कसं कळत नाही, पण आज सकाळी उठल्यापासूनच मन एकदम प्रसन्न झालं होतं. किंवा काल रात्रीपासूनच मनाची अशी अवस्था होती असं म्हणायला हरकत नाही. कारण झोपही छान लागली. अगदी ज्याला गाढ का काय म्हणतात ना तशी. पहाटे पहाटे घडय़ाळाच्या गजराची आई-बहीण काढायला लागली नाही. गजर व्हायच्या आधीच जाग आली. ‘अरे ऊठ, अरे ऊठ’चा जप करायला बायको कुठेही आसपास नव्हती. सकाळी धुकं वगैरे पडलं होतं. सकाळी उठल्यावरचा चेहराही आरशात हसरा दिसत होता. वर्तमान उघडताच पहिली बातमी सकारात्मक वाचायला मिळाली. बायकोने काहीही न सांगता कॉफीचा मग पुढे केला. हा तर माझ्या प्रसन्नतेचा परमोच्च बिंदू होता. बऱ्याचदा खूप बोंबाबोंब करून किंवा गयावया करूनसुद्धा काहीही उपयोग होत नाही. कधी कधी मी कॉफी मागितल्यानंतर मी नवरा असल्याची ओळखसुद्धा बायकोच्या डोळ्यात दिसत नाही. म्हणजे कोण हा परग्रहवासी कॉफी मागतोय, असे काहीसे अनोळखी भाव तिच्या डोळ्यात दिसतात. शेवटी मलाच माझ्या जीवनाचा शिल्पकार बनून काहीतरी हालचाल करावी लागते. पण आज मात्र दिवसच काही वेगळा होता. आदल्या दिवशीच पुस्तक प्रदर्शनातून ‘तुमच्या सकारात्मक विचारांची शक्ती’ नावाचं एक पुस्तक विकत आणलं होतं, त्याचा हा परिणाम असावा बहुतेक. अरे वा! नुसतं पुस्तक घरी आणलं तर ही स्थिती. ते वाचायला वगैरे सुरुवात केल्यावर तर प्रत्येक दिवस बहुधा ‘रम्य ही स्वर्गाहून धरणी’ असा उगवणार बहुतेक. समज खरंच प्रत्येक दिवस जर असा अविस्मरणीय ठरणार असेल तर आपल्यात असे काही सकारात्मक बदल होतील आणि त्यातूनच अशी काही धननिर्मिती आपण करू शकू, वगैरे विचारांच्या डोहात मी उडी मारणारच होतो तेवढय़ात बायकोने एक बातमी आणली. माझी शांताआत्या आणि तिचे मिस्टर आज आपल्याकडे येणार आहेत. पंचपक्वानाने भरलेल्या ताटावर जर वाढपीच शिंकला तर जी स्थिती होईल तशी माझ्या मनाची अवस्था झाली. शक्यतो चेहरा हसरा ठेवत झालेली ही अवस्था चेहऱ्यावर दिसू नये यासाठी मी कसोशीने प्रयत्न करत होतो. ‘कशाला येणार आहे मरायला आजच!’ हे शब्द मी जिभेच्या टोकावरून मोठय़ा मुश्किलीने पडजिभेकडे ढकलत चेहरा कसबसा हसरा ठेवत म्हणालो, ‘अरे वा! अलभ्य लाभ. पण म्हणजे काही काम आहे का सहजच?’ या प्रश्नात दोन गुप्त हेतू दडले होते. काही काम असेल तर ते कोणतं? म्हणजे आपण घरात थांबायचं की ते काम टाळायला कुठल्यातरी कामाचं खोटं खोटं निमित्त करून सरळ घरातून पलायन करायचं- हे एक, आणि दुसरं म्हणजे घरी आल्यानंतर ते किती वेळ थांबणार याचा अंदाजही आला असता. ‘ते काही माहीत नाही,’ असं उत्तर देत बायकोने माझे दोन्ही हेतू धुळीला मिळवले. इतका वेळ ‘आजचा दिवस किती प्रसन्न आहे,’ असं म्हणणारा मी ‘आला दिवस आता कसातरी रेटायचा,’ असं म्हणायला लागलो. आता ही शांताआत्या म्हणजे नक्की कोण? आयत्या वेळी परीक्षेत प्रश्नांची उत्तरं जशी आठवत नाहीत तसे आयत्या वेळेला बायकोचे नातेवाईक काही आठवत नाहीत. मला नेहमी बायकोची एकच नातेवाईक आठवते- जी आमच्या लग्नात पाय घसरून पायरीवरून पडली होती ती बरणीसारख्या आकाराची दिसणारी बायकोची मावशी.
‘अरे, शांताआत्या म्हणजे धायरीची.’ ‘हां हां म्हणजे जिच्या डोळ्यांत डिफेक्ट आहेत ती. नाही म्हणजे तसं नाही, आता डोळे तिरळे असणं हे आपल्या हातात थोडीच असतं.’ पहिलं वाक्य उत्स्फूर्तपणे बोलून गेलो. नंतरचं वाक्य म्हणजे बिनशर्त सारवासारव. पण मला आठवलं, शांताआत्या म्हणजे विनाकारण बिनकामाचे भलभलते प्रश्न विचारून भंडावून सोडणारी तीच ती. किनरा आणि भसाडा आवाज असणारं ते घुबड. किती पैसे मिळतात हो तुम्हाला? अमक्या नटाचं घर तुम्हाला माहिती आहे का? तमक्या नटीचं ते लफडं खरं आहे का? कधी बोलवणार आम्हाला शुटिंग बघायला? नसत्या चांभारचौकश्या. आपल्या प्रश्नांकडे स्वच्छ दुर्लक्ष केलं जातंय हेसुद्धा त्या बाईला अजिबात कळत नाही. उलट ओरखडल्यासारखे ती प्रश्न विचारतच राहते. मी अभिनेता होऊन आयुष्यात खूप मोठी घोडचूक केली आहे, मला माफ करा आणि तोंडाचं गटार झाका, असं म्हणून सरळ मोकळं व्हावं असं मला नेहमी वाटतं. अशी बायकोची आत्या आज घरी येणार या कल्पनेने आजारी पडल्यासारखं वाटायला लागलं. उगाचच उसासे टाकायला लागलो. बायकोचे नातेवाईक घरी येणार म्हणून मनापासून आनंद होणारा नवरा जर कुणाला या पृथ्वीतलावर भेटला तर प्लीज मला कळवा. मला त्या आनंदाच्या मागचं रहस्य त्याला विचारायचं आहे.
थोडक्यात, शांताआत्या आता दोन तासात या प्रसन्न वातावरणाचा नायनाट करण्यासाठी या वास्तूत दाखल होणार होती. दिवसाची सुरुवात एवढी छान झालेली असताना तिने एकदम वेगळंच वळण घेणं मला सहजासहजी मान्य होणारं नव्हतं. माझ्या कारमध्ये बसून मी लॉंग ड्राइव्हला निघालो आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी आहे. छान रस्ता मोकळा आहे. शांतपणे समाधी लागल्याप्रमाणे मी ड्रायिव्हग करतो आहे. आणि अचानक खडय़ाखडय़ांचा रस्ता समोर आला आहे. मला वेगळा रस्ता घेणं आवश्यक होतं. मी विचार करायला लागलो. असं काय आहे, की जे शांताआत्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. कुठल्यातरी मित्राला फोन करून कुणाच्या तरी अंत्यविधीसाठी मला बोलवायला सांगावं. पण त्याने माझी सुटका झाली असती. शांताआत्या घरी आलीच असती. आपलं ध्येय हे आहे, की शांताआत्याला घरी येण्यापासून कसं परावृत्त करता येईल. कुठलंतरी असं कारण पाहिजे- जे घडवल्यासारखं नाही, तर घडून आल्यासारखं बायकोला वाटलं पाहिजे. मला आठवलं, बायकोचं कुणीतरी बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होतं आणि त्यांना भेटायला जायचं राहून गेलं होतं. मी ताबडतोब बायकोला आठवण करून दिली. त्यांना दोनच दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाल्याचं तिने सांगितलं आणि इतक्या उशिरा मला आठवण झाल्याबद्दल मलाच चार गोष्टी सुनावल्या. अजूनही वेळ गेली नाही. आपल्या हातात अजून तासभर आहे. प्रश्न : तुला त्या दिग्दर्शकांना भेटायला जायचं होतं त्याचं काय झालं? उत्तर : कालच फोन केला होता- पुढच्या रविवारी बोलावलं आहे. प्रश्न : आज आपण घरगुती वस्तूंचं प्रदर्शन पाहायला जाणार होतो ना? उत्तर : अजून आठ दिवस आहे ते. नंतर जाऊ. प्रश्न : आज आपण घर आवरणार होतो ना? (अगदी दीनदुबळा प्रयत्न) उत्तर : (पूर्ण दुर्लक्ष) ‘तू कितीही प्रयत्न केलेस तरी शांताआत्याला तू आज घरी येऊ नकोस असं मी म्हणणार नाही..’ असं म्हणून शेवटी मलाच बायकोने चारीमुंडय़ा चीत केलं. तोंड दाबून प्रश्नांचा मार झेलताना मला मी दिसायला लागलो.
‘आली वाटतं!’ असं बायकोने म्हटल्यावर ‘एक साथ बाये मुड’ असं शाळेत कवायत करताना म्हणायचो तसं ‘चेहरा आता हसरा कर’ असं मनाशी म्हणालो आणि मोठय़ा धैर्याने संकटाला सामोरा गेलो. आत्याने आपल्याबरोबर एक सरप्राइजही बरोबर आणलं होतं. एक-दोन वर्षांचं अत्यंत मळकं मूल खांद्यावरून उतरवून तिने खाली ठेवलं. लोकं म्हणतात की, लहान मुलांचे डोळे निष्पाप असतात. पण मला नेहमी ते अत्यंत बेरकी आणि डॅम्बिस दिसतात. का, माहीत नाही. हेही मूल तसंच होतं. त्याला खाली उतरवल्याबरोबर उगाच ते घरात इकडून तिकडे पळायला लागलं. त्याच्या बुटांना जो चिखल लागला होता तोही घरभर फिरून आला. बाहेर ते मूल कुठंतरी खेळत असणार. आजी-आजोबांना बाहेर जाताना बघून केकटायला लागलं असणार. त्यामुळे त्याला हे तसंच उचलून घेऊन आले असणार. ‘या भागात कुणाकडे तरी आलो होतो. म्हटलं, तुलाही भेटावं म्हणून आले,’ असं म्हणून आत्याने घरी येण्यामागचं कारण स्पष्ट केलं. बराच वेळ ती असंच काहीतरी बोलत राहिली. ‘काय आज घरीच? शूटिंग नाही?’ मधेच बायकोने ‘काय विचारतीये आत्या?’ असं म्हणून हटकलं. ‘हो, आज जरा आराम. तुम्ही आराम नाही केलात आज तुमच्या घरी?’ बायकोने डोळे वटारले. मी गप्प. म्हणजे ती बाई इतका वेळ माझ्याशी बोलत होती, माझ्या लक्षातच आलं नाही. कारण बोलत माझ्याशी असली, तरी डोळे भलतीकडेच होते बघत. आणि दुसरं म्हणजे माझं पूर्ण लक्ष जो छोटा गनिम आला होता त्याच्या हालचालींकडे होतं. आणि अचानक माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. डोळ्यांत संताप आणि बाकी चेहरा हसरा असा काहीतरी मिश्र आकार चेहऱ्याने घेतला. त्या गनिमाने कुणाचीही पर्वा न करता बिनधास्त जमीन ओली केली. यावर आत्या मोठय़ाने हसली. ‘अलेच्चा! चू चू झ्याली वाटतं!’ असं म्हणत बायकोनंही त्या प्रसंगात मोठय़ा हिरीरीने भाग घेतला. तशा अवस्थेत ते बालक ओल्या पायाने घरभर फिरून आलं. जवळच पडलेलं ‘तुमच्या सकारात्मक विचारांची शक्ती’ या पुस्तकाचं कव्हर पेज बघत बराच वेळ मी बसून राहिलो. थोडय़ा वेळाने परत त्या गनिमाने जमीन ओली केली. इतका वेळ कव्हर पेज बघत जमवलेल्या सकारात्मक शक्तीचा सत्यानाश झाला. त्याला जवळ बोलावून हळूच त्याला चिमटा काढून घेतला. बराच वेळ रडण्याचा कार्यक्रम पार पडल्यावर परत एकदा त्याने जमीन ओली केली आणि माझ्याकडे बघून स्मित केलं. जणू काही मी काढलेल्या चिमटय़ाचा कसा बदला घेतला, असं तो म्हणत असावा. ‘लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात’ ही म्हण ज्याने कोणी बनवली असेल त्याला इथे येऊन एकदा बघ म्हणावं. हे फूल दुसऱ्याच्या घरात जिकडे तिकडे शू करून कशी अस्वच्छता मोहीम राबवतंय ते एकदा उघडय़ा डोळ्यांनी बघ म्हणावं. आत्याने मात्र हसत हसत ‘मुद्दामच त्याला डायपरची सवय लावली नाही आम्ही..’ असं पंख्याकडे बघत आम्हाला सांगितलं. ‘केवळ मूर्खपणा आहे हा. तुमच्या घरात तुम्ही त्याला चड्डीही घालू नका हवं तर. पण दुसऱ्यांकडे जाताना डायपर लावलाच पाहिजे. डायपरची सवय नाही ही काही अभिमानाने सांगण्याची गोष्ट नव्हे. आणि अगदी झाली सवय, तरी एक दिवस त्याला कळेलच ना, की आता इथून पुढे डायपर वापरायचा नाही,’ असं सरळ परखडपणे त्यांना सुनवावं असा विचार मनात येऊन गेला. बायको नावाच्या तोफेच्या भीतीने मूग गिळून गप्प बसलो. दोन तास माझ्या सहनशक्तीच्या सर्व परीक्षा घेऊन आत्या घरी जायला निघाली. जाताना अगदी ‘मावचीला शॉली म्हण- चूचू केली म्हणून..’ असा उसना अपराधीपणाचा आव आणत आत्या उद्गारली. ‘अहो, असू दे. राहू दे. लहान आहे. त्याला काय कळतंय?’ हे म्हणताना मला किती यातना होत होत्या ते परमेश्वरालाच ठाऊक. पुढच्या वेळी बागेत बांधून ठेवणार आहे मी असली मुलं.
त्याच संध्याकाळी माझी एक मैत्रीण, तिचा नवरा आणि अर्थात त्यांचं एक चतुर, चौकस आणि चौफेर बागडणारं अपत्य अचानक घरी येऊन थडकले. काय म्हणतात या अवस्थेला? तुटलेली बोटं घेऊन शाहिस्तेखान जेव्हा औरंगजेबाच्या भेटीला गेला तेव्हा त्याच्या मनात अशा प्रकारच्या संमिश्र भावनांचा हलकल्लोळ माजला असेल. शाहिस्तेखानाची बोटं तुटली. ही मैत्रीण गेल्यानंतर माझ्यावर बायको कसे आडवेतिडवे वार करणार आहे याचा विचार मी करायला लागलो.
सुरुवातीला बराच वेळ ते मूल आईला बिलगून होतं. म्हणालो, चला- सुटलो. पण जसं ते आईच्या मांडीवरून खाली उतरलं तसं त्याने स्वैर थैमान घालायला सुरुवात केली. कोंबडय़ा पकडताना जशी होईल तशी धावपळ त्याच्यामागे धावताना माझी होत होती. उगाच मोठमोठय़ांदी किंचाळत होतं. त्याचं किंचाळणं कमी व्हावं म्हणून त्याला कॅडबरी दिली. त्याने कॅडबरीने भिंती बरबटवून टाकल्या. ‘अ‍ॅक्टिव्ह आहे अगदी. मोठेपणी कुणीतरी मोठा चित्रकार होणार असं दिसतंय.’ खरं तर हे वाक्य मी खवचटपणे म्हणालो होतो. पण फालतू कौतुकाची झापड लावून घेतल्यामुळे ते पालक खवचटपणा वगैरे काही कळण्याच्या पलीकडे गेले होते. वास्तविक ‘अत्यंत मवाली, इब्लिस होणार आहे हे करट. पोलिसांपासून तोंड लपवत पळणार हा बंडखोर!’ असं म्हटलं असतं तरी काही चुकीचं ठरलं नसतं. तरी मनावर संयम ठेवत ‘म्हणतातच ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!’ असंच म्हणावं लागलं. असं मी म्हणेपर्यंत टिपॉयवरच्या फ्लॉवरपॉटचा आणि आमचा सहवास त्या नराधमाने कायमचा संपवला. मी यावेळी भारत- पाकिस्तान बॉर्डरवर शत्रूच्या गोळीलासुद्धा तोंड देऊ शकलो असतो; पण बायकोशी नजर मिळवण्याचं माझं धाडस काही होईना. फ्लॉवरपॉटचे तुकडे उचलून टाकतच होतो तेवढय़ात ‘टर्र्र्’ असा आवाज झाला. बघतो तर काय? ‘तुमच्या सकारात्मक विचारांची शक्ती’चा शक्तिपात झाला होता. त्या चाणाक्ष बालकाने ते पुस्तकच फाडायला सुरुवात केली. ते पुस्तक त्याच्या हातातून हिसकावून घेईस्तोवर त्याच्या अजून चार-पाच पताका झाल्या. ‘अस्संच करतो हा. जरा कुठलं मासिक हातात लागलं की फाडूनच टाकतो. त्यामुळे आम्ही सगळी मासिक, पुस्तकं माळ्यावरच ठेवतो.’ मी म्हणालो (अर्थात मनात), ‘मूल तुमचं आहे. ते कधीतरी भविष्यात आमच्या घरी आणाल म्हणून काय आम्ही पुस्तकं घेऊन सतत माळ्यावरच बसून राहायचं की काय?’ नवरा जरा सूज्ञ असावा. त्याने काहीतरी लालुच दाखवून त्याला आपल्याजवळ बोलावलं आणि मांडीवर बसवून त्याला खेळवायला लागला. काही कळायच्या आत चहाचा कप नवऱ्याच्या शर्टवर उपडा झाला. त्या पिसाळलेल्या कोवळ्या बालकाने आपला हात त्या चहाच्या कपावर मारला आणि गरम चहा नवऱ्याच्या अंगावर सांडला. थोडय़ाच काळात त्या काटर्य़ाने दहशतच निर्माण केली होती. हळूच नजरेच्या कोपऱ्यातून बघितलं तर बायको माझ्याकडेच नजर रोखून बघत होती. युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं असं मला वाटलं. पण कुकरची शिट्टी वाजली आणि त्या बिचाऱ्या आई-बापांचीही. दोघेही तो चालता-बोलता उत्पात उचलून निघायला लागले. ‘मला असं एकटय़ाला बायकोच्या तावडीत सोडून जाऊ नका,’ असं मला त्यांना कळकळीने सांगावंसं वाटत होतं. पण ते निघून गेले. कुठून गोळी येतीये का? की कुठून बॉम्ब पडतोय अंगावर? असा लपतछपत मी घरात शिरलो. बायकोला समोर बघून दचकलो. म्हटलं, ‘अरेच्चा! होतं असं कधी कधी. वेळ काय कुणावर सांगून येते का? आणि एवढं काय झालं? सगळ्याच गोष्टी आपल्या हातात थोडीच असतात! आणि लहान मुलं इकडून तिकडून सारखीच. दंगामस्ती करण्याचं वयच आहे त्यांचं. हे बघ, आजच्या दिवसाची सुरुवात एवढी छान झालीये. उगाच नस्त्या गोष्टींमुळे आपल्यात भांडणं नकोयत.’ यावर शांतपणे बायको म्हणाली, ‘मी काहीच बोलले नाहीये.’ असं म्हणून हसत हसत ती निघून गेली. त्या हसण्यामागे केवढा अर्थ दडला होता हे मी वेगळं सांगायला नको. मी आपला ‘तुमच्या सकारात्मक विचारांची शक्ती’ची पानं चिकटवत खाली मान घालून बसलो.
निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
actor amit tandon cheated wife ruby tandon
पत्नीची अनेकदा फसवणूक केली, अभिनेत्याचा स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल खुलासा; घटस्फोट घेतल्यावर सहा वर्षांनी पुन्हा तिच्याशीच केलं लग्न
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल