‘काय मग ओळखलंस का?’ जुना घनिष्ठ मित्र असल्यासारखी कुणीतरी पाठीवर थाप मारली. असेल कुणीतरी जुना मित्र म्हणून मी मागे वळून बघितलं, पण ओळख पटेना. कारण एवढा पण जुना माझा कुणी मित्र असणं शक्यच नव्हतं. साधारणत: वयाची पंच्याहत्तरी उलटलेल्या त्या युवकाने (माझा मित्र म्हणजे सध्या तरी युवकच म्हटलं पाहिजे.) डोळे किलकिले करत मला पुन्हा एकदा तोच प्रश्न हिंदीतून विचारला. डोळे आणि डोळ्यांवरचा तो चष्मा यांची जरा जरा ओळख पटायला लागली होती. पण चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि खुरटी वाढलेली पांढरी दाढी यांची काही केल्या ओळख पटेना. आणखीन गोंधळात टाकणारी चेहऱ्यावरची खूण म्हणजे मुस्लीम लोकांच्या कपाळावर नमाज पडून पडून एक काळा डाग पडतो तसा डाग त्यांच्या कपाळावर होता. म्हणजे व्यक्ती मुस्लीम होती. बापरे! हे तर अजूनच अवघड झालं. एवढी वयस्कर व्यक्ती ओळख सांगतेय म्हटल्यावर मी माझ्या बालपणाच्या फायली सर्च करायला लागलो. पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या कट्टर ब्राह्मण परिसरात माझ्या बालपणाचा बऱ्यापैकी काळ गेला असल्याने कोण्या मुस्लीम व्यक्तीशी ओळख होणंच लांबची गोष्ट होती, तिथे एवढी घनिष्ठ मैत्री असणं शक्यच नव्हतं. कोण असावेत हे? ‘अरे शेखकाका!’ असं त्यांनी म्हटल्याबरोबर माझ्या डोक्यात लख्खकन् प्रकाश पडला. माझ्यासाठी नेहमी फाइव्हस्टार नावाची महागडी कॅडबरी घेऊन येणारा हा प्रेमळ चेहरा मी असा कसा काय विसरलो, म्हणून मला स्वत:ची एवढी शरम वाटायला लागली. बऱ्याचदा त्यांच्या घरी लाजवाब चिकन बिर्याणी येत असे. ती अशी काही आम्ही फस्त करत असू. ईदच्या दिवशी त्यांच्या घरी खाल्लेला शीरखुर्मा आठवला. आता मात्र सगळं सगळं आठवलं. माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र होते शेखकाका. पण त्यांच्यातलं नातं नक्की किती जवळचं होतं, हे कळण्याचं माझं तेव्हा वय नव्हतं. ते आमच्याशी एवढय़ा प्रेमाने वागत असत, की हे काका म्हणजे वडिलांचे खूप खास मित्र असले पाहिजेत, एवढंच त्यावेळी कळत होतं. मधे पंचवीस वर्षांचा काळ गेला होता आणि आज अचानक थकलेल्या देहाचे अवशेष घेऊन शेखकाका माझ्यासमोर उभे होते. मी त्यांची रीतसर माफी मागितली. आपण याआधी भेटलो होतो तेव्हा मी खूप लहान होतो, असं मी त्यांना म्हणालो खरा; पण हळूहळू आठवायला लागलं.
वडील हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना भेटायला आलेले त्यांचे एकमेव मित्र म्हणजे शेखकाका. वडील गेल्यानंतर ज्यांना रडताना मी बघितलं होतं ते होते शेखकाका. माझ्याच विवंचनेत असल्यामुळे या गोष्टी त्यावेळी प्रकर्षांने मला कधी जाणवल्या नव्हत्या. पण आज त्यांना समोर बघून एखाद्या चित्रपटाचा फ्लॅशबॅक बघावा तशा सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यांपुढे यायला लागल्या. माझ्या बायकोची त्यांना ओळख करून दिली. त्यांची ओळख करून द्यायला लागलो तर त्यांनी अचानक मला थांबवलं आणि स्वत:च स्वत:ची ओळख करून द्यायला लागले. ‘तुमच्या सासऱ्यांचा मी मित्र. मित्र म्हणजे नुस्ता म्हणायला. तसे आप्पा माझे गुरू. एकाच कंपनीत आम्ही काम करत होतो. तुमच्या सासऱ्यांना आम्ही मित्र आप्पा म्हणायचो. त्यांनीच मला शिकवलं. त्यांच्या हाताखाली जवळजवळ पंचवीस वर्षे मी काम केलं..’ इथपर्यंत कसेबसे ते अडखळत बोलले. त्यांना बोलवेना. घसा खाकरायचं नाटक करून त्यांनी मान खाली घातली. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. त्यांनी खिशातून रुमाल काढला आणि नाक स्वच्छ करायचं निमित्त करून डोळे पुसून टाकले. त्यांनी मान वरती केली तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आप्पांच्या पंचवीस वर्षांच्या आठवणी दाटीवाटीने उभ्या असलेल्या स्पष्ट दिसत होत्या. मला बघून त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांना खूप बोलायचं होतं. खूप काही विचारायचं होतं. पण काही सुचत नसल्याचंही कळत होतं. काहीतरी झालं होतं. माझी आणि बाकी कुटुंबातल्या व्यक्तींची जुजबी चौकशी झाल्यावर आता काय, हा आम्हा दोघांपुढेही मोठ्ठा प्रश्न पडला. कारण ‘सध्या काय चालू आहे? काय मग नवीन?’ या प्रश्नांची उत्तरं त्यांनी काही न विचारताच मी घडाघडा सांगून टाकली होती. मोबाइल नंबर्सची देवाणघेवाणही झाली होती. ओघानेच कुठल्या सíव्हसचं नेटवर्क चांगलं आहे, कुठे कुठे रेंज असते/नसते, ही चर्चाही झाली होती. जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा तर मध्यंतरी बराच काळ लोटला होता. बरं, आम्ही भेटलो होतो ती जागा हॉस्पिटल होती. नाही म्हटलं तरी आजूबाजूच्या वातावरणात बऱ्यापैकी निराशा पसरलेली होती. ‘तुम्हाला पहिल्यांदा मी ओळखलंच नाही. तुम्ही मला उगाचच बुटके झाल्यासारखे वाटलात,’ असं म्हणत मीच हसलो. अत्यंत मूर्खासारखं काहीतरी बोलायचं म्हणून मी बोललो होतो. ‘कुठं, कधी, काय बोलावं अजिबात कळत नाही तुला!’ या अर्थाचा बायकोनेही एक लुक दिला. ‘अरे, तू मोठा माणूस झालास. माझ्यापेक्षाही उंच झालास. किंवा मीच बुटका झालो असेन एवढय़ा वर्षांत. आता म्हातारपणी हळूहळू एक- एक गोष्ट कमी होत जाणारच की!’ असं ते म्हणाले. वातावरण उगाच फार गंभीर वळण घ्यायला नको म्हणून जरा वेगळा विषय सुरू करावा, या उद्देशाने मी म्हणालो, ‘तुम्ही इकडे हॉस्पिटलमध्ये कसे? म्हणजे काही होतंय का तुम्हाला?’ ‘भावाची मुलगी झरीना- तिला कॅन्सर झाला आहे. भेटायला आलोय. काय होणार समजत नाही.’
परत एकदा सर्वत्र मौन. वातावरण गंभीर होऊ नये म्हणून मी वेगळा विषय काढला खरा; पण प्रकरण उलट अजूनच गंभीर झालं. जाऊ दे, आपण आपले गप्पच बसू. थोडय़ा वेळानं ते जायला निघाले. ‘निघालो मी. झरीना के लिये दुवा मांगना बेटा. फोन करूंगा बाद में,’ असं म्हणून ते निघून गेले. बाद में म्हणजे अक्षरश: ‘बाद में’च त्यांचा फोन आला. अगदी दोन तासांच्या आत. म्हणाले, ‘तुला भेटून खूप आनंद झाला. खूप वर्षांनी आप्पांना भेटल्यासारखं वाटलं. ठेवतो फोन.’ एवढी दोन-तीनच वाक्यं ते म्हणाले. म्हणजे एवढंच सांगण्यासाठी त्यांनी फोन केला होता? त्यांच्या त्या फोनमुळे मलाच अस्वस्थ वाटायला लागलं. म्हातारपणात सगळ्यात जास्त त्रास हा शारीरिक व्याधींचा होत नसून आठवणींचा होत असणार. शारीरिक व्याधी या वयात अगदी पूर्णपणे बऱ्या होत नसतील तर काहीतरी उपाय केल्याच्या समाधानात तरी राहता येतं. पण आठवणींचं काय करणार? त्यांना कोण समजवणार? त्या तर येतच राहतात. कुठलाही उपाय करून त्या थांबत नाहीत. शारीरिक रोग कॅन्सर जेवढा भयानक असतो, तेवढय़ाच मानसिक दुरवस्थेला आठवणी जबाबदार असतात. दु:ख हलकं करायला काळ हा एक रामबाण उपाय असतो. पण काळही जिथे नतमस्तक होत असेल- त्या आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आठवणीच असतात. त्या टाळता येत नाहीत किंवा त्यापासून पळूनही जाता येत नाही. शेखकाकांना मला भेटल्यानंतर.. कदाचित त्याआधीही असेल, पण त्यांच्या परममित्राच्या आठवणींनी घेरलं होतं.
आठवणींचा खूप चांगला ठेवा त्यांनी त्यांच्या मनात जपला असणार. कारण दर दोन-तीन दिवसांनी त्यांचा मला फोन यायला लागला. ‘मी गेल्यानंतर माझ्या कुटुंबाकडे लक्ष ठेव. त्यांची वेळोवेळी चौकशी करत जा. त्यांना काय हवं, नको ते बघ.’ जणू काही आप्पा असं बजावून गेलेत, असे त्यांचे फोन यायला लागले. ‘काय, कसं काय, बरा आहेस ना? सहजच फोन केला. बरेच दिवस तुझा फोन नाही म्हणून तबियतपाणी विचारायला फोन केला.’ दोन-तीन दिवसांत असा काय माझ्या तब्येतीत फरक पडणार होता! दोन दिवसांनी फोन करूनही या किंवा अशा अर्थाच्या दोन-चार वाक्यांपुढे संभाषण जात नसे. ‘मी इतक्या वेळा फोन करतो. तुम्हाला डिस्टर्ब तर होत नाही ना?’ त्यांना याही गोष्टींची जाणीव होती. याचा अर्थ न राहवून आप्पांच्या मुलांना ते फोन करतात. कधीतरी ‘झरीना के लिए दुवा मांगना. तू पण स्वत:ची काळजी घे..’ असं काहीतरी एकदम मन हेलावून टाकणारी वाक्यं बोलायचे.
मला नेहमी वाटायचं की, यांना माझ्याशी काहीतरी मनातलं बोलायचं आहे. पण ते टाळतायत. काही प्रॉब्लेम असेल का त्यांचा? माझ्या भावालाही ते असाच फोन करत असत म्हणून त्याला काही माहिती आहे का, विचारलं. पण त्यालाही काही माहीत नव्हतं. पण आम्ही जरा त्यांची कौटुंबिक माहिती काढायचं ठरवलं. ‘तुम्हाला वेळ असेल तर भेटू या आपण कधीतरी..’ असं मी त्यांना अनेकदा म्हणायचो खरा; पण ‘हो, हो भेटू या की!’ यापलीकडे प्रत्यक्षात भेटणं सोडाच, पण या वाक्याच्या पुढे ही भेट कधी सरकली नाही. आणि एक दिवस अचानक तीन-चार महिन्यांनी पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांची गाठ पडली. यावेळी ते जरा टेन्शनमध्ये होते. झरीना लास्ट स्टेजला असल्याचं कळलं. त्यांना जरा या दु:खद वातावरणापासून दूर न्यावं म्हणून मी म्हणालो, ‘चला, जवळपास कुठं चांगलं हॉटेल असेल तर कॉफी घेऊ.’ तेही आनंदाने तयार झाले. मग त्यांना घेऊन मी जवळच्या बरिस्तांमध्ये गेलो. कुठूनतरी चर्चेला सुरुवात करावी म्हणून मीच त्यांना म्हणालो, ‘एवढे दिवस ठरवत होतो- शेवटी आज भेट झाली.’ कुठेतरी हरवल्यासारखे ते फक्त ‘हं’ एवढंच म्हणाले. आप्पांचा विषय काढल्याशिवाय खरं नाही. ‘तुमच्या सर्वाचे कुठल्या कुठल्या पाटर्य़ाचे फोटो सापडलेत मला. पुढच्या वेळी भेटलात की देईन.’ आता जरा त्यांचा चेहरा खुलला. ‘पुढच्या वेळेला कशाला? आजच दे तू मला. मी येतो आता घरी.’ फोटो बघायला ते खूप उतावीळ झाले होते. म्हणून मी त्यांना घरी घेऊन आलो. अल्बम त्यांच्या हातात दिले. घरात बऱ्यापैकी रिनोव्हेशन केलं होतं तरी पार्टीच्या वेळी ते कुठं बसायचे, आप्पा कुठं बसायचे, इतर मित्र कुठे बसायचे, आणि कसे आम्ही चिअर्स करायचो, वगैरे वर्णन त्यांनी सुरू केलं. अल्बमचं प्रत्येक पान उलटलं की त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येत असे. ‘गोल्डन डेज ऑफ माय लाइफ. आम्ही पार्टी करण्यासाठी कारणं शोधायचो. कितीही फालतू कारण असलं तरी पार्टी मात्र जोरदार असायची. कधी कधी काहीच कारण सापडत नाही म्हणूनही आम्ही पार्टी करायचो. कुणाचं प्रमोशन झालं तरी पार्टी. नाही झालं तरी पार्टी. कुणाची सासू आजारी पडली म्हणून पार्टी. बरी झाली म्हणून पार्टी. आमच्या एका मित्राचा पाय केळ्याच्या सालावरून घसरला आणि हात फॅ्रक्चर झाला म्हणून आम्ही पार्टी केली होती.’ फ्रॅक्चर झालेल्या हातानेच तो मित्र दारूचा ग्लास उचलून चीअर्स करत होता, हे त्यांनी पाण्याचा ग्लास उचलून त्याची नक्कल करून दाखवली. पिढी बदलली, पण विचार बदलले नाहीत. ते सांगत असलेले किस्से माझ्याही खूप जवळचे आहेत असं मला वाटायला लागलं. खूप वर्षांनी मला भेटल्यावर ते जेवढे खूश झाले नव्हते तेवढे ते त्या अल्बममध्ये फोटो बघून झाले होते. प्रत्येक फोटोत त्यांना शिरावंसं वाटत होतं आणि परत एकदा मोठय़ांदी ‘चीअर्स’ असं ओरडावंसं वाटत होतं. अल्बम सापडला म्हणून पार्टी करू या म्हणतायत का काय, असं मला वाटायला लागलं. ‘तुझी हरकत नसेल तर हा आप्पांचा आणि माझा चीअर्स करतानाचा फोटो मी घेऊन जातो.’ मी म्हणालो, ‘हे सगळे अल्बम घेऊन गेलात तरी हरकत नाही. तुमच्यासाठीच काढून ठेवलेत मी.’ पण त्यांनी फक्त त्यांना हवा असलेला फोटोच घेतला. आणि ‘काळजी घे, बाद में फोन
करता हूँ..’ अशी नेहमीची एक-दोन वाक्यं म्हणून निघून गेले.
पण बाद में काही त्यांचा फोन आला नाही. बाद मेंच काय, बरेच दिवस त्यांचा फोन आला नाही. मला आता त्यांचा फोन येण्याची सवय झाली होती. पण माझ्या लक्षात आलं, की झरीनाचं काहीतरी बरंवाईट झालं असेल. म्हणून मग मी त्यांना फोन केला नाही. त्यांनी जेव्हा जेव्हा मला फोन केला, किंवा जेव्हा जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी मला काहीतरी सांगायचं आहे असंच मला वाटत आलंय. एक दिवस ते कुठे राहतात, त्यांच्या घरी कोण कोण असतं, एकूणच कुटुंबात काय वातावरण आहे,
किंवा एकमेकांचे एकमेकांशी कसे संबंध आहेत, याची थोडी अजून तपशिलात जाऊन माहिती काढली आणि एक दिवस त्यांच्या घरी जायचं ठरवलं. काय प्रॉब्लेम असेल त्यांचा? मी विचार करायला लागलो. म्हातारपणात येणाऱ्या सर्वसाधारण प्रॉब्लेम्सचा विचार करून बघितला. मुलं नीट सांभाळ करत नसतील असं म्हटलं तर त्यांना दोन मुलीच होत्या. त्यातली तर एक डॉक्टर असून दुबईमध्ये एका हॉस्पिटलमध्ये सीनियर डॉक्टर म्हणून काम करत होती. म्हणून मग मुलीकडून काही करून घ्यायची इच्छा असेल का? हजला नेऊन आण, वगैरे. काही आर्थिक प्रॉब्लेम असावा म्हटलं तर दोनमजली बंगल्यात ते आणि त्यांचा भाऊ एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होते. घरात नोकरचाकर, गाडीघोडा सगळं होतं. बायकोही स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेणारी होती. या वयात ज्या आरामदायी आयुष्याची माणूस कल्पना करतो, ते सगळं त्यांच्याकडे होतं. पण तरीही शेखकाका अस्वस्थ होते. त्यांचा प्रॉब्लेम त्यांनी सांगितला नाही तरी तो आपण समजावून घेतला पाहिजे असं मला वाटायला लागलं. हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या वेळाच खरं तर आम्ही भेटलो होतो. पण त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आपुलकीने मन ओसंडून वाहत होतं. लहानपणी खाल्लेल्या त्या कॅडबऱ्यांचं ओझं उतरवण्याची वेळ आली होती.
अजून पंधरा दिवसांनी दिवाळी होती. म्हणजे दिवाळीचं निमित्त करून त्यांच्या घरी जाता येणं शक्य होतं. मग रीतसर दिवस ठरवून वेळ घेऊन त्यांच्या घरी जायचं ठरवलं. पण नक्की त्यांच्या घरी जायला किती वेळ लागेल, याचा अंदाज चुकल्यामुळे मी आणि माझी बायको जवळजवळ पाऊण तास लवकरच त्यांच्या घरी पोहोचलो. घरात कुणी माणूस कॅन्सरने आजारी असल्याची चिन्हं दिसत नव्हती. म्हणजे सगळ्यांनी तोंड पाडूनच बसायला पाहिजे असं नाही, पण सीरियस असं काही दिसत नव्हतं. दिवाळी म्हणून असेल कदाचित. काका जवळच कुठेतरी बाहेर गेल्याचं समजलं. प्राथमिक चौकशी झाल्यानंतर एक मोठा पॉज आला. मीच जरासं धाडस करून विचारलं, ‘कशी आहे झरीनाची तब्येत आता?’ कुणी काहीच उत्तर देईनात म्हणून मग हिंदीतून बोलायला सुरुवात केली. तरीही कुणी काहीच बोलेनात. तिथेच काम करत असलेल्या एका बाईने ‘असा काय मूर्खासारखा प्रश्न विचारतोय हा?’ या अर्थाचा लुक दिला. बोलताना काहीतरी हिंदीच्या व्याकरणात चूक झाली असेल म्हणून तेच वाक्य मी मनात परत एकदा म्हणून बघितलं. थोडं थांबून काकांच्या मिसेस म्हणाल्या, ‘झरीना तो ग्यारह साल पेहेलेही गुजर गयी. कॅन्सर की बिमारी थी उसे.’ ‘कायऽऽ?’ असा मोठ्ठा आवाज झाला माझ्या कानात. पायाखालची जमीनच सरकली. तसंच कसंतरी कसनुसं हसत आम्ही विषयाला बगल दिली. काकांना घरी यायला खूपच उशीर होत असल्याचं कारण काढून आम्ही तिथून काढता पाय घेतला. घरी येईपर्यंत मी आणि माझी बायको एक अवाक्षरही बोललो नाही. आम्हाला काही टोटलच लागेना. दुसरं कुठलंतरी नाव घेतलं नसेल ना काकांनी? त्यांना भेटून आता तीन-चार महिने होत आले होते. झरीनाचा उल्लेख त्यांनी अनेकदा केला होता. पण मग ही काय भानगड आहे? एक दिवस काकांचा फोन आला. आम्हाला भेटण्याची त्यांना इच्छा होती. झाल्या प्रकाराने आम्ही जरा घाबरलो होतो. तरीही मनाचा हिय्या करून आम्ही त्यांना एक दिवस वेळ काढून भेटलो. काय घडलं होतं, हे त्यांनाही माहीत झालं होतं. फारसे आढेवेढे न घेता त्यांनी मुद्दय़ालाच हात घातला. ‘आप्पांशी मी खूप वर्षांपूर्वी एक पैज लावली होती. त्याकाळी मी खूप सिगरेट ओढायचो. मला बघून आप्पा नेहमी म्हणायचे- ‘ही सवय चांगली नाही. एक दिवस कॅन्सर होऊन मरशील.’ मी म्हणायचो, ‘मी कुठलाही रोग न होता मरणार आप्पा. लावता का पैज हजार रुपयांची? मग एक दिवस आम्ही खरंच पैज लावली. आणि आज मी ही पैज हरलो. झरीना को हर वक्त मैं अपने अंदर महसूस कर सकता हूं. हे आप्पांना द्यायचे हजार रुपये मी तुम्हाला देतो. प्लीज, डू सम फेवर फॉर मी. आमच्या घरी अजून माहिती नाही. किसी को कुछ बोलना नहीं.’ इतक्या दिवसांनी त्यांच्या वागण्या-बोलण्याचे सगळे अर्थ मला उलगडत होते. हेच बहुधा त्यांना मला सांगायचं होतं. नेहमीप्रमाणे ‘काळजी घ्या’ असं म्हणून ते निघून गेले. माझ्या छातीचे ठोके जोरजोरात पडायला लागले. हातापायाला मुंग्या आल्या. आजूबाजूला काय चाललंय याचं भानच राहिलं नाही. सुन्नपणे बसून झरीनाला दुवा मागण्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नव्हतो.
nratna1212@gmail.com
अतूट
जुना मित्र म्हणून मी मागे वळून बघितलं, पण ओळख पटेना. कारण एवढा पण जुना माझा कुणी मित्र असणं शक्यच नव्हतं.
Written by निखिल रत्नपारखी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-04-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व गाजराची तुतारी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abiding relation with uncle sheikh