आधी असं ठरलं होतं की ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमाच्या दिवशी राशिद खान सकाळी मुंबईत येतील. मग जेवायला जायचं आणि संध्याकाळी गप्पा. पण तसं काही झालं नाही. विमानसेवेची कृपा! राशिदजींना यायलाच संध्याकाळ उजाडली. कसंबसं गप्पांसाठी पोचता आलं. आणि हा कार्यक्रम संपायलाच साडेआठ वाजून गेले. त्यामुळे ते जेवायला जाणं वगरे राहिलंच. कार्यक्रम संपल्यावर त्यांना विचारलं, ‘उद्याचं काय?’ ‘हां.. हां. मिलना है.. बिलकुल आजाईये..’’ त्यांचं उत्तर.

ठीक बाराच्या ठोक्याला त्यांच्या हॉटेलच्या खोलीचा दरवाजा वाजवला. एकटाच होतो. खरं तर खाली स्वागतकक्षातून त्यांना फोन करायला हवा होता. नाही केला. थेट गेलो. उस्तादजी आतल्या खोलीत मस्त लोळत होते. बाहेरच्या दर्शनी भागात त्यांचा मुंबईतला पट्टशिष्य मंदार पिलवलकर, एक-दोन साथीदार तेवढे होते. त्यांच्याकडून कळलं : काल रात्री चांगला मूड होता उस्तादांचा.. गात बसले. मंदारनं आत जाऊन त्यांना सांगितलं. राशिदजी बाहेर आले. अंगात मळखाऊ रंगांचा टी-शर्ट, खाली ट्रॅक पँट. हातात पानाचा डबा. मूड आदल्या रात्रीचाच. तोच सुरेल मूड मागील पानावरून आज पुढे सुरू होता.

Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
sankarshan karhade visits karad and tried these food items
भाकरी, अख्खा मसूर, भरलं वांगं अन्…; कराडमध्ये संकर्षण कऱ्हाडेने ‘या’ पदार्थांवर मारला ताव; पश्चिम महाराष्ट्रासाठी खास पोस्ट
Mahadev Jankar on Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : “एखादा पक्ष काढा आम्ही तुमच्याबरोबर युती करू”; भुजबळांना महादेव जानकरांचा सल्ला
Nitesh rane calls kerala mini Pakistan
उलटा चष्मा : भारतातच पाकिस्तान?
Tharla Tar Mag New Year Promo
ठरलं तर मग : सासरेबुवांचं मन जिंकण्याचा अर्जुनचा निर्धार! मधुभाऊंना शब्द देत म्हणाला, “तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची…”

‘पान खाओगे?’ त्यांच्या एकाच प्रश्नार्थक होकारार्थी विधानातून तो स्पर्शून गेला. मी म्हटलं, ‘ते किमाम वगरे सोडून बरीच र्वष झाली.’ ‘तो क्या हुआ?’ म्हणत उस्तादजींनी एक मोठ्ठं  कलकत्ता पान बरोबर उभं शिरेवर कापून बनवून दिलं. स्वत:ही घेतलं. ते बहुधा सकाळपास्नचं त्यांचं पंधरावं वगरे पान असावं. त्यांच्या सोफा- खुर्चीच्या पायाशी निमुटपणे उभी पिकदाणी त्याची साक्ष होती. आता ती रसयात्रा सुरांकडे वळवणार तेवढय़ात त्या हॉटेलच्या व्यवस्थापिका भेटायला आल्या. ‘‘उस्तादजी, कहॉं हो आप..? कल शाम को चेक इन् किया.. मं काऊंटर पे रूकी थी.. आप आये भी नहीं.. गायब हो गये.’’

..त्यांच्या त्या धबधब्यासमोर राशिदजी सांगायचा प्रयत्न करीत होते : ‘विमान उशिरा आलं.. लोकसत्तेच्या गप्पांना जायचं होतं..’ वगरे. पण बाई काही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हत्या. त्यांना जे सुनवायचं होतं ते सुनावलं, ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या दिल्या आणि मगच गेल्या.

आता जरा बोलणार तोच फोन वाजला. रिसेप्शनवरनं. गाडी आल्याचा. राशिदजी म्हणाले, ‘‘आता..? शाम की मीटिंग के लिए अभी से गाडी?’’ मग त्याला म्हणाले, ‘आलाच आहेस तर थांब.. मी तरी काय करणार?’

हे सगळं मी पहात होतो. कुठेही चिडचिड नाही. सगळ्यांशी बोलण्याचं सौजन्य. तेवढय़ात माझ्या शेजारी पडलेला त्यांचा मोबाइल वाजला. कोणाचा तरी नंबर होता. त्यांनी तो घेतला. ‘नंतर फोन करतो..’ म्हणाले. मी म्हटलं, ‘फोन ओळखीच्याचा नसला तरी घेता?’

‘हो. घेतो.. नाही घेता आला तर नंतर उलट फोनही करतो. कौन किस काम के लिए करता होगा, क्या पता? किसी को मदद की जरूरत हो सकती है.. हर कॉल मं लेता हूँ..’

हे सगळं पाहिल्यावर प्रश्न पडला. त्यानेच गप्पांचीही सुरुवात झाली. त्या सुरेल गप्पांचा हा गद्य गोषवारा..

‘गाणाऱ्याचा स्वभाव त्याच्या गाण्यातून दिसतो का? म्हणजे खडुस माणसाच्या गाण्यात मोकळेपणा नसतो, किंवा एखाद्याचं गाणं मोकळंढाकळं असेल तर त्याचा स्वभावही तसाच असेल का?’

– नक्कीच. तसंच असतं. मनानं बंदिस्त असलेल्यांचं गाणं तितकं मोकळं होत नाही. स्वभावात एक दिलेरी असेल तर ती गाण्यातही उतरते. एखादा कोणी रिझव्‍‌र्ह टाईपचा असेल तर गाण्यातही तो तसाच असण्याची शक्यता असते.

‘तुमचं काय?’

– मेरा गाना बिलकुल मेरे जैसा है.. और मं मेरे गाने जैसा हूँ..

आदल्या दिवशीच्या गप्पांत त्यांनी भीमसेनजी, बडे गुलाम अली खॉं साहेबांपास्नं अनेकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. तो धागा पकडून त्यांना इतिहासातून वर्तमानात आणायचा प्रयत्न केला. ‘या प्रत्येकाचं वेगळेपण..?’ हा प्रश्न.

– देखो ऐसा है.. ही सगळी माणसं म्हणजे मूíतमंत संगीत होती. ती संगीत जगत होती. त्यांच्या गाण्याचा, स्वरांचा लहेजा अलग अलग असेल, पण या सगळ्यांत एक गोष्ट समान होती.. ती म्हणजे उपज. राग, त्याचे आरोह, अवरोह, वादी, संवादी सगळं काही समान असतं सगळ्यांसाठी. पण समान नसते ती उपज.. गाना पेश करने का तरीका.. कुणी रागाला समोरनं मिठी मारतो, तर दुसरा कुणी त्याच्या हातात हात घालून आपल्यासमोर पेश येतो. तर आणखी कुणी त्याला मधे ठेवून कडेकडेनं गोल गोल असं त्याचं दर्शन आपल्याला घडवतो. मजा आणि मोठेपणा आहे तो त्यांच्या या क्षमतेत.

..असं म्हणून उस्तादजी आपल्या शिष्यांकडे पाहत हे फरक गाऊन दाखवतात. आदल्या दिवशी त्यांनी आपली तालीम कशी झाली ते सांगितलं होतं. तो मुद्दा पकडून विचारलं..

‘तुम्ही एका बाजूनं उपज वगरेचं महत्त्व सांगता आणि त्याचवेळी तालीम कशी घोटून घोटून झाली तेही सांगता.. हा विरोधाभास नाही का? उपज तालमीतनं तयार होऊ शकते का?’

– कसं आहे, की नुसत्या तालमीनं, रियाजानं काही होणार नाही, हे खरं आहे. तो काही व्यायाम नाही. सकाळ- संध्याकाळ केला आपला असं नाही. पण रियाजानं होतं काय, तर तुम्हाला अंगभूत असं काही सांगायची ‘देन’ असेल तर तालमीनं तिचा विकास होऊ शकतो. काय गायचंय, कसं गायचंय हे कळतंय, पण ते सादर करायला गळा तयार नाही असं व्हायला नको, म्हणून तालीम करायची.

‘म्हणजे दोन-चार तास दंड-बठका काढायच्या..?’

– इसकी जरूरत नहीं. रियाज येता-जातासुद्धा सहज करता येतो. गाना अपने दिमाग में होना चाहिए.. वैसे होगा तब आप चलते चलते भी रियाज कर सकते है..

(मोठे कलाकार विचारांच्या किती एकाच पातळीवर असतात, ते इथे जाणवलं. मागचा एक प्रसंग आठवला. त्यावेळी एक मित्र सांगायला गेला मोगुबाईंना (कुर्डीकर.. किशोरीबाईंच्या आई)- रियाज करायला वेळ मिळत नाही, मुंबईत प्रवासातच वेळ किती जातो, वगरे. त्यावर मोगुबाई म्हणाल्या, ‘लोकलमधून जातोस ना? तो ठेका नाही पडत कानावर? तो धरायचा आणि मनातल्या मनात लावायचा सूर.’) ‘गाणं इतकं सहज आहे, तर मग त्याला नियमांच्या चौकटीत का इतकं बांधून ठेवलंय?’

– देखो मजा लेने के भी कुछ उसूल होते है.. तसंच गाण्याच्या नियमांविषयी आहे. नियमच नाही अशी व्यवस्था केवळ गोंधळाला जन्म देईल. त्यातून सौंदर्यनिर्मिती होणार नाही. आणि नियमभंग जरी करायचा म्हटला, तरी आधी नियम माहिती तर हवेत!

‘हे ठीक. पण तुम्हीही गाण्याच्या परंपरेतले नियम पाळता का? म्हणजे कोणत्या वेळी कोणता राग गायचा, वगरे. मला वाटलं- सकाळी मारवा ऐकावंसं, तर काय बिघडलं?’

– कुछ नहीं बिगडता. सुननेवाले कुछ भी सुन सकते है. प्रश्न गाणाऱ्यांचा आहे. मलाही कोणी असा काही आग्रह केला की मीही गातो ते. पण सकाळी मारवा गायची वेळ आली तर मी मनानं आणि सदेह सायंकालात गेलेलो असतो. सूर्य मावळतीला गेलाय.. असलेला प्रकाश पाठून येणाऱ्या अंधाराची जाणीव करून देतोय.. गाई घरी परततायत.. हे सारं वातावरण म्हणजे मारवा आहे. भले मला तो सकाळी गायला लागला तरी हे वातावरण माझ्या मनात तयार होतं आणि मगच तो मारवा बाहेर पडतो. तसं नाही झालं तर मारवा रंगणार नाही.

‘आणि ते वज्र्य स्वर वगरे? आनंदासाठी एखाद्या रागातला वज्र्य स्वर लागतो का? अशा वेळी काय करता? व्याकरण इतकं महत्त्वाचं असतं का?’

याचं उत्तर त्यांनी द्यायच्या आधीच मंदार बोलू लागतो. राशिदजी ही संधी साधतात आणि पान लावायला घेतात.

‘‘गुरूजींनी मालकंसात असं एक-दोनदा केलंय. मालकंसात ‘नि’ कोमल आहे..’’ कसा, ते तो गाऊन दाखवतो. राशिद खान सुरात सूर मिसळतात. मालकंस पिसाऱ्यासारखा फुलू लागतो.

‘‘पण गुरुजी गंधाराच्या खटक्यानंतर हलकासा शुद्ध नि मिसळतात त्यात. लोकांना काही कळत नाही. पण वेगळं, अद्भुत असं काही स्पर्शून गेलंय याची जाणीव तेवढी होते त्यांना.’’

मग ते गुरू-शिष्य मालकंस गप्पागप्पांतून उलगडून दाखवतात. त्यातला ‘नि’ कोमल आहे की शुद्ध, कळत नाही. पण जेव्हा केव्हा हे घडतं तेव्हा नकळत एक ‘आहाहा’ क्षण घडून जातो. ‘हे कसं होतं?’ यावर राशिद खान यांचं भाष्य : ‘‘बस.. एक छुरी हलके से चल जाती है.. लगती है तो पता भी नहीं चलता.. बस.. एक खून की लकीर उसका एहसास दिलाती है।’’

हे अद्भुत आहे.

‘व्याकरणाचं काय..?’

– वो इतना मायने नहीं रखता, जितना आनंद.. गाने में मजा आना चाहिए..

एव्हाना समोरच्या खिडकीतनं दिसणाऱ्या आकाशात काळ्या ढगांची दाटी खोलीतही जाणवावी इतकी दाट झाली होती. राशिदजींच्या गळ्यातून ‘मेघ’ उमटतो. मग त्यावर नुसता ‘अहाहा’चा खच खोलीभर. मंदार सांगतो, ‘‘यातला गंधार कोमल नाही. पण िमड घेताना गुरूजींनी तो घेतला..’’

‘‘देखो- ये एक सोच है..’’ असं त्यावर राशिदजींचं म्हणणं. एव्हाना राहुल रानडेही तिथं पोचतात.

‘सोच’ या मुद्दय़ावर मग राशिद खान यांना विचारलं.. ‘काही काही गायक बठकीत इतकी सरगम घेतात, की जणू गाण्याची शिकवणीच वाटावी. हे असं का?’

– हा त्यांचा विचार आहे. आपण गाणं असं गावं ही त्यांची सोच आहे. कोणाला ती आवडेल किंवा आवडणार नाही. पण म्हणून कोणी त्याला चूक/बरोबरीच्या काटय़ात बसवू नये. ते बरोबर नाही.. असंच त्यांचं मत ‘उस्तादी पेशकश और गाने का पंडिती तरिका’ याबाबतही स्पष्ट.

‘‘दोनोही बराबर. जिसको जो पसंत है वो वो कर ले.’’

या सगळ्यात एक जाणवलं, की राशिद खान यांचा काही बडेजाव नाही. आहे तसेच ते समोर येतात आणि तसेच गातात. आता आणखी एक पान निघालेलं. ते पाहून त्यांना विचारलं- ‘गळ्यासाठी काही विशेष काळजी वगरे घेता का?’ कारण अलीकडच्या काही गायकांना त्यांच्या गळ्याचं अवडंबर माजवताना पाहिलेलं. ‘‘कुछ नहीं..’’ असं त्यांचं उत्तर.. ‘‘वो बस नखरे होते है उनके. मं जो चाहे वो खाता-पिता हूँ. गाना दिमाग में होता है.. गले से सिर्फ बाहर आता है.’’

अलीकडे काही गायकांच्या गाण्यापेक्षा दिसण्यासाठीच त्यांच्या गाण्याला ‘वा..वा’ म्हणायची पद्धत रूढ होताना दिसते. त्याबाबत राशिदजींना छेडलं.

‘‘देखो भाई, मं किसी के भी गाने के बारे में कभी भी बुरा नहीं कहता. ना आपके सामने, ना पिछे. जो लोग दिखावे पे जाते है, वो उनकी सोच है.’’

‘तुम्ही नव्या पिढीचे बुजुर्ग आहात. जुन्यांच्या उंचीशी स्पर्धा करणारे नवे. तेव्हा तरुणांच्या गाण्याला जाता का कधी?’

– जाता नही हूँ.. पर सुनता जरूर हूँ..

‘मतलब?’

– अरे, होता क्या है.. मी जर गेलो तर आयोजक त्या तरुण गायकाकडे दुर्लक्ष करून माझीच खातीरदारी करायला लागतात. ये सही नहीं लगता.. इसलिए जाता नहीं हूँ..

एव्हाना घडय़ाळाचा काटा दोन आणि अडीचच्या मधे घुटमळत असतो. सगळ्यांना भुका लागलेल्या असतात. आणि जेवायला जायचं असतं एका विशेष ठिकाणी. उस्तादजींना त्याची आठवण करून दिली. तर ते म्हणाले : भाई, क्या करना है इधर उधर.. अच्छे गप्पे लगा रहे है.. गाना हो रहा है.. तो खाना भी यही खाएंगे..

ती पडत्या फळाची आज्ञा समजून हॉटेलच्या मॅनेजरला हाळी घातली जाते. तो येतो. काहीही सांगावं लागत नाही. फक्त किती माणसं एवढंच तो बघतो. थोडय़ाच वेळात ट्रॉलीवरनं जेवण येतं. तो मॅनेजरही येतो. ‘‘उस्तादजी.. कुरकुरी भिंडी बनाई है आपकेवाली.’’

आणि मग उस्ताद राशिद खाँ गाण्याच्या समेवरनं खाण्याच्या समेवर येतात.. तितक्याच आनंदानं.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

Story img Loader