एकदा सकाळी आठ वाजताच मोबाइल वाजला. फक्त नंबर होता. उगाच छातीचा ठोका चुकल्यासारखं झालं. काही वाईट बातमी तर नसेल? किंवा न जाणो- फोन कुठल्या कामासंबंधी असेल तर? फोन उचलू तरी.. जे काही असेल ते असेल. अगदी हलक्या आवाजातच ‘हॅलो’ म्हणालो. पलीकडून कुणीतरी माझ्यापेक्षा हलक्या आवाजात बोलत होतं. ती कुणीतरी स्त्री होती. ‘सर, एका चित्रपटाविषयी तुमच्याशी आमच्या दिग्दर्शकांना बोलायचं आहे. तर कधी फोन करू दे, हे विचारायला मी फोन केला आहे. म्हणजे तुम्ही कामात नसाल ती वेळ सांगा- म्हणजे सविस्तर बोलता येईल.’ ‘अहो, करा ना कधीही. एवढी कसली ती औपचारिकता? रिकामटेकडा तर बसलो आहे!’ असं मी बोलायला जाणारच होतो, पण चटकन् माझ्या लक्षात आलं : माझी वेळ घेण्यासाठी ही बया फोन करतीये म्हणजे मी कुणीतरी मोठा अभिनेता आहे. आणि माझ्याकडे अक्षरश: क्षणभरसुद्धा उसंत नाही असा तिचा गैरसमज झाला असणार. तर असो. आपण कशाला उगाच झोपलेल्याला जागं करा. उगाच मोठे मोठे पॉझ घेत ‘अंऽऽऽ कधी बरं वेळ होईल.. आज.. असं करा- उद्या.. नाही, नको.. संध्याकाळी.. नाही नको.. लंच ब्रेकमध्ये.. नाही, नको.. नाहीतर असं करा- तासाभरात फोन केला तरी चालेल.’ माझ्या वेळेसंबंधी चाललेल्या चर्चेत माझा उतावीळपणा कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी शेवटी सगळा अजागळपणा झालाच. पण मी तरी काय करणार? एकतर फोन करण्यासाठी माझी कुणीतरी वेळ मागतंय यावर माझा विश्वासच बसेना. आणि दुसरं म्हणजे उगाच कामाच्या गडबडीत दिग्दर्शक विसरले तर स्वत:हून दुधात मिठाचा खडा टाकल्यासारखं होईल. त्यापेक्षा आपण आपला सेफ गेम खेळावा. बरोबर तासाभरात दिग्दर्शकांचा फोन आला. कॅरेक्टर, स्टोरी वगैरे प्रस्तावना झाल्यावर माझ्यासाठीच कसा तो रोल लिहिला आहे याविषयी त्यांचा दृष्टिकोन त्यांनी स्पष्ट केला. त्यानंतर ते काय म्हणाले ते मला ऐकूच आलं नाही. ‘हा रोल तुमच्याशिवाय कुणीच करू शकणार नाही.. तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून हा रोल लिहिला आहे.. मला तुमच्याशिवाय दुसरं कुणी दिसतच नाहीये..’ ही सिनेमासृष्टीतली फसवी वाक्यं आहेत. पण जेव्हा कुणी तुम्हाला असं म्हणतं, त्यावेळी त्यातली सत्यासत्यता न तपासता कुठल्याही अभिनेत्याचा अहंकार आकाशातून पतंग जसा हेलकावे खात जमिनीवर येतो तसा गळून पडतोच. अशावेळी आकाशात बघत दोन-चार सिगारेटचे दीर्घ झुरके मारल्याशिवाय चैन पडत नाही. मला होकार देण्याशिवाय गत्यंतरच ठेवलं नाही त्या दिग्दर्शकांनी. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मीटिंगसाठी वेळ ठरवून मी फोन ठेवला. या संभाषणादरम्यान कधी मी आरशासमोर येऊन उभा राहिलो, तेसुद्धा कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये संहितेचं वाचन स्वत: दिग्दर्शक करणार होते. पण कुठल्याशा  कामासाठी त्यांना जावं लागलं. त्यामुळे मग त्यांच्या वाचनाचा व्हिडीओ आम्हा चार-पाच कलाकारांना प्रोजेक्टवर दाखविण्यात आला. स्क्रिप्टवाचनाची ही आधुनिक पद्धत मला जेवढी आवडली, तेवढं स्क्रिप्ट काही केल्या मनाला पटेना. अर्धा चित्रपट ऐकून संपला तरी त्यात जे काही चाललं होतं ते कशासाठी, याचा थांगपत्ता लागत नव्हता. प्रसंगांचं क्राफ्टिंग (विणकाम) अगदीच सुमार दर्जाचं होतं. मला लिखाणातलं काहीही समजत नाही असं जरी गृहीत धरलं तरी प्रेक्षक म्हणून बघताना ते प्रसंग मनोरंजक आहेत की नाहीत, ते आतापर्यंत मला कळायला लागलंय. तो चित्रपट विनोदी आहे असं आम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. पण प्रत्येक विनोद अत्यंत बालिश शब्दकोटय़ा आणि वाक्यांनी बरबटला होता. आता इथे काहीतरी नाटय़मय घडेल असं वाटत होतं तिथे प्रसंग एकदम गुळगुळीत करून आटपले होते. कल्पनादारिद्रय़ाचा हा खटाटोप कधी संपणार, म्हणून मी वाट बघायला लागलो. आदल्या दिवशीपासून सुरू झलेली स्वप्नं पानगळ लागल्यासारखी नष्ट होत होती. आपण काही या चित्रपटात काम करायला नको असं मनाशी पक्कं ठरवून दिग्दर्शकांची वाट बघत बसलो. कसे काय यांना प्रोडय़ुसर मिळतात, वगैरे विचारांनी डोकं फुग्यासारखं फुगत चाललं होतं. शिगोशीग आत्मविश्वास डोळ्यांत नाचवत दिग्दर्शक आले. मी चित्रपट सर्वोत्तम बनवणार आहे असं त्यांच्या देहबोलीतून प्रकर्षांने जाणवत होतं. आणि जिभेवर तर साखरेचं पोतंच होतं. असं सगळं असूनही कधी एकदा माझा नकार त्यांना कळवतोय असं मला झालं होतं. ‘तू माझ्या चित्रपटात आहेस ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे..’ असं म्हणून त्यांनी फुग्याला कधी टाचणी मारली आणि मी माझ्याही नकळत कधी त्यांना होकार दिला, हेच मला कळलं नाही. असं काहीतरी वैशिष्टय़ त्या दिग्दर्शकाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होतं, की मी त्यांना नाही म्हणूच शकलो नाही. ठीक आहे. एवढय़ा सुमार दर्जाच्या स्क्रिप्टमधून हे दिग्दर्शक सर्वोत्तम चित्रपट कसा बनवणार, या कोडय़ाचा यानिमित्ताने शोध घेता आला तर कुठल्याही सुमार दर्जाच्या संहितेतून उत्तम चित्रपट कसे बनवायचे, या विषयावर प्रशिक्षणवर्ग सुरू करून करोडो रुपये कमावता येतील. म्हणजे तेवढी एक बाजू समाधानाची म्हणून शिल्लक होती. कारण एवढं सगळं झाल्यावर व्यवहार आणि तारखांच्या बाबतीत मला गुंडाळायला त्यांना कितीसा वेळ लागणार होता!
पण काहीही असो- दिग्दर्शक अत्यंत प्रेमळ, सुस्वभावी आणि शांत डोक्याचा विचारी माणूस होता. ही चव ना चोथा स्क्रिप्ट त्यांनी लिहिली आहे यावर अजिबात विश्वास बसू नये एवढं त्यांचं व्यक्तिमत्त्व समोरच्या माणसावर प्रभाव टाकणारं होतं. जर कुणी टाय-सूट घालून भंगारची गाडी घेऊन रस्त्याने फिरला तर कसं वाटेल, तशी ते स्क्रिप्ट आणि दिग्दर्शक ही जोडी वाटत होती. एकूणच प्रॉडक्शन म्हणून कामात टापटीप आणि प्लॅनिंग या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जात होतं. म्हणजे मंडप अगदी छान सजवला जात होता; पण मंडपात मूर्तीच नसेल तर तो सगळा खटाटोप काय कामाचा, हे वेळीच माझ्या लक्षात यायला हवं होतं. पण ठीक आहे. निदान गेला बाजार ही सजावट तरी शिकता येईल म्हणून मनावर साचलेलं नकारघंटेचं मळभ मी दूर सारलं आणि शूटिंगसाठी पाय रोवून सज्ज झालो. पाय कितीही रोवले असले तरी अत्यल्प मानधन आणि नवीन प्रॉडक्शन हे शेवाळं पायाखाली आहे, ही जाणीव काही केल्या विसरता येत नव्हती.
त्यानंतर बरेच दिवस त्यांचा फोनच आला नाही. म्हटलं- चला, वेळीच त्यांना त्यांची चूक लक्षात आली असेल आणि चित्रपट कॅन्सल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असेल. पण या आनंदात मला फार काळ नाही राहता आलं. आणि एक दिवस परत एकदा वेळ मागणाऱ्या प्रेमळ आवाजाच्या त्या बाईचा फोन आला. ठरलेल्या मानधनात जेवढय़ा तारखा देण्याचं ठरलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त त्या तारखा होत्या. ‘नाही सर, त्या सेफर साइड म्हणून घेऊन ठेवल्यात. त्या उपयोगात येतीलच असं नाही.’ पण म्हणजे येणार नाहीत असंही नाही. सेफर साइड म्हणून एक-दोन तारखा ठीक आहेत; या जवळजवळ कबूल केलेल्या तारखांच्या दुप्पट तारखा होत्या. पण त्या प्रेमळ आणि सौहार्दपूर्ण संभाषणात पुन्हा एकदा माझी हार झाली.
आऊटडोअर शूटिंगसाठी बाहेरगावी जाण्याचा दिवस ठरला. मला एका प्रॉडक्शनवाल्याचा फोन आला. रूम शेअर करण्याविषयी तो फोन होता. इतका वेळा कसाबसा आवरलेला संतापाचा बांध फुटला. कुणी काहीही म्हणो, आऊटडोअर शूटिंगला गेल्यावर मला रूममध्ये नेहमी एकटय़ाला राहायला आवडतं. यात अहंकार किंवा माज दाखवण्याचा असा कुठलाही हेतू नाही. एकटं राहिलं की शूटिंगनंतरही त्या चित्रपटाबरोबर राहता येतं. स्वत:च्या कॅरेक्टरशी गप्पा मारता येतात. नवीन गोष्टी सुचतात. मोकळेपणाने विचार करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला अनुभवायचं असेल तर स्वत:शी आरशात बघून गप्पा मारण्यानेच ते अनुभवता येतं. नटांसाठी रियाज का काय म्हणतात तो हाच नव्हे का? तुमच्याबरोबर कुणी असेल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींवर बंधन येतं. त्यातून तुमचा रूममेट दारू पिणारा असेल तर मग कसला विचार आणि कसलं स्वातंत्र्य! पहिल्यांदा मी थोडं नरमाईने त्याला सांगून बघितलं. पण त्याच्या डोक्यात काहीच प्रकाश पडत नाहीये हे लक्षात आल्यावर ‘तुम्ही सोय करत असाल तर ठीक आहे, नाहीतर मी माझी सोय करतो..’ असं कडक शब्दांत सांगावं लागलं. ती रात्र माझ्या मनासारखी पार पडली.
दुसऱ्या दिवशी शूटिंगचा दिवस उजाडला आणि इतके दिवस नीटनेटक्या वाटणाऱ्या प्रॉडक्शनचा फज्जा उडाला. एक-दोन-तीन अशा अनेक चुकांची मालिकाच प्रॉडक्शनच्या लोकांनी सुरू केली आणि त्यामुळे जवळजवळ दोन तास उशिरा मी शूटिंगसाठी पोहोचलो. शूटिंग सुरू झालं. शूटिंगच्या पहिल्या दिवशी सगळेजण खूप उत्साहात होते.
आणि काय आश्चर्य! शूटिंगच्या वेळी जे घडत होतं ते बघून मी मनातल्या मनात स्वत:ला दोन थोबाडीत मारून घेतल्या. स्क्रिप्ट ऐकताना माझ्या मनात जे विचार आले होते, प्रॉडक्शनच्या अजागळपणामुळे जी अस्वस्थता आली होती, किंवा  एकूणच आत्तापर्यंत ज्या काही मनाविरुद्ध गोष्टी घडत होत्या आणि त्यामुळे जे काही थोडंफार नैराश्य आलं होतं ते कुठल्या कुठे पळून गेलं. पुन्हा एकदा दिग्दर्शकांनी आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करत फारच झकास सीन घडवून आणले. त्या माणसामध्ये काय जादू होती माहीत नाही. आमचे दिग्दर्शक समोर आले की चीड, निराशा, अस्वस्थता अशा कुठल्या गोष्टीचा मागमूसही मनात उरायचा नाही. तो दिवस तर मजेत गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताचा कॉल टाइम होता. दुसऱ्या दिवशीचा माझा माझा प्लॅन करून, गजर वगैरे सेट करून मी झोपी गेलो. पहाटे चार वाजताच कुणीतरी दार वाजवलं. ‘सर, कॉश्च्युम ट्रायल करायची आहे,’ असं म्हणत प्रॉडक्शनवाला दाराबाहेर उभा. ताबडतोब तोफेच्या तोंडी द्यावं असं हे कृत्य होतं. पहाटे चार वाजता जर कॉश्च्युम ट्रायल करायची होती, तर इतके दिवस हे काय करत होते? दुसऱ्या दिवशी परत एकदा भल्या पहाटेच माझा भडका उडाला. स्वत:ला अतिकर्तव्यदक्ष भासवणाऱ्या प्रॉडक्शन टीम आणि साहाय्यक दिग्दर्शक टीमचे दिवसेंदिवस तीन तेरा वाजत होते. आणि नवीन प्रॉडक्शन या शेवाळावरून माझा पाय घसरायला लागला होता. अजूनही शूटिंगचे बरेच दिवस शिल्लक होते आणि दुसऱ्याच दिवशी प्रॉडक्शनच्या लोकांचा गलथानपणा पराकोटीला गेला होता. दिग्दर्शकांचं दर्शन झाल्याशिवाय माझा पारा काही उतरणं शक्य नव्हतं. ठरल्याप्रमाणे दिग्दर्शकांना भेटलो आणि परत एकदा मनाने उभारी घेतली. तीन-चार दिवसांचं आऊटडोअर संपवून मुंबईत परतलो. मुंबईत अजून काही दिवस शूटिंग असणार होतं. आता प्रॉडक्शनच्या लोकांवर फारसं अवलंबून राहावं लागणार नाही, ही मनाला दिलासा देणारी गोष्ट होती.
मुंबईमध्ये शूटिंग सुरू झालं आणि प्रत्येक दिवस वाट पाहणं हा शूटिंगमधला महत्त्वाचा भाग होऊन बसला. पण मीच नाही, तर अनेक प्रथितयश नट सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त वाट बघत होते. त्यामुळे वाट बघण्यात मी एकटा नसल्याचं एक फुटकळ समाधान मनाला वाटत होतं. वाट बघण्याचा कालावधी एवढा जास्त होता, की मला वाटलं- तेवढय़ा वेळात पडद्यामागे प्रतिचित्रपट तयार होऊ शकेल. मला रोज इंग्रजी नट मायकल केन यांनी म्हटलेलं वाक्य आठवायचं : ‘अ‍ॅक्टर हा वाट बघण्याचे पैसे घेतो. अ‍ॅक्टिंग वगैरे त्याने फुकटच करायची असते.’ पण इथे वाट बघण्याचाही मोबदला मिळत नव्हता. सत्तर टक्के शूटिंग होऊनही मानधन (क्षुल्लक असलं म्हणून काय झालं?) आपल्यापासून हजारो मैल दूर आहे असं मला वाटायला लागलं. म्हणजे आता परत एकदा प्रॉडक्शनच्या नादी लागणं नशिबी आलं. शेवटी कसंबसं शूटिंग पूर्ण झालं आणि महत्प्रयासाने मानधनही मिळालं.
या सगळ्या प्रक्रियेदरम्यान माझं सिंहावलोकन सुरू होतं. आपल्याला काय मिळतंय आणि आपण काय गमावतोय, याचा हिशेब मांडणं चालूच होतं. शेवटी लक्षात आलं- मिळवणं आणि गमावणं याचा हिशोब मांडण्यापेक्षा सगळं विसरणं यातच खरं समाधान दडलं आहे. तरच परत उभं राहता येईल.. नवीन शूटिंग करण्यासाठी!
निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा