|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी
अवचित एखाद्या अडनिडय़ा सुटीदिवशी जेवणापूर्वीच डोळा लागत असतो. पुस्तक जेमतेम छातीवर कलंडत असतानाच खण् टणाण् खळ् टण् असे भांडय़ांचे आवाज येतात आणि दचकून जाग येते. कुतूहलाने आवाज ऐकले असता व्यक्त होणारा राग समजून येतो. मी उठून मावशींना विचारतो, ‘‘काय मावशी? कोणी त्रास दिलाय आज? मुलाने की मिश्टराने?’’
स्वत:शी पुटपुटत, भांडी आदळत धूत असलेल्या मावशी जरा चपापतात आणि हसतात. ‘‘काय नाय’’ असे म्हणून परत कामात गुंततात. पण कधी मी ताणलेच तर तुटकसे काही सांगतात. कधी मुलाने भांडून पसे नेलेले असतात, तर कधी मिश्टराने आगळीक केलेली असते. कधी सासुरवाडी कारण, तर कधी शेजार. माउलीस आणि आमच्या घरच्या ताटवाटय़ांस सहनच करावे लागते निमूट. या असहायतेचा आवाज मग घरभर गुंजतो. मावशीला आणि भांडय़ांना एकमेकांचीच काय ती साथसंगत. दोन माहेरवाशिणींनी गुज करत टिपे गाळावी, मध्येच मोठे उमाळे यावे असे ते कांडणकूजन जराशाने विरत जाते. इतक्यात ती येते अन् मावशीला काहीबाही देते. मावशी हरखून पुढच्या कामी निघून जाते.
‘‘एकदा चर्चा करायला हवी मावशीच्या मिश्टराशी अन् मुलाशी.’’
‘‘ओ मिश्टर, ही सिनेमातली पात्रे नाहीत तुम्ही सांगाल ते ऐकायला. उगी राहा.’’ ती सकल सार्वत्रिक समजूत असल्यागत मला गप्प करते.
‘‘अगं, पण हा अन्याय का म्हणून सहन करायचा मावशीने? आणि आपण तिला काहीच मदत करायची नाही का?’’
‘‘मग आता काय मधे पडून वितंड वाढवणार? त्यापेक्षा मी ती अनब्रेकेबल भांडी आणायचं म्हणतेय. थोडा खर्च होईल, पण आवाजाचा त्रास मात्र हमखास कमी होईल.’’
हे काही प्रश्नाचं उत्तर नसतं; पण आजकाल योग्य वा सम्यकही फार बोलून चालत नाही, म्हणून मी गप्प राहतो. रिअॅक्शनरी बोलून पटकन कळपात घुसायचं. वैयक्तिक अन् सामाजिक शांतता सांधून राहते. पण मग जरा स्वतंत्र विचार करायची खोड असली, तर अशा गप्प राहण्यातून वा गप्प केलं जाण्यातून येणारी असहायता मनात भरून राहते. ‘‘काचेचीच का नाही आणत त्यापेक्षा?’’ कुजकट टोमण्यानं तात्पुरता दिलासा मी मिळवतो.
असंच आणि एकदा कुणी मित्र घरी येतो. अनवधानानं वा नियम अनुसरण्याचा कुठलाच भाव कधीच आपसूक तयार न होण्याच्या जनुकीय दोषातनं बिचारा वाहन इमारतीच्या आवारात आणतो. उभे करतो अन् घरी येऊन गप्पा मारतो. तर निघताना कळतं, की शेजारणीनं त्याच्या वाहनावर स्वयंपाकघरातला ओला कचरा अंथरून ठेवलाय. मी ओशाळतो. तो चिडतो, दुखावतो. असहायतेनं कचरा गोळा करू लागतो. मीही मदत करतो. इमारतीच्या आवारात शहराचं व्यवच्छेदक लक्षण असणारी पाटी आहे. त्यावर खऱ्या खोटय़ा सूचना लिहिलेल्या आहेत. त्यात आवारात ‘बाहेरच्यांनी वाहन आणू नये’ यासह ‘अभ्यागतास कुत्रा चावेल’ अशीही एक सचित्र सूचना आहे. एक पायजमा घातलेला पाय आणि त्याची पोटरी पकडलेला कुत्रा असे समर्पक चित्रंही निरक्षरांच्या सोयीकरता चितारलेले आहे. इमारतीत कुत्रा नसताना खोटी धमकी का देतात, असे याच मित्राने सात्त्विक संतापाने विचारलेले असते. वाहनाचा कुणालाही त्रास नसता कचरा का अंथरला, असे वाटत असतानाच पाटी लावली असतानाही वाहन आत आणलेच कसे? असा प्रश्नांचा तिढा तयार होतो. याप्रसंगी कुणाशी चर्चा करावी?
शेजारीण- उच्चविद्याविभूषित व शिव्यांचे ताजे शब्दकोश मुखोद्गत करून लोकसंस्कृतीशी नाळ सांधलेली विदूषी. नुस्ता विरोधी विचार मनी येताच ती त्वरेने येऊन आपले विपुल शब्दसामथ्र्य सादर करते. समोरचा वाहता रस्ता काही क्षण थबकतो. काही स्पर्धा परीक्षा द्यायला आलेले विद्यार्थी व काही भाषाप्रेमी जुनी खोडं अंमळ या मनोरंजनाचा लाभ घेतात. सारा प्रसंग निवळायला संध्याकाळ होते. मी न सांगताच तिला झाला प्रकार कळतो अन् आल्या आल्या ती अन्याय का सहन केला, असा जाब विचारत भांडी वाजवू लागते. मावशीच्या भांडय़ांहून हा आवाज निराळा व घुमावदार. एकंदरीत कौटुंबिक कलहापेक्षा सामाजिक कलह जास्त तिढेदार हे खरंच. यात चच्रेला बघ्यांसह अनेक पाटर्य़ा इलिजिबल. बोलायचे तर कसे अन् कुणाशी? मग असहायतेचा नि:शब्द आवाज माझ्यासह शहराला नीज आणतो.
बहरहाल, जिवंत माणसाचं व्यवच्छेदक लक्षण जर स्वतंत्र विचारशक्ती असं मानलं तर ते चाचपून पाहायला हवं. वापरात ठेवून जिवंत असल्याची खूण पटवायला हवी. पडणाऱ्या प्रश्नापाशी थांबून झगडायला हवं. कधीतरी गुगलला विसावा देऊन स्वत: गुंग व्हायला हवं. मी स्वत:ला समजावत उत्सुकतेनं जागतो. शब्दांनी अर्थ हरवल्यानं त्यांच्या फोलफटातून वास्तव समजून घेण्याचा यत्न करतो.
का सहन करते मावशी अन्याय? तशी ती आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र आहे आणि अगदी पुलंच्या हरी कुरणेला चोपणाऱ्या गंगव्वाइतकी नसली तरी अंगमेहनतीच्या कामानं चांगलं दणकट बनवलंय तिला. मग का नाही वापरत ती बळ? जगण्याच्या लढाईत बळ हरवलेला तिचा मिश्टर दारू पिऊन बळजोरी कशी करू शकतो? शिवजयंती साजरी करण्याकरिता स्वत:च्या आईलाच अपमानित व असहाय करीत तिचा लेक हातची शिल्लक कशी घेऊन जातो? मावशी भांडय़ांवर राग काढते म्हणून मी का रागावतो? एखादी निरुपयोगी नवी वस्तू देताच मावशी प्रसन्न कशी होते? विचार करू शकण्याचा टेंभा मिरवणाऱ्या मला कृती करण्यापासून नेमके कोण रोखते? तिचं माझ्यावर प्रेम असल्याचं नेमकं ठाऊक असताही मी तिला का घाबरतो?
प्रश्नांची उतरंड रहाटपाळण्यागत भोवंडून टाकते. पण मजा येते. दरवेळी उत्तरं शोधण्याचा अट्टहास ठेवून चालणार नाही. काही वेळा नुस्ताच प्रश्नांचा हिंदोळा हलवीत राहावे लागेल. कदाचित नेमकी उत्तरं मिळायला चारित्र्य कमवायला हवं. कमावलेलं आचरणात आणायला हवं. मग मिळकत हाती लागेल वाचलेल्या बुकातून वा जगलेल्या प्रसंगातून. शिक्षकांनी सांगितलं होतं हे बहुदा. आई-वडील तर नित्य म्हणत. लहानपणी संघात पद्यही म्हणवून घेत. गावोगावच्या चौकात पुतळेही बसवून पाहिलेत शिवाजी महाराज, गांधी अन् टिळकांचे. पण काही केल्या शौर्य, धर्य, न्याय, नीती, सत्य, क्षमाशीलता, सहिष्णुता असल्या शब्दांचे अर्थ कळत नाहीत. वारंवार बोलूनही आचरणात आणताच येत नाहीत.
मग मुकाट बॉलिवुडी मन रमतं. अँग्री यंग मॅनभोवती विश्व फिरतं. तो आहे. तो करील. मला सोडवील या प्रश्नांच्या गुंत्यातून. आपण त्याचा जयजयकार करू ना. लागलंच तर त्याचेही पुतळे उभारू. तेवढी चारित्र्याची अट काढा बाबा. ते काय जमत नाय. मला नाय, दोस्ताला नाय, गावाला नाय अन् देशाला नाय. नेमकं करायचं काय, तेच कळत नाय. शिवाजी व्हायचं की गांधी? म्हणजे आमच्या देशाचा नंबर एक हिरो कोण? किंवा आपली नेमकी ओळख काय सांगायची? म्हणजे इंग्लंड कसा नियमानं चालणारा, चहा पिणारा देश किंवा अमेरिका कसा लबाड व्यवहारी लांडगा अथवा चीन कसा माजोरी बोका, तसं आपलं काय? सहनशील? हो! तोच एकमेव गुण आहे आमच्यात. मावशीत, मिश्टरात, मित्रात, माझ्यात.. सगळ्यांत! अन्यायाविरोधात सडय़ानं उभं राहण्याची गांधी, शिवबाची निर्भयता नाहीच उरली का आता? आम्ही भांडी बडवण्यातच पुरुषार्थ शोधणार?
बहरहाल, परवा वाजली परत भांडी. अनेक. देशभर. कल्लोळ नुसता. मी दडे बसून लपून बसलो. मला भीती वाटली माझ्या मनातलं बोलायची. भाबडं काही कसं बोलणार या गदारोळात? पण खरंच मला वाटतं, की संयमाची पराकाष्ठा करणाऱ्या मावशीतून, शिवारात राबणाऱ्या कष्टकऱ्यातून, सीमेवर उभ्या जवानातून, तुकडय़ा तुकडय़ानं का होईना, आमचं चरित्र घडेल. भांडी बडवायचं थांबवलं आणि स्वत:चा स्वतंत्र विचार केला, तर कदाचित माझा तुकडाही मला मिळेल. घडेल गाडगं गोरोबाच्या थापटण्याला आवडणारा नाद उमटवणारं!
बहरहाल, वो जगजीत की गजल भौत पसंद हुआ करती थी अपने को, उसमे वो गाता है –
‘तेरे होते कोई किसीकी जान का दुष्मन क्यूँ हो?
जीने वालों को मरने की आसानी दे मौला,
चिडियों को दाने, बच्चों को गुडदानी दे मौला’
girishkulkarni1@gmail.com