रघुनंदन गोखले
आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील उदयोन्मुख खेळाडूंची दिव्या देशमुख ही एक ‘आयडॉल’ बनली आहे. तिच्या खेळाचं वैशिष्टय़ म्हणजे प्रतिस्पर्धी जितका तगडा, तितका तिचा खेळ उंचावत जातो. वयाच्या १२ व्या वर्षांपासून ग्रॅण्डमास्टरना हरवणं म्हणजे खायचं काम नाही. ते दिव्या सतत करत आली आहे. आता ती कोणते विक्रम करते, याकडे बुद्धिबळ वर्तुळाचे लक्ष लागले आहे..
नुकत्याच कझाकस्तानमधील आल्माटी येथे झालेल्या आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरच्या १७ वर्षीय दिव्या देशमुख हिनं बाजी मारली आणि विजेतेपदाबरोबर अझरबैजानमधील बाकु येथे होणाऱ्या ‘वल्र्ड कप’मधील आपलं स्थानही पक्कं केलं. महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट म्हणजे, आशियाई स्पर्धेच्या महिला गटात दिव्या चमकदार कामगिरी करत असताना, पुरुष गटातून भारताचा फक्त एक जण वल्र्ड कपसाठी निवडला गेला; आणि तो मान मिळवला आहे पुण्याच्या ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक यानं!
दिव्यानं आतापर्यंत लहान मुलांच्या गटात अगणित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदं मिळवली आहेत, त्यांचा नुसता उल्लेख करायचा म्हटलं तर हा लेख अपुरा पडेल; पण मला आठवतो तो तिनं बलाढय़ चीनला दिलेला दणका! गोष्ट आहे २०२० च्या ‘ऑनलाइन ऑलिम्पियाड’ची. चीनमध्ये जन्मलेल्या कोविडच्या हाहाकारामुळे सगळं जग ठप्प झालेलं होतं. बुद्धिबळ स्पर्धा खेळणं सोडा, पण एकमेकांना भेटणंही अशक्य होतं. अशा वेळी जागतिक बुद्धिबळ संघटनेनं एक क्रांतिकारी निर्णय घेतला- बुद्धिबळ ऑलिम्पियाड घ्यायचं, पण ते ऑनलाइन! चीन किंवा रशिया जिंकणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नव्हती. कारण त्या सर्व खेळाडूंचं रेटिंग इतरांपेक्षा खूप जास्त होतं. स्पर्धेत पुरुष, महिला, ज्युनिअर मुलं आणि ज्युनिअर मुली देशासाठी खांद्याला खांदा लावून खेळणार होते.
साखळी फेरीतील भारत-चीन लढत खूप उत्सुकतेनं बघितली गेली. जरी निकालाचा बाद पद्धतीच्या प्रवेशावर परिणाम होणार नसला, तरीही आपल्या गटात कोण प्रथम येतो हे पाहणंही महत्त्वाचं होतं. दोन पुरुष, दोन महिला यांच्या लढती बरोबरीत सुटल्या. कर्णधार विदित गुजराथीनं डिंग लिरेन, तर कोनेरू हम्पीनं हू यीफान या बलाढय़ांना बरोबरीत रोखून चीनला आघाडी मिळवून दिली नाही. आता ज्युनिअर पटावर काय होतं याकडं सगळय़ांचं लक्ष लागलं होतं. प्रज्ञानंद काहीही करून हरणार नाही अशी सगळय़ांची अटकळ होती; पण केवळ मास्टर असलेल्या दिव्याला लढत द्यायची होती ती तिच्यापेक्षा तब्बल ५५० रेटिंग पॉइंट्सनं पुढं असणाऱ्या ग्रँडमास्टर झू जाइनरशी- आणि तीही काळय़ा सोंगटय़ांनी! थोडक्यात, प्रज्ञानंदनं बरोबरी केली तरी सामना आपण हरणार अशीच हवा होती.
घडलं ते इतकं अकल्पित होतं की, चीनचा संघ पार कोलमडून गेला. दिव्यानं सिसिलिअन बचावात काळय़ा मोहऱ्यांनी आक्रमक खेळ करून झू जाइनरला अनपेक्षितपणे धूळ चारली. तिकडे संघाला बरोबरीत आणू पाहणाऱ्या ग्रँडमास्टर लिऊ यानला प्रज्ञानंदनं हरवलं. पराभव आणि तोही भारतासारख्या आपल्या शत्रूशी? हा पराभव चीनच्या इतका वर्मी लागला की, दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या नॉकआऊट पद्धतीच्या लढतीत युक्रेनशी हरून चीन बाहेर फेकला गेला. सहज जाता जाता सांगतो, चीनला हा पराभव इतका जिव्हारी लागला होता की, त्यानंतर चीन संघानं महिलांची जागतिक सांघिक स्पर्धा किंवा चेन्नई ऑलिम्पियाड येथे न खेळण्याचा निर्णय घेतला. बहुधा त्यांच्या खेळाडूंना ही शिक्षाच दिली होती म्हणा ना!
दिव्या देशमुखच्या खेळाचं वैशिष्टय़ म्हणजे प्रतिस्पर्धी जितका तगडा, तितका तिचा खेळ उंचावत जातो! वयाच्या १२ व्या वर्षीपासून ग्रॅण्डमास्टरना हरवणं म्हणजे खायचं काम नाही. ते दिव्या सतत करत आली आहे. कोविडमुळे तिची दोन वर्षे फुकट गेली नसती तर आज ती कुठे असती याची कल्पना करा! तिच्या संघाला चेन्नई ऑलिम्पियाडमध्ये पदक मिळालं नाही; पण तिनं इतका सुंदर खेळ केला होता की, तिला वैयक्तिक कांस्य पदक मिळालंच!
आई नम्रता आणि वडील जितेंद्र दोघेही स्त्रीरोगतज्ज्ञ! त्यांच्या घरचं वातावरण कायम पुरोगामी राहिलं आहे. तिची मोठी बहीण आर्या देशमुख सोनिपतच्या प्रख्यात जिंदाल ग्लोबल विश्वविद्यालयातून कायद्याची पदवीधर झाली; पण तिनं बंगळूरुमध्ये एका उदयोन्मुख संस्थेत काम करणं पसंत केलं. आता आईवडील कमीत कमी दिव्याकडून तरी डॉक्टर होण्याची अपेक्षा करत असतील? पण नाही- त्यांनी दिव्याच्या इच्छेला मान देऊन तिला बुद्धिबळात झोकून देण्यास मान्यता दिली. नुसतं एवढंच करून दिव्याचे पालक थांबले नाहीत, तर तिच्या आईनं नोकरी सोडून छोटय़ा दिव्याबरोबर स्पर्धाना जाणं पसंत केलं. असे पाठीराखे आईवडील असताना दिव्याच्या कारकीर्दीनं जोरदार झेप घेतली नसती तरच नवल.
दिव्या देशमुख या नावाची पहिली नोंद बुद्धिबळ जगतानं घेतली ती चेन्नईमधील महिला ग्रँडमास्टर स्पर्धेमुळे. जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या या स्पर्धेत सहा भारतीय महिला आणि सहा परदेशी मान्यवर खेळाडू यांची ११ फेऱ्यांची स्पर्धा झाली. गेल्या महिन्यात आशियाई स्पर्धेत दिव्या सुवर्णपदक जिंकत असताना कांस्य पदक मिळवणारी मंगोलियाची मुनगुंथूल अग्रमानांकित होती. तिच्याविरुद्ध दिव्या होती १० वी मानांकित! या आशियाई स्पर्धेत झाली तशीच पहिल्या फेरीत बरोबरी घेऊन आपल्या स्पर्धेची सुरुवात करणाऱ्या दिव्यानं नंतर जो धडाका लावला- त्यामुळे सगळय़ा बुद्धिबळ जगतानं या १४ वर्षांच्या बालिकेची दखल घेतली. चेन्नई म्हणजे भारतीय बुद्धिबळाचं माहेरघर! पहिले आंतरराष्ट्रीय मास्टर मॅन्युएल एरन आणि भारताचा तारा विश्वनाथन आनंद तसेच भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी चेन्नईचे! आणि एवढंच नव्हे तर भारताच्या बहुसंख्य ग्रॅण्डमास्टर्सचं निवासस्थान चेन्नई आहे. या बुद्धिबळ नगरीत जाऊन १२ खेळाडूंपैकी १० व्या मानांकित दिव्यानं भल्याभल्यांना धूळ चारून पहिलं बक्षीस मिळवलं. यामुळे तिच्याकडे सगळय़ांचं लक्ष गेलं. मार्च आणि एप्रिल २०१९ या दोन महिन्यांत दिव्यानं ३०३ रेटिंग पॉइंट्स मिळवले. त्यासाठी चेन्नईच्या यशानंतर तिनं मॉस्कोमधील ऐरोफ्लोट ओपन आणि व्हिएतनाममधील ‘एचडी बँक’ ओपन या आघाडीच्या स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली.
त्यानंतर २०१९ च्या मे महिन्यानंतर अचानक दिव्याच्या खेळाला नसेल, पण तिच्या रेटिंगला घसरण लागली. अबुधाबी खुल्या स्पर्धेचा अपवाद वगळता तिला कोविडच्या लॉकडाऊनपर्यंत अपयश बघावं लागलं. तिच्या रेटिंगमध्ये १२६ गुणांची घसरण झाली; पण खरा विजेता अशा वेळी डगमगून जात नाही. दिव्यानंही तेच केलं. त्या दोन वर्षांत दिव्यानं आपली घरातली कैद सत्कारणी लावली. विविध ऑनलाइन स्पर्धा खेळून तिनं आपल्या मनाचं हत्यार धारदार ठेवलं आणि त्याचं फळ तिला मिळालं. ऑनलाइन ऑलिम्पियाड असो किंवा ऑनलाइन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धा असो, दिव्यानं आपली चमक दाखवली आणि कोविडच्या आधी गमावलेलं आपलं रेटिंग तिनं हळूहळू परत मिळवलं. पूर्वी आपल्या खेळात चढउतार बघणारी दिव्या आता खंबीरपणे खेळू लागली. तिच्या खेळातील सातत्य जाणवलं ते या वर्षीच्या राष्ट्रीय महिला अजिंक्यपद स्पर्धेत! अग्रमानांकित वैशाली आणि माजी विजेती भक्ती कुलकर्णी यांना पराभूत करून दिव्यानं राष्ट्रीय महिलांचं विजेतेपद खिशात घातलं आणि तेही वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी!
राष्ट्रीय विजेतेपदाच्या पाठोपाठ आशियाई स्पर्धा जिंकून दिव्या देशमुख आता जगज्जेतेपदाच्या प्रांगणात उतरली आहे. तिची खेळण्याची शैली आता विकसित होऊन ती पूर्ण खेळाडू बनण्याकडे वाटचाल करत आहे. पूर्वी तिची खेळण्याची पद्धत साधारणपणे माजी आव्हानवीर व्हिक्टर कोर्चनॉय किंवा डेन्मार्कचा ग्रँडमास्टर बेन्ट लार्सन यांच्यासारखी ‘जिंकू किंवा मरू’ अशी होती. प्रत्येक खेळात काहीना काही करत राहायचं असं तिचं तत्त्व होतं. त्यामुळे तिच्या वयोगटाच्या स्पर्धामध्ये तिला अमाप यश मिळालं; पण वरिष्ठ खेळाडूंमध्ये हे चालत नाही म्हटल्यावर तिनं आपल्या आक्रमक वृत्तीला लगाम घातला. तिचा आशियाई स्पर्धेच्या अखेरच्या फेरीतील डाव बघा. तिला विजेतेपदासाठी फक्त बरोबरी हवी होती. दिव्यानं जराही धोका न पत्करता परिस्थितीनुसार खेळ केला आणि बरोबरी साधली.
बेन्ट लार्सनचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. एक वर्ष लार्सन निम्म्या स्पर्धात पहिला आला आणि उरलेल्या स्पर्धामध्ये धोका पत्करून खेळताना त्याची दाणादाण उडाली. या महान खेळाडूला पत्रकारांनी विचारलं, ‘अरे बाबा, तू इतका विजयासाठी का तडफडतोस?’ यावर लार्सन म्हणाला, ‘लक्षात ठेवा! मी पाच स्पर्धा जिंकतो आणि उरलेल्या पाचमध्ये शेवटचा आलो, तरी लोकांच्या लक्षात राहतात पाच विजेतेपदे! याउलट मी सगळय़ा स्पर्धामध्ये दुसरा/ तिसरा आलो तरी इतिहासात त्याची नोंद होणार नाही.’ दिव्या देशमुख काहीशी याच मनोवृत्तीनं खेळत असे; पण आता तिच्या खेळात सामान्यपणे तिच्या वयातील इतर युवक/ युवतींमध्ये न दिसणारी परिपक्वता आली आहे आणि आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील उदयोन्मुख खेळाडूंची दिव्या देशमुख ही एक ‘आयडॉल’ बनली आहे. दिव्याला महाराष्ट्र सरकारनं शिवछत्रपती पुरस्काराने २०१९ साली गौरवले आहे. बहुधा १३ व्या वर्षी हा मान मिळवणारी सर्वात लहान खेळाडू तीच असावी. तिच्या नावावर राष्ट्रीय आणि आशियाई महिलांची अजिंक्यपदे आहेतच; त्यातच आशियाई स्पर्धाच्या दरम्यान बातमी आली होती की, जागतिक संघटनेनं तिला पुरुषांचा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब दिला आहे. आता दिव्या देशमुख आधी पुरुषांमधील ग्रँडमास्टर बनते की आधी तिचा अर्जुन पुरस्काराने गौरव होतो याची आमच्यासारख्या तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
gokhale.chess@gmail.com