समीर गायकवाड sameerbapu@gmail.com
जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाच्या झंझावातात ग्रामीण आणि शहरी जग यांतलं द्वैत आता हळूहळू मिटत चाललं आहे.या पुसट होत चाललेल्या खुणांचा मागोवा घेणारं सदर.. ‘गवाक्ष’!
इरण्णा एकदम रोमनाळ गडी. त्याचं मूळ गाव कर्नाटकातलं नागरहळ्ळी. सोलापूरपासून भूमी सलग असलेल्या ईंडीहून त्याचा रस्ता. मात्र, हे गाव धारवाड जिल्ह्य़ातलं. गावाच्या हद्दीपासून दूर हिरव्या-निळ्या भीमेच्या तीरापासून अवघ्या काही फर्लागावर त्याची वडिलोपार्जित शेती होती. धार्मिक प्रवृत्तीचा चनबसप्पा हा इरण्णाचा बाप. त्याला पाच भावंडं. सगळ्यांची शेती एकत्रितच. सगळ्या घरांत असतो तसा तंटाबखेडा त्यांच्या घरातही होता, पण त्याला फार मोठं स्वरूप नव्हतं. रोजच्या जीवनातला तो एक अविभाज्य भाग होता. त्याची सर्वाना सवयही होती. त्यामुळं त्यांच्यात भावकीचं वितुष्ट असं काही नव्हतं. १९७२ च्या दुष्काळात भीमेचं पात्र कोरडंठाक पडलं. पीकपाणी करपलं. विहिरी आटल्या. खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. इथून त्यांचे दिवस फिरले. पिकाचं निमित्त होऊन सुरू झालेलं भांडण सलग चार-पाच वर्ष चाललं. खातेफोड झाली. वाटण्या झाल्या. थोरल्या चनबसप्पाच्या वाटय़ास नऊ एकर शेती आली. त्याच साली त्याच्या धाकटय़ा मुलाचं- म्हणजे म्हंतप्पाचं लग्न झालं. नवीन सून घरात आली अन् घरात नवी भांडणं लागली.
चनबसप्पाची पोरं आपसात भांडू लागली. त्यांना शेतात वाटण्या हव्या होत्या. सलगच्या भांडणामुळं खचलेल्या चनबसप्पानं त्या सालच्या पावसाळ्यात कंबरेला धोंडा बांधून भीमेच्या पात्रात उडी घेतली. भीमेनं त्याला पोटात घेतलं. भावकीने पोरांना सबुरीनं घ्यायचा सल्ला दिला. अखेर चनबसप्पाच्या चार पोरांनी शेत वाटून घेतलं. त्या जमिनीत एक मेख होती. रान नदीला लागून होतं, तरीही वरच्या अंगाला काही जमीन खडकाळ होती. थोरल्या इरण्णानं मनाचा पहाड करत ती जमीन आपल्याकडं घेतली. बाकीच्या भावांनी राहिलेली सुपीक जमीन घेतली. त्या वर्षीच इरण्णानं वस्ती सोडली. त्याच्या मेव्हण्यानं त्याला काम दिलं. त्याच्या ओळखीनं तो दामू पाटलांच्या शेतावर सालगडी म्हणून कामाला लागला. दामूअण्णाच्या घरादाराला कन्नड येत असल्यानं त्याचे भाषेचे वांदे झाले नाहीत. पण मराठी अवगत करायला त्याला काही वर्ष लागली. काही वर्षांपूर्वी स्वत:च्या शेतात राबणारा इरण्णा आता सालदार झाला. पस्तीशी पार केलेल्या इरण्णासोबत पत्नी पार्वती आणि दीड-दोन वर्षांचा चिमुरडा शिवाप्पा होते. आधी मूल लवकर होत नव्हतं म्हणून घरादाराचा दु:स्वास झेललेल्या पार्वतीला सगळ्या कामांची सवय होती, पण सुखाचा संग कधीच नव्हता. आता मूल झालं होतं, तर स्वत:च्या मुलखातून परागंदा व्हावं लागलेलं. तरीही आपल्या पतीविरुद्ध तिची कधीच तक्रार नव्हती.
त्यानं नांगरट सुरू केली की ही बेडगं घेऊन मागं असायचीच. त्यानं दारं धरली की ही फावडं घेऊन वाफे बांधायला तयार. त्यानं टिकाव घेतला की हिच्या हातात घमेलं आलंच. त्यानं गाडीला बल जुपायला काढले की ही सापत्या घेऊन हजर. तिला शेतातलं कोणतं काम येत नव्हतं असं नव्हतं. इरण्णा हा तर आडमाप गडी. विठ्ठलासारखा काळा कुळकुळीत. अंगानं ओबडधोबड. केळीच्या बुंध्यागत िपडऱ्या अन् तांब्या हातात मावंल अशी मूठ! कोंबडय़ानं बांग द्यायच्या आधीच त्यांचा दिवस सुरू होई तो सूर्य अस्तास जाईपर्यंत चाले. दामूअण्णाच्या शेतात त्याचा वावर एकदम जुन्या माणसासारखा झाला. तिथली झाडंझुडपंदेखील त्याच्या प्रेमात पडलेली. घरटय़ातली पाखरंदेखील त्याच्या यायच्या वक्ताला हजर राहून चिवचिवाट करून त्याला सलामी देत. तो जुंधळ्यांत गेला की फुलपाखरं त्याच्या मागोमाग येत! सांजेला कडबाकुट्टी आटोपून तो धारा काढे. मांडीच्या बेचक्यात लख्ख पितळी चरवी ठेवून धार काढायला बसला की दोन तास गडी हलत नसे. अवघ्या काही महिन्यांत पवाराच्या वस्तीवरची सगळी जित्राबं त्यानं आपलीशी केलेली. काही म्हशी तर त्यानं कासंला हात लावल्याशिवाय धारदेखील देत नसत. त्यानं चरवी घेताच गुरांच्या आमुण्याच्या पाटय़ांची तयारी करायचं काम पार्वतीकडं येई. बलगाडीची तऱ्हाही न्यारी होती. राण्या-सुभान्याची जोडी त्याच्याशिवाय जू चढवून घेत नसे. त्यानं कितीही कासरा आवळला तरी त्यांची तक्रार नसे.
काळ्या मातीलाही त्याच्या राकट पायांची सवय झालेली. त्यानं मायेनं पाभरीतनं टाकलेलं बियाणं मातीनं अलवार आपल्या कुशीत कुरवाळलेलं. पार्वतीनं दंडातून पाणी सोडताच सगळी पिकं गटागटा पाणी प्यायची. बघता बघता सगळं शेत कसं हिरवंगार होऊन गेलं, पाटलाला कळलंही नाही.
कित्येक मौसम मातीची कूस सलग भरभरून फुलून आली आणि त्यानंतर पाचेक वर्षांनी पार्वतीचीही पावलं जड झाली. त्याही अवस्थेत ती जमेल तसं काम करत राहिली. पाटलीणबाईंनी सांगून पाहिलं, तरी तिने ऐकलं नाही. ठरल्या दिवसापेक्षा आधी ती ‘मोकळी’ झाली. पुन्हा पोरगाच झाला. ‘विश्वनाथ’ त्याचं नाव!
आता पाटलांनी त्याला वस्तीतच चांगलं दोन खोल्यांचं घर बांधून दिलं. पाटलांची वस्ती तान्ह्य़ा पोराच्या आवाजानं गजबजून गेली. शिवाप्पाची ओढ लहानपणापासूनच शेताकडं. तरीही पाटलांनी त्याला गावातल्या शाळेत बळंच धाडलं. पण त्याचं काही शिकायचं लक्षण नव्हतं. वर्ग बुडवून तो शेतात यायचा. असं पाच-सहा वर्ष चाललं. अखेर सहावी-सातवीत त्याची शाळा सुटली. दप्तरात चिंचेचे आकडे घेऊन जाणारा तो पोर गुरं वळायला हाळावर घेऊन जाऊ लागला. तोवर इकडे विश्वनाथची शाळा सुरू झाली. पोरगा अभ्यासात हुशार आहे
आणि त्याला अभ्यास आवडतो असा मास्तरांचा निरोप आल्यावर पाटील हरखून गेले. कारण इरण्णा कामाला लागल्यापासून त्याच्या गावीदेखील गेला नव्हता. सलग एक तप त्यानं तसंच काढलेलं. त्याची बायको आणि पोरगंही आपल्या शेतात राबतं, तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही पाटलांची अनिवार इच्छा. विश्वनाथची प्राथमिक शाळा सरल्यावर त्याला सोलापुरात शिकायला ठेवलं. पोरगं दूर गावी एकटंच जाणार म्हणून पार्वतीच्या पोटात गोळा आला. पाटलीणबाईंनी तिची समजूत घातली. मधल्या काळात इरण्णा गावाकडे जाऊन आला. तिथून आल्यापासून त्याचं चित्त लागत नव्हतं. ते दामूअण्णांनी ओळखलं. त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरवत त्याला बोलतं केलं.
इरण्णाच्या गावी सगळं आलबेल नव्हतं. त्याच्या सर्वात धाकटय़ा भावाचं पोटपाणी पिकलं नव्हतं. त्याच्याहून लहान्या भावाला लकवा मारला होता, दुसरा एक भाऊ व्यसनाधीन झालेला. त्याच्या पोरीबाळी न्हात्याधुत्या झालेल्या, पण लग्नं जमत नव्हती. नदीजवळ शेत असूनही इरण्णा गेल्यापासून त्यात फारसं काही पिकलं नव्हतं. गाव म्हणू लागलं, की कुटुंबाला चनबसप्पाचा तळतळाट लागला. तरीही त्यांच्या वागण्यात फरक पडला नव्हता. त्यांनी इरण्णाची फिकीर कधीच केली नव्हती. पण त्यांची फिकीर करू लागलेला इरण्णा झाडाला खोडकिडा लागावा तसा स्वत:ला टोकरत होता. पाटलांनी त्याला जगरीत समजावून सांगितली, पण गडी काही खुलला नाही. त्यानंतर तो आपली निम्मीअर्धी कमाई दरसाली भावांच्या हवाली करू लागला. भावकीच्या हातापाया पडून कशीबशी पोरींची लग्नं उरकली.
तोवर इकडे विश्वनाथ पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेला, तर शिवाप्पाचं हात पिवळं करा म्हणून पार्वतीने टुमणं लावलं. त्याचं लग्न पाटलांच्या वस्तीवरच झालं. लग्नाच्या पहिल्याच वर्षी त्याला मुलगी झाली. पुढच्या पिढीसाठी पार्वतीनं गावात एक घर द्यायची विनंती पाटलांना केली. गावात घर केलं आणि शिवाप्पानं आपल्या दमलेल्या बापाला गावातच विश्रांती घ्यायला सांगितलं. इरण्णाचं मन आता तिथं थांबायला तयार नव्हतं. त्याला त्याच्या मातीची असीम ओढ लागून राहिली होती. तो गावाकडं निघाला तेव्हा पाटील ढसाढसा रडले. शेतशिवार चिडीचूप झालं. गोठा अबोल झाला. झाडांनी मान वेळावून घेतली. वारं शांत झालं. शिवाप्पा आणि सुनेच्या डोक्यावरून आपले सायमाखले हात फिरवून पार्वती इरण्णासह नागरहळ्ळीला आपल्या मातीकडं रवाना झाली.
या घटनेला आता एक तप झालंय. इरण्णा सत्तरीपार झालाय, तर पार्वती साठीत. ते परतल्यापासून पीकपाणीही परतलं. खडकाळ रान फोडत त्यानं तिथं माती ओतली. बरीच वर्ष मशागत करून यंदा पहिलं पीक घेतलंय. येळवशीच्या दिवशी दरसाली तो पाटलांच्या घरी जातो. शिवाप्पादेखील आपली बायको-पोरं घेऊन दरसाली नागरहळ्ळीला येतो. मात्र, त्याचं मन तिथं रमत नाही. कधी एकदा परतेन असं त्याला होतं. इरण्णाचं मात्र तसं नव्हतं. पाटलांच्या घरी गेलं वा स्वत:च्या गावी गेलं, तरी पाय निघत नाहीत. विश्वनाथची तऱ्हा थोडी न्यारी होती. शिक्षणानंतर नोकरीही पुण्यातच लागली. त्यानं घरही तिकडेच केलं. सवड मिळेल तसं तो कधी शिवाप्पाला, तर कधी इरण्णाला सहकुटुंब भेटून जातो. त्याचं मन पूर्वीसारखं खेडय़ात रमत नाही. मात्र, रोज सांज होताच पार्वतीच्या ओलावल्या डोळ्यांच्या निरंजनात पोराबाळांच्या आठवणींची दिवेलागण होते. ती घनव्याकूळ होते. बाजेवर पडलेला इरण्णा मातीच्या सुगंधात न्हाऊन निघत चांदणं अंगाला लपेटून झोपी जातो.
माणसांचं स्थलांतर केवळ शहरातच होतंय असं नाही, खेडोपाडीही ते होऊ लागलंय. तुलनेत त्याची गती धिमी आहे. पण एका गोष्टीचं समाधान आहे, की गावाकडं माणुसकीचं स्थित्यंतर अजून सुरू व्हायचंय. त्याचा संबंध मातीशी जुळलेल्या घट्ट नाळीशी असावा. इरण्णा हा त्याचं जितंजागतं प्रतीक ठरावा.