संदीप भानुदास तापकीर

इतिहास कथेच्या रूपात सांगितला तर तो लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतो. बबन मिंडेंनी ‘गुलामराजा’ या कादंबरीत तेच केलं. सध्याच्या वास्तवाला भिडत मिंडे या कादंबरीतून दीडशे वर्षांचा कालपट आपल्यासमोर उभा करतात. कादंबरीचा पहिला भाग ‘सत्याग्रह’. यात तत्कालीन मुळशी पेटा धरण होण्याआधी कसा होता, तेथील संस्कृती, परंपरा, रितीरिवाज, यात्राजत्रा, उदरनिर्वाहाचे साधन यातून ते तत्कालीन मुळशी पेटा उभा करतात. अचानक धरणाची कल्पना येते. धरण होतं आणि येथील गावांसह उदरनिर्वाहाची साधनं तर बुडतातच पण इथली संस्कृतीही बुडते. धरणात सर्वस्व बुडालेले येथील शेतकरी पोट भरण्यासाठी मिळेल त्या दिशेने जातात. या पहिल्या भागातील सत्याग्रहाचा इतिहास खूप चित्रमय पद्धतीने समोर येतो.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

‘गुलामराजा’ या कादंबरीत शेतकऱ्याचा ‘राजा’ ते ‘गुलाम’ असा प्रवास मिंडेंनी ज्या पद्धतीने मांडला आहे, त्यावरून आपण शहरात राहून, सगळी आधुनिक सुखं उपभोगणारे किती असंवेदनशील आहोत याची जाणीव होते. ही कादंबरी म्हणजे लेखकाच्या ‘सत्याग्रह’या कादंबरीचाच पुढचा भाग आहे. ‘सत्याग्रह’ कादंबरीचा नायक म्हादू बोडके आपल्या कुटुंबाला घेऊन आपल्याच डोंगरातल्या जमिनीच्या तुकडयावर राहायला येतो. त्याच्यासारखी इतरही तीन-चार कुटुंब येतात. त्यात महारवाडयातल्या शिवा महाराचं कुटुंबही येते. हे डोंगराचं पठार असल्याने सगळे आपण राहतो त्याला पठारवस्तीच म्हणायला लागतात. ही पठारवस्तीच त्यांचं गाव आणि तेच त्यांचं जग होऊन जातं. इथंच आपल्या मालकीच्या जागेत ते वावरं काढून जगू लागतात. नामदेव म्हादू बोडकेचा नातू. त्याला धरण झाल्यावर पन्नाससाठ वर्षांनी कळतं, की आपण आपली म्हणून जी जमीन कसत आहे ती आपल्या नावावर नाही. तीही एका कंपनीच्या नावावर आहे. कंपनीने धरणासाठी जमिनी घेतल्यावर पार डोंगरापर्यंतच्या जमिनी आपल्या नावावर करून ठेवल्या आहेत आणि आपण आपल्याच जमिनीचे कंपनीला भाडे भरत आहोत. हे कळल्यावर त्याचा संघर्ष सुरू होतो. आपली जमीन आपल्या नावावर करण्याचा, आपण राहत असलेल्या पठारवस्तीला गावठाण दर्जा मिळण्याचा. स्वतंत्र भारतात घडणारी नामदेवची ही कथा वाचताना सतत वाटतं की नामदेवसारख्यांना अजून स्वातंत्र्य मिळालेच नाही. ते अजूनही गुलामगिरीतच जगत आहेत. खरं तर धरण होण्याआधी आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी ते आपल्या जमिनीत, आपल्या गावात स्वयंपूर्ण जीवन जगत होते. ते आपल्या बांधावर राजा होते. पण देशाच्या प्रगतीसाठी त्यांचं सर्वस्व लुटलं आणि त्यांनाच गुलाम बनवलं. नामदेवला भीती आहे की, आता ज्या जमिनीवर आपण जगत आहोत ती जमीनही धरणाची उंची वाढवल्यावर कंपनी ताब्यात घेते की काय? कारण पठारवस्तीवर अशा घटना घडायला सुरुवात झाली होती. म्हणूनच नामदेव आपली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी धडपडत आहे. त्याची धडपड पाहून वाचकाचं मन अस्वस्थ होतं. सरकारची धरणग्रस्तांबद्दलची उदासीनता वाचकाच्या लक्षात येते. ज्यांच्या पिढयान्पिढया शेतीवर जगत आल्या त्या नामदेवच्या नावावर सातबारा नाही. आणि आजोबांनी बांधलेलं आपल्या जमिनीतलं घर आणि सगळी वस्तीच कंपनीच्या जागेत आहे, हे कळल्यावर तो आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या अस्तित्वासाठी जे प्रयत्न करतो त्याची ही कथा आहे.

धरणामुळे पठारवस्तीला आलेलं बेटाचे स्वरूप, त्यामुळे शाळा जवळ नाही. लांबची शाळा ही दुर्गम भागात असल्याने तिथे शिक्षक टिकत नाही. त्यामुळे पठारवस्तीवर शिक्षणाचा अभाव. पण चौथीपर्यंत शिकलेला नामदेवचा मुलगा तुकारामला अक्षर ओळख होते आणि तो पठारवस्तीवर वर्तमानपत्र वाचून दाखवतो. आंदोलने, निवेदने, मोर्चे, नेत्यांची भाषणं यातून पठारवस्तीला बाहेरील घडामोडी कळत राहतात, पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. जिल्हाधिकारी पुनर्वसन अधिकाऱ्याकडे, पुनर्वसन अधिकारी पुनर्वसन मंत्र्यांकडे प्रकरण ढकलत राहतात. यातून सरकार आणि भांडवलदारांचे हितसंबंध लक्षात येतात. त्यांच्यापुढे धरणग्रस्त अगदीच तुच्छ आहे. अशा वेळी मोठया उमेदीने लढणारा नामदेव आता हतबल वाटायला लागतो.

कादंबरी शेवटाकडे येते तेव्हा नामदेवचा मुलगा तुकाराम आणि त्याची पिढी या आंदोलनाशी जोडते. गांधीजींच्या अहिंसक मार्गाने सुरू झालेला हा लढा नामदेवच्या पिढीपर्यंत अहिंसक मार्गानेच लढला गेला, पण तुकारामच्या पिढीचा या मार्गावरील विश्वास उडालेला दिसतो. मग हिंसा आणि अहिंसेमधील द्वंद्व सुरू होतं. आंदोलनाची मोठी शिदोरी घेऊन वाटचाल करणारे नेते या पिढीची समजूत काढतात. आता मोठा भांडवलदार आणि सरकारविरोधात उभं राहायचं असेल तर स्थानिक नाही तर देश पातळीवरील नेत्याची गरज त्यांना वाटायला लागते आणि हे धरणग्रस्त जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाशी जोडले जातात. विनायकराव भुस्कुटे, सेनापती बापट यांच्यापासून सुरू झालेल्या या लढयाचं नेतृत्व आता नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्याकडे येतं. त्यामुळे येथील धरणग्रस्तांमध्ये एक वेगळी ऊर्जा येते. ‘जान किंवा जमीन’ या घोषणेपासून सुरू झालेला मुळशीचा लढा ‘लढेंगे जितेंगे’ या घोषणेपर्यंत येतो. पुन्हा एकदा नवी आशा घेऊन शंभर वर्षांच्या त्याच मागण्यांसाठी हे धरणग्रस्त पुन्हा नव्या आशेनं पोटतिडकीने घोषणा देतात, लढेंगे जितेंगे.

आज देशभर धरणग्रस्तांची आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनांचं पुढे काय होतं हे पहायचं असेल तर शंभर वर्षांपूर्वी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी झालेल्या जगातील पहिल्या धरणविरोधी लढयाचं काय झालं आणि त्यावेळी ज्यांच्या जमिनी धरणात बुडाल्या त्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढया आज कुठे आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. ‘गुलामराजा’ कादंबरी तोच शोध घेत वास्तव सांगते.

‘गुलामराजा’, बबन मिंडे, पॉप्युलर प्रकाशन, पाने- ३९१, किंमत- ५५० रुपये.