल्या मर्यादांविषयी झालेलं लिखाण व त्याची मीमांसा ढोबळपणे सर्वाना माहिती असते, तसेच (भारतीय राजनीतीवरचा महत्त्वपूर्ण ग्रंथ मानल्या गेलेल्या) ‘कौटिलीय अर्थशास्त्रा’त स्त्रियांसंदर्भात केलेली भाष्ये आजच्या पारंपरिक वृत्तीच्या नागर संस्कृतीत वाढलेल्या सनातनी पुरुषालाही ‘अॅट्रोशियस’ वाटतील अशी आहेत. ‘कामंदकीय नीती’ किंवा ‘शुक्रनीती’सारख्या राजनीतिपर ग्रंथांत शत्रूराज्य जिंकल्यावर प्रजेवर दहशत बसवण्यासाठी प्रतिष्ठित घरे, लहान मुले व स्त्रिया यांना लक्ष्य करण्याचे तंत्र कामी येत असल्याचे सुचवले आहे. आधुनिक काळातील राजकारणातून पुढे आलेल्या धार्मिक अस्मितांतून प्रकट होणारी, समर्थ रामदासांसारख्या राजकीय भान जागृत असलेल्या संतांनी ‘किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या। किती येक त्या शांमुखी फाकविल्या।।’ अशी केलेली विधाने मध्ययुगीन-आधुनिक हिंदू-मुस्लीम राजकारणाचे संदर्भ जागविणारी असली तरी त्यांचे ‘शुक्रनीती’, ‘कामंदकीयनीती’तील या संदर्भाशी असलेले संवादीपण विसरणे अभ्यासकीय दृष्टीला नाकारून चालणारे नाही.
राजकीय आणि सांस्कृतिक अधिसत्तेच्या राजकारणात बळ (power) ही संकल्पना महत्त्वाची भूमिका पार पाडते असे आपण याआधीच्या लेखांत पाहिलं होतं. ही ‘पॉवर’ मानवी समूह आणि त्या समूहांतील सामाजिक धारणा यांच्या संस्थाकरणाच्या प्रक्रियेतून एकसाची होत जाते. समाजातील वर्गव्यवस्थेमधील आर्थिक स्तर, राजकीय सत्ता या तत्त्वांसोबतच ही तत्त्वे-मूल्ये लिंगभावाशी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मूल्यव्यवस्थेशी केंद्रित अशी असतात. राजकीय व्यवस्था, त्यातील पुरुषसत्ताकता आणि सरंजामी वृत्ती व बळाचे राजकारण हे जातिव्यवस्थेसोबतच या लिंगभावाशी- पर्यायाने पुरुषसत्ताकतेशी बेमालूम मिसळले जाते आणि त्या मूल्यव्यवस्थेला अधिक बळकट करते. वर नमूद केलेल्या उदाहरणांखेरीज स्त्रियांच्या स्वभाव-चारित्र्य, लैंगिक अभिव्यक्ती, स्वातंत्र्य इत्यादीविषयी प्रतिकूल मते व्यक्त करणाऱ्या अनेक मतांना स्त्रीपात्रे व्यक्त करताना रामायण, महाभारत व जातकांसारख्या ग्रंथांतून आढळतात. धर्मश्रद्धा (वैदिक-पौराणिक असो किंवा बौद्ध-जैन) आणि सामाजिक संरचना या व्यवस्था कृषिसंस्थेच्या निमित्ताने असेल किंवा अन्य कुठल्याही कारणाने असेल, अधिकाधिक पुरुषकेंद्री होत असल्याचे आपल्याला वारंवार दिसून येते. त्या अर्थी आजच्या लिंगसमतेच्या संभाषितांमध्येही पुरुषसत्ताकता डोकावते का, स्त्री-पुरुष समता म्हणजे नेमके काय, लैंगिक अभिव्यक्तीचे नियमन, वैयक्तिक श्रद्धा आणि सामाजिक व्यवस्थांतील लिंगभावाचे संतुलन-समीक्षण इत्यादी अनेक विषय हाताळणे आज सयुक्तिक ठरणार आहे. सरंजामी वृत्तीने भारून गेलेल्या आजच्या जगाला बाजारपेठ, धर्माग्रह आणि भांडवली व्यवस्थांच्या कोंदणात बसवले जात असताना लिंगभावाविषयी ऐतिहासिक धारणा काय होत्या, त्या कशा विकसित झाल्या याचा परामर्श घेणे गरजेचे व सयुक्तिक ठरेल.
(लेखक ‘ऑब्झव्र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)