शिकवावे कसे, हे शिकवणारी अनेक महाविद्यालये जगात आहेत. पण शिकावे कसे, हे मात्र जणू काही सर्वाना जन्मजात माहीत असते असे समजले जाते. नुकतेच जन्मलेले मूल दोनच वर्षांत चालायला, बोलायला लागते ते आपले आपण. कुणीही त्याला शिकवत नाही. त्याला व्याकरण न शिकवता नीट बोलता येते. त्याला वस्तू, माणसे, भावना ओळखता येतात. असे म्हणतात, की आयुष्यात आपण जे काही शिकतो, त्यातले ९० टक्क्यांपेक्षा जास्त पहिल्या दोन वर्षांत शिकतो. हे सारे कुणीही न शिकवता शिकणाऱ्या बाळाला पुढे आपण शिकवायला लागतो आणि त्याने अनिच्छा दाखवल्यास बदडायला लागतो. पहिल्या दोन वर्षांतले हे कौतुकभरले आपोआप झालेले शिक्षण अचानक अत्यंत दु:खद अशा शालेय शिक्षणात परिवर्तित होते. काय बरे होत असावे? ज्या गोष्टीमुळे आपले अज्ञान दूर होते, आपल्याला नवीन गोष्टी समजू लागतात, ती गोष्ट किती आनंददायक असायला हवी! पण ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ यावर विश्वास ठेवणारे काही कमी नाहीत. प्राणी आपल्या पिलांना शिकार करायला शिकवताना मारझोड करताना कुणी डिस्कव्हरी चॅनेलवर पाहिले असेल तर सांगावे. शिक्षणातील पहिले दु:ख असे हे शिकणे शक्य आहे, पण शिकवणे अशक्य आहे हेच कुणाला माहीत नाही.     
एखादी गोष्ट शिकायचा ध्यास घेतला की एकलव्य फक्त पुतळ्याकडून सारी धनुर्वद्यिा शिकू शकतो आणि शिकायचे नसेल तर बाळ्या प्रत्यक्ष आइनस्टाइनकडून ‘बे दुणे चार’ हेदेखील शिकू शकत नाही. हा ध्यास उत्पन्न झाल्याशिवाय मुलांना शिकवणे हा अत्याचार आहे. त्यामुळेच शाळेत जाताना मुले आक्रोश करून रडत असतात. ही गोष्ट भयंकर आहे, हे त्यांना मनापासून समजलेले असते.
सम्राट अकबराला एकदा प्रश्न पडला की, जन्मलेल्या मुलाची भाषा कोणती असते? त्याने दरबारात तो प्रश्न मांडला. कुणीच योग्य उत्तर देऊ शकेना. मग त्याने एक प्रयोग केला. एका नुकत्याच जन्म झालेल्या बाळाला पूर्णपणे आवाज न येतील असे एक वर्ष वाढवले व अखेर ते मूल एक शब्दही उच्चारण्यास असमर्थ ठरले, कारण त्याच्याभोवतीचे वातावरण शिकण्यास अनुकूल नव्हते. सहज शिकण्यासाठी फक्त वातावरण अनुकूल लागते. मूल आपले आपण शिकते.
शिकणे शक्य आहे, पण शिकवणे अशक्य आहे हे एकदा शिक्षकांना कळले, की एक प्रकारचा अहंभाव नाहीसा होतो. म्हणजे ‘तुला काहीही अक्कल नाही, मला आहे.’ सबब, आता माझ्याकडून शिकणे एवढा एकच पर्याय तुझ्यासमोर आहे, असे मनात येत नाही. मग उरते ते एवढेच की जशी मुले पहिल्या दोन वर्षांत आपोआप शिकली तशी वातावरणनिर्मिती करणे, जेणेकरून मुले आपोआप शिकतील आणि शिकत राहतील. शिक्षण हे घडले पाहिजे. चालताना मूल पडले तर हसते, परत उठते, परत पडते, हसते असे करत करत चालायला लागते. अनेक मुले एकत्र आल्यावर एकमेकांचे बघून शिकत राहतात, किंबहुना हे बघून शिक्षकदेखील शिकत राहतात आणि एक आनंदमय असे वातावरण यासाठी कारणीभूत असते. मुलांकडून शिकत राहिले की, आपोआप शिकवले जाते.
आपल्याला काय आवडते, हे कळायला कित्येकांना फार वेळ लागतो, कारण अगदी लहानपणापासून कुणी विचारलेले नसते आणि तसा विचार करण्याएवढा पोच नसतो, पण आयुष्याच्या कोणत्याही वळणावर जर कळले तर त्या क्षणी शिकायला सुरुवात करणे हे जितके लवकर जमेल तितका आयुष्यातला आनंद वाढीस लागतो. शिकताना कुणाकडून आणि कसे शिकायचे हेही शिकायला लागते. ज्या माणसाशी बोलताना आनंद होतो, जो आपल्याला काय माहीत नाही याविषयी सहज बोलू शकतो, ज्याची विनोदबुद्धी जागृत आहे आणि ज्याला भेटून गेल्यावर एक शांतपणा येतो, त्याच्याकडून शिकणे योग्य. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या मनात एकाच वेळी पूर्ण विश्वास आणि पूर्ण अविश्वास लागतो. विश्वास अशासाठी की आपल्याला जे शिकायचे आहे ते याच्याकडे आहे हे माहीत आहे. अविश्वास अशासाठी की हा जे शिकवतो आहे त्याची प्रचीती आल्याखेरीज ते स्वीकारता येत नाही. प्रचीती न आल्यास प्रश्न विचारायलाच पाहिजेत. प्रश्न विचारू न दिल्यास शिक्षकाबद्दल परत विचार करावा.
जे  शिकल्यावर आनंदाव्यतिरिक्त उपजीविका, सृजन, मदत, साक्षात्कार यापकी सारे किंवा काहीही आयुष्यात होते, तेव्हा आयुष्य भरून पावले असे म्हणता येते. उत्तम शिक्षकाकडे अहंकार नसतो, तसेच त्याच्याप्रमाणे त्याच्या विद्यार्थ्यांकडेही तो शिल्लक राहत नाही. कारण आपल्याला जे माहीत आहे त्यापेक्षा माहीत होण्यासारखे असे अफाट ज्ञान आहे, की जे या आयुष्यात कवटाळणे शक्य नाही हे त्या दोघांना समजलेले असते. पंचेंद्रियांमुळे जे ज्ञान होते, त्याही पल्याड काही आहे अशी जाणीव होणे हे शिक्षणाचे फलित असले पाहिजे.
आयुष्यभर शिकत राहणे यासारखी दुसरी मजेदार गोष्ट नाही. आपल्यापेक्षा लहान मुले कितीतरी जास्त छान गात असतात. वाजवत असतात. चित्रे काढत असतात. आपल्याला येत नाही, असे जेव्हा त्यांना समजते तेव्हा आपणहून शिकवतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखी दुसरी मजा नाही. इतके सोपे आणि सुंदर कुणीच शिकवू शकत नाही. शिकत राहण्यामुळे आयुष्यातील ऊर्जा वाढत राहते. वय वाढल्याची कोणतीच जाणीव तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. शिकण्याचा आनंद पूर्णपणे वैयक्तिक असल्यामुळे  कुणाला त्रास होण्याची शक्यता नसते. वृत्ती अंतर्मुख झाल्यामुळे बाहय़ गोष्टींचा विनाकारण त्रास करून घेणे बंद होते. ऊर्जेचा संचय होत राहिल्यामुळे अनेकजणांना तुमच्याकडून आपोआप मदत होऊ लागते, त्यामुळे तुमचा मित्रपरिवार वाढता राहतो. तुम्ही क्षणाक्षणाला चकित होत असता. आयुष्यात सतत विस्मयजनक असेच काहीतरी चालू आहे, असे वाटत राहते आणि याहून आनंददायक अशी कोणती अवस्था असू शकत नाही.     n

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत