जगभरातल्या सर्व स्त्रीवर्गाची माफी मागूनच मी हा लेख लिहितो आहे. कारण जी गोष्ट त्या सर्वोत्तम करतात असं त्यांना वाटतं, त्यातल्या एका गोष्टीविषयी मी थोडंसं तिरकस बोलणार आहे. बायकांच्या वाहन चालवण्याचे किस्से किती जगप्रसिद्ध आहेत हे मी वेगळं सांगायला नको. अर्थात अपवाद असतीलही; पण माझे याबाबतीतले अनुभव फारच भयंकर व करमणूकप्रधान आहेत. विशेषत: गाडी पार्क करणे, यू-टर्न घेणे, गाडी रिव्हर्स घेणे, हॅण्डब्रेक काढायला विसरणे- या क्रिया आणि त्याचे होणारे परिणाम खास मनोरंजन करतात. यू-टय़ूबवरचे बायकांनी चारचाकी चालवण्यासंबंधीचे व्हिडीओज् बघून माझी बऱ्याचदा हसून हसून पुरती वाट लागली आहे. बायकोसमोर असे व्हिडीओज् बघून मनमुराद हसायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. डोळ्यात हसू व मनात भीती ही अवस्था शब्दात वर्णन करता येण्यासारखी नाही. ते व्हिडीओ बघताना हसू येत नाहीये हे दाखवण्यासाठी ज्या क्लृप्त्या कराव्या लागतात त्या वापरून मला बऱ्यापैकी भ्रष्ट, धूर्त व चलाख नेता सहज होता येईल.
कुठलंही वाहन आणि बहुतांश बायकांचं नातं कम्पास व पेन्सिलसारखं असतं. वर्तुळाकार काढायचा म्हणून कम्पासमध्ये पेन्सिल अडकवून आपण सुरुवात करतो. पण पुढे काय होतं कळत नाही. वर्तुळाऐवजी कुठल्या तरी देशाचा नकाशाच तयार होतो. तसंच काहीसं बऱ्याच बायकांचं होत असावं. कारण वाहन रस्त्यावरून शक्यतो डाव्या बाजूने चालवणे, डाव्या किंवा उजव्या बाजूने वळताना इंडिकेटर दाखवणे आणि मुख्य म्हणजे आपल्याशिवाय इतरही लोक रस्त्यावर गाडय़ा चालवत असतात याचं भान ठेवणं, यांसारख्या गोष्टींचा स्त्री-वाहनचालकांना बऱ्याचदा विसर पडतो. दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट. एक उच्चभ्रू बाई आपल्या कारमधून चालल्या होत्या. अचानक काहीही कारण नसताना गाडीचा ब्रेक दाबून रस्त्याच्या मधोमध त्या थांबल्या आणि बराच वेळ तशाच थांबून राहिल्या. ट्रॅफिक जाम झाला. एका युवकाने महत्प्रयासाने त्याची बाईक पुढे काढली आणि त्या बाईंशी तो मोठमोठय़ाने भांडण करायला लागला. खरं तर भर रस्त्यात कारने दगा दिलेल्या त्या स्त्रीबद्दल त्याला सहानुभूती वाटायला हवी होती. दोन-चार हात मदतीस पुढे सरसावायला हवे होते. पण हा प्रकार वेगळाच होता. नक्की काय घडलं होतं, हे कळल्यावर मात्र मला त्या युवकाबद्दल आदरच वाटायला लागला. बाई भर रहदारीच्या रस्त्यावर गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून आरामात मोबाइलवर बोलत होत्या. बाईंचा मोबाइल आणि कार हिसकावून रस्त्याकडेला नेऊन रॉकेल टाकून पेटवावी असं माझ्या मनात येत होतं. परंतु त्या धक्क्यातून सावरत ‘लायसन्स जप्त करायला पाहिजे अशा लोकांचं!’ एवढंच अतिशय भोंगळवाणं विधान मी करू शकलो. अर्थात रस्त्यात मोबाइलवर बोलत गाडी चालवताना किंवा रस्त्याच्या मधोमध बाईक थांबवून आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे मोबाइलवर बोलणारे महाभाग बऱ्याचदा बघायला मिळतात. परंतु तसं ते मुद्दामच करतात. ‘मी अशिक्षित, बेअकली गुंड आहे. बघू, मला कोण काय करतंय ते!’ असा त्यांचा आविर्भाव असतो. परंतु आजूबाजूचं भान हरवून असं कृत्य करायचं तर बाईचंच काळीज हवं.
गाडीला चार चाकं असूनही कधीही तोल जाऊन आपण खाली पडू अशी भीती मनात धरूनच त्या स्टेअरिंग घट्ट पकडून गाडी शिकायला बसतात. मी ज्या ड्रायव्हिंग क्लासमध्ये गाडी शिकलो तिथे एक बाई गाडी चालवताना समोरचं बॉनेट दिसायला पाहिजे म्हणून घरून एक उशी घेऊन येत. पहिल्या दिवशी त्या बाई त्यांचं कुत्रं घेऊन गाडी शिकायला आल्या आणि हेही माझ्याबरोबर गाडीत बसेल असा आग्रह धरू लागल्या. त्यांच्याशिवाय इतरही लोक गाडी शिकायला आले आहेत. ते पण गाडीत बसणार. त्यांच्याबरोबर हे कुत्रं गाडीत बसवून घ्यायला कुणीही तयार होणार नाही, असं म्हटल्यावर तिने त्या कुत्र्यासाठी स्पेशल बॅच घेतली म्हणे. म्हणजे ती, ते कुत्रं आणि ट्रेनर एवढेच त्या गाडीत असत. मधेच कुत्रं घाबरल्यासारखं भुंकायचं. गाडीतल्या गाडीत उडय़ा मारायचं. त्यामुळे ट्रेनरचं लक्ष कुत्र्याच्या करामतींकडेच असायचं. परिणामी पहिल्या वेळेस त्या बाई गाडी नीट शिकू शकल्या नाहीत असं त्या बाईंनी जगजाहीर केलं. ट्रेनरच्या मते, गाडी शिकण्यापेक्षा गाडीचा हॉर्न वाजवून कुत्र्याचं मनोरंजन करण्यात बाईंचं जास्त लक्ष होतं. त्यांनी दुसऱ्यांदा परत क्लास लावला. मात्र यावेळी त्यांच्यापेक्षा झकपक ड्रेस व भडक लिपस्टिकवाल्या मिसेस सातभाईंकडेच ट्रेनरचं जास्त लक्ष असल्याने त्यांचा गाडी शिकण्यातला मूडच गेला. ट्रेनरच्या मते, त्या बाई अनेकदा सांगूनही इतकी स्लो गाडी चालवत, की दोनदा बैलगाडीसुद्धा त्यांना ओव्हरटेक करून गेली होती. आता माझ्या बॅचला तिसऱ्यांदा त्या क्लासला येत होत्या. एक मात्र खरं, की त्या गाडी शिकत असताना इतरांची करमणूक होत असे. कधी त्या गाडीचा अचानक ब्रेक दाबत. कारण त्यांना समोरून येणारी बस दिसत असे. ती बस एवढी लांब असे, की ती जवळ येईतो बाकीच्या सर्वाची गाडी शिकून झाली असती. त्या सीटवर उशी घेऊन बसत असल्याने खालपर्यंत त्यांचे पायच पोचत नसत. त्यामुळे आपण क्लच दाबतोय की ब्रेक की अ‍ॅक्सिलरेटर, हे त्यांना कळत नसे. या तिन्ही क्रियेत त्या एवढा घोळ घालत! ट्रेनरने ब्रेक दाबायला सांगितलं की त्या अ‍ॅक्सिलरेटर दाबत. इंडिकेटर दाखवण्याऐवजी विंडशिल्डवर पाण्याचा स्प्रे उडवत. एखादा खड्डा चुकवायला सांगितला की बाई हमखास खड्डय़ातच गाडी घालत. एखाद्याचं रक्त आटवणे म्हणजे काय, हे चढावर त्यांना गाडी शिकवणाऱ्या बिचाऱ्या ट्रेनरकडे बघून आम्हाला कळायचं.
त्यांच्या नवऱ्याने त्यांना आधीच गाडी घेऊन दिली होती. त्यामुळे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये त्या रोज गाडी चालवायची प्रॅक्टिस करत. त्यावर ट्रेनरचं मत ‘या बाईंना ढकलगाडी जरी चालवायला दिली तरी या कुठेतरी धडकतील!’ असं होतं. शेवटी बॅचमधील सर्वाना लायसन्स मिळून ते गाडी चालवायला लागलेसुद्धा. या बाई मात्र पुन्हा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये पैसे भरण्याची तयारी करत होत्या.
गाडी शिकल्यानंतर त्यापुढची पायरी लायसन्स मिळण्याची. त्यासाठी आरटीओ इन्स्पेक्टरसमोर गाडी चालवून दाखवावी लागते. एक दिवस सकाळीच एक बाई आपल्या कन्येला घेऊन आरटीओत आली होती. गाडी नीट चालवण्याविषयी ती आपल्या मुलीला टिप्स देत होती. तिचे लायसन्स मिळवण्याचे आधीचे प्रयत्न फसले असावेत. कारण आई जाम वैतागून तिच्याशी बोलत होती. आरटीओ इन्स्पेक्टरच्या सांगण्यावरून त्या मुलीने वाहन हातात घेतलं. मुलीने स्टेअरिंगला तसेच खाली वाकून क्लच-ब्रेकला नमस्कार करून पहिला गिअर टाकला आणि गाडी पुढे जाण्याऐवजी चक्क मागेच गेली. आरटीओ इन्स्पेक्टर हातातलं सगळं बाजूला ठेवून हाताची घडी घालून उभा राहिला. त्याने मानेनंच पुन्हा इशारा केला. परत एकदा तिने पहिला गिअर टाकला. गाडी एकदम आरटीओ इन्स्पेक्टरच्या अंगावरच घातली. अचानक सार्वत्रिक डोळे विस्फारले गेले आणि मोठाच हशा पिकला. तिच्या आईचा चेहरा कुठून या मुलीला जन्म दिला, असा झाला होता. पुढे दिवसभर ‘अजून एखादी संधी देऊन तर बघा. तुम्ही समजता तेवढी वाईट नाही माझी मुलगी!’ अशी विनंती करत ती स्त्री आरटीओ इन्स्पेक्टरची समजूत घालत होती. मुलगी मात्र कुणीतरी गेल्यासारखं हमसून हमसून रडत होती.
लायसन्स मिळाल्यानंतरची पायरी म्हणजे प्रत्यक्ष रस्त्यावर गाडी चालवणे. एक दिवस माझी एक जवळची मैत्रीण नवंकोरं लायसन्स नाचवत माझ्याकडे आली. म्हटलं, लायसन्स मिळालं ठीक आहे, परंतु गाडी किती चालवता येते, ते बघू बरं. म्हणून मग माझ्या गाडीवर प्रयोग करायचं ठरवलं. आम्ही दोघं गाडीत बसलो. ती ड्रायव्हर सीटवर मोठय़ा रुबाबात बसली. तरी ‘तू मला सांगितलंच नाहीस’ असं नंतर तिने म्हणायला नको म्हणून ‘हे बघ, पहिल्यांदा मागचा आरसा अ‍ॅडजस्ट करायचा..’ असं काहीतरी मी बोलायला गेलो. पण यावर ‘एऽ कुणाला सांगतोयस तू?’अशा अर्थाचा लुक तिने दिल्यावर मी चूप झालो. तिने स्टार्टर मारून गाडी सुरू केली. डावीकडचा इंडिकेटर सुरू केला. पण इंडिकेटर सुरू न होता समोरच्या काचेवर एकदम पाणीच आलं. तिच्याकडून पहिलं ‘सॉरी’ आलं. मग गिअर टाकायचे प्रयत्न सुरू झाले. पण पहिला गिअर पडायलाच घडाभर रक्त आटणार अशी चिन्हं दिसू लागली. शेवटी मी म्हणालो, ‘अगं, क्लच दाबल्याशिवाय गिअर कसा पडणार?’ तिच्याकडून दुसरं ‘सॉरी’ आलं. मग ‘आता तू काही सांगू नकोस. मला माहितीये काय करायचं,’ अशी तंबी मलाच देऊन सगळं परत सुरू झालं. या वेळेला कसं माहीत नाही, पण सगळं व्यवस्थित पार पडलं. मात्र गाडी पुढं जायलाच तयार नाही! यावर ‘कसली बंडल गाडी आहे तुझी!’ वगैरे सबबी सुरू झाल्या. मी काहीच न बोलता हॅण्डब्रेक काढला. तिच्याकडून आपसूकच तिसरं ‘सॉरी’ आलं. गाडी पुढे सरकली. निसरडय़ा जमिनीवरून आपण जसे तोल सांभाळत चालतो तशी चार चाकं असूनही गाडी पुढे सरकत होती. प्रत्येक वळणावर तिच्याकडमून ‘सॉरी’ येत होतं. काही अंतर गेल्यावर मी म्हणालो, ‘चल, आता परत जाऊ.’ ती म्हणाली, ‘यू टर्न नाही घेता येत मला अजून.’ त्यामुळे पाच मिनिटांवर असलेल्या माझ्या घरी पोहोचायला वीस मिनिटं लागली. घरी पोहोचल्यावर ‘तुझी गाडी आहे, तूच पार्क कर’ असं म्हणत रस्त्यातच गाडी सोडून ती निघून गेली. ‘आयडेंटिटी प्रूफम्हणूनसुद्धा तुझं लायसन्स तू कुणालाही दाखवू नकोस. त्या लायसेन्सचे दोन तुकडे केलेस तर भेळेचे चमचे म्हणून छान उपयोग होईल त्याचा!’ असं मी तिला म्हणालो. त्यावर दुसऱ्याच कुणाची तरी मी चेष्टा केल्याप्रमाणे ती मोठय़ाने हसली आणि ‘कुणी शेजारी बसलेलं असलं ना की माझा जरा गोंधळ होतो!’ अशी सबब तिने दिली. ही काय सबब होती, याचा मी आजपर्यंत विचार करतो आहे, पण मला उत्तर मिळालेलं नाही.
मी आता अशी प्रार्थना करतो की, बायका गाडी चालवायला घराबाहेर पडल्या आहेत. टॅक्सी-बस-रिक्षांचा संप आहे. भारत-पाकिस्तानची वर्ल्ड कप फायनल मॅच असल्याने रस्ते ओस पडले आहेत. इतके, की रस्त्याकडेला कुणी गाडय़ाही पार्क केलेल्या नाहीत. सर्व सिग्नल ग्रीन आहेत. लख्ख सूर्यप्रकाश आहे. रस्त्यावर एकही खड्डा नाही. स्पीडब्रेकरही त्या दिवसापुरते हटवले आहेत. आणि निदान त्या दिवशी तरी वाहतुकीचे कुठलेही नियम पाळणं बंधनकारक नाहीये. असा दिवस कधी येईल का? सांग सांग भोलानाथ.. असा स्वच्छंदी दिवस कधी येईल का?
निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Story img Loader