डॉ. अक्षयकुमार काळे लिखित ‘गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ या पद्मगंधा प्रकाशनाच्या आगामी पुस्तकाच्या प्रस्तावनेतील संपादित अंश…
गालिब हा उर्दूतील पहिला आधुनिक वृत्तीचा स्वच्छंदतावादी कवी होय. त्याच्या पूर्वीचे उर्दू काव्य बरेचसे सांकेतिक आणि व्याज अभिजातवादी परंपरेत निर्माण झाले होते. आशयाभिव्यक्तीच्या ठरावीक चाकोरीबाहेर निघून, डोळे चोळून बघण्याची त्याला सवय नव्हती. गालिबने मात्र आपल्या मूळच्या बंडखोर प्रवृत्तीमुळे ही परंपरा जशीच्या तशी न स्वीकारता सतत नव्या वाटांचा शोध घेतला..
मं जो गुस्ताख़ हूँ आईन-ए-ग़ज़्‍ाल ख़्वानी में। १७८-१२
या त्याच्या उद्गारात बंडखोरीची झलक अगदी स्पष्ट आहे. ही क्रांती व्यक्तीच्या आणि एकूणच मानवाच्या स्वातंत्र्याच्या अपेक्षेतून गालिबच्या मनात अंकुरली होती. त्याचे अवघे जीवन परिस्थितीविरुद्ध संघर्ष करण्यात गेले. आयुष्यभर प्रतिकूलतेने त्याचे हात-पाय करकचून बांधून टाकले व त्यातच शेवटी त्याचा अंत झाला. तरी लौकिक जीवनाच्या या बेडय़ा तोडून टाकण्याची ऊर्मी वारंवार त्याच्या लेखनातून प्रगट झाली. त्याला ना कुणाच्या बंधनात राहायचे होते, ना कुणाला बंधनात अडकवायचे होते. या त्याच्या प्रवृत्तीमुळेच त्याच्या वाटय़ाला कडवा संघर्ष आला; ज्याचे प्रतििबब त्याच्या काव्यात जागोजाग उमटले.
गालिबचे व्यक्तिमत्त्व मुळात अत्यंत सुसंस्कृत, रसिक, खानदानी, सर्वधर्मसमभावाची बूज राखणारे, ज्ञानप्रिय, जीवनासक्त असे आहे. तारुण्याचा पहिला बहर ओसरेपर्यंत त्यात कुठलाही विरोधाभास आढळत नाही. पण हे मुक्त, स्वच्छंदी जीवन त्याला फार काळ लाभले नाही आणि वयाच्या पंचविशीतच जीवनातील अनंत चिंताकाहुराने त्याचे व्यक्तिमत्त्व ग्रासून गेले. आíथक अडचणींचे काळेभोर मेघ, जे त्याच्या तारुण्यातच त्याच्या डोक्यावर दाटून आले होते, ते कधी दूर हटलेच नाहीत. उलट, दबा धरून बसलेल्या श्वापदाप्रमाणे त्याला भय घालीत राहिले. ज्या संसारातून सुख मिळावे, जीवन जगण्याच्या प्रेरणा मिळाव्यात, ज्या गृहस्थाश्रमाचा लाभ होऊन स्वत:ला धन्य धन्य म्हणवून घ्यावे, तो कधी त्याच्या वाटय़ाला त्याच्या मर्जीप्रमाणे आलाच नाही. ‘भवदु:खाच्या अनंत डोही परि बुडतो पाही । शांति मिळेना क्षणभर जीवा विश्रांती नाही’ असा सातत्याने विफल करणारा प्रत्ययच त्याला आला. त्याची वृत्ती मुळात झुंजार आहे म्हणूनच या दु:खाशी तो अत्यंत नेटाने सामना करताना दिसतो..
रँज का ख़ूगर हुआ इंसाँ, तो मिट जाता है रँज
मुश्किलें मुझ पर पडम्ीं इतनी, कि आसाँ हो गईं। ११२-१५
संकटांच्या अधिकतेनेच ती सोपी झाली, असे म्हणणारा शायर एकूण काव्यसृष्टीत विरळा असावा. एकूणच त्याचे व्यक्तित्व उत्कट भावभावनांनी, प्रभावी वासनाविकारांनी, टोकाच्या विरोधाभासांनी ओतप्रोत भरलेले दिसून येते. त्यात कधी कस्पटाची क्षुद्रता जाणवते, तर कधी व्योमाची व्यापकता. तथापि त्यात इतर व्यक्तींपेक्षा लक्षणीय भिन्नता आहे. त्याचे दोष आणि गुण इतरांसारखेच भासत असले तरी त्यात उत्कटतेचा गहिरा रंग असा काही भरला आहे, की त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला लाभलेल्या वेगळेपणाची कुणाशी तुलना करता येणे अशक्य व्हावे. त्याच्या जीवनक्रमात झालेल्या संघर्षांनी, विपदा-आपदांनी, मानसन्मानांनी आणि मानखंडनांनी त्याच्या अवघ्या व्यक्तिमत्त्वात वेगवेगळे अंतर्वरिोध निर्माण केले. आपल्या लष्करी घराण्याचा त्याला फार अभिमान होता. आपल्या अभिजनतेचा, कवी म्हणून असणाऱ्या आपल्या वेगळ्या स्थानाचा प्रत्यय एका अहंकाराच्या पातळीवर तो घेत असल्याचे दिसते. विश्वाला आपल्याला सातत्याने काहीतरी द्यायचे आहे, याची त्याला सातत्याने जाणीव असताना, रोजचे जिणे जगण्यासाठीही आपल्यापेक्षा लायकीने कमी असणाऱ्या अनेकांसमोर आडपडद्याने का होईना, लाचारासारखी हात पसरण्याची वेळ त्याच्यावर आली होती. आणि त्यातून त्याची आयुष्यभर कधीच सुटका झाली नाही. त्यामुळे त्याच्या अवघ्या व्यक्तिमत्त्वातच एकप्रकारचा अंतर्वरिोध निर्माण झाला. हृदयात एक स्वप्नवत जीवनाचा आदर्श, जो त्याच्या मानसिक पृष्ठभूमीतून, त्याच्या तरल काव्यात्म वृत्तीतून निर्माण झाला होता. ज्या मनोमय स्वप्नसृष्टीत त्याला वावरायचे होते तिथे राहताना, तो आदर्श जपताना त्याला प्रयासच प्रयास करावे लागले. सातत्याने वाटय़ाला येत गेली ती स्वप्नभंगाची कहाणीच. तथापि इतके कठोर प्रहार होऊन त्याची आत्मश्रद्धा आणि मानवश्रद्धा कधीच भंग पावली नाही. त्याच्या नसानसांत असणारे विश्वप्रेम आणि मानवनिष्ठा यत्किंचितही कमी झाली नाही. परिस्थितीने इतके नाडल्यानंतरची त्याच्या मूळ वृत्तीची बेफिकिरी आणि स्वातंत्र्यप्रियता कधी लोपली नाही. आपल्या स्वतंत्र वृत्तीची त्याला स्वत:ला प्रखर जाणीव होती. एके ठिकाणी तो म्हणतो-
यह लाश-ए-बेकफ़न, असद-ए-ख़स्त: जाँ की है
हक़ म़िग्फ़रत करे, ‘अजब आज़ाद मर्द था। ७-७
वस्तुत: प्रेताला कफन न मिळणे हे आत्यंतिक दारिद्रय़ावस्थेचे चिन्ह आहे. पण त्याने स्वत:च्या संदर्भात अशा अवस्थेला स्वातंत्र्याचे प्रतीक मानून आपल्या ‘अजब’ स्वातंत्र्यप्रियतेची जणू द्वाहीच फिरविली आहे. ‘हमसा कोई पदा न हुआ’ (२३-१) ही त्याच्या मनाची पक्की खात्री आहे. स्वाभिमान, स्वत्व आणि स्वातंत्र्य- ज्याची त्याच्या आयुष्यात सदैवच पायमल्ली झाली, त्याची त्याच्या परीने कधी कधी अट्टहासाने तो करीत असलेली जपणूक आणि त्यात निहित असणारी उदंडता लक्षणीयच आहे. सूफी संप्रदायाचा संस्कार पचविलेली अद्वैतवादी वृत्ती आणि परधर्मसहिष्णुता हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष आहे. आयुष्यात सर्वात अधिक पत्रे त्याने मुन्शी हरगोपाल ‘त़फ्ता’ यांना लिहिली. ही बाब यासंदर्भात बरीच बोलकी आहे. सांप्रदायिक सद्भावाबद्दलच्या आपल्या विचाराला आचारसंहितेचे मोल प्राप्त करून देताना त्याचे उद्गार बाहेर पडतात..
हम मुव्वहिद हैं, हमारा केश है, तर्क-ए-रुसूम
मिल्लतें जब मिट गईं, अज्ज़ा-ए-ईमाँ हो गईं। ११२-१४
विश्वैक्यवादी असणारा गालिब मूलत: प्रवृत्तिवादी आहे. जीवनाबद्दल त्याला अनिवार आसक्ती आहे. मानवी अस्तित्वाचे सारसर्वस्व विरक्तीत नसून आसक्तीत आहे अशी त्याची समजूत आहे. ही आसक्ती केवळ सर्वसामान्य शारीरिक भोगांशी आणि तज्जन्य सुखांशीच संबद्ध नाही. वस्तुत: ज्या ऐषआरामी संस्कृतीत तो वाढला, त्यात अतिरिक्त विलासप्रियता असली, तरी तो केवळ आसक्तीतच अडकून पडल्याचे जाणवत नाही. तृष्णा व तृप्ती यांच्या मर्यादा त्याने चांगल्या समजून घेतल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा