ज्याला विचार करण्याची सवय असते तो माणूस दु:खी तरी असतो किंवा अस्वस्थ तरी! देव व दैव मानणाऱ्यांना आणि न मानणाऱ्यांना प्रतिगामी आणि पुरोगामी ठरविण्यास सुरुवात झाल्यापासून साहित्य आणि साहित्यिकांवर शिक्के मारण्याची पद्धत सुरू झाली. या निकषाच्या काठीने साहित्य डावीकडे आणि उजवीकडे लोटण्याची प्रथा सुरू झाली. मग माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की, वैचारिक दृष्टिकोन बदलू शकणारा असेल तर, किंवा डळमळीत असेल तर, त्याआधारे केलेले वाङ्मयकृतीचे मूल्यमापन त्या लेखनाला न्याय देऊ शकेल काय? खुद्द लेखक तरी असा अंकुश मनावर टोचलेला राखून लेखन करू शकतो काय? विचारांवर भावना मात करीतच नाही काय?
हानपणी देवाचा आधार वाटत असे आणि दैवाची भीती वाटत असे. मग दैव उलटय़ाचे पालटे आणि माणसाला उभ्याचे आडवे करू शकते असे वाचनात आले. मग ‘दैवजात दु:खे भरता’ आणि ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ असे कानावर आले. आणि प्रभू रामचंद्रालाही दु:ख सहन करावे लागते हे कळल्यामुळे दैव हे देवापेक्षाही बलवत्तर वाटू लागले. पुढे अक्कल आली. (म्हणजे तसे वाटले!) तेव्हा  जी. ए. कुलकर्णीनी सांगितले की, ‘सारे सानथोर, प्रेषित आणि राजे, देव आणि दानव नियतीच्या चक्राला बांधलेले आहेत.’ तेवढय़ातच ज्ञानदेव-तुकाराम यांची भेट झाली. त्यामुळे देवाबद्दल प्रीती निर्माण झाली. या दोघांमुळे एक गोष्ट फार चांगली घडली. ‘देव हे करत नाही न् ते करत नाही, न् तो दुर्लक्ष करतो, न् तो हे उघडय़ा डोळ्यांनी कसे पाहतो न् सहन करतो,’ वगैरे आरोप, अपेक्षा- सारं काही निघून गेलं मनातलं. ज्ञानदेव म्हणाले, ‘त्याला’ काही कर म्हणणे किंवा तो काही करतो म्हणणे हे चूक आहे. म्हणजे देवही सुटला आणि मुख्य म्हणजे मी सुटलो. उरलेला भाग तुकारामबोवांनी सांगितला की, ‘दया तिचे नाव । भूतांचे पालन । आणि निर्दालन । कंटकांचे.’ अरेच्चा! म्हटलं, बोवा तर नवीनच व्याख्या करतात शब्दांच्या. मग तरुण वयातच ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी..’ असे वाटले आणि मनाने समजूत करून घेतली, की चांगल्या कामासाठी हाणामारी करावी, असा थेट आदेशच संत तुकारामांनी खुद्द दिलाय. मग काय, तुकोबा एकदम केव्हाही पाठीत गुद्दा घालतील असे ज्येष्ठ दोस्तच वाटायला लागले. (या काळापर्यंत तरी त्यांना कोणी ‘संतसूर्य’ किंवा ‘जगद्गुरू’ केले नव्हते.)
पुढे विचारप्रक्रियेत कालवाकालव सुरू झाली ती अलीकडल्या काळातील साहित्य वाचताना. असं लक्षात आलं की (किंवा वाटायला लागलं की), सकाळ-संध्याकाळ उठल्या-पडल्या ज्ञानदेव-तुकारामाचे नाव घेणाऱ्या आणि त्यांनी दाखवलेल्या प्रकाशात आम्ही वाटचाल करीत आहोत असे म्हणणाऱ्या लोकांची वाटचाल सुरू आहे प्रकाशातच; पण डोळ्यांना पट्टी बांधून सुरू आहे की काय?
ज्याला विचार करण्याची सवय असते तो माणूस दु:खी तरी असतो किंवा अस्वस्थ तरी. देव व दैव मानणाऱ्यांना आणि न मानणाऱ्यांना प्रतिगामी आणि पुरोगामी ठरविण्यास सुरुवात झाल्यापासून साहित्य आणि साहित्यिकांवर शिक्के मारण्याची पद्धत सुरू झाली. या निकषाच्या काठीने साहित्य डावीकडे आणि उजवीकडे लोटण्याची प्रथा सुरू झाली. मग माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की, वैचारिक दृष्टिकोन बदलू शकणारा असेल तर किंवा डळमळीत असेल तर, त्याआधारे केलेले वाङ्मयकृतीचे मूल्यमापन त्या लेखनाला न्याय देऊ शकेल काय? खुद्द लेखक तरी असा अंकुश मनावर टोचलेला राखून लेखन करू शकतो काय? विचारांवर भावना मात करीतच नाही काय? कट्टर मार्क्‍सवादी कवीच्या कवितेत मग ‘आत्मा’ हा शब्द कसा काय येतो? किंवा एकदा स्वत:ला कम्युनिस्ट म्हणविणारा, श्रेष्ठ मानला जाणारा दलित कवी, अगदी पंडित कवींच्या मनोरचनेशी साधम्र्य सांगणारा कवी; राधा आणि कृष्णाच्या प्रेम आणि प्रणयाच्या कवितेचा ‘खेळ’ कसा काय रचतो?
तत्त्व, भूमिका, दृष्टिकोन यांचा व्यासपीठीय आग्रह धरता धरता माणूस म्हणून असलेली नैसर्गिक आणि स्वाभाविक ऊर्जा अशी कुठूनतरी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आणि आकारात प्रगट होते का? मग सारी असलेली आणि घालून घेतलेली बंधने कलावंतांच्या प्रतिभाधर्माने तुटून कातळातल्या झऱ्यासारखी कलानिर्मिती प्रवाहित होते का? हा माझ्या दृष्टीने टीकेचा किंवा आरोपाचा नाही, तर उत्सुकतेचा आणि कुतूहलाचा विषय आहे. माणूस बदलतो, कलावंतामध्ये आतील पातळीवर होणारे बदल तो दडपून टाकू शकत नाही, हेही एक तथ्य जाणवायला लागते. तेव्हा तो चांगल्या अर्थाने ‘बेपर्वा’ होतो.
जी. ए. कुलकर्णीच्या कथेत ‘अलमख्तूब’ (जे लिहिले आहे ते लिहिले आहे.) अशी नियतीवादी जाणीव राज्य करताना दिसते. पण त्यांनी अखेरच्या पर्वामध्ये लिहिलेल्या कथांमध्ये ‘स्वामी’सारखी कथा या जाणिवेला छेद देते. एक विश्वास आणि आशावाद प्रकाशाच्या दिशेने वाढणाऱ्या वेलीच्या प्रतिमेतून ठामपणे प्रकट होतो. आयुष्यभर पराभूत, खचलेल्या माणसांच्या कुटुंबकथा लिहिणाऱ्या जी. ए. कुलकर्णी यांनी या दुसऱ्या पर्वामध्ये ‘सर्प, दूत, विदूषक’सारख्या अनेक छोटय़ा-मोठय़ा (आकाराने), पण सशक्त कथा लिहिल्या. त्या सरळसरळ ‘राजकीय’ कथाच आहेत. हे कसे झाले?
बुलढाण्याचे डॉ. स. त्र्यं. कुल्ली हे कट्टर आणि कठोर मार्क्‍सवादी होते. चारित्र्यसंपन्न असा त्यांचा लौकिक. या विचारांचा त्यांच्या आचारावर इतका परिणाम झालेला; की वैयक्तिक, खासगी जीवनातून त्यांनी छोटय़ा छोटय़ा सुखांनाही हद्दपार केले होते. मार्क्‍सवादी दृष्टिक्षेप टाकून केशवसुत, मर्ढेकर, सुर्वे यांच्या काव्याचा परामर्श घेणारा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. याच भूमिकेतून त्यांनी जीएंच्या कथेवरील चर्चेत त्यांच्या शैलीविशिष्ट कथेवर आक्षेप घेताना ‘सत्यकथे’त ‘प्रेत कितीही शृंगारले तरी त्यात जिवंतपणा येऊ शकत नाही,’ अशी तीव्र टीका केली होती. नंतर काय झाले हे कळायला मार्ग नाही; पण प्रा. कुल्ली जीएंच्या कथांचे व जीएंचे परमभक्तच बनले. कुल्लींचे, त्यांच्या मनाचे मोठेपण असे की, या बदललेल्या भूमिकेवरील टीका सोसूनही प्रामाणिक धाडस दाखवून ते सौम्यपणे आपले विचार मांडत राहिले. असे का झाले असावे? हे हळूहळूच झाले असेल ना? साक्षात्कार घडणे त्यांच्यासारख्या बुद्धिनिष्ठ माणसाच्या बाबतीत घडणे नाही. मग..?
हा प्रवास चक्क उलटय़ा दिशेने होताना कलावंताच्या मनातील द्वंद्व, खळबळ काहींनी हिमतीने शब्दांकितही केलेली आहे. प्रवास उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, खालून वर, वरून खाली असाही झालेला दिसतो. काही लेखक त्याचे लंगडे समर्थन करताना दिसतात. काहीजण कशी फसगत झाली होती आधी, हे नि:संकोचपणे मांडताना दिसतात.
‘सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ताँ हमारा’ आणि ‘मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना’ या ओळी लिहिणारे महान विचारवंत- कवी डॉ. महंमद इक्बाल यांचे उदाहरण ठळक आणि लक्षणीय आहे. एकेकाळी ते कट्टर मार्क्‍सवादी होते.
जिस महफिल में तक्सीम न होती हो बराबर मय
वो तुम्हारी होगी साकी मेरी महफिल नहीं है
ज्या जगामध्ये उत्पादन, संपत्ती, कष्ट, कमाई यांचे सर्वाना समान वाटप होत नाही (सर्वाचा यावर समान अधिकार असत नाही) ते तुमचे (म्हणजे भांडवलदारांचे, शोषणकर्त्यांचे) जग असेल; ते माझे असू शकत नाही, अशी स्पष्ट आणि आग्रही भूमिका त्यांनी मय म्हणजे मद्य आणि साकी यांच्या पारंपरिक प्रतीकांद्वारे हा नवा, नव्या युगाचा आशय सांगताना मांडली. (मय, साकी ही प्रतीके उर्दू कवितेची स्वाभाविक अंगे आहेत.) तेच इक्बाल पुढे तेवढेच कट्टर धार्मिक बनले आणि पाकिस्तानचे समर्थक बनले. त्यांची भूमिका योग्य की अयोग्य, हा माझा मुद्दा नाही. असे का घडले असावे, हा विचार मात्र मनात येतो. एका रात्रीत तर हे घडले नसावे! मार्क्‍सवाद, जगभरच्या विचारसरणी, उपनिषदे, धर्मशास्त्र, दर्शनशास्त्र, कुराण, बायबल, मानवी इतिहास- या साऱ्यांचा प्रचंड अभ्यास असलेला हा महाकवी! भूमिकेत बदल करून आणि नवी भूमिका स्वीकारून त्यांनी आपली नियती स्वत: निश्चित केली किंवा लिहिली असे म्हणता येईल का?
कमला दास या केरळच्या बंडखोर, स्त्री-स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या आणि त्यासाठी टीका, हल्ले, बहिष्कार, छळ सोसणाऱ्या कवयित्री व लेखिका. त्यांच्या आत्मकथनाने एकेकाळी खळबळ माजवली होती. आणि त्यांनी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी (चूकभूल देणे-घेणे!) इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि सांगितले की, या धर्मातच स्त्रीचा खरा सन्मान केला जातो. बुरखा घातलेला त्यांचा फोटोही त्यावेळी झळकला. लोक धक्काचकित झाले. प्रश्न इस्लामविरोध किंवा समर्थन यांचा नाही. बौद्ध वा ख्रिश्चन धर्म हे पर्याय त्यांनी विचारात घेतले की नाहीत, हादेखील नाही. कुतूहल- त्यांच्या मनातील वैचारिक घुसळणीचे, घालमेलीचे आहे. अंतरात्म्याचा आवाज वगैरे..?
कुठल्याही प्रलोभनाला किंवा दडपणाला बळी न पडणारी ही मोठी माणसे. त्यांची नीयत साफ होती. म्हणूनच त्यांच्याविषयी, त्या सृजनशील, निर्मितीक्षम माणसांच्या भूमिकांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाविषयी ही उत्सुकता आणि कुतूहल. स्वत:च स्वत:ची नियती बनण्याइतके बळ त्यांच्याजवळ होते. रक्तामधून हजारो वर्षांच्या वंशपरंपरेने आलेले गुण आणि ते जगले ते पर्यावरण- यांपैकी काय प्रभावी ठरले, असा विचार करावासा वाटतो. ‘रात्रंदिन आम्हा। युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य़ जग। आणि मन’ असा जीवघेणा संघर्ष त्यांनी मनाच्या रणांगणावर किती काळ सोसला असेल, तुकोबांप्रमाणे!
त्यामानाने देव हा फार चांगला माणूस आहे. तो फारसा त्रास देत नाही. त्याला साक्षी ठेवून तुम्ही पाप करू शकता, पैसे (किंवा शेण) खाऊ शकता, डाका टाकायला जाण्याआधी त्याचा आशीर्वाद मागू शकता, किंवा त्याचे दागिनेच काय, त्यालाही उचलून नेऊ शकता! तो काही म्हणत नाही. या सत्याचे ज्ञान झालेले रोमँटिक कवी मग अस्वस्थ होतात, करवादतात, त्रागा करतात. त्यांच्या जिवाचा तडफडाट होतो आणि कडवटपणे तिरकस शैलीत मग कुसुमाग्रज म्हणतात- ‘शेवटी गाभाऱ्याचंच महत्त्व अंतिम असतं.. गाभारा सलामत तो देव पचास.’
किंवा मग सौंदर्यात आणि मद्यानंदात बुडून जाणारा व ‘अभी तो मैं जवान हूँ’ असे म्हणणारे ‘हफ़ीज’ जालंधरीही अस्वस्थ होतात आणि म्हणतात-
जिसने इस दौर के इन्सान किये हैं पैदा
वो मेरा भी खुदा हो, मुझे मंजूर नहीं..    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा