आबा अत्यवस्थ आणि अस्वस्थही आहेत. का? तर राजकारणातील रुची त्यांच्या पुढल्या पिढीतही उतरली, पण राजकारणाचा पोत आधीसारखा राहिला नाही. नवनवे पक्ष, युत्या, आघाड्या झाल्या, तुटल्या, पक्षांत बंडखोरी झाली, पक्ष फुटले. या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम आबांच्या कुटुंबावर झाला. तो कसा?
फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज झळकला- ‘आबा अस्वस्थ आहेत.’ लगेच नव्या पिढीच्या एका ताज्या दमाच्या शिलेदाराने ‘‘चीयर्स यंग मॅन, वी आर प्राऊड ऑफ यू.’’अशी कमेंट केली. तिन्ही-त्रिकाळ सोशल मीडियावर पडीक असलेले त्याचे सगळे ‘ब्रो’ त्या कमेंटवर अभिनंदनाचे स्टिकर्स, इमोजी, अंगठे अन् बदामांची लयलूट करण्यासाठी पुढे सरसावले. ‘शहाणे करून सोडावे सकळ जन’ अशी शपथ घेतलेल्या निवृत्त शिक्षिका असलेल्या बेबीमावशीने ‘अस्वस्थ म्हणजे बेचैन रे पोरांनो, तुमच्या भाषेत बोलायचं तर रेस्टलेस आहेत,’ असे स्पष्टीकरण दिले. (आबांच्या बेचैनीचं कारण विचारण्याची तसदी मात्र बेबीमावशीने घेतली नाही. तिच्या दृष्टीने नुकताच अभिजात म्हणून मान्यता पावलेल्या मराठी भाषेची शुद्धता राखणे, व्याकरणाचे नियम पाळणे अन् भाषा जगवणे आबांच्या जगण्या-मरण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे होते.)
‘‘ओह माय बॅड.’’ म्हणत लगेच सगळी स्टिकर्स, इमोजी, अंगठे अन् बदामं ‘डिलीट फॉर ऑल’ झाली. शहाणेसुरते लोक अॅक्शन मोडमध्ये आले. आबांना नक्की काय झालंय? कुठे अॅडमिट आहेत? डॉक्टर काय म्हणताहेत याच्या चौकशा सुरू झाल्या. आबा म्हणजे आमच्या पंचक्रोशीतील बडं प्रस्थ. प्रत्यक्ष राजकारणात नसले तरी राजकीय क्षेत्रात वजन राखून असलेले. सगळ्या राजकीय नेत्यांशी चांगले संबंध राखून असलेले. आबांची ही राजकारणातील रुची त्यांच्या सगळ्या मुला-मुलींमध्येदेखील उतरलीय. पण पुढे राज्यातील राजकारणाचा पोत बदलत गेला. नवनवे पक्ष, युत्या, आघाड्या झाल्या, तुटल्या, पक्षांत बंडखोरी झाली, पक्ष फुटले. या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम आबांच्या कुटुंबावरही झाला. आबांच्या मुलामुलींपैकी कुणी दिल्लीतील हायकमांडच्या कलाने चालू लागला, कुणाची सूत्रं नागपूरवरून हलविली जाऊ लागली, कुणी मुंबईतील वाघाच्या डरकाळीवर मान डोलावू लागला. तिसऱ्या पिढीत तर या तिघांच्या कुटुंबातून आपापल्या बापांसोबत वैर घेऊन फुटून बाहेर पडलेली पोरं-पोरी, काही चुलते-चुलत्या, त्यांचे वारसदार, या सगळ्यांचे आपापसातले हेवेदावे, वेगवेगळ्या मुद्द्यांवर घडणाऱ्या अन् बिघडणाऱ्या त्यांच्या युत्या-आघाड्या यांमुळे कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. एक मात्र होतं, राज्यात जितके म्हणून राजकीय पक्ष होते त्या प्रत्येकाचा पाठीराखा असलेली एकतरी व्यक्ती आबांच्या म्हणजे आमच्या या कुटुंबात होतीच होती. त्यामुळे राज्यात माजलेल्या ‘शिंदळकी’चे प्रतिबिंब आमच्या या घरात पडलेले असून त्याची एन्लार्ज करून भडक रंगात रंगविलेली प्रतिमा आमच्या कुटुंबाच्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये दिसून येते.
हेही वाचा : गुंतवणारी गूढरम्य आदिकथा…
झालं असं की, राज्यभर विखुरलेल्या आमच्या संयुक्त कुटुंबातील सर्वांत जेष्ठ व्यक्ती आमचे आदरणीय आबा आजारी होते आणि घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आपण या जगातून एग्झिट घेण्याआधी आपल्या इस्टेटीला, घराण्याच्या वैभवाला अन् समाजातील इज्जतीला जपेल, टिकवून ठेवील अन् वाढवील असा वारसा मिळावा अशी सामान्यपणे कर्तबगार म्हाताऱ्यांची इच्छा असते. मात्र आपल्या राज्याच्या गतवैभवाला, पुरोगामी प्रतिमेला, विकासाभिमुख दृष्टिकोनाला अन् सामाजिक व आर्थिक नेतृत्वाला जपेल, टिकवून ठेवील अन् वाढवील अशा नेत्यांच्या व पक्षाच्या हाती राज्याची धुरा सोपवून मगच आपण प्राण सोडावा अशी आबांची इच्छा होती. त्यासाठी आपल्या सर्व वारसांची एकदा मते जाणून घ्यावीत आणि त्यानुसार आपण आपलं (बहुधा शेवटचं) मतदान करावं या हेतूने आमच्या कुटुंबाच्या व्हाट्सअप ग्रुपवर त्यांनी हा विषय छेडला होता.
‘हाय हॅलो’ करण्याची औपचारिकता न पाळता आबांनी व्हाट्सअप ग्रुपवर थेट विचारणा केली, ‘‘मी इतके दिवस इथे बिछान्यावर पडल्या पडल्या खिडकीतून पाहतोय की, आपल्या वाड्याच्या समोर रस्त्यावर जो विजेचा दिवा आहे तो गेले काही दिवस बंद आहे. माझ्या मित्रांनी मला हेही सांगितलंय की, या परिसरातील रस्त्यांवरील सर्वच दिवे मागील दोनेक महिन्यापासून बंदच आहेत. तुमच्यापैकी कुणाला आणि तुमच्या पक्षाला याबद्दल काही करावं असं वाटत नाहीये का? मला उत्तर हवंय. ज्यांना भरभर टाइप करता येतं त्यांनी टाइप करा, ज्यांना ते जमत नाही त्यांनी व्हॉइस नोट्स पाठवल्या तरी चालतील. पण सगळ्यांनी व्यक्त व्हा.’’
‘‘आबा, मी तुम्हाला सांगतो, रस्त्यावरील मागील सत्तर वर्षातील अंधार असा तडकाफडकी दूर होणार नाही. आज सुदैवानं आपल्या देशाला दिवसाला अठरा अठरा तास काम करणारा पंतप्रधान मिळाला आहे. त्याचप्रमाणे आपल्या राज्याला घरात बसणारा मुख्यमंत्री नकोय, तर जनतेत जाऊन मिसळणारा, जनतेला बहुसंख्याकांचे सगळे सण, उत्सव दणदणीतपणे साजरे करू देणारा अन् त्यात जातीने सहभागी होणारा, काम करणारा, ‘खतरे में’ असलेल्या आपल्या धर्माला वाचविणारा, आमच्या एकमेव देशप्रेमी पक्षाचा मुख्यमंत्री येत्या निवडणुकीत आपण निवडून दिला तर हे रस्त्यावरील दिवे आम्ही एका रात्रीत बदलून देऊ.’’
‘‘अरे, मग अठरा अठरा तास काम करणारा, खर्च वाचवण्यासाठी विमानातच झोपणारा, हॉटेलच्या बिलाचा भुर्दंड पडू नये म्हणून विमानतळावर अंघोळ करणारा नेता मिळालाय तरीही जसा फेसाळ हातातून साबण घसरावा तसा देशाचा ‘जीडीपी’ का घसरतोय?’’
‘‘विषयाला फाटे फोडू नका. विषयावर बोला.’’
‘‘आबा, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्तेवर कुणीही आलं असलं तरी जनतेने आमच्याच बाजूने कल दिलाय. आमच्या पक्षाचा नैतिक विजय झाला आहे. हा देश चालविण्याचा आमच्याकडे मागील सत्तर वर्षांचा अनुभव आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत देखील जनता आमच्या सोबत राहिली तर राज्यातील प्रत्येक घरसमोर एक बल्ब लावू अन् त्याचं बिल राज्याच्या तिजोरीतून देऊ.’’
‘‘ हे बघ भावा, नैतिक विजयाच्या सर्टिफिकेटचा उपयोग टिश्यू पेपर सारखाच असतो. आधी बहुमत मिळवा अन् मग बाकीच्या गमजा करा.’’
‘‘अरे, कुणाची उणीदुणी काढू नका रे. रस्त्यावरील बल्ब हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटत नसेल तर विकास, अर्थव्यवस्था, एकंदर पायाभूत सुविधा याविषयी बोला.’’
‘‘आबा, शेजारच्या वस्तीतील पोरं रस्त्यावरील विजेचे बल्ब फोडतात. एकदा आमच्या पक्षाच्या हाती सत्ता द्या, मग बघा एकेकाला कसं सुतासारखं सरळ करतो. प्रत्येक गल्लोगल्ली उजेड पडेल अशी आमच्याकडे विकासाची ‘ब्लू प्रिंट’ आहे. आबा, मी तुम्हाला सांगतो, विकास, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा या इतकंच जनतेला परपीडेचं सुख देणं हेच निवडणूक जिंकण्याचं हुकमी अस्त्र आहे असं आमच्या पक्षाचं मत आहे.’’
‘‘आज कंपन्या गुजरातला, गावे कर्नाटकला आणि नेते गुवाहाटीला जाताना दिसत आहेत. हा मर्द मराठ्यांचा महाराष्ट्र गद्दारांना त्यांची जागा दाखवील तेव्हाच या विजेच्या खांबावर स्वाभिमानाने दिवा लावील.’’
‘‘अरे, प्रश्न काय अन् तुम्ही बोलताय काय? जरातरी डोकं वापरा रे.’’
‘‘ओ आबा, देशात एक विश्वगुरू आणि एक चाणक्य असताना आणखी कोणी आपला मेंदू वापरण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. आबा, हे सारे लोकशाहीतील गुलाम झालेत. जसे गर्दीत पाकीट मारलं जातं तसे यांचे मेंदू मारले गेलेत.’’
‘‘तुलाही तुझ्या पक्षाध्यक्षाप्रमाणे टोमणे मारायची सवय लागली काय रे? अरे, पक्षाध्यक्ष घराबाहेर पडत नाहीत म्हणून पक्ष सोडणारे अन् पक्षाध्यक्ष घरात बसतच नाहीत म्हणून पक्ष सोडणारे का गप्प आहेत बरे? बोला की?’’
‘‘ तोंडात हाडुक असलेला कुत्रा भुंकू शकत नाही ना आबा!’’
‘‘टोमणे मारणे थांबवा रे प्लिज.’’
‘‘आता या ठिकाणी खांबावरचा बल्ब चालत नाही, तर काय मी खांबावर जाऊन लटकू?’’
‘‘अरे ए, तुझ्या नेत्याकडून कॉपी करण्यासारखे खूप गुण आहेत रे. तू त्यांच्याकडून नेमका चुकीचा डायलॉग कॉपी केलेला आहेस.’’
‘‘आमच्या पक्षाला गद्दार म्हणणाऱ्यांना मला इतकंच सांगायचं आहे की, बाहेर जायची संधी मिळाली नाही म्हणून अनेकांची निष्ठा टिकून आहे. आमचे साहेब पुन्हा शीएम झाले तर त्यांना सांगून आम्ही राज्यभर प्रत्येक खांबावर ‘मुख्यमंत्री लाडका बल्ब’ योजना लागू करू. आणि राज्यातील प्रत्येकाला फोन करून विचारू… लाईट आली का? आली का लाईट? लाईट आली ना?
हेही वाचा : वैद्याकीय क्षेत्रातली अस्वस्थ करणारी कहाणी
(या दरम्यान चुकून रेकॉर्ड झालेला कुणाचा तरी एक व्हॉइस मेसेज ग्रुपवर आला. त्यातील बाई म्हणाली, ‘‘अहो, तुम्ही जे आश्वासन देताय ते करणे शक्य आहे का?’’ यावर पुरुष आवाज म्हणाला, ‘‘आपल्याला काय करायचंय, बोलायचं आणि निघून जायचं!’’)
‘‘अरे बंडखोर भावांनो, बल्ब लावणे राहूदे बाजूला. ज्या गुरूचा गंडा बांधायचा त्यालाच गंडा घालू नये एवढा जरी उजेड तुमच्या नेत्यांच्या डोक्यात पडला तरी खूप झालं.’’
‘‘यावर मला एक कविता सुचलीय-
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील आठ फ्लेक्स
एका खांबाला टेकून बसले
आणि टिपं गाळू लागले
कमळधारी फ्लेक्स म्हणाला,
शेवटी मी उरलो
फक्त सनातनी भक्तांचा
पंजावाला फ्लेक्स म्हणाला,
माझ्यावर शिक्का मुस्लीम अनुनयाचा
धनुष्यबाण आणि मशालवाले एकत्रच म्हणाले,
आम्हीच खरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाचे
घड्याळ अन् तुतारीवाले उद़्गारले,
आम्हीच खरे मराठ्यांचे उद्धारकर्ते
वंचित अन् इंजिनवाल्यांनी
गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात आणि
काहीएक लोकप्रतिनिधी तरी
तुमच्या पाठीशी आहेत.
आमच्या कपाळी मात्र
बी-टीम असल्याची भळभळती जखम!’’
‘‘अरे, कविता करून कुठल्या समस्या सुटल्या आहेत? चुलीत घाला तुमच्या कविता!’’
‘‘मला वाटते, इथे विशिष्ट जातीचे लोक राहतात म्हणून इथल्या खांबावरील विजेच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातंय.’’
‘‘निदान या संवेदनशील घटनेचं राजकारण करू नका रे!’’
‘‘ सग्यासोयऱ्यांसकट आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय हा विजेच्या दिव्याचा प्रश्न सुटणार नाही.’’
‘‘आरक्षण नष्ट करून निव्वळ मेरीटवर नेमणुका झाल्याशिवाय कुणी या विजेच्या प्रश्नाला हात घालणार नाही.’’
हेही वाचा : कॉर्पोरेट राजकारणाचे ताणेबाणे
‘‘केवळ राज्यातील सरकार बदलून होणार नाही, केंद्रात देखील आमचे सरकार येईल तेव्हाच डबल इंजिनमुळे विकासाला खरी गती येईल.’’
(ग्रुपवर एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणाऱ्या मेसेजेसचा भडीमार सुरू होता. टोमणे मारण्याची अन् दुसऱ्यांचे दोष दाखविण्याची संधी कुणीच सोडत नव्हते. पण आम्ही काय ठोस करू, यावर मात्र सगळ्यांचे सोयीस्कर मौन होते. सगळे मेसेज वाचून अन् व्हॉइस मेसेज ऐकून आबा वैतागले. त्यांचे डोके गरगरू लागले. त्यांनी निर्वाणीचं लिहिलं)
‘‘ मुलांनो, हा आपल्या रस्त्यावरील विजेचा खांब कोणाच्या आधिपत्याखाली येतो आणि त्यावर दिवा लावण्याची जबाबदारी कोणाची आहे? हेदेखील ठाऊक नसलेले तुमच्यासारखे नागरिक, मतदान करून तरी कोणता दिवा लावणार आहात? तुमचे आपापसातले हेवेदावे आणि कुरघोडी संपत नाहीत तोवर माझ्या नशिबात अंधारच आहे असे दिसतेय.’’
(असं लिहून आबांनी ग्रुप Exit केला.)
आबाची सेवा करणाऱ्या आबांच्या मानस कन्येने ग्रुपवर मेसेज टाकला… ‘‘आबा अस्वस्थ आहेत अन् अत्यवस्थसुद्धा!’’
sabypereira@gmail.com