|| पराग कुलकर्णी

गोष्टी ऐकणे कोणाला आवडत नाही? लहानपणी चिऊ-काऊंच्या गोष्टीपासून सुरू झालेला प्रवास पुढे आयुष्यभर वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यात, वाचण्यात, सांगण्यात आणि कधी कधी तर काही गोष्टी बनवण्यातही जातो. कधी या गोष्टी म्हणजे निव्वळ माहिती असते तर कधी इतिहास, कधी नुसत्याच घटना तर कधी दंतकथा! खरं आयुष्य (म्हणजे जे काय असतं ते) समजावून घेण्यासाठी कधी या कल्पनारम्य गोष्टी कामी येतात, तर कधी खऱ्या आयुष्यातल्या गोष्टींपुढे या कल्पनेच्या भराऱ्याही फिक्या पडतात. आदिमानवाने गुहेत काढलेल्या चित्रांपासून ते मानवाच्या संस्कृतीकरणात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या कलांमध्ये या गोष्टींचा मोठा वाटा आहे. अशाच गोष्टींचा एक मोठा मनोरंजक तितकाच उद्बोधक खजिना म्हणजे- ग्रीकांच्या पौराणिक कथा!

ग्रीक पौराणिक गोष्टींमध्ये हिंदू पुराणाप्रमाणेच खूप देवदेवता आहेत. निसर्गाचेच  रूप असलेल्या (उदा. आकाश, पृथ्वी, पाणी, आग) आणि वेगवेगळ्या मानवी संकल्पना (सौंदर्य, बुद्धिमत्ता, शौर्य) यांना ग्रीक पुराणात देवदेवता म्हणून मानण्यात आले. पौराणिक कथेतले हे देव ‘माउंट ऑलिम्पस’ या पर्वतावर राहतात आणि त्यांना ‘ऑलिम्पियन्स’ असे म्हटले जाते. यात ‘झ्यूस’ हा हवामानाचा देव आणि देवांचा राजा, त्याची बायको ‘हेरा’ ही देवांची राणी, ‘अफ्रोडाइट’ ही सौंदर्य आणि प्रेमाची देवता, भविष्य-काव्य-संगीत आणि ज्ञानाचा देव ‘अपोलो’, युद्धाचा देव ‘अरीस’, तर ‘आर्टेमिस’ ही शिकारीची देवता, संरक्षण आणि हुशारीची देवी ‘अथेना’, मृत्यूचा देव ‘हेडीस’, तर देवांचा संदेशवाहक ‘हर्मीस’ या आणि अशा इतर अनेक देवांचा समावेश होतो. ग्रीक पुराणकथेतले हे देवदेवता बघून आपल्याला आपल्या इंद्र (झ्यूस), यम (हेडीस) आणि नारदमुनी (हर्मीस) यांची आठवण झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही.

आपल्या ‘रामायण’, ‘महाभारता’सारखी ग्रीक साहित्यात होमर या कवीने लिहिलेली ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’ ही महत्त्वाची महाकाव्ये आहेत. होमरबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. तो आंधळा होता इथपासून तो एक माणूस नसून ते एक शाहिरीच्या परंपरेला दिलेले नाव आहे, अशी वेगवेगळी मते आहेत. होमरची ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’ ही दोन्ही काव्ये ट्रॉयच्या युद्धाशी संबंधित आहेत. ट्रॉयच्या पॅरिसने स्पार्टाच्या राजाची बायको हेलन हिला पळवून ट्रॉयला आणले. त्यानंतर ग्रीक आणि ट्रॉयचे सन्य यांत झालेले युद्ध म्हणजे ट्रॉयचे युद्ध. देवांचा मुलगा असलेला अकिलीज हा या युद्धाचा नायक, जो या युद्धात ग्रीकांच्या बाजूने लढला. ‘इलियड’ ही अकिलीजच्या पराक्रमाची गोष्ट आहे. ग्रीकांच्या बाजूने लढणारा अजून एक योद्धा ओडीसिअस ट्रॉयच्या युद्धानंतर स्वत:च्या इथाका देशाला परत जाण्यास निघतो. त्याचा हा लांब, खडतर प्रवास आणि त्यात येणारा चित्रविचित्र अनुभव म्हणजेच ‘ओडिसी’ हे काव्य. ग्रीक गोष्टींमध्ये मुख कथानकासोबत अनेक उपकथानकं, मुख्य कथेचा पूर्वार्ध आणि उत्तरार्धातले छोटे प्रसंग, कथा अशा गोष्टीही मोठय़ा प्रमाणात येतात. जसे की ट्रॉयचे युद्ध का झाले, याची गोष्ट. ट्रॉयच्या पॅरिसला ‘तुला जगातील सर्वात सुंदर स्त्रीचे प्रेम मिळवून देईल’ हे आमिष दाखवून पुढचं युद्ध उभा करण्यात आले, ज्याचा उद्देश होता पृथ्वीवर  वाढत असलेल्या अतिमानवी शक्ती असलेल्या देवपुत्रांची संख्या कमी करणे.

ग्रीक पौराणिक कथांमध्ये अनेक छोटय़ा गोष्टी आहेत. ‘पिग्मॅलियन’ अशीच एक गोष्ट – पिग्मॅलियन नावाचा एक मूर्तिकार एका सुंदर स्त्रीची मूर्ती बनवतो. ती मूर्ती इतकी सुंदर असते, की तो त्या मूर्तीच्याच प्रेमात पडतो. शेवटी अफ्रोडाइट देवीला त्याची दया येऊन ती त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकते आणि तिला सजीव करते. याच गोष्टीवरून जॉर्ज बर्नाड शॉ यांनी ‘पिग्मॅलियन’ हे नाटक लिहिले, ज्यात एक प्रोफेसर समाजातल्या खालच्या स्तरातील एका फुलं विकणाऱ्या मुलीला फक्त शुद्ध बोलणे शिकवून तिला उच्च वर्गात आणण्याचा प्रयत्न करतो. याचेच मराठी रूपांतर म्हणजे पुलंचं ‘ती फुलराणी’ हे नाटक!

पण आपण जर ‘पुराणातील वानगी पुराणात’ असे म्हणत असू तर या गोष्टीची माहिती घेऊन काय होणार? ग्रीक पौराणिक कथा या वर वर पाहता साध्या आणि सरळ दिसत असल्या, तरी त्या कथा, त्यातील पात्रं, त्यांना मिळालेले शाप-उ:शाप, कथेतला संघर्ष हे सगळे एक रूपक म्हणून येतात. त्यांचे अर्थ लावणे आणि त्यातून मानवी स्वभावाची वैशिष्टय़े शोधणे हा एक फारच समृद्ध करणारा अनुभव असतो. उदा. सिसिफसला देवांनी एक शिक्षा दिली होती- एक मोठी दगडाची शीळा डोंगराच्या वर नेऊन ठेवायची. प्रत्येक वेळेस ती शीळा डोंगरमाथ्यावर ठेवली, की ती घरंगळत खाली यायची आणि सिसिफसला पुन्हा ती वर नेऊन ठेवावी लागे. निर्थक आणि कष्टाच्या कामात आयुष्यभर अडकलेला हा सिसिफस काही जणांना सामान्य माणसाच्या जगण्याच्या निर्थकतेचं प्रतीक वाटू शकतो, तर काही जणांना तो- प्रत्येक वेळेला पुन्हा आशेने शिळा वर ढकलताना बघून- आशावादीही वाटू शकतो. या  अशा गोष्टींमुळेच अनेक लेखक, कवी, चित्रकार, मानसशास्त्रज्ञ ग्रीक गोष्टींच्या प्रेमात पडले. पाश्चिमात्य विचार, साहित्य, कला यांवर ग्रीक पुराणाचा खूप प्रभाव आहे. अनेक इंग्रजी शब्दांचा उगम ग्रीक गोष्टींत सापडतो (अकिलीज हील, नार्सिसिस्ट, मिडास टच, पांडोरा बॉक्स, हक्र्युलियन टास्क, इको). आज आपल्या आजूबाजूला अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यांचा संबंध कुठेतरी ग्रीक पौराणिक गोष्टींशी येतो.

शेवटी काय, तर अमर होण्याचा पर्याय असतानाही मृत्यू स्वीकारणारा अकिलीज आणि मर्त्य मानव असूनही जगण्याची प्रचंड आस असलेला आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेला ओडीसिअस हे दोन्ही नायक आपल्याला ग्रीक पुराणकथेत भेटतात. असे आयुष्याचे वेगवेगळे रंग दाखवणाऱ्या ग्रीक कथा म्हणूनच वाचकाला आनंद आणि मनोरंजनासोबतच आणखी खूप काही देऊन जातात.