‘मुक्या प्राण्यावर प्रेम करा’ या मताच्या अगदीच मी विरोधात नाही. पण ते किती करा आणि कुठे करा (कुठे? हा नियम माणसांनाही लागू होतो.), याविषयी मात्र माझी मतं अतिशय ठाम आहेत. उगाच फालतू कौतुकं आणि लाड करण्याच्या तर मी विरोधातच आहे. ‘कुत्रं’ या जमातीविषयी सध्या आपण बोलू. स्वत:च्या राहत्या घरात हे श्वानप्रेमी कुत्री पाळतात. त्यांना अगदी फॅमिली मेंबरचा दर्जा देऊन टाकतात. मग सगळय़ा फॅमिली फंक्शनमध्ये- उदाहरणार्थ लग्न, मुंज, डोहाळजेवण, एवढंच नव्हे तर कुणाच्या तेराव्यालाही त्याला घेऊन हजेरी लावतात. मग त्या कुत्र्याला कुठल्यातरी नातेवाईकामध्ये आणि स्वत:मध्ये काहीतरी साम्य आढळलं, की ते जोरजोरात भुंकायला लागतं. अत्यंत समजुतीच्या स्वरात, आवश्यकता पडल्यास लटक्या रागाने हे कुत्र्याचे मालक किंवा मालकिणी त्याच्याशी बोलायला लागतात आणि आपलं सगळं सगळं म्हणणं त्या कुत्र्याला समजलंय असा इतरांचा समज करून देतात. घरच्या माणसांवर चिडचिड करायची, दुस्वास करायचा आणि या मुक्या प्राण्यावर प्रेमाचा वर्षांव! हे असं प्रेम मिळणार असेल तर आपण पण आयुष्यभर मूक व्रत स्वीकारायला तयार आहोत! काय कारण असावं या जनावराविषयी एवढं प्रेम वाटायचं? कुत्रं प्रामाणिक असतं, हे एक क्वालिफिकेशन झालं. पण आपण आपल्या आजूबाजूच्या अशा किती लोकांवर प्रामाणिक आहेत म्हणून प्रेम करतो? उलट, अपमान आणि फसवले गेल्याची जाणीवच बऱ्याचदा अशा लोकांच्या वाटय़ाला येते. कुत्री चोरांपासून तुमच्या घराचं रक्षण करतात. चोर चोरी करून गेले तरी एखाद्या ओंडक्यासारखं निपचित पडलेली कुत्र्यांची कितीतरी उदाहरणं ऐकायला येतात. घरातल्याच लोकांना ते चावलं, असंसुद्धा उदाहरण माझ्या ऐकिवात आहे. पण तरी या प्राण्याविषयी वाटणारं प्रेम मात्र तसूभरही कमी होत नाही. नवऱ्याबरोबर डिव्होर्स घेतलेल्या एका बाईने घरी दोन कुत्री पाळलेली होती. त्यांच्यासाठी खास पलंग, जेवणासाठी खास व्यवस्था. त्यांची करमणुकीचीही व्यवस्था त्या घरात होती. उदंड करमणूक व्हावी म्हणून मांजरांची फजिती असणारी कार्टून फिल्मही टीव्हीवर लावत असे ती बाई. त्यांच्या आकाराचे कपडेपण होते. कधी कधी किंवा सणासुदीला त्यांना नवीन कपडे घालत असे ती. एकमेकांचे कपडे फाडून, चावून ती कुत्री लक्तरं करत असत. त्याबद्दल लाडिक कौतुकच त्यांच्या पदरी पडत असे. स्वत:च्या हाताने त्यांचे लाड करत त्यांना ती घास भरवत असे. ‘माझ्याशिवाय जेवत नाही जानू.’ एखाद्या नवख्याला वाटेल स्वत:च्या नवऱ्याबद्दलच बोलते आहे की काय? एकाचं ‘जानकी’ आणि दुसऱ्याचं ‘जॉन’ अशी नावं ठेवून त्यांचं बारसंही केलं होतं तिने. खाऊनपिऊन धष्टपुष्ट झालेली ती नतद्रष्ट कुत्री आजूबाजूला आग लागल्यासारखी रात्रंदिवस भुंक भुंक भुंकूनसुद्धा शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून त्यांच्याविरुद्ध एक अवाक्षरही ऐकून घेत नसे ही बाई. ‘हसरी, खेळती पेट्स बघवत नाहीत शेजाऱ्यांना!’ वर हे ऐकवत असे. त्या कुत्र्यांना तिने हसताना कधी बघितलं होतं कोण जाणे. त्या बाईच्या हृदयात प्रेमाचा झरा सतत वाहतो आहे, असा काहीतरी बघणाऱ्याचा समज व्हावा इतपत ती त्या कुत्र्यांवर प्रेमाचा वर्षांव करत असे. प्रेमाच्या मूर्खपणाचा अतिरेक असा की, दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करत असे ही बाई. मला नेहमी प्रश्न पडायचा की, ही बाई जर एवढी प्रेमळ असेल, तर हिचं हिच्या नवऱ्याबरोबर न पटण्याचं काय कारण? यातलं अर्धा टक्का प्रेम जरी तिने नवऱ्यावर केलं असतं तर काडीमोड झाला नसता तिचा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा