कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या आणि लता मंगेशकर यांनी नेहरूंसमोर सादर केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या आगळ्यावेगळ्या देशभक्तीपर गीताला आज (२६ जानेवारी) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्याची जन्मकथा
दरवर्षी २६ जानेवारी (प्रजासत्ताकदिन) आणि १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) जवळ येऊ लागले, की सर्व टीव्ही चॅनेल्सवर आणि रेडिओवर देशभक्तीपर गीतांची पारायणं सुरू होतात. या सर्व गीतांत वर्षांनुवर्षे आपले अग्रगण्य स्थान टिकवून असलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’ला मानाचे स्थान दिले जाते. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ ‘प्रदीप’ यांच्या या काव्यरचनेची आजही जनमानसावर अबाधित मोहिनी आहे. हे गीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात आणि डोळ्यात अश्रूंची दाटी होते.
६ जानेवारी १९१५ रोजी बडनगर (मध्य प्रदेश)मध्ये जन्मलेल्या कवी ‘प्रदीप’ यांनी लखनऊ विद्यापीठातून हिंदी साहित्य या विषयात बी.ए.ची पदवी संपादन केली. हिंदीवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. अनेक प्रचलित हिंदी शब्दांचा त्यांनी सुरेख आणि चपखल वापर करून हिंदी काव्याचे दालन समृद्ध केले. हिंदी चित्रपटासाठी लिहितानाही त्यांनी आपली शैली कायम राखली.
बॉम्बे टॉकीजच्या ‘कंगन’ या चित्रपटापासून त्यांनी आपली चित्रपट कारकीर्द सुरू केली. ‘चल चल रे नौजवान, रुकना तेरा काम नही, चलना तेरा काम’ या ‘बंधन’ चित्रपटातील गाण्यातून त्यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या हिंदुस्तानातील तरुणाईला जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याकाळी प्रभात फेऱ्यांमध्ये हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते. अशाच प्रकारचे आणखी एक गाणे त्यांनी ‘किस्मत’ चित्रपटासाठी लिहिले. हा चित्रपट आला तो भारताच्या मुक्तिसंग्रामातील निर्णायक कालखंड होता. तेव्हा चित्रपटासारखे तळागाळात पोचलेले दुसरे कुठलेही प्रसारमाध्यम नव्हते. देशबांधवांमध्ये राष्ट्रीयत्व, देशभक्ती, स्वातंत्र्य या गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कवी प्रदीपनी चित्रपट माध्यमाचा जितका प्रभावी उपयोग केला, तितका प्रयत्न त्यांच्या समकालीन व नंतरच्या चित्रपट गीतकारांनी केलेला दिसत नाही. त्याकाळी त्यांच्या अनेक गीतांनी राष्ट्रप्रेमाची ज्योत फुलवली आणि प्रज्वलित ठेवली.
‘आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो, दूर हटो ये दुनियावालो हिंदुस्तान हमारा है’ या त्यांच्या ‘किस्मत’ चित्रपटातील गाण्याने सगळीकडे धूम माजवली होती. इंग्रजांनी या गीताला कात्री लावू नये, म्हणून त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी प्रदीपजींनी गाण्यातील काही ओळी खुबीने लिहिल्या आणि आपला रोख इंग्रजांवर नसून अन्य देशांवर असल्याचे भासवले. ‘शुरू हुआ है जंग तुम्हारा, जाग उठो हिंदुस्तानी तुम न किसी के आगे झुकना, जर्मन हो या जापानी’ या ओळीतील ‘जर्मन’, ‘जापानी’ या शब्दांमुळे इंग्रज फसले आणि त्यांच्या कचाटय़ातून हे गीत अलगद सुटले. परिणामी, यातून प्रदीपजींना आपल्या देशबांधवांपर्यंत जो संदेश पोहोचवायचा होता, तो यशस्वीरीत्या पोहोचवला.
‘जागृती’ या चित्रपटात त्यांनी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते लिहिली, जी आजही आपला प्रभाव टिकवून आहेत. हिंदूुस्थानाची महती सांगणारे ‘आओ बच्चे तुम्हे दिखाए झाँकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की’ हे गीत, महात्मा गांधींची अहिंसेंची विचारसरणी अधोरेखित करणारे ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ हे गीत किंवा मोठय़ा प्रयत्नांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याला जपून ठेवण्याचे आवाहन करणारे ‘हम लाए है तुफान से कश्ती निकालके, इस देश को रखना मेरे बच्चो संभालके’ या ‘जागृती’तील गीतांमधील तत्त्वज्ञान आजही तितकेच प्रभावी वाटते.
‘तलाक’ या चित्रपटात त्यांनी लिहिलेल्या गीतांमधील विचार आजही विचारप्रवृत्त करतात. ‘कहनी है एक बात हमें इस देश के पहरेदारों से संभलके रहना, अपने घर मे छिपे हुए गद्दारोंसे,’ हा त्यांनी त्याकाळी दिलेला इशारा आजही तितकाच समयोचित आहे. देशांतर्गत शत्रूंनी देशाला ज्या पद्धतीने पोखरले आहे, ते बघता प्रदीपजींच्या काव्यप्रतिभेतील दूरदृष्टीला सलामच करावासा वाटतो.
चिनी आक्रमणानंतर (१९६२) ‘भारत-चिनी भाई भाई’ या घोषणेतील पोकळपणाने दुखावलेल्या भारतीय देशबांधवांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने दिल्लीमध्ये एक कार्यक्रम योजिला होता. त्या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील कलावंतांना देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्याची विनंती केली होती. त्यात नौशाद-महम्मद रफ़ी ‘अपनी आजादी को हम हरगिज़्‍ा मिटा सकते नहीं’ (लीडर), शंकर जयकिशन ‘होठों पे सच्चाई रहती है’ (जिस देश में गंगा बहती है), मदन मोहन ‘कर चले हम फिदा जान ओ तन साथियों’ हे गीत सादर करणार होते. संगीतकार सी. रामचंद्र यांनादेखील एक गीत सादर करण्यास सांगितले होते. पण त्यांना चित्रपटातील गीत सादर न करता नवीन आणि वेगळे गीत सादर करण्याची इच्छा होती.
सी. रामचंद्र यांनी प्रदीपजींना बोलावून सांगितले की, ‘आतापर्यंत देशभक्तीपर गीतांमध्ये जे आलेलं नाही, असं काही तरी वेगळं मला तुम्ही द्या.’ प्रदीपजींनी विचार केला, पण त्यांना काही सुचेना. दिवस-रात्र प्रदीप याबाबत विचार करू लागले. एखादं वेगळं गीत लिहावयाचं असलं की, त्यांना सर्जनशीलतेचा ज्वर चढत असे. स्थळ, काळ, वेळ व मानसिक अवस्था या गोष्टींचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नसे. वेगवेगळ्या कल्पनांवर गीतरचना करण्याचा प्रयत्न मनात सतत चालू असे. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हा गीताचा मुखडा त्यांना माटुंग्यातील फूटपाथवर चालताना सुचला. ताबडतोब तिथेच थांबून त्यांनी तो सिगरेटच्या पाकिटावर लिहिला. मुखडा निश्चित झाल्यावर त्यांनी अंतऱ्यांमध्ये त्या कल्पनेचा अप्रतिम विस्तार करून गीतरचना पूर्ण केली. त्यांनी आठ ते दहा अंतरे लिहिले. त्यातून सी. रामचंद्र यांनी त्यांना आवडलेले आणि योग्य वाटतील असे अंतरे निवडले.
‘ऐ मेरे वतन के लोगो’च्या आधीच्या गीतांमध्ये देशाचे गुणवर्णन करणारी व ऐक्यभावना वाढीस लावणारी रचना असे. प्रदीपजींनी प्रथमच या गीतात सीमेवर लढून देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांची आठवण सदैव जागृत ठेवणारी रचना करून सर्व शहिदांना मानाचा कुर्निसात केला.
हे गीत सुरुवातीला आशा भोसले गाणार होत्या. त्या काळी संगीतकार सी. रामचंद्र व लता मंगेशकर यांच्यात काही मतभेद असल्याने ते एकमेकांबरोबर काम करत नव्हते. प्रदीपजींची मात्र अशी इच्छा होती की, हे गीत लता मंगेशकर यांनीच गावे. कारण या गीतातील भावनांना त्या अधिक प्रभावीरीत्या देशबांधवांपर्यंत पोहोचवतील. त्यांनी सी. रामचंद्र व लता मंगेशकर यांच्याशी बोलणं करून एकमेकांबरोबर काम करण्यासाठी त्यांना तयार केले. या गाण्याविषयी आणि त्यातील शब्दांविषयी पूर्ण गुप्तता बाळगण्यात आली. रिहर्सलसाठीदेखील वादकांना डमी शब्द देण्यात आले.
दिल्लीला प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हजर राहणार होते. धीरगंभीर वातावरणात लता मंगेशकर यांनी आपल्या दैवी स्वरात ‘ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा’ या वाद्यमेळांनी सजलेल्या ओळी गायल्या. पण जेव्हा ‘पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गँवाए, कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए’ या ओळी इतक्या पिळवटून टाकणाऱ्या स्वरात म्हटल्या की, पंडितजी एकदम सावरून बसले. सर्वत्र सन्नाटा पसरला. गाणं जसजसं पुढे सरकू लागलं, तसतशी ऐकणाऱ्याच्या हृदयात कालवाकालव होऊ लागली. पंडित नेहरू इतके भावनाविवश झाले की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ही होती प्रदीप, सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर यांच्या दैवी प्रतिभेची कमाल.
या गीताने इतिहास घडवलेल्या त्या कार्यक्रमानंतर मुंबईत आल्यावर पंडित नेहरूंनी कवी प्रदीप यांना बोलावून त्यांचा मानसन्मान केला. ते त्यांना म्हणाले, ‘‘जीवनाच्या विविध टप्प्यांवर तुमच्या गीतांनी मला स्फूर्ती दिली आहे. तुमचे ‘चल चल रे नौजवान’ हे गीत इंदू (श्रीमती इंदिरा गांधी) वानरसेनेमध्ये गात असे तर ‘दूर हटो ए दुनियावाले’ हे गाणं आम्ही जेलमध्ये गात असू.
कवी प्रदीप, सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर यांनी नंतर हे गाणे ध्वनिमुद्रित करून त्याची एच.एम.व्ही. कंपनीतर्फे ध्वनिमुद्रिका काढली आणि त्या ध्वनिमुद्रिकेच्या रॉयल्टीची सारी रक्कम युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी मदत म्हणून दिली. राष्ट्रप्रेमाने भारलेल्या या गीताला राष्ट्रालाच अर्पण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा