जगात देव आहे की नाही, हा खूप छान वादाचा मुद्दा आहे. दीर्घकाळ चालू शकणारा. कधीही न संपणारा. आणि बहुतेकांना पात्रता, हुद्दा व ज्ञान याची काहीच आवश्यकता नसताना बिनदिक्कत बोलता येईल असा हा विषय आहे. त्यावर कुणाचीच खास मक्तेदारी नाही. या विषयाची काही वैशिष्टय़े आहेत. या विषयाला सुरुवात, मध्य, शेवट असं काहीही नसतं. मध्य आला, शेवट झाला म्हणेपर्यंत पुन्हा नव्याने सुरुवात होते. चर्चाही विषयाला धरूनच झाली पाहिजे असं बंधन नाही. उलट, ती जेवढी जास्त भरकटेल, तेवढी जास्त करमणूकप्रधान आणि रंजक होते. या विषयावर राज्यस्तरीय वा आंतरदेशीय चर्चा जातीय दंगलीही घडवून आणू शकतात एवढय़ा ताकदीचा हा विषय आहे. या विषयासंबंधी जनसमुदायाची जेवढी भिन्न प्रकारची मतं असू शकतात तेवढी क्वचितच कुठल्या विषयासंबंधी असू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चर्चेअंती फारसं काही हाती लागत नाही; पण तरीही या विषयावर पुन:पुन्हा चर्चा करायला लोकांना भयंकर आवडतं. पृथ्वीच्या निर्मितीपासून हा विषय अस्तित्वात असूनही याचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही. उलट, अजूनच वाढलं आहे, हे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सार्वजनिक पूजाअर्चा व सण-समारंभांच्या वाढत्या प्रमाणावरून उघडच आहे. ‘तुम्ही देवाला मानता की नाही?’ असे सहजच कुणालातरी विचारले जाते आणि मग आजूबाजूचे सर्वच जण त्या चर्चेत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. काही लोकांच्या मते, तो आहे. काही लोकांच्या मते, तो नाही. काही लोकांसाठी देव असणे किंवा नसणे हा त्यांच्यासाठी सोयीचा विषय आहे. थोडक्यात, या चर्चेतील वाक्ये पुढीलप्रमाणे- आपल्या सोयीसाठी देव मानणाऱ्यांचा गट (अ) आणि न मानणाऱ्यांचा (ब). आणि या दोन्हींची मजा घेऊन स्वत:ला आणि आजूबाजूच्या लोकांना बुचकळ्यात टाकणाऱ्यांचा गट (क)! (ब) ‘मी देवाला मानत नाही, कारण जर देव असेल तर सैतानालापण तुम्हाला मान्यता द्यावी लागेल. मी आजपर्यंत कधीही पिशाच्चं पाहिली नाहीत, त्याचप्रमाणे देवही पाहिला नाही. आणि जे डोळ्याला दिसत नाही, ते आहे यावर मी विश्वास ठेवणार नाही.’ (अ) ‘अरेच्चा! कमालच आहे. कुठलीतरी अदृश्य शक्ती आहेच, हे मी पैजेवर सांगतो. मला सांगा, तुम्ही श्वास घेता तो तुम्ही बघू शकत नाही, पण त्यामुळेच तुम्ही जिवंत आहात हे लक्षात ठेवा.’ (ब) ‘हे बघा, तुम्ही शरीरशास्त्र आणि अंधश्रद्धा एकत्र करू नका. श्वास घेणं, सोडणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. फार फार तर ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्साइडशी माझ्या जिवंत असण्याचा संबंध आपण लावू शकतो.’ (क) ‘मी खरं सांगू का, मी जेव्हा कुठल्या संकटात किंवा अवघड प्रसंगात फसतो तेव्हाच मला देव आठवतो. इतर वेळी नाही आठवत, हे खरंय. मीपण मूर्तिपूजा नाही मानत.’ (अ) ‘काय सांगताय? मग मागच्या महिन्यात बालाजीला गेला होतात ते काय नुसती देवळाची घंटा वाजवून परत आलात की काय?’ (क) ‘कुठेतरी तुम्हाला श्रद्धा ठेवायलाच लागते. हे बघा- मूर्तीपुढे जरी मी हात जोडत असलो, तरी मनातून मी काही तिला देव वगैरे मानत नाही.’ (ब) ‘पण मग मूर्तिपूजा मानत नाही तर मूर्तीपुढे हात जोडायची काय गरज आहे? उद्या शेंदूर फासलेल्या दगडापुढेही तुम्ही हात जोडाल.’ (क) ‘शेंदूर फासलेल्या दगडाला लोक जे नमस्कार करतात ते त्या दगडाला नसून त्या दगडावरच्या श्रद्धेला नमस्कार करतात.’ (अ) ‘दगडावर श्रद्धा!? भयंकर काहीतरी चुकतंय.’ (क) ‘काय चुकतंय? मूर्ती सजीव नसते म्हणून ती देव नाही. आणि दुसरं म्हणजे मूर्ती ही मनुष्यनिर्मित असते, तर दगड हा निसर्गनिर्मित असतो. निसर्ग हाच खरं तर देव आहे. त्यामुळे दगडावर श्रद्धा असू शकते. आणि देव खरं तर तुमच्या आतच आहे. त्याला इकडे-तिकडे शोधायची गरज काय?’ (ब) ‘आत म्हणजे नक्की कुठे? म्हणजे मग आरशात बघून स्वत:लाच नमस्कार करणार का तुम्ही? छे! छेऽ! खूपच निर्थक बोलताय. तुम्हाला तुमचा कुठलाच मुद्दा नीट मांडता येत नाहीये. इकडचं तिकडचं कुणाचं तरी ऐकून तुम्ही बोलताय. तुम्ही परत एकदा विचार करून बोला.’ (क) ‘हे बघा महाशय, हा विषय चेष्टा करण्याचा नाहीये. देवाचा कोप होईल ना तेव्हा तुम्हाला समजेल.’ (अ) ‘आणि काय हो, तुम्ही एवढं अगदी देव नाही म्हणता, मग तुम्हाला तुमच्या पाप-पुण्याची फळं कोण देतं? तुमचा रोहिदास तुमच्या असल्या नास्तिकपणामुळे काही केल्या दहावी पासच होत नाहीये. तुमच्या पापाची फळं तुमच्या मुलाला भोगायला लागतायत.’ (ब) ‘काहीतरी काय बोलताय? नीट लक्ष देऊन अभ्यास केला तर होईल पास.’ (क) ‘शक्यच नाही. मुळात आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ (ब) ‘हे बघा, तुम्ही काही बोलू नका. थोडेसे का होईना, प्रयत्न तरी करतोय आमचा रोहिदास. तुमच्या बंडय़ासारखा कामधंदा सोडून घरात अंडी नाही ना उबवत बसलाय? वयाची तिशी आली तरी फुकटचे तुकडे मोडतोय घरात. आणि तुम्ही? अगदी पाप-पुण्याच्या गोष्टी करणारे. रोज अगदी मोबाइल फोन, घरची बेल बंद करून तीन- तीन तास पूजा करता. यांच्या पुण्याचा घडा अगदी एवढा दुथडी भरून वाहतोय, तर देवाने यांच्या शरयूची एवढी लग्नं का मोडली आत्तापर्यंत?’ (अ) ‘ही एवढी मंगळाची महादशा संपू दे. नाही तिच्या लग्नाची वरात तुमच्या घरासमोरूनच वाजतगाजत नेली तर बघा! पण तुमचा रोहिदास लग्न होईपर्यंत तरी दहावी पास होतोय का ते बघू या आपण.’ (क) ‘हे बघा, भांडू नका. विषय काय आहे- देवाला तुम्ही मानता की नाही? अशा प्रकारच्या चर्चेत मी पण बऱ्याचदा सहभागी झालो आहे. यात माझी भूमिका ही बऱ्याचदा बघ्याची असते. मला कुणाशी वादही घालायचा नाहीये. कारण मला दोन्ही बाजूची मतं पटतात. मी नास्तिक नाही किंवा फार आस्तिकही नाही. ‘क’ कॅटेगरीत माझा समावेश होऊ शकतो. पण म्हणजे फक्त संकटाच्या वेळीच मला देव आठवतो असं नाही; तर कुठल्या ना कुठल्या निमित्ताने रोज देवाची आठवण होतेच. मी देवापुढे रोज एकदा तरी हात जोडतोच. पण मला बऱ्याचदा प्रश्न पडतो. ज्या तसबिरीसमोर किंवा मूर्तीपुढे मी हात जोडतो ते त्याची सुंदर, वैभवसंपन्न, दागदागिन्यांनी मढवलेली श्रीमंत, तेजस्वी प्रतिमा आहे म्हणून. पण हीच प्रतिमा जर दरिद्री, कुरूप, निस्तेज असेल तर मी हात जोडीन का? देव कुणी बघितला आहे? देवाची प्रतिमा कदाचित अशी असूही शकते. ‘ब्रुस ऑलमाइटी’ नावाच्या एका इंग्रजी चित्रपटात मॉर्गन फ्रीमन नावाचा एक कुरूप दिसणारा नट देवाच्या भूमिकेत दाखवला आहे. तो लगेच आपल्याला माणूस वाटायला लागतो. त्याचं वागणं, बोलणं बघून आपल्याला एखाद्या मित्राची आठवण येऊ शकते. असा देव असेल तर त्याच्यासमोर हात जोडण्यापेक्षा त्याच्या खांद्यावर हात टाकण्यात आपल्याला जास्त समाधान वाटेल. थोडक्यात, तो नमस्कार त्या वैभवाला किंवा श्रीमंतीला केलेला असतो असं माझं मत आहे. खरं म्हणजे देव असला किंवा नसला, तरी माझी काहीच तक्रार नाही. एक गोष्ट मला नक्की म्हाइतीये, की ‘भावेविण केलेली भक्ती व्यर्थचि होय’! ती कशाचीही किंवा कुणाचीही असो. ती तुमच्या कामाविषयी असो, कुणा व्यक्तीविषयी असो, धनप्राप्तीसाठी असो किंवा कुठल्या इच्छापूर्तीसाठी असो, किंवा अगदी भक्ती व्यक्त करण्यासाठी केलेला नमस्कार असो; पण त्यात जर भक्तिभाव नसेल तर तो काय कामाचा? उदाहरणार्थ- माझ्या माहितीचं एक कुटुंब आहे. आई, वडील, बहीण, भाऊ सर्वजण त्या कुटुंबात आहेत. ते जेव्हा कधी एकमेकांसमोर येतात तेव्हा पहिला खाली वाकून आदरभाव व्यक्त करण्यासाठी नमस्कार करतात. उगाच येता-जातासुद्धा करतात. बाहेरून बघणाऱ्याला वाटेल, काय आदर्श कुटुंब आहे! साने गुरुजींच्या पुस्तकातली पात्रं जिवंत होऊन या धरतीवर अवतरली आहेत की काय! आत्ता ह्य़ांचे फोटो काढतो आणि पूजेसाठी देवघरात नेऊन ठेवतो. पण आतली गोष्ट तेवढीच विदारक आहे. ती म्हणजे- पाठीमागे एकमेकांची टिंगल करायची. एखाद्याच्या अपरोक्ष बाकीच्यांनी एकत्र येऊन त्याच्याविषयी वाईटसाईट बोलायचं. तिरस्कार करायचा. कपट-कारस्थानं करायची. तोंडावर मात्र खोटं खोटं एकमेकांकडे बघून हसायचं. खोटी खोटी स्तुती करायची. त्यांच्यापैकी एक बहीण अतिशय सावळी आहे. चहा पावडर आणि ती यांत चहा पावडरच जराशी उजवी असेल. जेव्हा कधी दुसरी बहीण तिला भेटते तेव्हा नेहमी ‘मागच्या वेळेपेक्षा तू यावेळी फारच उजळ झाली आहे हं ताई!’ असं म्हणते. इतरांनाही डोळ्यांना स्वच्छ दिसतंय तेव्हा तरी निदान अशी खोटी स्तुती करू नये माणसाने. मग तीही रांजणासारखा आकार असलेल्या बहिणीला ‘तूही अगदी छान बारीक झाली आहेस..’ वगैरे म्हणते. आता जिथे मुळातच प्रेम किंवा आदर नाहीये, तिथे ‘मूह में राम, बगल में छुरी’ असं वर्तन काय कामाचं? देवाला हात जोडण्यामागे असलं कुठलंही स्वरूप असू नये.
कदाचित देवालाही माणसासारखे प्रश्न पडत असतील. तोपण कधीतरी अडचणीत येत असेल. काही वषार्र्पूर्वी एक गोष्ट वाचलेली मला आठवतीये. एका गावात एक कुंभार आणि शेतकरी राहत होते. दोघांच्या घरांच्या मधे एकच भिंत होती. दोघेही अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू असून परमेश्वराचे अत्यंत लाडके होते. इतके, की दोघांपैकी कुणी दु:खी झालं तर स्वत: देवही दु:खी होत असे. एका वर्षी ते आपापल्या देवासमोर प्रार्थना करायला लागले. कुंभार म्हणत होता, ‘देवा, या वर्षी पाऊस नको पडू दे. मी जी मडकी बनवली आहेत ती विकून मी लक्षाधीश होईन. पण ती अजून ओली आहेत. पाऊस पडला तर ती मडकी भाजण्यासाठी मी जी भट्टी पेटवली आहे ती विझून जाईल. मडकी बेकार होतील. माझं मोठं नुकसान होईल. मला माहीत आहे- तुझी माझ्यावर कृपादृष्टी आहे. तू मला निराश करणार नाहीस.’ दुसरीकडे शेतकरी प्रार्थना करत होता- ‘देवा, या वर्षी भरपूर पाऊस पडू दे. मी माझ्या शेतात भरपूर बी-बियाणं पेरलं आहे. बरीच मेहनत घेतली आहे. पाऊस पडला तर खूप मोठय़ा प्रमाणावर पीक येईल आणि मी लक्षाधीश होईन. पण जर पाऊस नाही पडला, तर सगळी मेहनत वाया जाईल. सगळी बी-बियाणं जळून जातील आणि माझं मोठं नुकसान होईल. मला माहीत आहे की, तुझी माझ्यावर कृपादृष्टी आहे. तू मला निराश करणार नाहीस.’ आता मला सांगा- या परिस्थितीत देव काय करणार? ‘काय करायचं?’ या प्रश्नाभोवती संपूर्ण मानवजात सूर्यमालेतल्या ग्रहांप्रमाणे फिरते आहे. या विश्वाच्या निर्मात्यालाही त्यापासून सुटका नाही. एका वेळी दोघांना सुखी करणं विधात्यालाही शक्य नाही. पुढल्या वर्षी आत्ताच्या विरुद्ध परिस्थिती निर्माण होऊन दुसरा समाधानी होऊ शकतो. पण आत्ता दोघांपैकी एकाला निराश व्हावं लागणार. आपणही देवाची ही अडचण समजून घेतली पाहिजे. ‘समय से पहले वह कुछ नहीं देगा’ हे अंतिम सत्य आपण स्वीकारायला पाहिजे.
देवाला जरी मी कधी प्रत्यक्ष बघितलं नसलं तरी माझ्यासाठी देवाला भेटणं एकदम सोपं आहे. अनेक चालत्या-बोलत्या माणसांच्या रूपाने मला तो बऱ्याच वेळा भेटला आहे. काही व्यक्ती हयात आहेत, तर काही हयात नाहीत; पण प्रत्येक वेळी त्यांच्यातल्या दैवत्वाचा साक्षात्कार त्यांनी मला करून दिला आहे. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न जेव्हा मला त्या व्यक्तींच्या बाबतीत पडतो आणि चकित मनाला या प्रश्नाची उलथापालथ होऊनही उत्तर मिळत नाही तेव्हा त्यांच्यातल्या दैवी शक्तीचा प्रत्यय मला येत असतो. क्षणोक्षणी आश्चर्याची कारंजी नाचवतच त्यांचे आविष्कार सादर होत असतात. हवेतून केळे किंवा विभूती काढून दाखवणे असल्या चमत्कारांबद्दल मी बोलत नाही. किंवा हस्तरेषांवरून, पत्रिका बघून, अंगठय़ाचा छाप बघून किंवा कुठल्याही अतक्र्य प्रकाराने तुमचं नशीब ठरवणाऱ्या बाजारबसव्यांबद्दलही मी बोलत नाही. माझे काही देव आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे. चार्ली चॅप्लिन, आर. डी. बर्मन, पु. ल. देशपांडे, अमिताभ बच्चन, किशोरकुमार, आशा भोसले, लता मंगेशकर अशी ती सगळी आश्र्चय आहेत. (अजूनही काही नावं आहेत. पण सगळीच इथे समाविष्ट करता येणं शक्य नाही.) जेव्हा कधी मी चार्ली चॅप्लिनचे सिनेमे बघतो तेव्हा मला ‘हे कसं शक्य आहे?’ हा प्रश्न पडतोच. या कल्पना चॅप्लिनला कशा सुचल्या असतील? नुसतं सुचणं नाही, तर प्राप्त परिस्थितीत उपलब्ध आयुधांचा वापर करून त्या प्रत्यक्षात उतरवणंदेखील. आज शंभर र्वष झाली असतील, पण तेवढे चैतन्यपूर्ण चित्रपट माझ्या पाहण्यात नाहीत. बरं, नुसता अभिनय केला की जबाबदारी संपली असं नाही; तर दिग्दर्शक, लेखक, निर्माता, संगीत दिग्दर्शक या सर्व जबाबदाऱ्या तेवढय़ाच ताकदीने पेलायच्या तर तुमच्यात दैवी अंशच पाहिजे. आर. डी. बर्मन ऊर्फ पंचमदाही एक असंच अजब आश्चर्य आहे. पंचमदांचं संगीत हे तुम्हाला बोट धरून अगदी सहज स्वर्गाची सफर घडवून आणतं. त्यात जर किशोरकुमार, आशा भोसले किंवा लता मंगेशकर गात असतील तर मग त्या सफरीतून परतीची वाट सापडणं अजूनच कठीण. ‘आवाजाची जादू’ हा शब्दप्रयोग खऱ्या अर्थाने इथे सार्थ ठरतो. पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते, ‘जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत लता आणि आशाचा आवाज हा आसमंत व्यापून टाकतील.’ हृदय चिरत जाणाऱ्या या आवाजांना पंचमदांनी दिलेल्या सुरांची साथ मिळाली नसती तर माझ्यासारख्या कित्येकांचा जन्म व्यर्थ झाला असता. पंचमदा म्हणजेच राहुल देव बर्मन यांच्याबद्दल तर काय बोलायचं! त्यांच्या नावातच देव आहे. मला आश्चर्य वाटतं की अशा टय़ून्स सुचणं कसं शक्य आहे? आधुनिक संगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत असलेला पंचमदांचा आवाका थेट इंद्रधनुष्याची आठवण करून देणारा आहे. संगीताला एक्स्प्रेशन असतं आणि ते तुमचं मन हेलावून टाकू शकतं, हे मला पहिल्यांदा पंचमदांचं संगीत ऐकून कळलं. त्या गाण्यांनी कधी आनंदानं मन उचंबळून येतं, कधी कंठ दाटून येतो, तर कधी अंतर्मन स्वच्छ झाल्याचा अनुभवही येतो. त्या गाण्यांनी मला अनेकदा निराशेच्या गर्तेतून खेचून बाहेर काढलं आहे. असंच काहीसं पु. लं.च्या कथाकथनाच्या बाबतीत घडतं. फक्त कथाकथनातून किंवा लेखनातून प्रेक्षकांना, वाचकांना दुरूनच गुदगुल्या करण्याचं त्यांचं सामथ्र्य अजब आहे. त्यांचा विनोद कधीही न टोचणारा. उलट, रेशमी वस्त्रातून उडून एखादं पीस तुमच्या अंगाखांद्यावर खेळावं इतका तो तरल असतो. अचाट निरीक्षणशक्तीमुळे माणसातले किंवा परिस्थितीतले बारकावे एवढय़ा तिरकस विनोदबुद्धीने पाहण्याचं कौशल्य असणं, किंवा आपल्या एकपात्री अभिनयाने लोकांना तीन- तीन तास खुर्चीला खिळवून ठेवणं, हे दैवी अंश असल्याशिवाय शक्य नाही. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, नाटककार, संगीतकार, वक्ता आणि पेटीवादक हे सर्व पैलू एकाच माणसाकडे सर्वोत्तम असणं कसं शक्य आहे! अमिताभ बच्चन हेही असंच दैवी अंश असलेलं आश्चर्य. माझ्यासारखा भाग्यवान मीच- जो अमिताभ बच्चन सुपरस्टार असलेल्या काळात जन्माला आलो. ‘अग्निपथ’ चित्रपट पाहिल्यानंतर पाचशे विजय दीनानाथ चौहान थिएटरबाहेर पडताना मी पाहिले आहेत. आपल्या अभिनयाद्वारे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणं कसं शक्य आहे?
या सर्वाना मी कधी प्रत्यक्ष भेटलो नाही, पण यांनी माझ्या अभिरुचीवर चांगलाच प्रभाव टाकला आहे. मी ज्यांना भेटलो आहे अशीही काही देवमाणसं आहेत. माझे एक अतिशय प्रेमळ व्यायाम शिक्षक आहेत. हे वाक्य ‘प्रामाणिक आणि भ्रष्टाचार न करणारा एक नेता आहे’ या वाक्याइतकंच अविश्वसनीय वाटेल. पण आमच्या शैलेश परुळेकर सरांच्या बाबतीत ते एक हजार एक टक्के खरं आहे. हसत जिममध्ये स्वागत हा योग कुठल्याच व्यायाम शिक्षकाच्या बाबतीत याआधी घडून आलेला नाहीये. एवढा सुंदर दिवस माझा याआधी कधीच सुरू झालेला नाहीये. फक्त व्यायामाच्या बाबतीतच नाही, तर एकूणच उत्तम आयुष्य जगण्याविषयीच्या त्यांच्या संकल्पना या जवळजवळ अमरत्व बहाल करणाऱ्या आहेत. दुसऱ्याविषयी एवढी तळमळ आणि प्रेम सर सोडले तर फक्त देवालाच वाटू शकतं. तुम्ही जर जिममध्ये येऊन व्यायाम करणार नसाल तर भरलेले पैसे परत घेऊन जा, किंवा पहिल्यांदी जिममध्ये येऊन व्यायामाची सवय करा- आणि जर सवय लागली तरच पैसे भरा, असं म्हणणारे व्यायाम शिक्षक त्यांच्याव्यतिरिक्त माझ्या तरी ऐकण्यात किंवा पाहण्यात नाहीत. आजच्या काळात एवढं नि:स्वार्थीपण जपणं आणि स्वत:च्या कामाविषयी कमालीचा आत्मविश्वास असणं हे कसं शक्य आहे? ‘आजच्या जगात देवमाणसं राहिलीयेत कुठं?’ असं जर कोणी म्हणालं तर मी अभिमानाने सांगू शकतो, ‘हो. मी अशा माणसाच्या सहवासात राहिलोय. त्यांचं नाव आहे- शैलेश परुळेकर.’ देव जरी मज कधी भेटला तर मी त्याला सांगीन- ‘ही अशी सगळी माणसं सतत तुझ्या रूपाने या धरतीवर जन्म घेऊ देत. आणि सतत त्यांचा सहवास मला लाभू दे.’
निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा