एक जेआरडी आणि नंतर रतन टाटा सोडले तर प्रत्येकाविषयी काही ना काही नकारात्मक मतांची पिंक सहजपणे टाकणारे अर्थविषयक पत्रकार ‘वायएम’विषयी मात्र एकदम तोंड सांभाळून बोलत. ‘वायएम’ यांच्याबद्दल काही तिरकी कॉमेंट करताना दहा-बारा वर्षांत एकदाही कधी कोणाला ऐकलं नाही. साहजिकच ‘वायएम’ना भेटणं हा औत्सुक्याचा विषय बनला. पुढे भेटीनंतर ते अधिक जवळचे वाटू लागले…

मराठी माणसाला सर्वांना मिळून एक आजार आहे. मराठी घरात जन्माला आलेल्या बहुतेकांना त्याची बाधा आपोआप होते. हा आजार जनुकीय आहे. म्हणजे जन्माला येताना कशाच्या तरी कमतरतेमुळे काही जणांना रंगारंगातला फरक कळत नाही. रंगांधळे म्हणतात त्यांना. काहींची दृष्टी अंधार पडला की विझून जाते. हे रातांधळे. तसा मराठी माणूस महतांधळा आहे. त्याला आपल्या आसपासच्या माणसांची महती लक्षातच येत नाही. मोठी माणसं दिसत नाहीत की जाणवत नाहीत! या आजाराचा दुष्परिणाम फक्त मराठी माणसांनाच जाणवतो. म्हणजे कोणी अमराठी मोठा झाला की त्याचं मोठेपण मराठी माणसांना कळतं. फक्त मराठी माणसाचं तेवढं कळत नाही. मराठी माणसांच्या या आजारामुळे मोठी असूनही कळायला हवा तितका मोठेपणा कळला नाही, अशी एक व्यक्ती म्हणजे यशवंत मोरेश्वर देवस्थळी. ऊर्फ वायएम.

हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं अर्थविषयक दैनिकात होतो तेव्हा. मुळात दैनिकातली माणसंच संशय घेण्यासाठीच जन्माला आलेली असतात. इंग्रजीत छान शब्द आहे आमच्यासारख्यांच्या वृत्तीचं वर्णन करण्यासाठी- स्केप्टिसिझम. म्हणजे नास्तिक्यवाद. कशावरच विश्वास नाही. त्यामुळे होतं काय की, आमच्यातला एखादा कोणाला चांगलं म्हणू लागला की आमच्यातलाच दुसरा लगेच म्हणतो- ‘‘तू काय सांगतो त्याच्याविषयी… त्याची ही अमुक-तमुक भानगड माहिती नाहीये तुला!’’ या वृत्तीमुळे होतं असं की, आमच्या विश्वात सर्वानुमते चांगली, प्रामाणिक, सत्शील, सात्त्विक इत्यादी इत्यादी सद्गुणी व्यक्तींची संख्या इतकी कमी होऊन जाते की, अशा व्यक्ती मोजायला एका हाताची बोटंही पुरतात. त्यात अर्थविषयक नियतकालिकांत तर हा तुटवडा आणखी गंभीर. व्यावसायिक, उद्याोगपती, व्यवसाय संचालक, गुंतवणूकदार… कोणीही असो! त्याची काही ना काही आर्थिक कुलंगडी आम्हाला माहिती असतातच. परिणामी आदरणीय म्हणता येतील अशा व्यक्ती अगदी दुर्मिळातल्या दुर्मीळ.

वायएम हे त्यातले एक. आयुष्यभर ते ‘एलअँडटी’ या कंपनीशी संबंधित राहिले. ही कंपनी अनेक क्षेत्रांत आहे. सिमेंटपासनं ते अगदी ऊर्जा, घरबांधणी ते प्रकल्प उभारणी. अर्थविषयक दैनिकांत कामाची एक पद्धत असते. त्यातली बातमीदारी सर्वसाधारण दैनिकांच्या बातमीदारीपेक्षा अधिक संवेदनशील. कारण थेट बाजाराशी संबंध. त्यामुळे एखाद्याने एखादी माहिती दिली की त्याच क्षेत्रातल्या दुसऱ्या तशाच अधिकारी व्यक्तीकडून तिची खातरजमा करून घ्यायची. एखादा जेव्हा या नियतकालिकातल्या कोणाला काही माहिती देऊ लागतो तेव्हा ती ऐकणाऱ्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे त्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. ‘‘ही व्यक्ती आपल्याला माहिती देतीये ती काही आर्थिक स्वार्थ साधण्यासाठीच,’’ अशीच प्रत्येकाची धारणा.

वायएम हे त्यातले सन्माननीय अपवाद. खरं तर मी त्या दैनिकात राजकीय बातमीदारी करायचो. त्यामुळे माझा वायएमशी कधी थेट संबंध येण्याची शक्यता नव्हती. पण आसपास माझा एक सहकारी सिमेंट क्षेत्र ‘कव्हर’ करायचा. दुसरा पोलादावर लिहायचा. एक सहकारी होती ती पायाभूत सोयी-सुविधांवर लिहायची. असे आम्ही चौघे शेजारी-शेजारी बसायचो. पलीकडे मार्केट ब्युरो होता. या सगळ्यांच्या बोलण्यात कोणत्या ना कोणत्या निमित्तानं ‘वायएम’चा उल्लेख व्हायचा. ‘वायएम’ से पूछा क्या’, ‘वायएम से कन्फर्म किया क्या’, ‘वायएम कहते है तो सहीही होगा’… अशी वाक्यं कानावर पडायची. लक्षात आलं, एक जेआरडी आणि नंतर रतन टाटा सोडले तर प्रत्येकाविषयी काही ना काही नकारात्मक मतांची पिंक सहजपणे टाकणारे अर्थविषयक पत्रकार ‘वायएम’विषयी मात्र एकदम तोंड सांभाळून बोलत. ‘वायएम’विषयी काही तिरकी कॉमेंट करताना दहा-बारा वर्षांत एकदाही कधी कोणाला ऐकलं नाही. साहजिकच ‘वायएम’ना भेटणं हा औत्सुक्याचा विषय बनला.

…आणि एकदा ती भेट झाली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्या दैनिकाचे महत्त्वाचे अर्थविषयक पुरस्कार दिले जाणार होते. त्या समारंभात माझ्या ‘सिमेंट’ सहकाऱ्यानं ‘वायएम’चा परिचय करून दिला. एकदम शिडशिडीत म्हणावी अशी शरीरयष्टी. उंचीही मध्यम. छान पिवळा टाय आणि हलक्या निळ्या रंगातल्या शर्टावर डार्क काळा कोट. त्याच रंगाची पँट. मराठी वाटू नयेत इतका प्रफुल्लित चेहरा. त्या दैनिकात त्या वेळी मी एकटा मराठी होतो. ‘वायएम’ना मी थेट मराठी मातीतच आणलं. नंतर मग लहान-मोठ्या कार्यक्रमात वायएम भेटत गेले. एकदा तर एका खसगी कार्यक्रमात ते गायले. मग तर तार आणखीनच जुळली. त्यांना गाणं आवडायचं. त्यांनी त्यांच्या गाणं शिकण्याची गोष्ट सांगितली मग. गिरगावातलं मराठी घर. काटकसर पाचवीला पुजलेली. अशा घरातल्या मुलांकडून आईवडिलांची एकच एक अपेक्षा असते. ‘लवकरात लवकर तू पायावर उभा राहा!’ यात गाणं वगैरे मग मागे पडतं. त्यांचंही तसंच झालं असणार. त्या गाण्यात आणखी एक जाणवलं. अशा मोठ्या पदावरची माणसं ‘मी फक्त शास्त्रीय गातो/ ऐकतो’ छापाची आढ्यता मिरवतात. एकंदर सूर ‘मला तुमच्यापेक्षा अधिक कळतं’ असा. बाकी सगळं थिल्लर, अ-अभिजन वाटतं या सुटाबुटातल्यांना. पण इथे तर वायएम एका सहकारिणीबरोबर ‘ये राते ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा…’ असं नितांतसुंदर निवांत गाणं गात होते. जास्त खरे आणि त्यामुळे जास्त जवळचे वाटू लागले तेव्हापासून ते!

त्यांना एकदा त्याबाबत विचारलं. ‘‘जवळपास शंभरभर उपकंपन्यांचा संसार ‘एलअँडटी’चा. आणि प्रमुखपदी ए. एम. नाईक यांच्यासारखी दांडगट व्यक्ती. (उच्चपदस्थांच्या दांडगटपणास धडाडी म्हणायची प्रथा आहे आपल्याकडे). आणि त्या कंपन्यांची आर्थिक जबाबदारी तुमची… इतकी डोकेदुखी. तरीही गाता, हे कसं?’’ त्यांचं उत्तर लहानसं, मस्त आणि अर्थानं खूप मोठं असं होतं. ते इतकंच म्हणाले, ‘‘गाणं मला संतुलन शिकवतं…!’’ ज्याला गाण्यातल्या सुरेलपणाचं महत्त्व कळतं त्या प्रत्येकाला ‘वायएम’च्या उत्तरातला व्यापक अर्थ लक्षात येईल. आणि हे ज्यांना कळत नाही त्यांना त्याची फोड करून सांगितली तरी कळणार नाही. असो. त्या काळात ‘बेस्ट सीईओ’ वगैरे पुरस्कार देण्याच्या सोहळ्यात वायएम भेटायचे. अभिनंदन किंवा तत्सम काही म्हटलं की मिस्कील हसायचे. त्या हसण्यात हे असे पुरस्कार माझ्यापेक्षा आयोजकांची अधिक गरज आहे असा काहीसा अर्थ आहे असं वाटायचं. असेलही तसा तो. नंतर या अशा समारंभीय भेटी कमी झाल्या. कारण मी त्या जगातनं ‘लोकसत्ता’त आलो. आणि मग वेगळेच ‘वायएम’ भेटू लागले. कॉर्पोरेट जगातल्यापेक्षा अगदी वेगळे.

‘लोकसत्ता’त आल्यावर एकदा त्यांचा मेसेज आला. फोनवर कधी बोलता येईल, ते विचारणारा. (मोठ्या लोकांचा हा गुण सगळ्यांनी अवश्य घ्यावा. मोबाइल फोन नंबर आहे म्हणून भसकन् ही शहाणी माणसं कधीही फोन करत नाहीत. आधी मेसेज करून विचारणा करतात…!) मी लगेच उलटा फोन केला. त्यांना संस्थांची माहिती हवी होती. ‘लोकसत्ता’नं नुकताच एक कार्यक्रम हाती घेतला होता. ‘सर्वकार्येषु सर्वदा’. वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था यात निवडल्या जातात आणि गणपती उत्सवाच्या दहा दिवसांत त्यांच्यासाठी आर्थिक मदत (त्या संस्थांच्या नावेच… हा मुद्दा महत्त्वाचा) गोळा केली जाते, असा हा उपक्रम. ‘वायएम’नी त्या उपक्रमाचं खूप कौतुक केलं आणि मग एकेक प्रश्न विचारायला लागले. संस्था कशा निवडल्यात, त्यांच्या सच्चेपणाची खात्री काय, तुमचं कोणी गेलं होता का त्या संस्थांचं काम पाहायला वगैरे… हे सगळं अत्यंत गोडपणे. अगदी मृदू भाषेत. त्यामुळे चिडचिड आपल्या उत्तरात दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी लागत होती. जवळपास अर्धा तास माझी ही उलटतपासणी सुरू असेल. ‘‘ही सर्व माहिती तुम्हाला कशाला हवी आहे,’’ असं विचारण्याचं माझ्या मनातही आलं नाही. कारण हे प्रश्न विचारणारी व्यक्ती ‘वायएम’ होती.

नंतर एक दिवस ‘वायएम’कडून एक भलं मोठं पाकीट आलं. आत १० संस्थांसाठी दहा चेक होते. किती रकमेचे ते सांगणं त्यांच्या कुटुंबीयांना आवडणार नाही. कारण त्या चेकबरोबर एक छोटी नोट होती- ‘तुम्ही देणगीदारांची नावे प्रसिद्ध करता. कृपया माझा अपवाद करावा.’ कोट्यवधी रुपये ‘वायएम’ सहज देत होते; पण या कानाचं त्या कानाला कळता नये, असंही बजावत होते. हे ‘वायएम’ मला माहीत नव्हते. नव्यानं दिसत होते, पण त्यांचं हे नवेपण तिथंच संपणारं नव्हतं.

हे धनादेश संबंधित संस्थांना देण्याचा कार्यक्रम करायचं ठरलं. त्यानिमित्ताने संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येतात, त्यांची त्यांची एक साखळी तयार होते. चार भेटी-गाठी होतात. मला ‘वायएम’नी दिलेल्या देणग्या, त्यांची सामाजिक कार्यासाठीची कणव वगैरे माहिती झाली होती एव्हाना. मी म्हटलं त्यांच्याच हस्ते हे धनादेश वाटप करू या. वायएम येतो म्हणाले. अट एक. मी किती देणग्या दिल्यात त्याची वाच्यता नको… त्या संस्थांनाही कळता नये…! अट मान्य केल्यावर ते आले. सपत्नीक आले. त्या दिवशी दोन गोष्टी कळल्या. आमचा ‘सर्वकार्येषु’चा कार्यक्रम जिथे होतो त्याच्या समोर ओबेरॉय हॉटेल. तिथे त्याच दिवशी त्याच वेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा कार्यक्रम होता. कसले तरी पुरस्कार! त्यात ‘वायएम’ यांचा कसला तरी सन्मान होणार होता, पण वायएम तो कार्यक्रम सोडून या ‘सर्वकार्येषु’च्या कार्यक्रमाला आले. अगदी छोट्यातल्या छोट्या राजकारण्यांना लोंबकळण्याची एकही संधी न सोडणारे दिवसाला डझनांनी समोर दिसत असताना, साक्षात पंतप्रधानांच्या कार्यक्रमाकडे सामाजिक संस्थांसाठी पाठ फिरवणारा मी पाहिलेला पहिलाच. ही पहिली गोष्ट!

आणि नंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना काही संस्थांच्या प्रतिनिधींनी माहिती दिली. ‘लोकसत्ता’त माहिती आल्यानंतर ‘वायएम’नी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सपत्नीक त्यातल्या काही संस्थांना भेट दिली. त्यांना काय हवं नको त्याची चौकशी केली. काही संस्थांत चक्क ‘जेसीबी’ वगैरे पाठवून त्यांची जमीन साफ करून देणं वगैरे सगळं ‘वायएम’नी करून दिलं. ते संस्थाचालक इतके भारावले की काहींना बोलताना भरून आलं. ‘वायएम’च्या चेहऱ्यावर मात्र ‘हे कोणाविषयी बोलतायत’ असे भाव. नंतर नंतर हा प्रघातच पडला. दरवर्षी ‘सर्वकार्येषु’ संस्था जाहीर झाल्या की ‘वायएम’च्या देणग्या ठरलेल्या. नंतर त्या संस्थांना धनादेश देण्याच्या कार्यक्रमालाही ते आवर्जून यायचे. प्रेक्षकांत बसायचे आणि नंतर संबंधित संस्थांना व्यवस्थापनाचे धडे द्यायचे. याच उत्साहातनं ‘तरुण तेजांकित’च्या निवड समितीचं प्रमुखपदही त्यांनी सांभाळलं. कार्यक्रमाला यायचे. या तरुणांच्या डोक्यात काय चाललंय ते समजून घ्यायचे.

संस्थांबाबत हा शेवटचा भाग फार महत्त्वाचा. ‘‘तुम्ही उत्साहात संस्था सुरू केली… नंतर काय?’’ असं काही विचारत सदर संस्था आपल्या पायावर कशी उभी राहील यासाठी ते लागेल ती मदत करायचे. एकदा त्यांचा फोन आला. मुंबईच्या उपनगरातल्या एका संस्थेतर्फे रुग्णालय सुरू होणार होतं. त्याच्या कार्यकारी मंडळाचं पद मी स्वीकारावं यासाठी. मी अत्यंत नम्रपणे नकार दिला. त्यांना माझा मुद्दा पटला. मलाही त्यांचं म्हणणं पटत होतं; पण व्यावसायिक बांधिलकी त्या पटण्याच्या अनुषंगानं मला पुढची कृती करू देत नव्हती. त्यांचं म्हणणं होतं, ‘‘… बऱ्याचशा संस्था एखाद्याच्या अंत:प्रेरणेनं सुरू होतात. बरं काम करतात, पण भविष्याचं कसलंही चित्र त्यांच्या डोळ्यासमोर नसतं. आपण मदत करायला हवी अशांना.’’ ‘वायएम’ तशी मदत अनेक संस्थांना करायचे. त्यांच्या दुसऱ्या एका कार्यक्रमाला मात्र आनंदानं सहकुटुंब गेलो. ‘वायएम’नी स्वत:च्या पैशानं एक टुमदार वृद्धाश्रम काढला खोपोलीच्या जवळ. तिथे नवरा-बायको असे एकत्रच राहायला लागलेत. म्हणजे मुलाबाळांना नकोसं व्हायच्या आधीच अनेकांनी आपल्या म्हातारपणातली सप्तपदी तिथं स्वत:हून सुरू केलीय. त्याचं पौरोहित्य देवस्थळी दाम्पत्य आनंदानं करत होतं. तो सोहळा मोठा हृद्या झाला.

हे असं ‘आत जाऊन’ पाहण्याची आवड त्यांना असावी. एकदा एक कलाकारांचा चमू ‘लोकसत्ता’त आला. त्यात ‘वायएम’ चौकटीचा शर्ट, फिकट राखाडी रंगाची पँट… मी उडालोच. त्यांना म्हटलं, ‘‘तुम्ही इथं कसे?’’

‘‘कसा म्हणजे? चित्रपट निर्माता म्हणून आलोय.’’

‘‘तुम्ही? आणि चित्रपट?’’ या माझ्या प्रश्नावर त्यांचं उत्तर इतकंच, ‘‘हा व्यवसाय नक्की चालतो कसा ते समजावून घ्यायचं होतं!’’ हा चित्रपट ‘राजवाडे अँड सन्स’. खात्री आहे चित्रपटाशी संबंधित मंडळींना त्यांनी अनेक प्रश्न विचारले असणार. गंमत म्हणजे ‘हा चित्रपट नक्की बघा, कसा वाटला ते सांगा’ वगैरे प्रचलित उद्गार त्यांनी एकदाही काढले नाहीत.

मध्यंतरी बराच काळ ‘वायएम’ दिसले नाहीत. त्यांच्या घरी चौकशी केली. कळलं ते आजारी आहेत. मुलुंडच्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या रुग्णालयात दाखल होते. भेटायला गेलो तेव्हा आजाराचं गांभीर्य जाणवलं. आधीच मुळात ते तसे कृश. त्यात आणखी बारीक झालेले. जमेल तितक्या गप्पा मारल्या. पण जाणवत गेलं काही खरं नाही. नंतरही गेलो एकदोनदा. बाहेर पडताना खिन्नता साकळायची. एक दिवस सकाळीच बातमी आली. शेवटच्या दर्शनासाठी जाताना गाडीमध्ये बसल्या बसल्या काही सत्ताधीशांना, राजकारण्यांना कळवलं, फोन केले. म्हटलं, कॉर्पोरेट जगतातल्या इतक्या मोठ्या व्यक्तीचं निधन झालंय… संबंधितांना सांगावं तरी. खरं तर तसं करणं त्यांच्या कुटुंबीयांना आवडलं असतं की नाही कोण जाणे, पण मला तसं करणं आवश्यक वाटलं. पण आता वाटतंय उगाच हा उद्याोग केला आपण. नेमक्या त्याच दिवशी अनेकांना भल्या सकाळी महत्त्वाच्या मीटिंगा तरी होत्या किंवा ते बाहेरगावी तरी होते! त्यामुळे जमलं नाही कोणाला यायला. एक नेता म्हणाला, ‘‘मी प्रेसनोट काढतो… माझ्या पीएचा फोन येईल, मजकूर जरा तेवढा डिक्टेट करा!’’ नंतर बऱ्याचदा एका अनोळखी नंबरचा फोन वाजत राहिला.

वायएम नोव्हेंबरात गेले. पुढच्या जूनमध्ये ठाणे जिल्ह्यातल्या मागास भागातल्या एका शाळेच्या वतीनं एका परिचिताचा फोन आला. मिसेस देवस्थळी त्या शाळेत येतायत ते सांगायला. ‘वायएम’ना त्या शाळेला काही देणगी द्यायची होती. पण ते राहूनच गेलं. त्यांचे कुटुंबीय त्या राहून गेलेल्या देणगीची पूर्तता करत होते.

मोठेपण समजून न घेण्याचा दुर्गुण दूर करण्याची पूर्तता मराठी माणूस केव्हा करणार… हा प्रश्नच आहे.

girish.kuber@expressindia.com

X@girishkuber