मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

‘तुझ्या स्वरात माझी भरून आस आहे

तुला न भेटता तुझाच स्पर्शभास आहे

तुझ्या लयीत माझी गुंफली स्पंदनेही

असा तुझा नि माझा हा एक श्वास आहे..’

तू एक अधुरी सरगम असलीस, तर मी तिला पूर्ण करणारा स्वरालाप! आवर्तनातली तू पहिली मात्रा, तर मी त्या मात्रेत बोल भरणारा! आपण एकमेकांच्या आयुष्यात आलो ते अपघाताने; जो नियतीनं योजलेला होता! कोण दूर करणार आपल्याला? जे प्रेम अत्यंत नैसर्गिक, कसलाही कृत्रिमपणा नसलेलं, अपेक्षा, अटी नसलेलं आहे, ते सफल होणारच. कारण ते बहरलंय या जगातल्या सगळ्यात सुंदर गोष्टीच्या साक्षीनं.. ती गोष्ट म्हणजे संगीत! सप्तसुरांच्या संगतीत बहरलेला हा प्रणय विलक्षण भिडतो मनाला. १९७६ साली आलेला, राजश्री प्रॉडक्शन्सच्या परंपरेला साजेसा, बासू चटर्जी यांच्या दिग्दर्शनाने नटलेला आणि अमोल पालेकर, झरिना वहाब यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘चितचोर’! या चित्रपटात प्रमुख भूमिका खरं तर रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताचीच आहे. गाण्यांभोवती कथा असावी, इतकं अप्रतिम आणि सुखद संगीत रवींद्र जैन यांनी दिलंय. प्रत्येकाच्या मनात एक सुरावट असते. एक लय असते. गाण्याचं अंग असलेल्यांना ती आधी जाणवते, इतकंच. ते सूर ज्या व्यक्तीशी जुळले, तिथे एकाच सुरात जुळलेल्या दोन तंबोऱ्यांमधून गंधार गुंजावा तसं प्रेम झंकारतं. प्रेमाचा आणि संगीताचा स्पर्श झाल्यावर एखाद्या सामान्य मुलीच्या आयुष्यातही सप्तसूर निनादू लागतात. ही किमया त्या सुरांची, त्या तारुण्यासुलभ ऊर्मीची आणि ‘त्या’ भावना उमलवणाऱ्या त्या अत्यंत गोड अशा नात्याची! हे नातं जन्मांतरीचं असतं. म्हणूनच पेल्यातल्या वादळाला ते दाद देत नाही.

रवींद्र जैन- ज्यांना प्रेमाने ‘दादू’ म्हणत- हे एक वेगळंच रसायन होतं. कवी आणि संगीतकार या दोन्ही भूमिका ते निभावत असत. शीघ्रकवी म्हणून त्यांचा लौकिक होता. कुणाचाही प्रभाव नसलेल्या अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना करण्यासाठी त्यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यांना जवळून ओळखणारे, त्यांच्यासोबत काम केलेले वादक सांगतात की, दादू हे ‘परफेक्शनिस्ट’ होते. व्हायोलिन्सचा फार सुंदर वापर, दोन स्वरवाक्यांमध्ये घट्ट बसवलेले फिलर्स (वाद्यसंगीताचे छोटे तुकडे), उंच स्वरातल्या आग्रही, ठामपणा असलेल्या रचना ही त्यांची शैली होती. एक प्रकारची भव्यता त्या संगीतात आढळते. पण ही भव्यता लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यापेक्षा वेगळ्या रंगाची. शास्त्रीय संगीताचा सढळ वापर असलेल्या रवींद्रजींच्या रचना होत्या. ‘चितचोर’मध्ये तर शास्त्रीय संगीताला पूर्णच वाव मिळाला. कारण त्याच्या कथानकातच संगीत महत्त्वाची भूमिका घेऊन आलं होतं.

मधुपूर.. एक छोटुकलं निसर्गरम्य गाव. तिथले हेडमास्तर पितांबर चौधरी. त्यांचं अत्यंत पापभिरू, टिपिकल मध्यमवर्गीय संस्कारांचं कुटुंब. गीता त्यांचीच मुलगी. गीताची मुंबईला असलेली बहीण गीतासाठी एक उत्तम ‘स्थळ’ सुचवते. तो मुलगा (सुनील) मधुपूरला नोकरीनिमित्ताने येणार असतो. परंतु प्रत्यक्षात आलेला मुलगा ‘तो’ नसतोच.. विनोद असतो. गीता आणि विनोद एकमेकांना मन देऊन बसतात. आणि नंतर आलेल्या सुनीलच्या प्रवेशानं त्या नात्यात गुंतागुंत निर्माण होते. पण या दोघांच्या तारा जुळलेल्या आहेत हे सुनीलच्या लक्षात येतं आणि तो स्वत:हून या तिढय़ातून बाहेर पडतो. दरम्यान, गीताच्या आई-वडिलांची कशी मजेदार तारांबळ उडते, गीता आणि विनोदचं नातं कसं फुलत जातं याची अतिशय गोड कहाणी म्हणजे ‘चितचोर’!

गीता ही अल्लड, दीपू नावाच्या छोटय़ा दोस्ताबरोबर कैऱ्या पाडत हिंडणारी मुलगी आहे. शेंडेफळच ते. विनोद गाणारा, हार्मोनियम वाजवणारा, माणसांचा भुकेला असलेला लाघवी मुलगा आहे. मधुपूरचं निसर्गसौंदर्य, इथल्या माणसांचं आदरातिथ्य बघून तो हरखून गेला आहे. फुलांचा गुच्छ घेऊन आलेली गीता खरं तर त्याला पहिल्या भेटीतच आवडते. संगीताचा अजिबात गंध नसलेल्या गीताला तो गाणं शिकवण्याचा निश्चय करतो. मालकंसची सुरावट हार्मोनियमवर वाजवताना त्यातूनच फुललेलं गाणं..

‘गोरी तेरा गांव बडा प्यारा..’

मालकंस म्हणता म्हणता हे गाणं उमटतं मात्र धानी रागाची सुरावट घेऊन! रागाचा आधार असला तरी या गाण्याला एक ग्रामीण स्पर्श आहे, लोकसंगीताची डूब आहे. सुरुवातीचं गुणगुणणं अलगद शब्दांकडे नेतं. या गाण्याचा ठेकासुद्धा लोकनृत्याचा वाटतो. त्यातला बासरीचा, उंच डोंगरावरून येणाऱ्या उतरतीच्या झुळुकेसारखा थेट कोमल गंधारावरून येणारा पीस फार सुंदर.

‘गोरी तेरा गांव बडा प्यारा,

मैं तो गया मारा आ के यहां रे

उस पर रूप तेरा सादा,

चंद्रमा जो आधा, आधा जवॉं रे..’

खरंच, खूप साधीभोळी आहे गीता. सावळीशी, पण तेजस्वी. कसलेही कृत्रिम सोपस्कार नसणारी.

‘परदेसी अनजान को ऐसे कोई नहीं अपनाता

तुम लोगों से जुड गया जैसे

जनम जनम का नाता

अपनी धून में मगन डोले,

लोग यहां बोले दिल की जुबॉं रे!’

..अशी विनोदची भावना आहे.

अलंकारिक नसलेले साधे शब्द आणि ही सुरावटसुद्धा खास गीतासाठी सहज, सोपी वाटावी अशी. कारण तिला शास्त्रीय संगीताची गोडी अजून लागायची आहे. यानंतरची जी गाणी आहेत, त्यांत हलकेच संगीताचा स्तर उंचावत नेलाय. ‘जब दीप जले आना’ आणि ‘तू जो मेरे सूर में’अशी ती चढती कमान आहे. कारण तोपर्यंत शिकण्याच्या पातळीवरसुद्धा गीतानं प्रगती केलेली असते. ‘गोरी तेरा गांव बडा प्यारा’मध्ये धानी रागात नसलेला शुद्ध गंधार इतका सुंदर तेजाळून उठतो. ‘आ के यहां रे’मध्ये ‘रे’ अक्षरावर अचानक चमकणारा हा वज्र्य स्वर.. अर्थात व्याकरणाला तो वज्र्य असला तरी भावनिर्मितीसाठी इथे त्या स्वरासाठी पायघडय़ा घालाव्यात, इतकं त्याचं महत्त्व आहे. या गाण्यात येशूदास यांच्या आवाजाची खोली, त्यातला घुमारा, स्वरावरचा त्यांचा ठहराव याबद्दल बोलावं तेवढं कमीच. किती सुंदर, सुखद आवाज आहे हा. शास्त्रीय संगीताची पक्की तयारी, रियाझ यातून घडवलेला; तरीही भावपूर्ण आवाज. सुरुवातीच्या त्या ँ४्रेल्लॠ लाच येशूदास ऐकणाऱ्यांचा पूर्णपणे ताबा घेतात. याच गाण्यात एका क्षणी ‘ती’ भावना दोघांच्या चेहऱ्यावर दिसते. अवखळ चेहरा लाजरा होतो. डोळे बोलून जातात. या गाण्याचा मूड संगीतकारानं मुद्दाम हलका ठेवलाय. निरागसपणे गीता विचारते की, ‘इसे कब गाते है?’ त्यावर विनोदचं उत्तर खूप काही व्यक्त करणारं. ‘ऐसे गानों का कोई समय नहीं होता. जब कोई गीता सामने हो, तब गाते है!’

‘चितचोर’मधलं, त्यातल्या गाण्यांमधलं प्रेम एक उच्च दर्जाचं सहजीवन ध्वनित करतं. या गाण्यांमध्ये कुठेही प्रेयसीवर कधी एकदा अधिकार मिळवतोय, तिला स्पर्श करतोय, ही भावनाच नाही. उलट, दोघं मिळून संगीताच्या अनोख्या दुनियेत जगू या, ही ओढ त्यांच्यात आहे. प्रत्येक गाण्यात विनोद तिला ‘त्या’ दुनियेत बोलावतोय, हीच आस आहे. अमोल पालेकर आणि झरिना वहाब यांच्या चेहऱ्यावरचा कोवळेपणा हीच या भूमिकांची गरज होती.

विनोदचं गीताच्या घरी वारंवार जाणं, तिला गाणं शिकवणं, यातून एक सुंदर नातं साकारत जातं. ते यमन रागाचं विलोभनीय रूप घेऊन येतं.. ‘जब दीप जले आना, जब शाम ढले आना’

यमन हा महासागर.. अथांग! हे सूर कायम एक वडीलधारेपण घेऊन येतात. म्हणूनच कवी सुधीर मोघे यांनी म्हटलं असावं-

‘नितांत शांतपण.. अथांग खोल अपार,

जसं माणसाचं मन!’

स्वरांच्या बोलीत यालाच म्हणतात ‘यमन’!

किती सुंदर धून आहे ही! त्यात सुख ओरबाडून घेण्याचा यत्किंचितही भाव नाही. ते येतंच आपसूक मागे.. यमनची विलक्षण सुरक्षितता आहे त्यात.

‘संकेत मीलन का भूल न जाना मेरा प्यार न बिसराना..’ हा ‘संकेत’ शब्दच किती सभ्य आहे! भेटीची आठवण करून देताना यमन कुठेही हट्टी होत नाही. रवींद्र जैन यांची काव्यशैली शुद्ध हिंदी भाषेनं नटलेली आहे. दीप, संकेत, मीलन, पलकन, डगर असे पारंपरिक शास्त्रीय बंदिशींमध्ये आढळणारे शब्द यात आहेत. ‘जब दीप जले’ आणि ‘जब शाम ढले’ या ओळींचे स्वर सारखेच आहेत- ‘नीरे गमप परे सानी’ हेच स्वर आहेत. यानंतर पहिल्या ओळीत ‘आना’ हा शब्द ‘रे’वर थांबतो आणि नंतरच्या ओळीतल्या ‘आना’चा ‘सा’वर ठहराव आहे. हा षड्जावरचा ठहराव फार शांतपणा देतो. यात येशूदासजींच्या आवाजातली फिरत ‘जले’ शब्दावरच्या अनेक हरकतींमुळे फुलली. त्या शब्दावर खूप सुंदर आर्जवी जागा घेतल्या आहेत त्यांनी. हेमलताने त्यांना दिलेली साथही महत्त्वाची. यात एक शिकाऊ भाव अपेक्षित होता. गीताला हा आवाज तंतोतंत शोभून दिसतो. तिनं धिटाईनं घेतलेला आलाप आणि ‘उन्हे देख के तारे’ म्हणताना वरच्या स्वरावरची जागा कमी सफाईनं आलीय. पण ती तशीच छान वाटते. गाण्याच्या ं११ंल्लॠीेील्ल३ मध्ये व्हायोलिन्समुळे एक सुंदर भारदस्तपणा आलाय. दुसऱ्या अंतऱ्याच्या आधीचा पीसही खूप वेगळा आहे. कारण सतारीच्या तुकडय़ात कोमल निषाद चमकून जातो. ‘जब दीप जले आना’ ही ओळ पूर्ण व्हायच्या आतच ‘प रे ग सा नी’ हा तुकडा (फिलर) येतो. ही खास रवींद्र जैन शैली! त्यांच्याकडे कुठलंही स्वरवाक्य अधांतरी सोडलेलं नसतं.

विनोद-गीताचं प्रेम पुढच्या टप्प्यावर घेऊन जाणारं ‘तू जो मेरे सूर में’ आणि विनोदची भावनिक आंदोलनं टिपणारं ‘आज से पहले आज से ज्यादा’ ही गाणी येत्या उत्तरार्धात..

(पूर्वार्ध )