‘‘एऽऽऽ धनंजय’ अशी हाक मारून हा धन्या मागे वळून बघणं शक्यच नाहीये,’ असं मी सुबोधला म्हणालो. ‘आता बघ मी हाक मारतो..’ असं म्हणून मी ‘ए ऽऽऽ धन्याऽऽऽ’ असं म्हणताक्षणी त्याने नुसतं मागे वळून बघितलंच नाही, तर दोन घटका गप्पा माराव्यात म्हणून आमच्या जवळदेखील आला. गेले आठ-दहा महिने हा आमचा गुणी मित्र नेहमीसारखा वागत नव्हता. एका उच्चभ्रू मल्टिनॅशनल कंपनीत मोठय़ा पदावर कामाला असूनही तो रोज घरी आला की संध्याकाळी बिल्डिंगच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी यायचा. इंजिनीअरिंगची पदवी मिळवून काही वर्षे परदेशात नोकरी करूनही ‘अ’ ते ‘ज्ञ’पर्यंत शिव्या त्याला मुखोद्गत होत्या. त्या परिणामकारकरीत्या देता येण्यासाठी तल्लख बुद्धीची जिभेला पूर्ण साथ होती. आपण एका उच्चभ्रू सोसायटीत राहतो, आपले आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत, आपल्याच बिल्डिंगच्या खाली उभे राहून आपण तोंड वारेमाप सोडलं आहे, वगैरे भ्याड विचार त्याच्या मनाला अजिबात शिवत नसत. योग्य परिणाम साधण्यासाठी शिव्या या भाषेला मिळालेलं वरदान आहेत असं त्याचं प्रामाणिक मत होतं. क्रिकेटशिवाय नाक्यावर भंकस करत उभे राहणं, एकत्र पोहायला जाणं, विनाकारण इकडे-तिकडे उंडारणं.. साध्या भाषेत ज्याला टपोरीगिरी असं म्हणतात, तसल्या उपक्रमांतसुद्धा तो हिरीरीने भाग घेत असे. संध्याकाळी क्रिकेट खेळून झालं की रोज त्याची एक अतिसुंदर मैत्रीण त्याला भेटायला येत असे. मग सोसायटीतल्या एका बेंचवर बसून ते दोघं एक-दीड तास गप्पा मारत असत आणि मगच तो घरी जात असे. असा साधारणत: रोजचा कार्यक्रम असे. दारू पाटर्य़ामध्ये तर धन्या विशेष बहार आणत असे.
अशा या आमच्या गुणी मित्राचं काहीतरी बिनसलं होतं. गेल्या आठ-दहा महिन्यांत हाताच्या बोटावर मोजता येईल एवढय़ा वेळाच तो आम्हाला दिसला होता. भेटून गप्पा मारणं वगैरे इतिहासजमा झालं होतं. ‘अरे, काय धन्या! काय चाललंय तुझं? कुठे असतोस आजकाल?’ यातल्या कुठल्याच प्रश्नांची धड उत्तरं न देता थोडय़ाच वेळात तो निघून गेला. जाता जाता पुढच्या आठवडय़ात सोसायटीत होणाऱ्या भेळ आणि आईस्क्रीम पार्टीला येण्याचं तेवढं त्याने कबूल केलं. त्याची मैत्रीणही गेल्या सहा महिन्यांत सोसायटीत फिरकली नव्हती. त्यांच्या त्या सोसायटीतल्या बेंचवर कबुतरं आणि इतर पक्ष्यांनी जे डंपिंग ग्राऊंड केलं होतं त्यावरून ते उघडच होतं. झालं असेल ब्रेकअप. पण एवढय़ा छान मुलीशी? झाले असतील वैचारिक मतभेद. असो. आपण कशाला उगाच नसत्या भानगडीत नाक खूपसा!
अधेमधे कधीही कुणालाही न दिसता तो आठ दिवसांनी सोसायटीतल्या पार्टीला आला. पुन्हा त्याच सर्व प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ‘सर्व पाश तोडायचे ठरवले आहेत मी..’ असं स्वच्छ मोठय़ांदी एकदाचं तो बोलला. ‘का? कुठे हिमालयात गुहाबिहा बघितली आहेस की काय? समाधी वगैरे घेणार आहेस वाटतं?’ मोठय़ांदी हशा! ‘नाही.. देश सोडून जाणार आहे मी.. कायमचा.’ तो जे बोलला त्यावर आपापल्या परीने सर्वजण प्रतिक्रिया देत होते. ठसका, उचकी, खाकरणं. याशिवाय काहींना आपलं डोकं कुणीतरी दाणकन् भिंतीवर आपटल्याचासुद्धा भास झाला. आम्हा काही चतुर मित्रांना लक्षात आलं, की आता ही पार्टी फक्त भेळ आणि आईस्क्रीम इथवर मर्यादित राहू शकणार नव्हती. ‘बियर, रम, व्होडका..’ अशी खुसपूस सुरू झाली आणि काही जणांनी धन्या ७७७ ला घेऊन सुमडीत गच्चीवर कल्टी मारली. दोन-तीन पेग डाऊन झाल्यावर सगळे स्थिरावले. ‘काय म्हणालास तू मगाशी? देश सोडून जाणार आहेस.. कायमचा?’ यावर तो ज्या प्रकारे ‘हो’ म्हणाला त्यात बऱ्यापैकी घृणा, चीड, तिरस्कार ठासून भरला होता. पण कुणाबद्दल? कशासाठी? काय झालंय काय असं? आणि धन्या उवाच : ‘काय आहे काय इथे? कशाला राहू मी इथे? बेशिस्ती, अजागळपणा आणि निष्काळजीपणा ठासून भरलाय सर्वत्र. भगवान भरोसे चाललाय हा देश. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. पदोपदी अंदाधुंद भ्रष्टाचार आणि वाढणारी असुरक्षितता. कायदा आणि सुव्यवस्थेचे असे तीन-तेरा वाजलेत ना, की समाजव्यवस्थेच्या गलथानपणामुळे जर कुणाचा हकनाक जीव गेला तरी कुणालाही आणि कुठेही जाब विचारण्याची सोय नाही.’
हे वेगळंच रूप बघत होतो आम्ही धन्याचं. काही महिन्यांपूर्वी धन्याचा एक जवळचा मित्र अचानक गेला होता. कुठल्याशा मिरवणुकीमुळे का कुठल्यातरी फेस्टिव्हलमुळे विनाकारण ट्रॅफिक जाम होऊन अॅम्ब्युलन्स वेळेत हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकली नाही म्हणून त्याचा अॅम्ब्युलन्समध्येच मृत्यू झाला होता. या अशा बेशिस्त कारभारामुळे घडलेली ही धन्याच्या आयुष्यातली तिसरी केस होती म्हणे. पण आता मात्र त्याने आपला निर्णय पक्का केला होता. धन्या थोडा शांत झाला होता. आता तो विचार करून बोलतोय असं आम्हाला वाटत होतं. ‘माझा जीव गुदमरून जातो इथे. पावलागणिक मूर्ख आणि बेअक्कल लोकांचा बाजार भरलाय सर्वत्र असं वाटतं. कुठल्याच बाबतीत समाधान नाहीये या गलिच्छ वातावरणात. अगदी रोजची साधी गोष्ट घे. मी घरातून ऑफिसला जाऊन परत येईपर्यंतच्या काळात कितीतरी गलथान कारभाराला मला तोंड द्यायला लागतं. माझा रोजचा हा संताप वाढत जाऊन एक दिवस मला हार्टअॅटॅक येणार आहे. पहिल्यांदी मी कारमधून जात असे. बऱ्याचदा माझी इच्छा नसूनसुद्धा मला सिग्नल तोडायला भाग पाडलं जायचं. मागून एवढय़ा मोठय़ांदी हॉर्न आणि शिव्याशाप द्यायची लोकं- की माझा नाइलाज व्हायचा. परदेशात हॉर्न वाजवणं याचा अर्थ शिवी देण्यासारखा आहे. लोक गाडीबाहेर थुंकतात काय.. कचरा काय फेकतात. गोळ्या घालून ठार मारावं असं खरं तर हे कृत्य आहे. मग एक दिवस मी ठरवलं- आपण लोकल ट्रेनमधून प्रवास करायचा. त्या वाढत्या गर्दीत एकदा लोकलमधून खाली पडून मरता मरता वाचलो. एवढं क्षुद्र मरण आपल्याला यावं यासाठी स्वत:ला आपण एवढं सर्वोत्तम घडवलेलं नाही याची जाणीव झाली. मग टॅक्सी आणि रिक्षाचा पर्याय वापरून बघितला. पण त्यांचा उर्मटपणा आणि मर्जीप्रमाणे मला वागणं जमेना. मग परत नाइलाजाने कार सुरू केली. पण जेव्हापासून मी कारमधून उतरून रस्त्यावरून चालत असे तेव्हा मला रोज असा प्रश्न पडत असे की, मी स्वच्छतेचा टॅक्स का भरतो? जिकडे तिकडे घाण, अस्वच्छता शिगोशिग भरून राहिली आहे. म्हणजे सरकारी सूत्रांची ही अजून एक खिसेभरू भ्रष्टाचारी योजना आहे की काय? किंवा कुठल्याच गोष्टींचा मला योग्य उपभोग या देशात मिळणार नसेल तर मी कुठलाही टॅक्स का भरू? एक साधं उदाहरण घ्या. करोडो रुपये रोड टॅक्स सरकारी तिजोरीत जमा होत असेल. पण दरवर्षी मी आपला माझ्या जीवावर उठलेल्या खड्डय़ांना तोंड देतोच आहे. पुन:पुन्हा शेकडो कोटी रुपयांचा रस्तादुरुस्तीचा उघड उघड भ्रष्टाचार होतोय, तर मग या देशाला जीवघेण्या खड्डय़ात घालणाऱ्या या सरकारी सूत्रांना देशद्रोहाच्या कायद्याखाली कडक शिक्षा करायला नको का? या अशा रस्त्यांमुळे मूठभर लोकांचे पैसे खाऊन भलं होत असेलही; पण वाहतूक कोंडीमुळे मानसिक ताण येऊन करोडो लोकांच्या शरीराचं, वेळेचं- पर्यायाने त्यांच्या उद्योगधंद्याचं, पर्यायाने देशाचं भयंकर नुकसान होत आहे. पण निर्लज्जपणे या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय जनतेच्या वाटय़ाला काहीच येत नाहीये. यात ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी सगळी सारवासारव चाललेली आहे. इथे कुणापाशी दाद मागायची?
‘आपल्या देशात श्रीमंतांसाठी वेगळे कायदे, गरीब लोकांसाठी वेगळे कायदे आहेत. ठरावीक धर्मासाठी वेगळे कायदे. जातीजमातींसाठी वेगळे कायदे. जर भारत देशाची जमीन एकच आहे तर सर्व धर्म आणि जातीजमातींसाठी भारतीय म्हणून एकच कायदा का नसावा? गाडीखाली लोकांना चिरडून ठार मारणारे लोक अगदी सहज पैशाच्या बळावर कायदा विकत घेऊ शकतात. आणि अगदी निर्भयपणे उजळ माथ्याने या देशात फिरू शकतात. याबद्दल कुणालाही कसलीही शरम वाटत नाही. हे आहेत का अच्छे दिन? आरक्षणासंदर्भातले कायदे म्हणजे तर मोठा विनोदच आहे या देशात. ज्यांचा बुद्धय़ांक सुमार दर्जाचा आहे त्यांना इंजिनीअरिंग किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये मेरिटवर नाही, तर त्यांच्याकडे केवळ प्रचंड पैसा आहे म्हणून किंवा आरक्षणाच्या कायद्यानुसार कसा काय प्रवेश मिळू शकतो? कॉमन सेन्स आहे हा, की हे असे इंजिनीअर आणि डॉक्टर तयार होऊन भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काय करणार या देशात? अर्थात भ्रष्टाचार करून काय करणं शक्य नाहीये या इथे? वाट्टेल ते करू शकता तुम्ही.’
‘हळूहळू सुधारणा होतीये. असा एकदम कसा चांगला बदल घडणार?’ कुणीतरी आमच्यापैकी पुसटसं उद्गारलं. ‘का? एकदम वाईट बदल कसा घडतो तसा. आता हळूहळू नाही, तर एका फटक्यात मोठा बदल घडवण्याची गरज आहे. हिटलरने पहिल्या महायुद्धानंतर बलाढय़ जर्मनी जसा उभा केला त्याच पद्धतीची काहीतरी मोठी राज्यक्रांती घडण्याची गरज आहे. लोकांची व्होट बँक मिळवण्यासाठी जर हा सगळा ऱ्हास घडत असेल तर मग ही व्होट बँकेची संकल्पनाच नष्ट करण्याची कसून तयारी करायला पाहिजे. आता या देशाला एकाधिकारशहाची गरज आहे; जो हिटलरप्रमाणे कडवा देशभक्त असायला हवा. ‘साम’ला तर देशवासी कोळून प्यायलेत. ‘दाम’ भरून नवीन गुन्हे करणं शक्य आहे. ‘भेद’ ही प्रथा तर आपल्याला इंग्रजांनीच घालून दिलेली आहे; जी नुकसानकारक म्हणून सिद्ध झाली आहे. राहता राहिला ‘दंड’! त्याचा अजून म्हणावा तसा वापर इथे झालेला नाहीये. कठोर अनुशासन, शिस्तबद्ध कायदा आणि सुव्यवस्था नुसतीच असण्याची गरज नाहीए; तर तो तेवढय़ाच कठोरपणे अमलात आणायची इथे गरज आहे. सिंगापूरसारख्या देशात साध्या साध्या गुन्ह्यसाठी केनिंग पनिशमेंट (म्हणजे बांबूचे फटके मारण्याची शिक्षा) आहे. ती शिक्षा एवढी कडक आहे! समजा, तुम्हाला पंधरा बांबूच्या फटक्यांची शिक्षा मिळाली असेल आणि दहा फटक्यातच तुम्ही बेशुद्ध पडलात, तर सरकारी खर्चाने तुमच्यावर उपचार करून तुम्हाला उरलेल्या पाच फटक्यांची शिक्षा पूर्ण करायलाच लागते. कसा आपला देश सहिष्णु आहे, किंवा नुसतं लोकसंख्येचं कारण देऊन पळवाट कसली काढता? कडक अनुशासन असेल तर शिस्त ही गोष्ट दहा जणांनाही लावता येते आणि दहा हजार जणांनाही.
‘भारताने मंगळावर यान सोडलं याला जर तुम्ही सुधारणा म्हणत असाल तर त्या सुधारणेचा तुमच्या देशातल्या सामान्य लोकांना काय उपयोग? पहिल्या वेळेस एवढय़ा कमी खर्चात हे यश भारताला मिळाल्याबद्दल जगभर भारताचं कौतुक झालं. ही बातमी सर्व वर्तमानपत्रांतून खर्चाच्या आकडेवारीसह पहिल्या पानावर झळकली. पण त्याच वर्तमानपत्रांत आतल्याच पानावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा गेल्या काही वर्षांतला आकडाही प्रसिद्ध झाला होता. हा विरोधाभास मला अस्वस्थ करतो. आत्महत्येचा आकडा आज लाखांच्या घरामध्ये आहे. माझा देश शेतीप्रधान देश आहे असं शिकलो मी शाळेत. ज्या देशाची ओळख शेतीप्रधान अशी आहे, त्याच देशातले शेतकरी कोणत्याही कारणाकरता आत्महत्या करत असतील तर यासारखी मान खाली घालायला लावणारी गोष्ट दुसरी नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न हा आपल्यासाठी मंगळावर यान सोडण्यापेक्षाही आज जास्त महत्त्वाचा असायला पाहिजे.’
आम्ही सर्वजण खाली मान घालून हे सगळं ऐकत होतो. अजून बरंच काही धन्याच्या मनात साठलं होतं. त्याला मार्ग मोकळा करून देण्याशिवाय पर्याय नव्हता. धन्या पुढे बोलायला लागला.. (पूर्वार्ध)
निखिल रत्नपारखी nratna1212@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा