वैशाखवणवा असह्य़ होत असतानाच एके दिवशी अचानक काळय़ा ढगांची गर्दी उठू लागते आणि पुढे एक-दोन दिवसांत काही कळायच्या आत ‘तो’ कोसळायला लागतो. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद असे एकापाठोपाठ बरसू लागतात. मातीचा गंध दरवळतो. सृष्टीचा रंग बदलतो. जलधारांचा जन्म होतो. धुक्याचा पदर पसरतो.. जणू सारी सृष्टीच या नव्या हिरव्या ऋतूच्या सोहळय़ाबरोबर नवचैतन्याचा रस पिऊन दारी-अंगणी उभी राहते. अशा या वर्षांकाळी मग कुठेतरी दूर डोंगररानी, फुलांच्या पठारी, धुक्याच्या दुलईत, हिरवाईच्या कुशीत, पाऊस-धबधब्यांच्या साथीला बाहेर पडावंसं वाटतं. साचलेल्या शहरांना, पिचलेल्या मनांना मागे लोटत दूर एकांतात हरवावंसं वाटतं. वाटतं ना?
मोरपिसांचा पाऊस यावा
निळसर हिरव्या हळव्या रात्री
स्पर्शलिपीतच लिहिले जावे
हस्तिदंती रेखीव गात्री।
खरंच, पाऊस येतो तो मोरपिसांप्रमाणे भुलवत.. त्याच्या त्या हिरव्या- निळय़ा-जांभळय़ा रंगांची उधळण करत. त्याचे हे रंगच भुलवतात. ओला स्पर्श मन आतूर करतो. आणि मग पाऊस पाहायला नव्हे, तर तो अनुभवायला मन बाहेर पडतं. कुठे कुठे हा पाऊस अनुभवता येतो! गावाबाहेर, डोंगरावर, दरीत, गडकिल्ल्यांवर, खळाळत्या नदीच्या काठाशी, धबधब्याच्या पायाशी! फुलांच्या पठारावर अन् भाताच्या शेतावर! डोंगररानी, वाडीवस्ती, वाटा.. अशा साऱ्यांच ठिकाणी! जिथे पावसाला तुम्ही आणि तुम्हाला पाऊस हवाहवासा वाटतो तिथं.
खरं तर पाऊस आल्याची पहिली वर्दी मिळते ती घाटमाथ्यांना! म्हणूनच खऱ्या भटक्यांची पावलं बरोबर याच काळात घाटवाटांवर अडखळतात. पाऊस शोधू-अनुभवू पाहतात. सह्य़ाद्रीच्या रूपाने सबंध महाराष्ट्रालाच
पावसालाही एक नाद असतो बरं का! अगदी कवी ग्रेस यांच्या ‘..पाऊस कधीचा पडतो!’च्या लयीत तो ऐकायचा!
प्रत्येक घाटावरचंच हे चित्र! पण त्यातही मुरबाड-जुन्नरजवळच्या माळशेज घाटात या काळात रानफुलांचं वैभव फुलतं. माणगाव-मुळशीदरम्यानच्या ताम्हिणी आणि भोरजवळच्या वरंध घाटात जागोजागी धबधब्यांचा नाद सुरू होतो. तर कोल्हापूरजवळच्या अंबा, अंबोली, गगनबावडा आणि फोंडा घाटमाथ्यावर टोचणारा पाऊस आणि त्यापाठी उतरणाऱ्या धुक्यात बुडायला होतं.
या घाटवाटा एरवी देश-कोकणात ये-जा करण्यासाठी आहेत. पण तेच पाऊस कोसळू लागला की त्या येत्या-जात्याला थांबवतात. या वाटेवरून येताना त्यांचं ओलंचिंब दृश्य पाहून आधी मन आणि मग शरीर भिजतं.
पाऊस, ढग, हिरवी गिरीशिखरं आणि त्यावरून वाहणाऱ्या जलधारा! जणू साऱ्यांनाच अधीरता असते. उत्तुंग नभाला भूमीच्या भेटीची ओढ लागलेली असते. त्यांची भेट घडते आणि त्यातून वर्षांऋतूचं हे चैतन्य उमलतं.
‘या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे।’
असे म्हणणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोरांचं ‘नभाचे दान’ आणि ‘मातीतले चैतन्य’ हे अशा एखाद्या पावसाळी घाटवाटेवर अडकलो की उमगतं. समोरच्या दरीत कोंडलेला पाऊसही त्याचं मन आपल्याशी उघडं करू पाहतो. त्याच्या भाव-भावना रिकाम्या करू पाहतो. ही लिपी स्पर्शाची असते. ही भाषा गंधाची असते. इथे डोळय़ांचे भरून घेणे आहे आणि हृदयाचा ठोका चुकवणेही आहे!
पाऊस अवतरतो आणि सारी सृष्टी बदलवतो. सृष्टीतला हा बदल आपल्यालाही अंतर्बाह्य़ बदलून टाकतो. हृदयातील दडलेलं प्रेम डोळय़ांमध्ये उतरतं. समर्पणाचे भाव साऱ्या शरीरभर विसावतात. आणि विकृतीचा निचरा झरझर झरून जातो. अगदी समोरच्या जलधारेप्रमाणे! नकळतपणे तो आपला सखा, मित्र, प्रिय, अगदी जवळचा- असे सारे काही होतो. एखाद्या निरागस मुलाला कवेत घेण्यासाठी हात पुढे करावेत तसे त्या
अशी ही पावसाळी घाटवाट सारा पाऊस शिकवून जाते.
प्रत्येक घाटवाटेच्या मध्यभागी देवाची एक जागा असते. त्या देवाच्या सहवासातच एखाद् दुसरी चहाची टपरीही फुलते. भिजरी मने इथं टपरीवर रेंगाळतात. वाफाळत्या चहाबरोबर समोरची पाऊस-धुक्यातली डोंगरदरी अनुभवता अनुभवता सारंच चित्र गुलाबी होऊन जातं.
जी गंमत घाटांची, तीच नद्यांच्या खोऱ्यांची! सह्य़ाद्रीच्या मुख्य धारेच्या अलीकडे-पलीकडे नद्यांची खोरी आहेत. सह्य़ाद्रीत उगम पावणाऱ्या सरितांची ही घरंच जणू! पाऊस पडू लागला की या खोऱ्यांमध्ये अक्षरश: श्रावण वास करू लागतो. हिरव्यागर्द डोंगररांगा आणि त्यांच्या मधोमध धावणारे सरितेचं पात्र. गढूळलेलं, लाल-तपकिरी! हिरवाईच्या पाश्र्वभूमीवर उठून दिसणारं. मधेच कुठे नदीपात्रावर फुललेला एखादा धरणाचा जलाशयदेखील! या जलदेवतेच्या काठानंच छोटी छोटी खेडी, गावं, तिथली ती लाल-कौलारू घरं, प्राचीन कळशीदार मंदिरं, त्याभोवती हिरव्या-पिवळय़ा रंगांत न्हालेली भातखाचरे. इकडे डोंगरावर जंगल-देवरायांची दाटी, कुठे गडकोटांच्या चौक्या, कुठे महादेव नाही तर शक्तीदेवतांची शिखरं.. या साऱ्यांचं एक चित्र तयार होतं आणि मनात घर करू लागतं.
कुठंतरी उंच डोंगरकडय़ावर जायचं आणि तिथून हे सारं न्याहाळत बसायचं. तासन् तास! निसर्गचित्रातले हे नाना रंग आणि छटा पाहता पाहता समाधी लागून जाते. दरीत विसावलेली शांतता या समाधीला खोल खोल घेऊन जाते.
कुठली कुठली ही खोरी! अगदी गोदावरीपासून सुरू केले तर प्रवरा, कुकडी, मीना, घोड, भीमा, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, गुंजवणी-कानंदी, नीरा, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि अशीच कितीतरी! पुन्हा कोकणच्या अंगाने निराळी.
पाऊस सुरू झाला की अशा कुठल्याही खोऱ्यात निघावं. कुठल्याही वाटेवर स्वार व्हावं. चिखलवाट तुडवावी. पाऊस झेलावा. ढग-धुक्याचे खेळ अनुभवावेत. आणि आंबेमोहोराचा गंध हृदयात साठवून परतावं. सारा मावळ या श्रावणसरींनी भिजलेला असतो. त्याचे रंग भुरळ पाडतात. दृश्यांचे पट हरवून टाकतात. आणि आठवणी चिरंतन बनून जातात.
या डोंगरदऱ्यांत गिरीदुर्गाची लेणीही आढळतात. एरवी इतिहास सोबत घेऊन धावणाऱ्या या वाटा पाऊस सुरू झाला की मात्र हळव्या होतात. राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कोरीगड, माळशेजजवळचा हरिश्चंद्रगड, नाशिकचा अंजनेरी, पुण्याजवळचा सिंहगड, गुंजन मावळातील राजगड, साताऱ्याजवळचा सज्जनगड, कोल्हापूरचा पन्हाळा.. असेच कितीतरी! या साऱ्यांचंच पावसाशी एक खास नाजूक नातं!
केवळ पाऊस आला म्हणून सिंहगडावर जाणारी असंख्य पावले आहेत. त्या ओलाव्यात, ढगांच्या दाटीत त्यांना कुठली ऊर्मी मिळते? आषाढातला धो-धो पाऊस कोसळत असताना दरवर्षी अनेकांना पन्हाळय़ाहून पावनखिंड आणि तिथून विशाळगड अशी दिंडी काढावीशी वाटते. त्यांच्यात दडलेल्या बाजीप्रभूंना हा पाऊस कुठले बळ देतो? सारेच अनाकलनीय!
सोलापूरजवळच्या नळदुर्गचा पाणीमहाल पावसात जिवंत होतो. सिंधुसागराचा स्वामी सिंधुदुर्ग लाटांना झटा देऊ लागतो. प्रबळगडच्या कलावंतिणीचं टोक धुक्यात बुडतं आणि माहुलीची शिखरंही धुक्यात आकाशी नाचू लागतात.
‘मेघावरती रान दाटते, रानावरती मेघ
पाऊल आपले ढगात विरते, घेऊन मन आतूर!’
पाऊसकाळी दुर्गवाटांवर फिरताना अशी भिरभिरावस्था होते.
या प्रत्येक दुर्गाला स्वत:चं व्यक्तिमत्त्व आहे! राकट, हेकट, काहीसं गूढ-गंभीर! पण पाऊस कोसळू लागला की हे सारे दुर्ग तरुण होतात. जणू त्यांचं यौवन उमलून येतं. ऐन वर्षांकाळी राजगडाला पाहिलंय? त्याच्यासारखं राजबिंडे व्यक्तिमत्त्व अन्य कुणातही आढळणार नाही! पवनेच्या डोहात अडकलेल्या तुंगवर
पाऊस या साऱ्यांच्या जीवनचक्रात बदल घडवतो. वयाची गणितं बदलवतो. तुमच्या-आमच्याप्रमाणेच या गिरीदुर्गानाही तरुण करतो.
धबधबा! पाऊस म्हटलं की याची चर्चा नाही, असं कसं? हा तर पावसाचा जणू आत्माच! पण ओल्या वाटांवरील भटकंतीत ‘भैरवी’प्रमाणे तो शेवटी येतो. सारं तन-मन चिंब भिजवून टाकतो. रंग, रूप आणि ऊर्जा या तिन्हीचं प्रतिबिंब धबधब्यात डोकावत असतं. सहस्र बाहूंची त्याची ऊर्जा घ्यावी, की अनंत धारांचं ते दातृत्व पाहावं, की सृष्टीला भेटायची त्याची ओढ जाणावी, हेच कळत नाही. जणू कालपर्यंत तो या भूमीत लुप्त होता आणि पाऊस सुरू होताच त्याच्या स्पर्शानं तो उसळून बाहेर आलाय.
पाऊस सुरू झाला की डोंगर-रानी, घाटवाटांवर हे धबधबे धावू लागतात. पण या शेकडो-हजारो जलधारांमध्येही काही खास- देवलोकीच्या! भंडारदऱ्याचा रंधा, साताऱ्याजवळचा ठोसेघर, महाबळेश्वरचा लिंगमाळ, वरंध घाटातील शिवथरघळ, देवरुखजवळचा मार्लेश्वर, भीमाशंकरजवळचा मंदोशी, कोल्हापूरचा बरकी, पाटणजवळचा ओझर्डे आणि नांदेडमधील सहस्त्रकुंड या त्यापैकी! उन्नत, उत्साही, पाण्यानं भरलेल्या! त्यांच्याकडे पाहिलं तरी आपलं जीवन भरून येतं.
सारे धबधबे पाण्याचे लोट घेऊन कोसळणारे; पण तरी त्या साऱ्यांचं व्यक्तिमत्त्व पुन्हा निराळं! भीमाशंकरच्या जटेतून वाहणारा मंदोशीचा किंवा समर्थाच्या घळीचे सान्निध्य घेऊन कोसळणारा शिवथरचा धबधबा तसा शांत, लयबद्ध! ‘गिरीच्या मस्तकी गंगा’ वाटावी तसा! पण तेच ठोसेघरची त्रिधारा, रंधा किंवा मार्लेश्वरचे कोसळणे पाहिले की महिषासुरमर्दिनीचंच रौद्ररूप भासतं. संयतपणा कमी अन् त्वेषच अधिक!
वरंध घाटातील वाघजाईसमोर उभे राहत समोरच्या काळ नदीच्या खोऱ्यात नुसतं पाहिलं तरी त्या उंच खोल कातळावरून कोसळणाऱ्या असंख्य जलधारांचे तांडव सुरू असलेलं दिसेल. एखाद्या आषाढघन दिवशी इथं आलो की हे दृश्य पोटात धडकी भरवतं! दुसरीकडे संत तुकारामांचे भामचंद्र, लोहगड, रोहिडा, राजगड यांच्या कडय़ावरील जलधारांना सोसाटय़ाचा वारा खालीच उतरू देत नाही. त्यामुळे इथं असे वरच्या दिशांना वळलेले उलटे धबधबे दिसतात. एखाद्या लांब-रूंद कडय़ावरचा जलधारांचा हा पाठशिवणीचा खेळ पाहणं केवळ गुंतवणारं! चिपळूणच्या सवतसडय़ाची धार उंची घेत खोलात शिरते, तर नांदेडच्या सहस्रकुंडाच्या भेदकतेनं नजर विस्फारते. महाबळेश्वरचा ‘लिंगमाळ’ हिरवाईच्या अंगावरून शुभ्र मोत्याची माळ बनून कोसळतो, तर ओझर्डेची धार अवकाशाला पाठीशी घेत निळाईत बुडून जाते.
काय नाही या जलधारांमध्ये? रंग, रूप, आकार.. एकाहून एक सुंदर! स्वर्गलोकीचे हे दूत जणू भूमीवर अवतरलेत! कुठे संथ, लयबद्ध, तर कुठे रौद्र. कुठे अभिषेकाची धार लावलेले, कुठे साऱ्या डोंगरकपारी शुभ्रधारांच्या माळा लावणारे. तर कुठे विशाल, विराट रूप घेत साऱ्या पावसालाच दरीत लोटणारे! त्याच्या रंगांचंही असंच. कुठे फेसाळ, कुठे दुधाळ, तर कुठे मातीचे गायन गात लाल-तांबडय़ा रंगात बुडालेले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा