वसंतराव जोशी यांची माझी ओळख असायची काही शक्यताच नव्हती. मी गोव्याला गेलो तेव्हा तसे ते समाजकारण, राजकारण यापासून दूर झालेले होते. ‘दास डोंगरी राहतो… यात्रा देवाची पाहतो’ अशा वृत्तीनं आसपासच्या जगातली मौज पाहात होते. त्यांची भेट, नंतर परिचय, स्नेह आणि नातं… आता मागे वळून पाहिलं की वाटतं ते सगळं अद्भुततेच्या पातळीवरचंच होतं.

मी गोव्यात बदली होऊन गेलो त्याला तीनेक महिने झाले होते. त्याआधी ८९ सालच्या निवडणुकांपासून गोव्यात जात होतो वारंवार. पण बदली होऊन कायमचा जाईपर्यंत मार्च उजाडला. तर मे महिन्यात गोविंदरावांचा (तळवलकर) फोन आला मी येतोय हे सांगायला. कोणाकोणाला भेटायला बोलवायचं हे देवरुखकर सांगतील म्हणाले. नंतर देवरुखकरांनी यादी दिली. काही भेटींना तळवलकर जाणार होते तर काही जण तळवलकरांना भेटायला येणार होते. त्यातली बाकीची नावं पणजीतली असल्यानं ऐकून तरी माहिती होती. वसंतराव जोशी यांचं काहीच माहिती नव्हतं. बाकीचे एकतर नावानं तरी गोंयकार होते. पण गोव्यातले असूनही हे जोशी कसे ते काही लक्षात येत नव्हतं. मग तिथल्या काही मित्रांची मदत घेतली. त्यांच्याकडनं उलगडा झाला वसंतराव ही काय असामी आहे त्याचा. त्यांना फोन केला. फोनवर असामी-पणाचा लवलेशही नाही. इतके प्रेमानं बोलले… तुझं वाचतो वगैरे म्हणाले की त्यामुळे मीच गोंधळलो. गोविंदरावांचे मित्र… त्यांच्यासारखेच घनगंभीर असणार अशी भीती मनात. हे तर चक्क प्रेमळ निघाले… कमाल आहे… गोविंदरावांच्या वर्तुळातलं असं काही कोणी प्रेमळ असेल असं चुकूनही वाटलेलं नव्हतं.

मग प्रत्यक्ष भेट. गोविंदराव ‘मांडवी’त उतरायचे. दिवसभराच्या भेटी-गाठी झाल्या आणि संध्याकाळ अवतरली. एकेक सगळे जमा व्हायला लागले. त्यातल्या काहींचा परिचय झालेला एव्हाना. मला वसंतरावांबद्दल उत्सुकता होती. आणि ते आले. पांढराशुभ्र शर्ट काळ्या पँटीत इन केलेला. अजिबात पोट नाही. एकदम ताठ. काळे पॉलिश केलेले शूज. चेहऱ्यापेक्षा मोठी, आयताकृती चौकोनी फ्रेम. ए. के. हंगल सुटाबुटात आले तर कसे दिसतील, तसे दिसायला. फरक म्हणजे एकदम फिट आणि कमालीचा मिस्कील चेहरा. समोरच्याची टोपी उडणारच उडणार यांची हमी त्यांच्या चेहऱ्यावर सतत असायची. ते आल्यावर गोविंदराव उभे राहिले आणि मग दोघांनी एकमेकांना मिठी मारली. माझी बोबडी वळणं तेवढं बाकी होतं. गोविंदरावांना असं कोणी मिठी मारू शकतं? कमाल आहे…! बाकीच्यांत प्रभाकर आंग्ले होते. सीताकांत लाड होते. आणि रामकृष्ण नायक. या तिघांशी वसंतरावांच्या ‘कित्ये म्हंट्ता’ सुरातल्या काही गमतीजमती.

मग सगळ्या बैठकीची सूत्रं वसंतरावांच्या हाती. वसंतरावांच्या हाती चामड्याची एक बॅग होती. आणि एक पाऊच. एखाद्या स्त्रीनं दागिन्यांच्या पेटीतून रत्नहार अल्लदपणे काढावा तशी त्या बॅगेतून वसंतरावांनी ‘ब्लू लेबल’ काढली. दुसऱ्या पाऊचमधून पाइप. बरोबर चांदीची असावीत अशी त्याची छानशी उपकरणं. एखादा कुशल बल्लवाचार्य किंवा गृहिणी मोदकात सारण ज्या अल्लदपणे भरेल त्या प्रेमानं त्या पाइपमधे वसंतरावांनी तंबाखू भरला. तो शिलगावला. त्या सुवासानं खोली भरली. आणि त्या पाइपच्या धुराप्रमाणे वसंतरावांच्या बोलण्यानं ती खोलीही भारून गेली. ‘मांडवी’च्या मॅनेजरला त्यांनी बोलावून घेतलं. रात्रीच्या डिनरला काय त्याची साद्यांत सूचना. साद्यांत म्हणजे किती खोल… तर कोणत्या माशाच्या कालवणात किती हळद घातली जायला हवी… बांगड्याच्या कालवणांत तिरफळं किती हवीत त्याचाही तपशील. माझ्यासाठी हे सगळंच अद्भुत. पदार्थांची चव सांगायला गोड, खारट, तिखट, अळणी, आंबट… अशी चारपाच ढोबळ विशेषणं पुरवायची आपली ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ संस्कृती. तिची इतकी चिकित्सा कधी अनुभवली नव्हती. नंतर तर कमाल झाली. गोव्यात एक खास लोणचं बनतं. बाळ कैऱ्या दगडाखाली दाबून ठेवायच्या आणि एका बरणीत ते सगळं बुडेल इतक्या तेलाच्या फोडणीत मुरवायच्या. ती फोडणीही खास. एकेक आख्खी कैरी ताटात वाढली जाते. गोविंदरावांसाठी त्यांनी कोणाला तरी फोन करून मागवून घेतलं. तो माणूस आला. वसंतरावांनी बाटली उघडून पहिल्यांदा त्या लोणच्याचा वास घेतला. चेहऱ्यावर कसली तरी शंका आली. ते घेऊन आलेल्याला म्हणाले, ‘‘फोन करून विचार यातल्या फोडणीचा हिंग कोणता ते.’’ रूममधल्या फोनवरून तो ते करेपर्यंत वसंतरावांची हिंग, चांगला हिंग आणि गोव्यातला तो विशेष हिंग यावर सुग्रास टिप्पणी. त्यांच्या मते, ‘त्या’ लोणच्याच्या फोडणीत चव, स्वाद या मुद्द्यांवर सर्वोच्च पायरीवरच्या मोठ्या खड्यांचा ‘शंकर छाप हिंग’ नव्हता. त्यांचं खरं होतं. त्या माणसानं हिंगाचं नाव सांगितलं. ते ऐकल्यावर वसंतराव त्याला म्हणाले, ‘‘ही बाटली परत घेऊन जा.’’ हा चोखंदळपणा ही वसंतरावांची खासियत. जगण्याच्या प्रत्येक अंगात तो दिसायचा. मुळात व्हिस्की प्यावी की अन्य काही… मग कोणती प्यायची… त्यासाठी ग्लास कोणते… सोडा/पाणी की नुसता बर्फ. जे करायचं ते नुसतं उत्तम नाही, तर सर्वोत्तम. वसंतराव गोव्यातल्या खानदानी जोशी कुलातले. वडिलांची पोर्तुगीजांच्या काळातही मोटारीची एजन्सी होती. तो काळ वसंतरावांनी अनुभवलेला. त्या आठवणी त्यांच्या तोंडून ऐकणं हा कमालीचा आनंद. तो पुढच्या काळात अनेकदा मिळाला. एकतर गोष्टी सांगण्याची त्यांची शैली. अगदी समोर गोविंदराव, पुलं आणि सुनीताबाई असले तरी त्यांनाही वसंतरावांना ऐकत रहावं असं वाटे. मग सुनीताबाईंना पुलंच्या औषधाची वेळ झाल्याचं लक्षात यायचं. त्या शिक्षिकेच्या शैलीत गप्पा थांबवू पाहायच्या. मग पुलं म्हणणार… थांब गं सुनीता वसंताचं हे पूर्ण होऊ दे. पण ‘हे’ पूर्ण झालं की वसंतरावांचं ‘ते’ सुरू व्हायचं… इतके ते गोष्टीवेल्हाळ. मधे मधे ‘समजलं’ असं प्रश्नार्थक विचारण्याची लकब. आपल्या किश्श्यानं समोरच्यांचं न आवरणारं हसू सुरू झालंय याची खात्री झाली की मग ते स्वत: हसायला लागायचे. लहान मुलाइतक्या निरागसपणे हसणं. डोळ्याच्या कडा ओल्या होण्याची हमी.

गोविंदरावांच्या एका दौऱ्याआधी ते नुकतेच लंडनला जाऊन आलेले. बरोबर रामकृष्ण नायकही होते. गेले होते कशासाठी? तर शेक्सपियरच्या घरची धूळ कपाळाला लावायची ही कुसुमाग्रजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना घेऊन. मग त्या बैठकीत त्या दौऱ्याच्या आठवणींचं साभिनय सादरीकरण. अॅव्हॉन नदीकाठच्या स्ट्रॅटफोर्ड इथल्या शेक्सपियरच्या त्या जन्मकुटीत गेल्यावर तात्यासाहेब कसे भान हरखून स्तब्ध झाले… भानावर आल्यावर शेक्सपियरचे कोणते संवाद त्यांनी कसे म्हटले वगैरे सगळा तपशील तसाच्या तसा वसंतराव सांगत गेले. आणि गंमत अशी की, त्या दौऱ्यात त्यांच्या बरोबर असलेले रामकृष्ण नायकही ते सादरीकरण भान हरखून ऐकत राहिले. वसंतरावांची समोरच्याला ऐकत ठेवण्याची क्षमता अवर्णनीय आणि अफाट. कोणतीही आठवण… मग ती लहानपणी गोव्यात त्यांच्या घरी हॉलंडमधून येणाऱ्या टोमॅटोची, विशिष्ट टिनमधल्या बिस्किटांची असो किंवा त्यांच्याच बैठकीतल्या बाकिबाब बोरकरांची असो. वसंतराव म्हणजे मूर्तिमंत सादरीकरण. मी गोव्यात गेलो तोपर्यंत दुर्दैवानं बाकिबाब बोरकर गेलेले. त्यामुळे त्या बैठका अनुभवणं राहूनच गेलं. पण गोविंदरावांच्या गोवा दौऱ्याच्या निमित्तानं वसंतरावांना पुलं-सुनीताबाई, शिरवाडकर, श्रीपु, मोहनदास सुखटणकर, रामकृष्ण नायक, श्री-सौ. लाड वगैरे अनेकांच्या सहवासात अनुभवता आलं. त्यांची प्रत्येक भेट पुढच्या भेटीची आस लावणारी असायची. स्वभाव इतका प्रेम लावणारा की, मग त्यांना भेटण्यासाठी गोविंदरावांनी गोव्यात येण्याची गरज नंतर नंतर लागेनाशी झाली. त्यांची माझ्यापेक्षा वयानं मोठी असलेली मुलं परेश, प्रशांत वगैरेंशी दोस्ताना झाला. वास्कोतल्या त्यांच्या घरी माझं स्वतंत्र जाणं-येणं सुरू झालं.

चांगला भरभक्कम चौसोपी म्हणता येईल असा वाडा. मधे चौकोनी अंगणासारखी मोकळी जागा आणि चारी बाजूंनी मुला-बाळांच्या खोल्या. चित्रपटातलं वाटावं असं एकत्र कुटुंब. सगळीच मुलं कर्तबगार. परेश, प्रशांत असे सर्व ‘प’कार. माझं घर म्हणजे ‘आंतरभारती’ आहे असं वसंतराव म्हणायचे. म्हणजे असं की, त्यांच्या पाच सुना पाच भाषक होत्या. एकच मराठी. परेशची पत्नी ललिता. त्या शुद्ध पुण्याच्या. गोव्यातल्या जोशींच्या सून झाल्या. हे जोशी ब्राह्मणच. पण गोव्यातले. सर्व काही खाणारे. (‘न खाणाऱ्या ब्राह्मणांना गोव्यात ‘भट’ म्हणतात. नुसते ब्राह्मण वेगळे आणि हे भट वेगळे. असो.) त्या पहिल्या बाळंतपणाला पुण्याला माहेरी गेल्या तेव्हा काय झालं त्याचा किस्सा त्या सांगतात ते ऐकलं की त्यांनी सासऱ्याची कथनशैली घेतली की काय… असं वाटून जातं.

तर झालं असं की, आपल्या नातीला पाहायला वसंतराव पुण्यात आले. गोव्यात एक रम्य प्रथा आहे- एखाद्याला नात/ नातू झाला की त्याच्या/ तिच्या नावानं एक खास पोर्त (पोर्ट नव्हे) वाईनची वा फेणीची बाटली राखून ठेवायची. नंतर ती समारंभपूर्वक उघडायची ती थेट त्याच्या/ तिच्या लग्नाच्या वेळी अथवा मुलगा असेल तर तो बाप झाल्यावर किंवा मुलगी असेल तर ती आई झाल्यावर. वसंतरावांनीही परेशचं पितृत्व साजरं करण्यासाठी अशी खास एक बाटली ठेवून दिलेली. ते नातीला पाहायला सुनेच्या माहेरी गेले आणि तुझ्यासाठी काय आणलंय बघ… म्हणत उत्कंठा वाढवत बॅगेतून काढलं काय? तर ही बाटली. शुद्ध पुण्यातल्या घरात मग एकदम दाणादाण. सुदैवानं परेशही तिथं होता… तो बायकोला म्हणाला, ‘‘काळजी करू नकोस… मी संपवीन ती.’’ एकदा गोविंदरावांच्या बैठकीत वसंतरावांना यायला उशीर झाला. मद्याची जबाबदारी कायम त्यांच्याकडे असायची. आता त्यांनाच यायला उशीर झाला म्हणून सगळेच अवघडलेले. हातांना ग्लासचा आकार येऊ लागलेला. शेवटी असं ठरलं, ‘मांडवी’तनंच चांगल्यात चांगली व्हिस्की मागवायची आणि आपण आपलं सुरू करायचं. त्या सगळ्यांमधला दुर्री अर्थातच मी. या सगळ्यांच्या गप्पा ऐकायला मिळणार या मिषानं मी ही कामं आनंदानं करायचो. मांडवीच्या मॅनेजरला सांगून आवश्यक ते सगळं मागवलं. पहिला पेग संपलाही नसेल, वसंतराव आले. सॉरी वगैरे सगळे उपचार… त्यातही उशीर का झाला त्याची गोष्ट सांगत… पार पाडता पाडता त्यांनी केलं काय? तर ती बाटली बेसिनमधे उलटी केली. ‘‘हे असलं काही प्यायचं वय आहे की काय आपलं?’’ असं म्हणत त्यांनी मॅनेजरला पुन्हा बोलावलं, आपल्या गाडीतले ग्लास घेऊन यायला सांगितलं. आणि ते ग्लास येईपर्यंत मग त्या दिवशीच्या व्हिस्कीची गोष्ट. वसंतराव दोन फेऱ्यांच्या वर कधीही गेले नाहीत. गप्पा दोन तास होवोत वा चार तास. आणि समोर पुलं असोत की अन्य कोणी माझ्यासारखे लहानसहान; त्यांच्या मात्रेत एका गुंजेची भर कधी पडली नाही. तेही आठवड्यातून फक्त दोनदा. गोविंदरावांच्या येण्यानं एका दिवसावर फुली झाली तर मग दुसऱ्या दिवसाचा खाडा. हा नियम त्यांनी आयुष्यभर पाळला.

तर त्यांच्या घराची गोष्ट. त्यांच्या त्या भव्य घरात दामोदराची मूर्ती होती. आताही असेल. वर्षातनं एकदा त्याचा सप्ताह असायचा. मग ते सात दिवस रोज गाणं. कधी अभिषेकी बुवा (त्यांना जवळचे गंपू की काय म्हणायचे बहुधा) कधी आणखी कोणी. प्रफुल्ला डहाणूकर हमखास असायच्या. त्या वसंतरावांची बहीण. एकदा अभिनेत्री तनुजाही तिथं भेटल्याचं आठवतंय. वसंतराव हे असले मान्यवर सहज अंगाखांद्यावर वडीलकीनं वागवायचे. एकदाही त्यांना जाहीरपणे यावर मिरवताना मी ऐकलं नाही. त्यांच्या साठीला, पंचाहत्तरीला साक्षात बाकीबाब, तात्यासाहेब अशांनी त्यांच्यावर कविता केलेल्या. पण वसंतरावांचं वागणं आपलं ‘ठीक आहे, त्यात काय’ असंच. त्यावरही बोलताना मग त्यांच्या काही आठवणींची गोष्ट. सप्ताहात समग्र वास्कोकर दामोदराच्या दर्शनार्थ त्यांच्या वाड्यात यायचे. वसंतराव चोख यजमान असल्यानं या काळात सगळं हवं नको ते स्वत: पाहायचे. गोवा मुक्ती संघर्षात याच वाड्यात अनेक वास्कोकरांनी आश्रय घेतलेला, त्यामुळे जुन्या वास्कोकरांना त्या वाड्याविषयी एक ममत्व असे. थेट घरचे असोत वा दारचे. कोणाला काही झालं की वसंतराव व्याकूळ. संधीवातावर दलाई लामा, त्यांच्यातल्या कोणाकडे काही औषध आहे असं कळल्यावर पत्नीसाठी औषध घ्यायला वसंतराव धरमशालात येताना आणखीही काही समव्याधीग्रस्तांसाठी औषध घेऊन आले. आल्यावरच्या बैठकीत मग ते औषध आणि ते देणाऱ्यांच्या काही गंमतकथा.

गोवा सुटल्यानंतर गोव्यात कधी गेलो तर दोघांच्या पायांवर डोकं ठेवायला हमखास जायचो. एक रामकृष्ण नायक आणि दुसरे वसंतराव. शेवटच्या भेटीवेळी वसंतराव मनानं हळवे वाटले. पण अगदी नव्वदीतही शरीरानं ताठ. त्या वेळी सपत्नीक वाकून नमस्कार करून उठताना त्यांच्या डोळ्यात पाणी. खरं तर मी कुठला कोण. वयानंही कित्येक दशकांनी धाकटा. वसंतरावांनी इतकी माया लावायचं काही कारण नव्हतं. पण त्यांचा तो स्वभावच. शेवटी एकदाच हॉस्पिटलमधे अॅडमिट होते. डिस्चार्जनंतर घरी परत यायच्या आधी घरच्यांना सूचना होती… इस्त्री केलेले कोणते शर्टपँट घेऊन यायचे ते सांगण्यासाठी. सोबत पर्फ्युम कोणता हवा तेही. बेंगरूळपणा, अजागळपणा कधी आवडला नाही त्यांना. जे काही करायचं ते सुंदर आणि मंगल. नंतर वसंतरावांच्या निधनाची बातमी आली.

आता त्यांच्या बैठकीतले कोणीच हयात नाहीत. पुलं, तात्यासाहेब, बाकिबाब, गोविंदराव, सीताकांत लाड, मोहनदास, रामकृष्ण नायक… सगळेच गेले. खात्री आहे कधी भेटलेच हे परत एकमेकांना तर वसंतराव आपल्या सदैव प्रफुल्ल चेहऱ्यानं ‘काकाजी’च्या शब्दात म्हणतील… निखारे कसे मस्त फुलून राहिलेत…!

Story img Loader