‘पुढचे दोन दिवस पाणी येणार नाही!’ कायऽऽ!!! ‘कुठेतरी बॉम्बस्फोट झाला’ या बातमीने माझ्यावर जेवढा परिणाम झाला असता त्यापेक्षा जास्त गंभीर परिणाम माझ्या मनावर झाला. ‘झाडे जगवा, पाणी वाचवा’, ‘पाणी हे जीवन आहे’, ‘थेंबे थेंबे तळे साठे’, ‘ओढवेल मोठा अनर्थ, पाणी नसेल तर जगणं आहे व्यर्थ’ अशा प्रकारच्या चार-पाच म्हणी आणि सुविचार लिहिलेल्या भिंतींसकट पटापट मनात येऊन गेले. एक दिवस कसाबसा आपण काढू, पण दुसऱ्या दिवशीचं काय? या धक्क्याची तीव्रता बऱ्यापैकी ओसरल्यावर उपाययोजनांना सुरुवात झाली. घरातल्या वाटय़ांपासून ज्या ज्या भांडय़ांत पाणी भरून ठेवता येणं शक्य आहे त्यात पाणी भरून ठेवायचं ठरलं. अगदी वॉशिंग मशिनचीही यातून सुटका झाली नाही. एक वेळ प्यायचं पाणी विकत आणता येईल, आणि एवढी सगळी भांडी भरली तर वापरायचं पाणी पुरेल, असा प्राथमिक अंदाज सर्वानुमते वर्तवला गेला. चला तर मग आता एक क्षणही वाया न घालवता पाणी भरायच्या कामाला लागा.
आणि बायकोने अनपेक्षितपणे दुसरा बॉम्ब टाकला- ‘कुठून आणि कसं भरायचं पाणी? आज पहाटेच पाणी गेलंय.’ कळवण्यास अत्यंत दु:ख होतंय की, आज पहाटेच आमचे घरातील सर्वाचे अतिशय लाडके कुणीतरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वैकुंठास रवाना झाले आहेत अशी शोककळा संपूर्ण घरावर पसरली. म्हणजे आता घरात फक्त अर्धा ड्रम वापरायचं पाणी, पाच बाटल्या आणि अर्धा माठ प्यायचं पाणी एवढंच शिल्लक होतं. जे दोन दिवस पाच माणसांनी पुरवायचं. बा..प..रे!
घरातल्या कुठल्याच नळाकडे बघवेना. एवढे आखीवरेखीव महागडे नळ बसवले होते घरात. दहा वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटीसुद्धा होती. पण जर त्या नळातून पाणी येणार नसेल तर तसलं बा सौंदर्य किती व्यर्थ आहे! त्यावेळी उगाचच नळाखाली हात धरल्यावर आपोआप सुरकन् पाणी येणाऱ्या नळाची मला आठवण झाली. टीव्हीवरच्या त्या महागडय़ा नळाच्या जाहिरातीमधली ती बाई इतर वेळी किती आकर्षक वाटते. पण आता तिच्याएवढी अनाकर्षक बाई या जगात दुसरी नाही असं वाटायला लागलं. इतर वेळी महागडे नळ बसवलेलं ते बाथरूमही बाथरूम नसून एक स्वर्गवत ठिकाण वाटायचं. सुंदर स्वप्नांचा चेंदामेंदा होऊन त्या बाथरूमच्या गटारातून वाहून जात असल्याची कल्पना माझ्या डोक्यात आली. दमयंती नळामुळे का एवढी वेडी झाली होती हे खऱ्या अर्थाने मला आज समजलं. शरीरात आत्माच नसेल तर केवळ बा सौंदर्याला काय अर्थ आहे? खरं तर या प्रसंगी एका मोठय़ा संकल्पनेचा साक्षात्कार झाला होता.
मिळालेल्या शिक्षणाचा भविष्यात उपयोग होणार असेलही; पण आता प्राप्त परिस्थितीत करायचं काय, हा एक मोठा व अतिमहत्त्वाचा प्रश्न भेडसावत होता. कुणा नातेवाईकांकडे जाता येईल का? की कुठे गावाला जायचं दोन दिवस? की पुण्यातल्याच कुठल्यातरी हॉटेलमध्ये राहायला जावं? की कुठल्या स्विमिंग टँकवर पोहायला जावं? एक ना दोन- अनेक कल्पना मेंदूमधून पिशवीतून गोटय़ा बाहेर पडाव्यात तशा बाहेर पडत होत्या. सर्वानी कुठल्या कुठल्या जवळच्या नातेवाईकांकडे आंघोळ व इतर विधींसाठी जायचं ठरलं. सर्वानी तयारी सुरू केली. ब्रश, पेस्ट, साबण, श्ॉम्पू, टॉवेल कॅरीबॅगमध्ये भरायला सुरुवात केली. सर्वाच्या कॅरीबॅग भरून तयार झाल्या आणि टेलिफोनची रिंग वाजली. ‘हॅलो, अरे आमच्याकडे पाण्याचा जरा प्रॉब्लेम झाला आहे, तर आजच्या दिवस आम्ही तुमच्याकडे आलो तर चालेल का? आम्ही फक्त चारजणच येतोय.’ त्या नळाप्रमाणेच मला त्या टेलिफोनचाही राग यायला लागला. खरं तर मोठय़ाने ओरडून मला त्यांना सांगावंसं वाटत होतं- ‘नाही. नका येऊ तुम्ही. आमच्याकडे काही पाण्याचे जिवंत झरे नाही सापडलेत. किंवा आमच्या घरावरून कुठला धबधबा नाही पडत. इथे आमच्या तोंडचं पाणी पळालंय आणि त्यात तुम्ही अजून कशाला येऊन उरावर बसताय?’ खरं म्हणजे आमच्या या नातेवाईकांनी अनेकदा आमच्या अडचणीच्या प्रसंगी अगदी नि:स्वार्थीपणे आम्हाला सढळ हाताने मदत केली होती. त्यामुळे अगदी हक्काने आमच्याकडे जाता येईल, या हेतूने त्यांनी फोन केला असणार. पण नाइलाजास्तव अतिशय नम्रपणे मला आमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचं वर्णन करावं लागलं. मी कितीही प्रामाणिकपणे वर्णन केलं असलं तरी आमचं घरी येणं टाळण्यासाठी मुद्दाम खोटंखोटंच मी हे असलं वर्णन करतोय असं त्यांच्या मनात आलंच. हे त्यांच्या शेवटच्या ‘हो का! बरं..’ असं अर्धवट तोडलेल्या त्यांच्या संभाषणाच्या आविर्भावातून मला समजलं. दुपापर्यंत मी अशा अनेक फोन्सना धैर्याने तोंड देत होतो. कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय आलेल्या एका नातेवाईकाला तर पाणी न विचारताच तातडीने निरोप द्यावा लागला होता. अचानक बेसावध अवस्थेत असतानाच पाणी गेल्यामुळे सर्वत्रच ही परिस्थिती उद्भवली होती. सर्वानी कुणाला काहीही न सांगता आपल्या आपणच कॅरीबॅग रिकाम्या केल्या. ‘एकदा पाणी आलं ना की सगळ्यांना खास आंघोळीला बोलवू या आपल्याकडे!’ घरातल्या सगळ्यांनी इतका तुच्छ लुक दिला माझ्याकडे. काय करणार! एवढा गिल्ट आला होता माझ्या मनात, की असं म्हणणं क्रमप्राप्त होतं मला. दुपारनंतर ओल्या कपडय़ाने अंग पुसून घेणं वगैरे त्यातल्या त्यात स्वच्छतेला सुरुवात झाली. टिपूसभरसुद्धा घाम न येऊ देता मी पाणी वाचवण्यासाठी जीव लावून प्रयत्न करीन आणि पाणी वाचवण्याच्या राष्ट्रीय कार्याला हातभार लावीन असं मनाशी ठरवून फुल पंखा लावून पंख्याखाली बसलो. पण संकटं कधीच एकटीदुकटी येत नसतात. पंखा अचानक हळूहळू फिरायला लागला आणि बंद झाला. ‘लाइट गेले. बापरे! मरा आता. कधी येणार आता लाइट?’ माझा उद्वेग झाला. पण आज गुरुवार असल्यामुळे संध्याकाळी लाइट येणार असल्याची गोड बातमी कुठूनशी माझ्या कानावर आली. माझं पाणी बचाव आंदोलन पत्त्यांच्या बंगल्यासारखं ढासळलं. त्यातच जेवताना धक्का लागून पाण्याने पूर्ण भरलेला ग्लास माझ्या हातून जमिनीवर कलंडला. ‘भिंतीत चिणून मारा याला!’ अशी शिक्षा मला मिळाली आहे, हे सर्वाच्या डोळ्यात मला दिसलं. शांतपणे काहीही न करता बसून राहणं याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कसा मी लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला जात असे. कसा फ्रिज उघडून गटागटा पाणी पीत असे. उन्हाळ्यात तर दोन वेळा आंघोळ करण्याची चैन असे. कधी शॉवर, कधी बाथटब. सरबत म्हणू नका, ताक म्हणू नका, बर्फाचे गोळे म्हणू नका. एकूणच माझ्या बालपणीच्या आनंदी प्रवासात पाण्याचा किती मोठा सहभाग होता हे अजूनच प्रकर्षांने मला जाणवायला लागलं. लहानपणी कधीतरी शिवथरघळ या ठिकाणी सहलीसाठी गेलो होतो. या गुहेच्या आत उभं राहून गुहेच्या बाहेर पडणारा धबधबा तुम्ही बघू शकता. समोरून पडणारे धबधबे मी अनेकदा बघितले आहेत. पण असं धबधब्याच्या मागे उभं राहून मी तो कधीच बघितला नाहीये. मी ते दृश्य कधीच विसरणं शक्य नाही. रात्रभर तो खळखळ आवाज कानात घुमत होता. त्या धबधब्याच्या आठवणीने मी ‘खळखळ’ असा नुसता तोंडाने आवाज काढून बघितला. त्या प्रसंगी तेसुद्धा किती बरं वाटलं म्हणून सांगू. एव्हाना संध्याकाळ झाली आणि कष्टी मनावर थोडी समाधानाची झुळूक यावी तसा पंखा सुरू झाला.
पण एक खंत मनाला सारखी टोचत होती. दुष्काळग्रस्त भागातल्या पाण्याची अवस्था याविषयी मी टीव्हीवर बातम्या पाहत होतो. वर्तमानपत्रात बातम्या वाचत होतो. काही भागांत तर चार-पाच दिवसांतून एकदाच पाणी येत असे. तिथली लोकं काय करत असतील? पाण्याविना गावंच्या गावं एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरित होत होती. त्यांच्या हृदयद्रावक कहाण्या ऐकून जिवाचं पाणी पाणी होत होतं. आपण त्यामानाने किती सुखी आहोत! दोन दिवस आपण पाण्याविना राहू शकत नाही, या विचाराने तर मला अजूनच शरम वाटायला लागली. पाण्यावरून काही भागांत हाणामाऱ्या होत असल्याची बातमी अगदी कालच टीव्हीवर बघितली होती. तिसरं महायुद्ध जर होणार असेल तर ते पाण्यावरून होणार असल्याचं भाकीत कुणीतरी वर्तवलं होतं. हे खरं आहे की काय असं ती बातमी बघून वाटायला लागलं. हीच त्या युद्धाची नांदी तर नसेल? लोकांनी पाऊस पडावा म्हणून पर्जन्ययज्ञ सुरू केला आहे ही बातमीही टीव्हीवरच बघितली. हे बघताना जरी गमतीशीर वाटलं असलं तरी त्यामागची भावना किती अस्सल असेल याचं ज्ञान काही तासांतच मला मिळालं होतं. देवाने तरी मानवजातीवर पाण्याच्या बाबतीत किती अन्याय केला आहे. एवढा मोठा समुद्र निर्माण केला; पण पाणी सगळं खारं. उपयोग काय? समुद्रात गोड पाणी निर्माण केलं असतं तर पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघाला नसता का? सरळ समद्रकिनारी जायचं आणि हवं तेवढं पाणी भरून आणायचं. अर्थात मुंबईतले काही समुद्रकिनारे सोडून! दुबईत म्हणे समुद्रापासून पिण्याचे पाणी निर्माण करण्याचं तंत्र विकसित केलेलं आहे. पण ते अतिशय महाग आहे. मलेशियामध्ये रेनफॉरेस्ट निर्माण केली आहेत. आपापल्या परीने सर्वचजण काही ना काही उपाययोजना करत आहेत. आपल्या देशातसुद्धा भ्रष्टाचारातून थोडा वेगळा वेळ काढून येणाऱ्या भविष्यात पाण्याविषयी काहीतरी गंभीर विचार आणि सुयोग्य तरतूद सरकारी सूत्रांनी करायला काय हरकत आहे? अशाच काहीशा विचारांत कधी झोप लागली कळलंच नाही.
उद्या कुणीही लवकर उठू नका. जेवढा जास्त वेळ झोपता येईल तेवढा वेळ सगळ्यांनी झोपून राहा- हा विचार सर्वानी मान्य केला आणि सर्वजण झोपी गेले. पण सगळ्यांचा दुसरा दिवस पहाटे पाच वाजताच उजाडला. आजचा दिवसही पाण्याविना काढायचा आहे, हा पहिला विचार सगळ्यांच्या डोक्यात आला. एवढय़ा लवकर उठून करायचं काय? आमच्यापैकी एकाने उपाय सुचवला- ‘सरळ पाण्याचा टँकर मागवू या का?’ इतका वेळ मरगळलेली सकाळ अचानक प्रसन्न वाटायला लागली. कधी एकदा उजाडतंय आणि पाण्याचा टँकर आम्ही मागवतोय, असे सारे उतावीळ झाले. एकदाचं उजाडलं. टँकरवाल्याला फोन केला. बँकेचे कर्जवसुली करणारे लोक जसं आडमुठेपणे बोलतील तसा तो दांडगट आम्ही त्या पाण्याचे पैसे देणार असूनसुद्धा आमच्याशी उर्मटपणे बोलत होता. आम्हीच आपले अडला हरी म्हणायचं आणि धरायचे या गाढवाचे पाय अशी आमची समजूत करून घेत होतो. पण तो मात्र आम्हाला उपकारांच्या बोजाखाली गाडून टाकायच्या तयारीने बोलत होता. कमीत कमी दोन हजार लिटर पाणी घ्यायला लागेल, असं त्याने सांगताच तापल्या तव्यावर थंडगार बर्फाचं पाणी पडावं तसा सगळ्यांचा उत्साह विझला. एवढं पाणी साठवायचं कुठे? म्हणजे दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत अशी स्थिती झाली ही. त्या प्रात:काळी त्या पाण्याचा विनियोग कसा करायचा, या विचारांनी सर्वाच्या मनात कल्पनेची कारंजी उडत होती. सर्वानी जवळजवळ गुढय़ा-तोरणं उभारून त्या टँकरचं स्वागत करायचं ठरवलं होतं. पण सगळंच व्यर्थ! काही तासांचा तर प्रश्न आहे; संध्याकाळी सात वाजता पाणी येणारच आहे, असं म्हणून प्रत्येकाने आपापली समजूत घालून घेतली. सरळ घराला आग लावावी आणि आगीचा बंब बोलावून घ्यावा, म्हणजे तरी पाणी बघायला मिळेल. मला कुठूनतरी भरपूर पाणी बघायचं होतं. या पाण्याच्या ओढीने मी यूटय़ूबवरचे सुनामीचे व्हिडीओज्पण बघितले. माझ्या विचारांमध्ये थोडी थोडी विकृतीची झलक दिसायला लागली होती. छे! छे! काय होतंय हे! या असल्या विचारांना बगल द्यावी म्हणून मग पुस्तक वाचायला घेतलं. त्यातही सुंदर नदीचा काठ वगैरे वर्णन यायला लागलं तसं तेही बाजूला ठेवलं. एवढा हतबल मी कधीच झालो नव्हतो. तसाच खिडकीतून बाहेरचं रणरणतं ऊन बघत बसून राहिलो.
आमच्या घराच्या बागेत पूर्वी एक छोटंसं कारंजं होतं. कधीकाळी त्यातून पाणी उडायचं. त्यावेळी आम्हा लहान मुलांना मजा वाटायची. मला बसल्या जागेवरून ते दिसत होतं. अगदीच ते रंजलंगांजलं होतं. एखाद्या पडक्या वाडय़ासारखी त्याची अवस्था झाली होती. वीस वर्षांत ते आहे हे कुणाच्या लक्षातही आलं नव्हतं. मला काय वाटलं कुणाला ठाऊक; मी बागेत गेलो. त्याच्या आजूबाजूला स्वच्छता केली. त्याला पाइप जोडला. या सगळ्या तयारीत बराच वेळ गेला. आता संध्याकाळी पाणी आल्यावर ते उडतंय की नाही हे बघायची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. संध्याकाळचे सात वाजले. नळाला पाणी आलं आणि मी हे काय बघत होतो! वीस र्वष बंद असलेलं ते कारंजं आमच्यासमोर मोठय़ा दिमाखात उडायला लागलं. काय आनंद झाला म्हणून सांगू! तो काय आनंद होता हे शब्दांत सांगता येणार नाही. पण काहीतरी नवीन निर्माण केल्याचा तो आनंद असेल कदाचित. दोन दिवसांचा शीण पार कुठल्या कुठे निघून गेला. या दोन दिवसांत कितीतरी गोष्टींच्या जाणिवा जाग्या झाल्या होत्या. रोजच्या जगण्याच्या प्रवाहात कुठेतरी पार हरवून गेल्या होत्या त्या.
निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com

The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
20 years after Indian Ocean tsunami
Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
Story img Loader