वेळ ही किती महत्त्वाची आहे नाही! रात्रीच्या शांत वेळी त्या अंधारात घडय़ाळाची टिकटिकसुद्धा आहे त्यापेक्षा जास्त मोठय़ाने ऐकू येते. त्यावेळी फोनची रिंग वाजली तरी डोक्यात झिणझिण्या आल्याशिवाय राहत नाहीत. आपण बेसावध असतो. पूर्णपणे जागे असूनही बेसावध अवस्थेतून सावध अवस्थेत आपण बातमी ऐकल्यानंतरच येतो. पण कधी कधी रात्री एक-दोन वाता फोनची रिंग वाजते तेव्हा गाढ झोपेतून आपण अर्धवट झोपेच्या अवस्थेत येतो; पण त्या क्षणी सावध होतो. गंमतच आहे माणसाच्या मनाची. माझ्या मनात नेहमी असा विचार येतो की- हे कुणी बरं माणसाच्या मनावर बिंबवलं असेल, की रात्री-अपरात्री आलेला फोन हा शुभवार्ता देण्यासाठी केलेला नाही असं आपोआपच मनात यावं? रात्री फोनची रिंग ऐकताक्षणी पहिला छातीचा ठोका चुकतो. एक लिस्ट डोळ्यांपुढे येते आणि मनातल्या सगळ्या विचारांची जागा पराकोटीच्या उत्सुकतेने घेतलेली असते. कुणाचा नंबर लागला असेल, कोणाला वैकुंठाचं तिकीट मिळालं असेल, याबद्दल मन अंदाज घ्यायला लागतं. त्या वेळेला जर कुठलं चांगलं स्वप्न बघत असू आणि जर एकदम जाग आली, तर अनपेक्षित चेहरेसुद्धा डोळ्यासमोर येऊन जातात. कधी कधी ते चेहरे नुकतेच आपण स्वप्नात हसताना बघितलेले असू शकतात. कोणाला ब्लडप्रेशरचा त्रास आहे, कोणाला डायबेटिस आहे, कोण हॉस्पिटलमध्ये आहे, कोण लांबच्या प्रवासाला गेलेलं आहे, कोण रोज दारू पितो, किंवा अगदी आपल्या ओळखीत कोण सर्वात जास्त पापी आहे, अशा अनेक शक्यता डोक्यात दाटीवाटीने येतात. कुणी सर्दी-खोकल्याने जरी आजारी असेल तरी मनात उगाच शंका येऊन जाते. नंतर लगेच दुसरा विचार मनात येतो तो म्हणजे दुसऱ्या दिवशी ठरवलेल्या कामांचा आता कसा सत्यानाश होणार आहे, याचा. सगळी महत्त्वाची कामं बरोब्बर दुसऱ्या दिवशीच प्लॅन केलेली असतात. आणि त्या दिवशी सर्व गोष्टी नेमक्या तुमच्यावरच अवलंबून असतात.
पण हे कारण असं जबरदस्त असतं, की कुठल्याही कामातून तुम्हाला अगदी सहज सूट मिळू शकते. (शाळेत असतानाच मला या गोष्टीचा अचूक अंदाज आला होता. त्यामुळे शाळेला वेळी-अवेळी बुट्टी मारण्यासाठी मी माझ्या अनेक नातेवाईकांना अनेकदा मारलं आहे. खासकरून मावशीचे किंवा आत्याचे मिस्टर हे नातं फारसं कुणी सीरियसली घेत नाही; पण कामातून सूट मात्र मिळते. शिवाय हे कारण असं आहे की, ते खरं आहे की खोटं, याची फार कुणी चौकशी करत नाही. आत्तापर्यंत फक्त एकदाच माझ्या एका वर्गशिक्षकांनी ‘सारखे सारखे कसे तुझे मावशीचे मिस्टर वारतात?’ असं मला विचारलं होतं. ‘मला मावश्याच इतक्या आहेत, आणि त्यांची सगळ्यांची लग्नं झाली आहेत, त्याला मी तरी काय करू?’ असं मी मनात म्हणालो होतो.) विचारांच्या या सगळ्या पायऱ्या चढून जाऊन आपण फोन कानाला लावतो. हृदय जोराने धडधडत असतं. ‘हॅलो!’ आपल्याला फक्त एवढंच म्हणायचं असतं आणि दुसऱ्या बाजूचं संभाषण ऐकायचं असतं. म्हणजे ‘असं अचानक कसं काय झालं?’ किंवा ‘बाप रे! माझा विश्वासच बसत नाहीये,’ वगैरे आपण म्हणतो, पण त्यावेळी ही वाक्यं अगदी बालिश व अर्थहीन असतात. कारण आपण त्यावेळी जी माहिती ऐकतो त्यातली समजते किती, हा भाग निराळा. आपले कान नुसतेच शब्द ऐकतात, तर मनाचं डिपार्टमेंट जगाचा कायमचा निरोप घेतलेल्या संबंधित व्यक्तीच्या आठवणींच्या फाइली धुंडाळण्यात गुंतलेलं असतं. फोन ठेवल्यानंतर पहिली दहा मिनिटं काहीच सुचत नाही. मग हळूहळू गोष्टी समजायला लागतात आणि हृदयाचे ठोके नियमित पडायला लागतात. पण त्या दोन मिनिटांच्या नाटय़पूर्ण काळात थरारपट बघितल्याचा अनुभव आपल्याला येतो.
आमच्या ओळखीच्या एक आज्जी होत्या. वय ९०- ९५ च्या घरात असेल. रात्री कधीही फोन वाजला तरी पहिल्यांदा त्या आज्जींचाच विचार डोक्यात येत असे. एवढंच नाही तर पुढे पुढे आज्जींच्या घरून दिवसाढवळ्या कधीही फोन आला तरी छातीची धडधड वाढत असे. (एकदा तर आज्जींनी स्वत: फोन करून त्यांच्या घरी हळदी-कुंकवाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं.) असं सुमारे पाच-सहा र्वष चाललं होतं. आज्जींचं मरणाचं वय उलटून गेलं होतं. तरीही आजी इकडे-तिकडे स्वत:च्या पायांवर फिरत असत. लग्न, वाढदिवस वगैरे सगळ्या कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावत असत. तसं एक-दोन वेळा त्यांना पाय घसरून पडल्याच्या क्षुल्लक कारणांवरून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिटदेखील केलं होतं; पण ते नावालाच. असं काही झालं की घरच्या लोकांच्या आशा पल्लवित होत असत. आता काही म्हातारी घरी येत नाही याबद्दल त्यांना खात्रीच वाटत असे. पण काही तासांत म्हातारी घरी हजर! आजींच्या घरचे लोक डॉक्टरांना विनवणीही करत असत की, ‘घाई करू नका. हवं तर एक-दोन दिवस ठेवून घ्या आज्जींना हॉस्पिटलमध्ये.’ त्यावर डॉक्टर म्हणत, ‘ह्य़ांना काहीसुद्धा झालेलं नाही. चांगल्या ठणठणीत आहेत आज्जी. अजून दहा-बारा र्वष सर्दी-खोकलासुद्धा होण्याची शक्यता नाही.’ अजून दहा-बारा र्वष काहीसुद्धा होणार नाही म्हणजे अजून नव्वद र्वष जगतीये का काय ही म्हातारी? डायनॉसोरच्या सापळ्याबरोबर या म्हातारीचाही सापळा पुराणवस्तुसंग्रहालयात ठेवावा लागतोय की काय? सगळेजण चेहरे पाडून आज्जींना घेऊन परत घरी येत. आज्जींची तब्येत ठणठणीत होती हे शंभर टक्के खरं होतं. या वयातही आजीचं एकूण राहणीमान एकदम टापटिपीचं आणि शिस्तीचं होतं. आज्जींना औषधाची एकही गोळी घ्यावी लागत नव्हती. सकाळी उठून त्या योगासने वगैरे करत असत. त्यांना व्यवस्थित दिसत असे. बुद्धी त्या वयातही तल्लख होती. विस्मरण वगैरे नावालासुद्धा होत नव्हतं. मरायचंच बहुतेक त्या विसरल्या होत्या. कुठल्या कुठल्या जुन्या गोष्टी आठवून त्या भांडण उकरून काढत. नुसतं उकरून काढत नसत, तर भल्याभल्यांना त्यांचं भांडणाचं कौशल्य खाली मान घालायला लावत असे. वर्षांनुर्वष नळावर भांडणं करून त्यांच्या जिभेला चांगलीच धार आली होती. फक्त ऐकू कमी येत असे. वृद्धापकाळाची तेवढी एकच काय ती खूण. नाहीतर वार्धक्यावर आज्जींनी निर्विवाद विजय मिळवला होता.
पण एक दिवस ‘आज्जी आम्हाला सोडून गेल्या. आम्ही पोरके झालो!’ असा त्यांच्या घरून एक नाटकी फोन आला. पहिल्यांदा कुणाचा विश्वासच बसेना. ‘अशा कशा गेल्या?’ हे वाक्य इतर वेळी कितीही निर्थक वाटत असलं तरी या प्रसंगी अर्थपूर्ण होतं. बाहेरच्या लोकांचाच काय, घरच्यांचाही विश्वास बसेना या घटनेवर. मूर्खासारखे चार-चार वेळा डॉक्टरांना विचारून घरचे लोक खात्री करून घेत होते.(खात्री करून घेणं कधीही चांगलंच. मी पुण्याच्या वैकुंठ स्मशानाच्या काचफलकात लावलेलं एक वर्तमानपत्रातलं कात्रण वाचलं होतं. एका गृहस्थाने आई वारली असं समजून तिचं क्रियाकर्म करण्यासाठी तिला वैकुंठ स्मशानात घेऊन आला. आणि विधी सुरू झाल्यावर आई अचानक तिरडीवर उठून बसली. म्हणून पूर्ण खात्री करूनच पुढच्या गोष्टींना सुरुवात करावी असं माझं स्पष्ट मत होतं. कुणाचं काय सांगता येतंय? मरणाचीसुद्धा हल्ली काही खात्री देता येत नाही.) पूर्ण खात्री झाल्यावर मगच जवळच्या नातेवाईकांनी आपापले गळे काढायला सुरुवात केली. (मागे एकदा असेच एक नातेवाईक हरपल्याची हॉस्पिटलमधून वार्ता आली. संबंधित नातेवाईकांनी जेवढं म्हणून बेंबीच्या देठापासून रडता येईल तेवढं रडून घेतलं. अचानक थोडय़ा वेळाने जेव्हा ते हयात असल्याची खबर आली तेव्हा सगळेजण रिलॅक्स झाले. रडून रडून सगळे थकून गेले होते. परंतु थोडय़ा वेळाने जेव्हा खरंच ते गेल्याची बातमी आली तेव्हा कुणाच्या अंगात परत तेवढय़ाच तीव्रतेने रडण्याचं त्राण उरलं नव्हतं. आजूबाजूला फक्त किरकोळ मुसमुस ऐकू येत होती.) मला त्या सगळ्या नाटकी आणि खोटय़ा वातावरणात हसायला यायला लागलं. काय करावं समजेना. सगळ्या दु:खाने बरबटलेल्या त्या वातावरणात माझं गालातल्या गालात हसणंदेखील उठून दिसलं असतं. मी खरंच सांगतो- ज्या ठिकाणी माझा कुठल्याही प्रकारचा भावनिक संबंध नसतो तेव्हा मला हसू आवरणं फार कठीण जातं. लोक ज्या प्रकारे वेडय़ासारखे हावभाव करत रडतात, ते बघून मला कुठं तोंड लपवावं कळत नाही. शेवटी त्यांच्या सत्तरी उलटलेल्या मुलाने थरथरत्या हाताने आज्जींचं क्रियाकर्म कसंबसं केलं आणि आज्जींच्या निरोगी शरीराने जगाचा कायमचा निरोप घेतला. एवढं भरघोस आयुष्य जगूनसुद्धा दहाव्याला आजींच्या पिंडाला सहज कावळा शिवला नाहीच.
या आज्जींच्या बरोबर विरुद्ध स्थिती आमच्या ओळखीच्या जमदग्नी कुटुंबात झाली होती. हे जमदग्नी कुटुंब अगदी सामान्य. लोअर मिडल क्लासमधलं. अनेक र्वष अंथरुणाला खिळून पडलेली एक म्हातारी या कुटुंबात होती. दोन शब्द बोलण्याचंही त्राण तिच्या अंगी नसायचं. फक्त रात्री झोपेत घोरण्याचं त्राण तिच्या अंगात कुठून संचारत असे, कळत नव्हतं. विष्णुदास हा त्या कुटुंबाचा प्रमुख तसा चांगल्या स्वभावाचा माणूस. गेली अनेक र्वष विष्णूने वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेऊन म्हातारीचा सांभाळ केला होता. ही म्हातारी विष्णूची आज्जी होती. आई-वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर आज्जीनेच त्या तिघांचा सांभाळ केला होता. विष्णूला दोन बहिणी होत्या. लग्नानंतर थोरली बेळगावला आणि मधली विजापूरला राहत होती. म्हातारीच्या आजारपणाच्या खर्चामुळे नाही म्हटलं तरी विष्णू चांगलाच खचला होता. या खर्चाच्या कचाटय़ातून सुटण्याची तो वाट बघत होता. एक दिवस संध्याकाळी म्हातारीला दम्याचा जोरात अ‍ॅटॅक आला आणि म्हातारी राहतेय की जातेय अशी स्थिती निर्माण झाली. डॉक्टरांना घरी बोलावून आणावं लागलं. तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितलं त्यानंतर विष्णूच्या नशिबाची चक्रंच फिरली. (उलटी का सुलटी, ते पुढे कळेलच.) ‘उद्याची सकाळ आजी बघू शकतीलसं वाटत नाही. हवं तर तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करा, पण त्याचा काही उपयोग होईलसं वाटत नाही,’ असं डॉक्टरांनी म्हणताक्षणी बऱ्याच- म्हणजे अगदी खूप वेळाने ग्रीन सिग्नल मिळाल्यावर जी मनाची स्थिती होते तीच विष्णूची झाली.
त्या रात्री त्याने जेवणात लगेच मटार उसळ आणि शिकरणाचा बेत केला. वरकरणी चेहरा गंभीर ठेवत तो पुढच्या तयारीला लागला. त्याने बहिणींना फोन करून सत्य परिस्थितीचं जरा जास्तच रंगवून वर्णन केलं. दहा-बारा तासांचा प्रवास करून दोघी बहिणी येणार असल्याने आणि त्या येईपर्यंत सकाळ होणार असल्याने शंभर टक्के म्हातारीचा रिझल्ट लागेल, या आशेवर तो निर्धास्त होता. वास्तविक त्याच्या बायकोने गोष्टी धीरानं घेण्याविषयी त्याला बजवलं होतं. पण विष्ण्या धीर, सबुरी वगैरे समजण्याच्या खूप पुढे गेला होता. सेकंड-हॅण्ड स्कुटी विकत घेण्याइतपत त्याने मजल मारली होती. आयत्या वेळी अनावश्यक धावपळ नको म्हणून त्याने स्मशानात क्रियाकर्म करणाऱ्या भटजींचा, अ‍ॅम्ब्युलन्सचा फोन नंबरही कुठूनतरी मिळवून ठेवला होता. पण म्हातारीने सकाळी डोळे उघडून सकाळचा पहिला चहा मागितला आणि विष्ण्याचा छातीचा ठोका चुकला. थोडय़ा थोडय़ा अंतराने विष्ण्याच्या बहिणीही घरी येऊन थडकल्या. पण सगळी परिस्थिती नॉर्मल असल्याचं बघून त्या विष्ण्यालाच दूषणं देऊ लागल्या.पुढच्या तेरा-चौदा दिवसाचं प्लॅनिंग करून आलेल्या बहिणी लगेच तर काही घरातून हलणार नाहीत, याचा विष्ण्या आणि त्याच्या बायकोला अंदाज आला आणि विष्ण्याने कपाळावरच हात मारला.
दुसरीकडे बायकोसुद्धा विष्ण्याला वारंवार फैलावर घेऊ लागली. जसजसे दिवस जायला लागले तसा खर्चाचा बोजा कमी व्हायचं सोडून आणखीनच वाढला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळही बघू न शकणाऱ्या म्हातारीची तब्येतही सुधरायला लागली. विष्ण्याच्या बहिणी घरात मस्त आरामात दिवसभर लोळत पडलेल्या असत. सगळी मरमर विष्ण्याच करत असल्यामुळे त्यांना कुठलंच टेन्शन नव्हतं. विष्ण्या एक दिवस वैतागला आणि आज्जीच्या मरणाची तारीख कढण्यासाठी पत्रिका घेऊन एका ज्योतिष्याकडे गेला. ज्योतिष्याने पत्रिका बघून विष्ण्याला अजूनच बुचकळ्यात टाकलं. या बाई अजून जिवंत आहेत याबद्दल ज्योतिष्यालाच आश्चर्य वाटत होतं. तरुण वयातच या बाई स्वर्गवासी व्हायला हव्या होत्या. पण त्या नव्वदीच्या आसपास आहेत बघून स्वत: ज्योतिषी गोंधळून गेला. ‘म्हणजे तरुण वयापासूनच या बाई मरणाला हुलकावणी देतायत. कसल्या चिवट आहेत बघा या बाई!’ ज्योतिष्याच्या बोलण्याने विष्ण्या अजूनच भैसटला. विष्ण्याच्या बहिणीही कंटाळल्या होत्या. त्यांनाही येऊन आता आठ दिवस झाले होते. काय करावं कुणालाच समजत नव्हतं. त्या संधी मिळेल तेव्हा विष्ण्याच्या नावानं बोट मोडत होत्या. एक दिवस कंटाळून त्या परत घरी जायला निघाल्या आणि नेमकी त्याच दिवशी पुन्हा म्हातारीची तब्येत बिघडली. परत एकदा डॉक्टरांना घरी बोलावून आणावं लागलं. आणि पुन्हा एकदा डॉक्टरांनी ‘आज्जीचं आता काही खरं नाही!’ असं सांगितलं. फक्त यावेळी विष्ण्याच्या नशिबाने बहिणीही समोर होत्या. कुणाला काहीच निर्णय घेता येईना. परत जावं तर विष्ण्याचा कधीही फोन येऊ शकत होता. थांबावं तर आज्जीही काही अंथरूण रिकामं करायला तयार नव्हती.
एका बहिणीने एक उपाय म्हणून त्यांच्या आई-वडिलांचे चंदनाचे हार घातलेले फोटो कोनाडय़ातून काढून म्हातारीला सहज दिसतील असे भिंतीवर लावायला सांगितले. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. कारण म्हातारीला अत्यंत कमी दिसत असे. तिची शेवटची काही इच्छा राहिली असेल म्हणून प्रत्येकाने म्हातारीसमोर काय तोंडाला येईल त्या आणाभाका घेतल्या. महिनाभर पुढे असलेल्या विष्ण्याच्या मुलीचा वाढदिवसही म्हातारीसमोर साजरा केला. काही ना काही प्रयत्न करून कुटुंब झोपी जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारी चहा मागायची. पुन्हा मग त्या दिवशी काय करायचं, याचं प्लॅनिंग सुरू व्हायचं. म्हातारीला चांगलचुंगलं खायला घालण्यापासून ते ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातली गाणी ऐकवण्यापर्यंत सर्व प्रयत्न झाले. (गाणी ऐकून तरी म्हातारी जाईल अशी उगाच सगळ्यांना भाबडी आशा होती.) म्हातारीसमोर भोंडला झाला. कुणालातरी तिच्यासमोर केळवण देऊन झालं. आनंदाच्या खोटय़ा बातम्या देऊन झाल्या. निदान आनंदाच्या धक्क्याने तरी म्हातारी सकाळचा चहा मागणं बंद करेल असं सर्वाना वाटत होतं. म्हातारीलाही या असहाय जगण्याचा कमी त्रास होत नव्हता.
पण नाही! एक दिवस अण्णाशास्त्री म्हणून त्यांच्या ओळखीचे एक म्हातारे गृहस्थ आज्जींच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यांच्यापुढे सगळ्यांनी म्हातारीची व्यथा सांगितली. कुठलेही वैद्यकीय उपाय लागू पडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. अण्णाशास्त्रींनी एक उपाय सुचवला. त्यांना एकटं सोडून तुम्ही सगळ्यांनी काही काळ त्यांच्यापासून दूर जायला हवं, असं अण्णांनी सुचवलं. कदाचित तुमच्या सगळ्यांमध्ये जीव अडकला असेल म्हातारीचा. म्हणून विष्ण्याने रात्रीच्या सिनेमाची सर्वाची तिकिटं काढली आणि म्हातारीला एकटीला सोडून सर्वजण सिनेमाला गेले. परत आले तेव्हा म्हातारीचा श्वास चालू होता. सर्वजण रात्री निराश होऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. पण त्या सकाळी म्हातारीने काही चहा मागितला नाही. त्यानंतर परत कधीच मागितला नाही. विष्ण्या खूप रडला. आतडी पिळवटून रडला.
(पूर्वार्ध)
निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा