लहानपणापासून विष्ण्याला म्हातारीने सांभाळलं होतं. न केलेल्या गुन्ह्य़ासाठी तुरुंगवास भोगून आलेल्या कैद्याला जेवढं हायसं वाटेल, तसंच खरं तर विष्ण्याला वाटत होतं. पण आज्जीचं शेवटचं दर्शन होईपर्यंत विष्ण्या रडत होता. काही म्हणा म्हातारीच्या मयतीला गर्दीही बऱ्यापैकी होती. आज्जींनी त्यांच्या आयुष्यात अनेक चांगली र्कम केल्याचा तो पुरावा होता.
याउलट, शऱ्याची आजी! आम्ही एका रात्री माझ्या या मित्राच्या- शऱ्याच्या घरी त्याचे आई-वडील गावी गेलेले असल्यामुळे आणि शऱ्या घरी एकटाच असल्यामुळे त्याला सोबत म्हणून जमलो होतो. आता एकत्र जमलोच आहोत आणि घरात कुणीच नाही, तर दारूपार्टी होऊन जाऊ दे असं ठरलं. मी एकटाच पिणार नव्हतो. शऱ्या धरून बाकी दोघे असे तिघेजण अट्टल पिणारे होते. यथेच्छ पिऊन झाल्यावर सगळेजण मद्यधुंद अवस्थेत झोपी जातच होते आणि फोन वाजला. शऱ्याची आजी आटपल्याचा फोन आला होता. म्हातारीचं मरणसुद्धा अनपेक्षितपणे आल्यासारखं वाटायला लागलं. शऱ्या टाइट असल्यामुळे आता पुढच्या बहुतेक जबाबदाऱ्या माझ्याच गळ्यात पडणार असल्याची चिन्हं दिसायला लागली. शऱ्याच्या आई-वडिलांना फोन करण्यापासून या कार्यास सुरुवात झाली. बाकी दोघांना प्रसंगाचं गांभीर्य काही केल्या लक्षात येईना. त्यामुळे शऱ्याची गाडी चालवत त्याला त्याच्या आजीकडे- म्हणजेच तिच्या घरी न्यायची जबाबदारी नाइलाजाने माझ्यावरच पडली. रात्री दोन वाजता आम्ही निघालो. आजीच्या घरी पोहोचलो तेव्हा जेमतेम दोघं-तिघंच घटनास्थळी उपस्थित होते. त्यातले दोनजण वयोवृद्ध आणि तिसरा शऱ्यापेक्षा जरा बऱ्या अवस्थेत, पण झोकांडय़ा खात उभा होता. तरी त्यातल्या एकाने मोठय़ा हिरीरीने तिरडी बांधण्याची जबाबदारी स्वीकारली आणि कॉपरेरेशनचा पास, फुलं व इतर मयतीचं सामान आणण्याची जबाबदारी शऱ्यावर- अर्थातच माझ्यावर पडली.
वास्तविक या मयतीशी माझा काहीही संबंध नव्हता. निष्कारण ध्यानीमनी नसताना माझ्या नकळत नियतीने पसरलेल्या जाळ्यात मी अडकत चाललो होतो. ही म्हातारी काळी का गोरी हेसुद्धा मी आत्ताच बघत होतो. आणि तिच्यासाठी मी मयतीचं सामान आणि कॉपरेरेशनाचा पास कुठं मिळेल, हे शोधत रात्री तीन वाजता या बेवडय़ाला घेऊन पुण्याच्या रस्त्यावरून फिरत होतो. शत्रूवरसुद्धा अशी वेळ येऊ नये खरं तर. शेवटी सगळं सामान घेऊन आम्ही परत घटनास्थळी पोहोचलो. अजून चार-पाच माणसं जमा झाली होती. त्यात दोन स्त्रियासुद्धा होत्या. पण एकाच्याही डोळ्यात पाण्याचा टिपूससुद्धा नव्हता. ही काय भानगड होती, मला कळेना. आम्ही येईपर्यंत तिरडीचं सामान घरात येऊन पडलं होतं. पण कुणीही ती बांधायला घेतली नव्हती. कसं कुणास ठाऊक, ती बांधायचं कामपण माझ्याच गळ्यात येऊन पडलं. शऱ्याने झोकांडय़ा खात थोडेफार प्रयत्न केले, पण कचराकुंडीसारखा तिरडीचा आकार दिसायला लागल्यावर त्याने प्रयत्न सोडून दिले. घाईघाईत लेंग्याची नाडीपण शऱ्याने नीट बांधली नव्हती, तिथं तो तिरडी काय बांधणार होता? म्हातारीच्या मागच्या जन्मातला कोणीतरी देणेकरी असल्यासारखा मी निमूटपणे लष्करच्या भाकऱ्या भाजत होतो. सर्वजण शऱ्याच्या आई-वडिलांची वाट बघत होते.
त्या मधल्या काळात ती म्हातारी शऱ्याच्या वडिलांची सावत्रआई असून सर्वाशी आयुष्यभर तुसडय़ासारखी वागत आली होती, ही अत्यंत उपयोगी माहिती मला मिळाली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या वागण्या-बोलण्याचे अर्थ चटकन् माझ्या लक्षात आले. मग तर मी आत्तापर्यंत केलेल्या कष्टांकरता अजूनच दु:खी आणि कष्टी झालो. कारण काहीही असो, तिथे असलेल्या सगळ्यांमध्ये मीच सर्वात जास्त दु:खी दिसत होतो. याचा अर्थ तिथल्या लोकांनी जाणूनबाजून मला त्या कामाला जुंपलं होतं. जेणेकरून कधीतरी म्हातारीने त्यांच्याबाबतीत केलेल्या दुष्कृत्याचा वचपा तिच्या शेवटच्या कार्यात सहभागी न होऊन काढल्याच्या समाधानात त्यांना राहता येईल. आयत्या बिळावर नागोबा बनून सगळेजण छान डुलत होते.
उपकार केल्यासारखे सात वाजायच्या सुमारास शऱ्याचे आई-वडील आले. खरं तर त्यांच्यासाठीच लोक म्हातारीला उचलायचे थांबले होते. आई-वडील धरून उपस्थितांची संख्या आठापेक्षा जास्त नव्हती. आतापर्यंत शऱ्याची उतरली होती. आई-बापाने मर्तिकाचं दर्शन घेतल्यानंतर मी फोन करून बोलावलेल्या अॅम्ब्युलन्समध्ये म्हातारीचा देह ढकलला आणि आता मी या कर्मकांडातून सुटलो असं मला वाटलं. पण मला आणि शऱ्याला म्हातारीबरोबर अॅम्ब्युलन्समध्ये बसवून शऱ्याचा बाप शऱ्याची गाडी घेऊन गेला. कोण कुठली म्हातारी- तिच्या प्रेताबरोबर मी अॅम्ब्युलन्समधे काय उगाच बसलोय! आता बास झालं हे! अचानक माझ्या डोक्यात एक आयडिया आली. शऱ्याला म्हणालो, ‘‘अरे शऱ्या, तुझ्या घरात सगळा पसारा अजून तसाच पडलाय. तो कुणीतरी आवरायला पाहिजे ना! तुझे आई-वडील घरी पोहोचायच्या आत त्या दोन दारूडय़ांनापण जागं करायला पाहिजे. मी जातो तुझ्या घरी, ’’ असं म्हणून मी जो तिथून सटकलो तो सरळ माझ्या घरीच आलो आणि पहिल्यांदा स्वच्छ आंघोळ केली. शऱ्याचा असा संताप आला होता मला, की मी त्यानंतर पुढे कधीही त्या प्रकरणाची चौकशी केली नाही. दारूडय़ा मित्रांना घरात पसरलेलं बघून शऱ्याच्या बापाने शऱ्याची चांगलीच चामडी लोळवली असं नंतर कधीतरी उडत उडत माझ्या कानावर आलं. खरं तर त्या सगळ्या प्रकरणात शऱ्याची काहीच चूक नव्हती. पण मला जो मन:स्ताप झाला होता त्याचा राग काढायला मला शऱ्याशिवाय दुसरं कुणीच दिसत नव्हतं.
या मयतीसंदर्भात एक भयंकर चमत्कारिक किस्सा माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितला होता. एका रात्री स्मशानात अनेक कुटुंबं आपापल्या प्रेतयात्रा घेऊन क्रियाकर्मासाठी वाट बघत उभी होती. नेहमीप्रमाणे आपापले ग्रुप करून चर्चेत सर्वजण मग्न असताना कुणीएक व्यक्ती मोठमोठय़ांनी आवाज काढून एका प्रेताच्या छातीवर जोरजोरात डोकं आपटून रडायला लागली. आपल्या सवंग कृतीने त्याने सर्वाचं लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं. हा कोण, कुठून आला, कुणाला काहीच कळेना. कुणाच्या ओळखीचा हा असावा, याचा सगळेजण अंदाज घेत एकमेकांकडे बघायला लागले. तो जो कोणी होता तो बेभान होऊन रडत होता. त्यामुळे त्याला थांबवायचं कुणाला धाडस होईना. ‘माझं चुकलं, माझं चुकलं’ असं अस्पष्ट काहीतरी तो म्हणत असावा असं काहींना वाटलं. मृत व्यक्ती ही पंच्याऐंशी वयाची आज्जी आणि रडणारी व्यक्ती वीस-पंचवीस वर्षांचा तरुण असल्याने दु:खाने एवढं बेभान होऊन रडावं असं त्या नात्यामध्ये काही असण्याची शक्यता नव्हती. काहीजण संशयाने, काहीजण उत्सुकतेने आणि काहीजण इमोशनल होऊन त्याचं दु:ख बघून त्याच्याबरोबर रडायला लागले. एक मात्र खरं, की वातावरण त्याने पार हलवून टाकलं होतं. एका-दोघांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याचं दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला. पण मनुष्य मागे हटायला तयार नव्हता. असेल कुणीतरी लांबचा नातेवाईक याबद्दल जवळजवळ लोकांची खात्री पटली.
रडता रडता मधेच त्या व्यक्तीने मान वर केली आणि प्रेताचा चेहरा बघितला आणि तो रडायचा एकदम थांबला. आवळा खाल्ल्यावर होतो तसा त्याचा चेहरा झाला. प्रेताचा चेहरा काही त्याला त्याच्या ओळखीचा वाटेना, म्हणून त्याने आजूबाजूच्या लोकांकडे बघितलं. कुठल्याच चेहऱ्याशी त्याची ओळख पटेना. आजूबाजूचे लोक मात्र ‘आता आपल्या हातात काय आहे?’ अशा पिळवटलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होते. त्याने परत एकदा प्रेताकडे बघितलं. ‘शांताराम..’ असं काहीतरी तो पुटपुटला आणि निर्विकार चेहऱ्याने निघून गेला. सगळेजणं चकित होऊन एकमेकांकडे बघतच राहिले. सगळ्यांना काय झालं याचा अंदाज आला तेव्हा हसू आवरत सारेजण आपापल्या जागेवर परतले. तो रडेश्वर सगळ्या प्रेतांजवळ जाऊन बघून आला. त्याला अपेक्षित असलेली शांतारामची प्रेतयात्रा अजून स्मशानात आलीच नव्हती. म्हणून मग स्मशानाबाहेर एका झाडाला टेकून शांतारामची प्रेतयात्रा येण्याची वाट तो बघू लागला.
आजींच्या प्रेतयात्रेतल्या काही चौकस हेरांनी खबर काढली की, ज्या शांतारामसाठी तो एवढा धाय मोकलून रडला तो राख होऊन केव्हाच मडक्यात जमा झाला होता. काही चतुर व्यक्तींना ही खबर त्याच्यापर्यंत पोचवून त्याला परत रडवण्याचा मोह आवरत नव्हता. पण त्याआधीच बहुतेक शांतारामची खबर त्याला मिळाली असावी. कारण नंतर तो कुणालाच त्या स्मशानाच्या आसपास दिसला नाही. आजींचं क्रियाकर्म आटोपल्यानंतर आजींचं दु:ख विसरून तो रडेश्वर सर्वाच्या चर्चेचा विषय बनला होता.
असाच एकदा सासरकडच्या एका नातेवाईकांच्या मयतीला मी गेलो होतो. सासरकडचे नातेवाईक म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी हसू आवरण्याचा महाकसोशीने प्रयत्न करावा लागणार होता. घटनास्थळी पोहोचेपर्यंत रस्ताभर मी त्या दु:खद घटनेपेक्षा माझ्या हसू येण्याच्या वैगुण्यावरच लक्ष केंद्रित करत होतो. शेवटी एकदाचे आम्ही पोहोचलो. मी जशी कल्पना केली होती तसं काहीच दिसत नव्हतं. ना मोठमोठय़ाने रडण्याचे आवाज, ना गळ्यात पडून एकमेकांचं सांत्वन केल्याचे आवाज. नुसतीच गर्दी होती. जांच्यासाठी हे सगळे जमले होते ती डेड बॉडी कुठंच दिसत नव्हती. मी उगाच घरभर फिरून बघून आलो. नंतर माझी मलाच चूक लक्षात आली, की डेड बॉडी काही लपवून ठेवण्याची वस्तू नव्हे. चौकशीअंती समजलं की, डेड बॉडी अजून हॉस्पिटलमधून घरी यायचीये. तरीच एवढी शांतता होती! पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती हे मला कळून चुकलं. युद्धात चढाईच्या आधी जसे घोडे फुरफुरतात तसेच सगळेजण मधूनमधून श्वास घेत होते आणि सोडत होते. घराच्या बाहेर जी गर्दी होती ते लोक एकमेकांमध्ये काहीतरी कुजबुजत वाट पाहत ताटकळत उभे होते. अशावेळी त्या प्रसंगाचा नायक – म्हणजेच स्वर्गवासी गेलेल्या व्यक्तीविषयी चर्चा चालली असावी म्हणून मी जरा सीरियस झालो. पण ती चर्चा- कुठली नटी जास्त श्रेष्ठ, जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करणारी, की त्यातल्या त्यात कमी अंगप्रदर्शन करणारी, याविषयी चालली होती हे ऐकून मी हडबडलोच. इतर कंपूमधल्याही चर्चा प्रसंगाला धरून नव्हत्याच. एका कंपूमध्ये तर व्हॉट्सपवर आलेल्या विनोदांची देवाणघेवाण आणि त्या विनोदांचं सामूहिक वाचन चाललं होतं. प्राप्त परिस्थितीत स्वत:ची करमणूक करून घेता यावी, या हेतूने मी आपला त्या कंपूजवळ उभा राहिलो. थोडा वेळ असाच टाइमपास होण्यात गेला आणि दुरून अॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज आला आणि रणशिंग फुंकल्यासारखा दहा-बारा बायकांचा रडण्याचा आवाज आला. मी म्हटलं, क्या बात है! दु:ख असावं तर असं! त्या बायकांमध्ये आमच्या सौदेखील होत्या. इतर वेळी दमदार वाटणाऱ्या आमच्या सौचा आवाज त्या मातब्बर स्त्रियांच्या आवाजापुढे मर्तिकावस्थेला गेला होता. अॅम्ब्युलन्स जसजशी घराच्या जवळ यायला लागली तसतशी वातावरणात एकदम घाई-गडबड सुरू झाली. डोळे मिटले तर आजूबाजूला लगीनघाई चालू आहे की काय असं वाटावं. ‘लग्नाला जातो मी’ या नाटय़संगीताच्या चालीवर ‘मयतीला जातो मी’ असं एखादं नाटय़संगीत सुचलं असतं त्या वातावरणात. तर अशा उत्साहात सगळे कामाला लागले. या सर्वामध्ये एक स्वयंघोषित नेता असतो. तो आज्ञा सोडत असतो आणि बाकीचे त्याचं पालन करत असतात. ‘‘चला, बायकांचं होईपर्यंत तिरडी बांधायला घ्या.’’ सगळ्यांनी ते काम करायला धाव घेतली. दिशा कुठली, ते फक्त पटकन् ठरत नव्हतं. मृतदेह पूर्वेला तोंड करून ठेवायचा की पश्चिमेला, यावर किरकोळ वाद झाल्यावर कुणीतरी म्हटलं, ‘‘पहिली तिरडी बांधायला तर घ्या! दिशा नंतर ठरवू.’’ प्रत्येकाला आपला पूर्वानुभव शेअर करायचा होता. ‘‘अरे, खालून घे ना सुतळी. चेंगटपणा काय करतोस रे? टाक ना इथं जरा गवताचा पेंढा. उरलेला काय घरी घेऊन जायचाय का तुला? कापड दुहेरी करून घ्या. जरा जास्त असू द्या सुतळी. हातबीत बाहेर आला तर बांधायला होईल. मडकं कुठंय?’’ एकदम टेन्शन. काहीजणांची धावाधाव. ‘‘आहे, आत आहे,’’ वगैरे वाक्यांच्या गर्दीत तिरडी बांधून पूर्ण झाली.
दुसऱ्या ठिकाणी बायकांचं रडगाणं चालूच होतं. माझ्या दृष्टीने तो जरा विशेष मनोरंजनाचा प्रकार होता. तिथे प्रेताशी डायलॉग बोलत बायकांचं रडणं चालू होतं. उदाहरणार्थ, बाई एक- ‘‘असा कसा न सांगता गेला रे तू मामाऽऽऽ? आता या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना घेऊन कोणाकडे जायचं सांग बरं मामा? माझ्या मुलांना आता कोण आहे तुझ्याशिवाय? सांग बरं! (या वाक्यावर नवऱ्याचा जळजळीत लुक!) मी पोरकी झाले रे मामाऽऽ.’’ बाई दोन- ‘‘असा कसा न सांगता गेला रे तू मामाऽऽऽ? (कुठलाही डायलॉग सुरू करायच्या आधी या वाक्याने स्टार्टर मारायला लागतोच; त्याशिवाय पुढचा गियर पडत नाही. मला एक कळत नाही- मामाने काय ‘बायांनो, तुमची परवानगी असेल तर मरतो,’ असं सांगून मरायचं होतं?) ‘तुला आठवतंय.. आठवतंय का? सांग ना रे मामाऽऽऽ (‘नाही आठवत!’ असं मर्तिक मामा म्हणाला हे गृहीत धरून) मला येत्या दिवाळीत नथ घेणार होतास ना रे तू? मी सोन्याची नथ मागणार नव्हते रे मामा ऽऽऽ (अरेच्चा! ही कन्या सोन्याची नथ मागेल या धक्क्याने गेला की काय मामा?) पंचवीस रुपयांची तुळशीबागेतील नथ मी सोन्याची समजून घातली असती रे मामाऽऽऽ आता नाकात काय घालू मी? (अरे बापरे! बरंय, मामा साडी किंवा ड्रेस घेईन नाही म्हणाला.) बोल की रे- आता का गप्प?’’ बाई तीन : पहिल्यांदी ती रुमालात चहुदिशांनी शिंकरली. हिने तर कहरच केला. ‘‘असा कसा रे तू मामा! ऊठ, मला माहितीये तुला गाढ झोप लागलीये. गुदगुल्या करीन बघ आता. (अत्यंत दु:खी स्वरात हे वाक्य ती बोलली, यातच खरं तर पब्लिकचे पैसे वसूल झाले होते.) ऊठ, बघ तुला बघायला कोण कोण आलेत? बास् झाली तुझी नाटकं. मामा ऊठऽऽऽ’’ दातखिळी आणि चक्कर आल्याचं नाटक! मग काही बायका आपलं रडणं सोडून तिच्यामागे धावल्या. एक बाई तर समोर दिसेल त्याला- ‘‘आता वाट तरी कुणाची बघायची सांगा बरं?’’ समोरचा काय सांगणार? कुणाची आणि कशाला वाट बघत होती ही बाई, हेच कळायला काही मार्ग नाही. आणि ही मृत व्यक्तीबद्दल बोलतीये की यमाबद्दल? बायका खरेदी आणि मेकअप करायला वेळ घेतात हे ठीक आहे; पण इथेसुद्धा त्यांचं पटकन समाधान होत नाही.
मीपण हल्ली चेहऱ्यावरची सुरकुतीही न हलवता हसण्याचं तंत्र विकसित करण्याच्या विचारात आहे. पण छे हो! या असल्या प्रसंगांना तोंड देता देता दात दिसतातच. शेवटी तिरडी उचलली गेली आणि पुन्हा एकदा रणशिंग फुंकल्यासारखा रडण्याचा आवाज झाला आणि मयत मामा आपल्या शेवटच्या प्रवासाकडे वाटचाल करायला निघाला.
काही दिवसांपूर्वीच आमच्या सोसायटीत कुणीतरी गेलं. अचानक ढोलताश्यांचे आणि कर्नाटकात पिपाणी वाजवतात तसले आवाज यायला लागले. गणपती तर होऊन गेले! मग कोण हा मूर्खपणा करतंय, म्हणून मी बघायला गेलो तर प्रेतयात्रा वाजतगाजत न्यायची, अशी त्या लोकांची प्रथा होती म्हणे! शुभप्रसंगी वाजवायची वाद्यं असल्या दु:खद प्रसंगी वाजवून मरणाचाही आम्ही आनंदाने स्वीकार करतो, असंच सांगायचं असणार त्यांना.
जरा विचित्र विरोधाभास वाटत होता. दु:खी वातावरणात आनंदाची भेसळ होत होती. पण मला गंमत वाटली. कुणाचातरी स्वर्गवास झाला आहे हे मीही क्षणभर विसरलो. मी असं ऐकतो की, राजस्थानात म्हणे अशी कुठली मयत झाली की खास पैसे वगैरे देऊन बायकांना रडायला बोलावतात. अशा बायकांना ‘रुदाली’ म्हणतात. हा तर सरळसरळ मयतीचा ‘इव्हेंट’ झाला. माणसं बोलावून कृत्रिम प्रकारे मयत साजरी करायची. तीसुद्धा एक प्रथाच आहे म्हणे. आजकाल कुणासाठी खरे अश्रू येतील अशी माणसंही फार कमी वाटय़ाला येतात. काहीही म्हणा- माणसांच्या बाजारात मरणाचं महत्त्व जरा कमीच झालंय. कारण जन्म आणि मृत्यू यामधला माणसाचा प्रवासही महागलाय ना! (उत्तरार्ध)
n nratna1212@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा