मला आजही तो दिवस आठवतो. त्या दिवशी मी उदास मनाने घरी परतलो. एका सिनेमासाठी दोन महिने मी तयारी करत होतो. कुठलीही पूर्वकल्पना न देता मला त्या चित्रपटातून काढून टाकलं होतं. त्या सिनेमाच्या शूटिंग लोकेशनवरून मी घरी परतत होतो. मनात सगळा अपमान, असहायता, दु:ख घेऊन मी कुठल्यातरी तंद्रित घराच्या दिशेने निघालो होतो. या सगळ्या मानसिक अवस्थेचा मला भयानक त्रास होत होता. अजून पुढे किती दिवस हा त्रास भोगावा लागणार आहे, या कल्पनेने माझा त्रास अजूनच वाढत होता. काही वेळ शिवाजी पार्कच्या कट्टय़ावर बसलो. माझ्यासारखाच त्रास कधीकाळी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही झाला होता, हे मी कुठेतरी वाचलं होतं. त्यांनाही एका चित्रपटातून असंच काढलं होतं आणि तेही असंच वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावर बिस्किटं खात, विचार करत, उदास अवस्थेत बसून राहिले होते. ते वरळीच्या समुद्रकिनारी आणि मी थोडय़ाच अंतरावर असलेल्या दादरच्या समुद्रकिनारी- शिवाजी पार्कवर. चला, म्हणजे थोडंसं का होईना, मला अमिताभ बच्चन आणि माझ्यात साम्य सापडलं होतं. तेवढीच जरा उदास मनावर फुंकर. चार्ली चॅप्लिनने तर दु:खाचे असंख्य दशावतार बघितले होते. त्यापुढे माझं दु:ख काहीच नाही. एकीकडे या थोर पुरुषांच्या दु:खाशी बरोबरी करून का होईना, माझ्या मनाला जरा बरं वाटत होतं. मनात आलं- चला, म्हणजे माझ्याही वाटय़ाला जर असं थोरामोठय़ांचं दु:ख येणार असेल तर पुढचं भविष्य उज्ज्वल असणार यात शंकाच नाही. या कल्पनेने मी जरासा खूश झालो; पण काही केल्या पूर्ण समाधान मात्र होत नव्हतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय करावं, या विचारानं मला एवढं घेरलं होतं, की त्या हताश अवस्थेत मी त्या कट्टय़ावर किती वेळ बसलो, ते कळलंच नाही. घडय़ाळात बघितलं तर साडेअकरा वाजले होते. बापरे! म्हणजे मी गेले पाच तास स्वप्नरंजन करत त्या कट्टय़ावर बसून होतो. पण तरीही फारसं हाती काही लागलं नव्हतं. शेवटी जड  पावलांनी मी घरी परतलो. रात्रभर मला झोप लागणार नव्हती. आणि त्यातच माझा रूम पार्टनर बाहेरगावी गेला होता. म्हणजे आता पुढची अख्खी रात्र मला एकटय़ाला काढावी लागणार. या विचाराने तर मी अजूनच उदास झालो. अंथरुणावर पडून डोक्यावर फिरणारा पंखा बघत बराच वेळ तसाच पडून राहिलो. आजूबाजूला थोडं शांत झाल्यावर कुठूनतरी रेडिओचा आवाज कानावर आला. सुचलं! म्हटलं, चला, रात्रभर थोडा काळ गाण्यांची तरी सोबत होईलच. मी पंचमदांचा डायहार्ड फॅन म्हणूनच जन्माला आल्यामुळे मोबाइलमध्ये पंचमदांची गाणी संग्रही होती. मी हेडफोन लावले आणि माझ्या मोबाइलमधली पंचमदांची गाणी सुरू झाली. एक, दोन, तीन.. मला आठवत नाही- किती गाणी मी ऐकली असतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला कधी झोप लागली हेसुद्धा कळलं नाही. अशा प्रकारे- म्हणजे खिन्न मनाने झोप मला याआधी फक्त आईच्या मांडीवर डोकं ठेवल्यावरच लागली होती. मी सकाळी उठलो तेव्हा एकदम फ्रेश झालो होतो. कालच्या दु:खद घटनेचा माझ्या मनावर झालेला परिणाम पूर्णपणे पुसून गेला होता. जवळजवळ दुसरा माणूस जन्माला आल्यासारखा मी झोपेतून जागा झालो होतो. ही किमया होती पंचमदांच्या गाण्यांची. हा केवढा मोठा शोध लागला होता मला! मला माझ्या निराशेवर रामबाण उपाय सापडला होता.

पंचमदांचं संगीत हे तुम्ही फक्त ऐकत नाही; ते तुमच्या धमन्यांतून वाहायला लागतं. डोक्यात मुरायला लागतं. हृदयात रुतून बसतं. एखादा बासरीचा तुकडा तुमचं हृदय चिरत थेट तुमच्या पापण्या ओल्या करतो. एखाद्या संतूरची झलक तुम्हाला क्षणात काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांतून फिरवून आणते. अगदी तुम्ही धारावीच्या झोपडपट्टीत उभे असलात, तरीही! तुम्ही अगदी कडक उन्हात ओसाड माळरानावर फिरत असाल तरी त्यांच्या एखाद्या गाण्याची लय तुम्हाला पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतल, शुभ्र प्रकाशात एखाद्या शांत सरोवरात नावेतून फिरवून आणते. मुंबईसारख्या शहरात इमारतीच्या खिडक्यांतून तुम्हाला काँक्रीटच्या भिंतीशिवाय काहीही दिसत नसलं तरी एखादा ताल तुम्हाला आगगाडीच्या खिडकीत बसवून हिरव्यागर्द झाडींचा प्रदेश बघायला घेऊन जातो. एखाद्या गाण्याचे सूर तुम्हाला ऐन मे महिन्यात नैनिताल किंवा सिमल्याच्या धुक्यात हलकेच नेऊन ठेवतात. सुरांची जादू या शब्दांचा अर्थ खरोखर जर कुणाला सापडला असेल, तर ते नाव आहे आर. डी. बर्मन! त्यांच्या एखाद्या गाण्याची चाल ऐकून त्या गाण्याचं लोकेशन काय असलं पाहिजे, हे तुमच्या डोळ्यांपुढे येतंच. (काही गाण्यांमध्ये ते फसलं आहे. पण ती चूक पंचमदांची नाही; त्या दिग्दर्शकाच्या कल्पनादारिद्य््रााचा तो आविष्कार आहे.)

हे झालं गाण्यांचं! पण सिनेमाच्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्येही चमत्कार करून दाखवण्याचं पंचमदांचं कौशल्य अजरामर आहे. ‘शोले’ हा सिनेमा त्यांच्या या कौशल्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. कधीतरी ‘शोले’मधील गब्बरसिंगच्या एन्ट्रीचं म्युझिक बंद करून ती एन्ट्री पाहा. मी ‘शोले’ वीस वेळा तरी बघितला असेल. पुढे काय होणार, हे सगळं माहीत असतं. पण गब्बरच्या एन्ट्रीच्या वेळी अजूनही डोळे विस्फारले जातात, छातीची धडधड वाढते, ती त्या म्युझिकच्या नांदीमुळेच!

‘मेहबुबा मेहबुबा’ गाण्याचं म्युझिक सुरू झालं की आजही सिनेमा थिएटरमधलं वातावरण एकदम चैतन्यपूर्ण होऊन जातं. इतक्या वेळा मी हा चित्रपट बघितला, पण आजपर्यंत थिएटरमध्ये ‘मेहबुबा..’ या गाण्याला लोकांनी उत्स्फूर्तपणे शिट्टय़ा वाजवल्या नाहीत असं एकदाही झालं नाही. एकदा तर आपल्याला शिट्टी वाजवता येत नाही आणि त्यामुळे त्या गाण्याला आपल्याकडून सणसणीत दाद दिली जात नाही, याचा केवळ खेद वाटून माझ्या एका जोरदार शिट्टी वाजवता येणाऱ्या मित्राला माझ्या खर्चाने मी ‘शोले’ बघायला घेऊन गेलो होतो. एकदा सिनेमाला पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे टायटल म्युझिक चुकलं. एवढी रुखरुख लागली मनाला. त्यानंतर लगेचचा शो बघून पूर्णत्वाचं समाधान घेऊनच आम्ही मित्र घरी गेलो.

जी गोष्ट ‘शोले’मध्ये गब्बरसिंगची; तीच गोष्ट ‘सत्ते पे सत्ता’मधल्या अमिताभ बच्चनच्या बाबू या कॅरेक्टरच्या एन्ट्रीची. एकतर अमिताभची एन्ट्री आणि त्याला पंचमदांचं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे अर्जुनाने पक्ष्याचा डोळा ज्या तल्लिनतेने बघितला असेल तीच तल्लिनता इथे अनुभवयास मिळते. किशोरकुमार, आशा भोसले, लता मंगेशकर, रफी यांसारख्या मातब्बरांनी पंचमदांच्या सुरांना स्वप्नांचे पंख दिले आणि हे सुरांचे पक्षी आमच्यासारख्या सामान्य श्रोत्यांना त्यांच्या देशात कधी घेऊन गेले, कळलंसुद्धा नाही. तिथे जाऊन प्रेमात पडलो त्या पक्ष्यांच्या. आता त्या प्रदेशातून सुटका नाही. सुटका झालीच तर मृत्यूशय्येवरच.

वाटलं, हे सगळं पंचमदांना सांगावं. म्हणून एक दिवस सरळ पंचमदांना पत्र लिहायचं ठरवलं. माझ्यासारख्या अनेक भक्तांना आमचं समाधान, आनंद, प्रेम, दु:ख, व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात अशी इच्छा तर होतच असते. पण ते शक्य नाही, हे जरी माहीत असलं तरी मनावर असलेले हे अस्वस्थतेचं ओझं हलकं होणं आता गरजेचं होऊन बसलं आहे. ही असली ओझी मनातलं कुणाशी तरी बोलूनच हलकी होत असतात. निदान पत्राच्या रूपाने का होईना त्यांच्याशी बोलावं, ही कल्पनाच मन भारावून टाकणारी होती. त्यावर ते काय बोलतील, ही कल्पना करणंसुद्धा एक देखणं स्वप्न बघितल्यासारखंच होतं..

प्रिय पंचमदा (आर. डी. बर्मनदा)

मी आणि माझ्यासारख्या अनेक अगणित भक्तांचं तुमच्या पायांवर साष्टांग लोटांगण. भक्त एवढय़ासाठी म्हटलं, कारण मी तुमचा फॅन आहे असं म्हणणं तुमच्याबाबतीत बऱ्यापैकी कोरडेपणाचं वाटेल. तुमचा भक्त म्हणवून घेण्यात जे समाधान आहे तेच समाधान तुकारामाला विठोबाचा भक्त म्हणवून घेण्यात वाटलं असेल. माझ्यासारखे तुमचे अनेक भक्त असतील; पण हा तुकाराम फक्त माझ्या विठोबाबद्दल बोलणार आहे. या आयुष्यात तुमचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं अशी खूप इच्छा होती. तुमच्या पायावर डोकं ठेवता आलं असतं तर जन्माचं सार्थक झालं असतं. या कमालीच्या व्यावहारिक आणि सृजनशीलतेच्या नावावर थिल्लरपणा चाललेल्या जगात श्वास घेण्यासाठी तुमचा आशीर्वाद मिळणं अत्यंत आवश्यक होतं. पण मी उशिरा जन्माला आल्याबद्दल खंत वाटण्यापलीकडे मी काहीच करू शकत नाही. तसे तुम्ही माझ्या आनंदाच्या प्रसंगी, दु:खाच्या प्रसंगी तुमच्या गाण्यातून भेटतच असता. तुमच्या मुलाखतींचे व्हिडीओ यू-टय़ूबवर बघून तुमच्याबद्दल गुलजारांनी केलेलं भाष्य, आशा भोसलेंच्या मुलाखतीत तुमच्याविषयीच्या उल्लेखांतून तुम्ही कसे असाल याची कल्पना तर येऊ शकतेच. मला नेहमी असं वाटतं- तुम्ही, किशोरकुमार, आशा भोसले, गुलजार, लता मंगेशकर जेव्हा भेटत असाल तेव्हा काय गप्पा मारत असाल? ‘बहारों फूल बरसाओ’ हे शब्द तुम्हा सर्वाना एकत्र बघून सुचले असतील.

तुम्हाला मनातली एक गोष्ट सांगायची आहे. गाण्यांचं रीमिक्स म्हटलं की माझं डोकं भयानक फिरतं. हे म्हणजे स्वर्गातल्या अप्सरेला मेकअप करून आणि जीन्स-टीशर्ट घालून नाचायला लावण्यासारखं आहे. त्यातून ते तुमच्या गाण्यांचं रीमिक्स असेल तर तो संगीतकार, त्याने केलेलं ते रीमिक्स डोकंच काय, मज्जातंतू, मज्जारज्जू- जे कोणी तंतू, नसा, आतडी असतील, त्यांना जोरात धक्का देऊन जातं. साधं रस्त्यानं चालताना जरा कुणी धक्का दिला तरीही आपला चेहरा किती कडवट होतो. इथे तर काय व्हायला पाहिजे. त्या संगीतकाराला उलटा टांगून त्यानेच तयार केलेल्या म्युझिकच्या कॅसेटस् जाळून त्याची धुरीच दिली पाहिजे. आणि हे करत असताना आफ्रिकन आदिवासींचं संगीत कानठळ्या बसेपर्यंत त्याला ऐकवायला पाहिजे. पंचमदांच्या गाण्यांचं रीमिक्स सोडाच, पण नुसता विचार करतानासुद्धा त्याचे हात-पाय गारठले पाहिजेत.

काही वर्षांपूर्वी तुम्ही संगीतबद्ध केलेली काही गाणी वाद्यांमध्ये, तसेच गाण्यातल्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये बदल करून, काही गाण्यांच्या लयींची मोडतोड करून, ताल बदलून, गायकांनी उगाच वेडय़ावाकडय़ा ताना घेतलेली ती गाणं रीकंपोझ केली होती म्हणे. चाली मात्र त्याच. अशी ही अर्धनग्न, लुळीपांगळी गाणी तुम्हाला आदरांजली म्हणून एका चित्रपटात घेतली होती. ही कसली आदरांजली? ही तर अनादरांजली! त्यापुढचा हिडीसपणा म्हणजे त्या ‘ढ’ संगीतकाराला विचारलं की, ‘तुम्ही या गाण्यांमध्ये काय नवीन केलं आहे?’ तर तो म्हणाला, ‘पंचमदांच्या सुरांना एक वेगळा क्रिएटिव्ह थॉट देऊन मी ती गाणी रीक्रिएट केली आहेत.’ पण मग तुम्ही जे क्रिएट केलंत ते काय होतं? तुम्हाला सांगतो- जीवाचा संताप संताप झाला. त्याला असं म्हणावंसं वाटलं की, ‘अरे कर्मदरिद्य््राा, उगाळायला चंदन मिळालं नाही म्हणून उगाच खडू उगाळून कपाळावर टिळा मिरवण्याचं कारणच काय? ज्यांनी कस्तुरीमृग बघितला आहे त्यांना कुठल्यातरी जत्रेतलं लाकडी हरीण दाखवून पाठीवर शाबासकीची थाप मिळवण्याची अपेक्षा करशील तर चांगला धपाटाच मिळेल. तुला पंचमदांची काय जी गाणी ऐकायची ती ऐक आणि आमच्या भक्तगणांत सामील हो. तिथे तुझं अगदी सौहार्दपूर्ण स्वागत करू. पण क्रिएटिव्ह थॉट द्यायचा असेल तर तुला तुझा पुढला जन्म येईपर्यंत वाट बघायलाच लागेल.’ एकतर काही बदल करायचे तर तो अधिकार पाहिजे; आणि असा अधिकार कुणा ऐऱ्यागैऱ्याला मिळत नसतो. तो जन्माला घेऊन यायला लागतो. आणि असा अधिकार असलेला एकमेव माणूस आहे तो म्हणजे स्वत: पंचमदाच. कारण संगीताची ‘माहिती’ असणं वेगळं आणि त्याचं ‘ज्ञान’ असणं वेगळं. दोन्हीमध्ये जमीन-आसमान एवढा फरक आहे. हा असला तुमच्या गाण्यांच्या रीमिक्सचा बाजार मांडून स्वत:चे खिसे भरणाऱ्यांवर कायद्याने बंदी घालायला पाहिजे. नाहीतर तुम्हीच स्वर्गातून काही देवदेवतांना गाठून इथली सूत्रं हलवता येतायत का, ते बघा. ‘माझ्या गाण्यांना हात लावणाऱ्यांचे हात कलम केले जावेत’ वगैरे काही फतवा काढता आला तर बघा.

पण तुम्ही कधीही असं करणार नाही. केलेल्या कामाचं क्रेडिट घेणं तुम्हाला आवडत नाही म्हणे. तुमचे वडील एस. डी. बर्मन यांच्याबरोबर असिस्टंट म्हणून काम करत असताना तुम्ही स्वतंत्रपणे काही गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलंत; पण क्रेडिट घेतलं नाहीत. वर्षांनुर्वष त्यांच्याबरोबर काम करूनसुद्धा त्यांची छाप तुमच्या कामावर नाही. तुमची शैली स्वतंत्र आहे. ‘बाप से बेटा सवाई!’ असं खुद्द एस. डी. बर्मनसुद्धा म्हणत असतील.

मला अजून एक प्रश्न आहे. चित्रपटातली सर्वच्या सर्व गाणी सुपरहिट्.. हे काय समीकरण होतं तुम्हा पिता-पुत्राचं? आणि असा एखादाच चित्रपट नाही, तर अनेक चित्रपट. ‘प्रतिभेचा झरा’ वगैरे म्हणायची पद्धत आहे, पण तुमच्यासाठी हे शब्द बदलून ‘प्रतिभेचा धबधबा’ असं म्हणायला पाहिजे. शेवटपर्यंत तुमच्या प्रतिभेचा धबधबा अव्याहतपणे वाहत होता- तो अगदी शेवटच्या चित्रपटापर्यंत. त्याही चित्रपटातील बहुतेक सर्व गाणी सुपरहिट् ठरली. (त्यावेळी मी गाणी ऐकण्यासाठी म्हणून माझ्या आयुष्यातली शेवटची सीडी खरेदी केली. त्यानंतर नाही.) चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी सुपरहिट् हा प्रकार आता पूर्णपणे लोप पावला आहे. एखादं गाणं अगदी थोडा काळ कसंबसं त्याचं अस्तित्व टिकवून ठेवतं. तीन-चार दशकं आणि त्यापुढेही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गाणी निर्माण करणारे किमयागार तुम्हीच होतात. गाण्यांचं रीमिक्स करा- करू नका, काय वाट्टेल ते करा; फक्त प्रतिभा, सृजनशीलता या शब्दांचा सोयीस्कर अर्थ लावणाऱ्यांनी पंचमदांच्या वाटेला जाऊ नये, ही कळकळीची विनंती आहे. ‘गाणं हे जन्माला घालावं लागतं. शब्द मनात जपावे लागतात. त्यांचं पालनपोषण करायला लागतं. त्यांच्यावर योग्य सुरांचे संस्कार करावे लागतात. त्यांच्याशी स्वत: ताल, लय होऊन खेळावं लागतं तेव्हा कुठे ते सशक्त होतं आणि त्याची चमक दुनियेला दिसते..’ असं तुम्ही म्हणायचात; आणि तसंच करायचातही. कुणीतरी कान धरून आजकालच्या उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या संगीतकारांना हे सांगण्याची गरज आहे.

माझं कुणा संगीतकाराशी वाकडं नाही; पण तुम्ही गेल्यानंतर चित्रपट संगीत आधीसारखं वेळ देऊन ऐकणं मी सोडून दिलंय. आजकालच्या गाण्यांशी संबंध येतो तो म्हणजे कुठे रेडियो चालू असेल तर चुकून कानावर पडतात, तेवढाच. वेळ असला तरी गाण्यांसाठी तो द्यावा असं अजिबात मनात येत नाही. रेडियोवरपण जी जुनी गाणी लागतात त्यात तुम्ही संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचाच समावेश जास्तीत जास्त असतो.

अजून एक माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. एका सिनेमाच्या स्क्रिप्टवर मी काम करत होतो. मनात गोष्ट तयार होती; पण शब्द मनात कोंडल्यासारखे झाले होते. बराच काळ गेला, पण काही केल्या मार्ग दिसेना. एक दिवस अचानक तुम्ही संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसलेंनी गायलेलं ‘भिनी भिनी भोर आयी’ असं एक गाणं आहे (चित्रपट संगीत नव्हे.) ते माझ्या ऐकण्यात आलं. एकदा, दोनदा, तीनदा.. परत परत मी ते गाणं ऐकलं. आणि काय आश्चर्य! पिशवीतून गोटय़ा बाहेर पडाव्यात तसे मनातून शब्द बाहेर पडले. सर्व प्रसंगाचा मूड एकदम उत्कृष्ट जमून आला. पुढच्या तीन दिवसांत चित्रपट लिहून पूर्ण झाला. मनात आलं, या चित्रपटाला संगीतपण पंचमदा देतील तर काय बहार येईल! आता मला भीती आहे की तसा संगीतकार मिळाला नाही तर..? (तो कधीच मिळणार नाही.) किंवा निदान तुमचा कुणीतरी माझ्यासारखा भक्त तरी शोधायलाच लागेल.

मला ना बऱ्याचदा प्रश्न पडतो- आपलं काय नातं असावं? मी तुम्हाला कधी भेटलो नाही. तुमच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मला फारशी माहिती नाही. तुमच्या गाण्यांशीच काय ती ओळख! असं असताना कधी कधी तुमच्या आठवणीने मला गदगदून येतं. आठवणीने कंठ दाटून येणाऱ्यांची पूर्वी मी चेष्टा करायचो. पण आजकाल हे तुमच्याबाबतीत माझं फार व्हायला लागलंय. आत्ता पंचमदा असायला हवे होते असं फार वाटायला लागलंय. तुमच्या गाण्यांची साथ होती म्हणून आयुष्य सोपं झालं असं वाटतं. नाही तर काय केलं असतं मी? हे तुमचे उपकार या जन्मी फिटणं शक्य नाही. तुम्ही हयात असता तर रात्रंदिवस तुमची सेवा करून हे ओझं थोडं हलकं करता आलं असतं. त्यातसुद्धा तुमच्या सहवासामुळे मिळणाऱ्या समाधानाचं व्याजच त्या उपकारांवर चढलं असतं. मला लहानपणी वडील ध्रुवताऱ्याची गोष्ट सांगत असत. ध्रुवबाळाला वरदान मिळालं होतं की, तुला असं अढळ स्थान प्राप्त होईल- जिथे तुझ्या स्थानाला कुणीही कधीच धक्का लावू शकणार नाही. माणसानं आयुष्यात असं स्थान प्राप्त केलं पाहिजे. ती

एक काल्पनिक गोष्ट होती. पण जेव्हा मी कधी आकाशात बघतो तेव्हा तो ध्रुवतारा तुम्हीच आहात असं वाटतं. तुम्ही असं स्थान मिळवू शकलात पंचमदा- जिथे तुमच्या स्थानाला कुणी कधीच धक्का नाही लावू शकणार. निदान चंद्र-सूर्य अस्तित्वात असेतोवर तरी!

निखिल रत्नपारखी- nratna1212@gmail.com

मराठीतील सर्व गाजराची तुतारी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A letter to pancham da