गुलजार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मिर्झा गालिब यांच्या जगण्याला अनेक पदर होते. अलवार आणि तितकेच गूढदेखील. हा माणूस उत्तम शायर तर होताच; शिवाय त्यांना जगण्याच्या प्रत्येक अंगाविषयी कुतूहल होतं. ‘मरण’ संकल्पनेविषयी गालिबना आकर्षण होतं. मानवी नातेसंबंध, प्रेम यांबद्दल चौकस कुतूहल होतं. या कवीचा मोठेपणा हा, की सामान्य माणूस म्हणून जगता जगता तो असामान्य शायरी करून गेला. शायरीतलं असामान्यत्व आणि जगण्यातलं सामान्यपण हे त्यांच्या बाबतीत हातात हात घालूनच चाललं. त्यांच्या कवितेवर नितांत प्रेम करणारे तितकेच उत्कट कवी गुलजार यांना गालिबच्या अनेकपदरी जगण्याविषयी कायम आकर्षण वाटत राहिलंय. विविध कोनांतून गालिब समजून घेण्याचा प्रयत्न गुलजार नव्याने करताहेत. ‘..सहर होने तक’!
हा त्याचा प्रारंभ.
उधार घेणं ही काही वाईट गोष्ट नाही. ती फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. पूर्वी कुठल्या वस्तूची गरज पडली- आणि खिशात दमडी नसली तरी कुणा श्रीमंताकडून वा वाण्याकडून उधारउसनवारी करून लोक वस्तू विकत घेत. किंवा मग सावकाराकडून.. जो व्याजाने पैसे उधार देत असे. आज असे अनेक सावकार निर्माण झाले आहेत. दुकानदार आहेत. बॅंका आहेत.. ज्या हल्ली जोरजोरात डंका पिटून, आकर्षक जाहिराती करून लोकांना बोलावतात : या आणि कर्ज घ्या, म्हणून. गरज नसताना ही ‘सावकार’ मंडळी पिच्छा पुरवतात.. की, या बाबांनो- आणि उधारीवर वस्तू विकत घ्या; नंतर पाहिजे तर या वस्तूंची ‘गरज’ निर्माण करता येईल! कूकर असो, फ्रिज असो, घर असो; सहज-सोप्या हप्त्यांवर यांची गरज असो-नसो.. तुम्ही उधारीवर घ्या. उधारीची ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ‘सव्वा शेर गव्हा’पासून ते जिओ मोबाइलपर्यंत. प्रत्येक काळातली गरज वेगळी. खूप लांबची गोष्ट नाहीए ही. विसाव्या शतकात मुन्शी प्रेमचंद यांच्या ‘सव्वा शेर गेहू’ या कथेतल्या शंकरने सव्वा शेर गहू उधारीवर घेतले होते. पण ते परत करता न आल्यानं बिचाऱ्याला मजदूर बनावं लागलं आणि त्याचं संपूर्ण आयुष्यच गहाण पडलं. ही परंपरा आजही सुरूच आहे. गरजा यापूर्वीही होत्या; आजही आहेतच. परंतु उधारी वसूल करण्याची परंपरा तेव्हा इतकी कठोर नव्हती. लोक मिशीचा केस गहाण ठेवूनदेखील माल उधार घेत. माणसाच्या शब्दाला किंमत होती. शब्दही तारण ठेवला जाई. माणसानं दिलेलं वचन पुरत असे त्या काळी. केवळ एक सही किंवा अंगठा! बस्स!! हां.. अर्थात उधारीची परतफेड झाली नाही तर कानूनही होतेच. वसुलीचे. देणेकऱ्याच्या मकानावर कब्जा करत. त्याच्या मालमत्तेचा लिलाव होई. आणि यातलं काहीच शक्य झालं नाही तर कानून देणेकऱ्याला बेडय़ा घालून तुरुंगात डांबत असे. जी खूपच शरमेची गोष्ट असे. क्वचित अशा मामल्यांत कधी बडय़ा असामीही असत. कधी बेरोजगारीपायी, कधी धंद्यात आलेल्या खोटीमुळे. किंवा कधी माणसाच्या गरजाच उधारीपेक्षा जास्त झाल्यानं. कर्जाच्या परतफेडीचा मार्ग खुंटल्यानं. आणि कधी कधी असंही होई, की एखाद्या गोष्टीच्या आशेवर उधारी घेतली जाई; पण ती आशाच फोल ठरे.
‘कोई उम्मीद बर नहीं आती
कोई सुरत नजर नहीं आती..’
मिर्झा गालिब.. अपने सदीं के सबसे बडे शायर.. जे पेन्शनच्या आशेपायी कर्जावर कर्ज घेत राहिले आणि काही मजबुरीयांमुळे मग त्यात रुततच गेले. मनानं ते दिलदार होतेच. स्वाभाविकपणे खर्चही ते मुक्तहस्ते करत. अशात दरबारातून मिळणारी आमदनीही फारशी नव्हती. तशात उधारीचा डोंगर सतत वाढत चाललेला. पेन्शन आली की सगळ्यांचं देणं चुकतं करू.. या आशेवर!
घरात दोन नोकर होते. एक कल्लन आणि दुसरी वफादार.. जी थोडीसं बोबडं बोलायची. आणि एक वकील होते.. हिरालाल.
कर्जाचा डोंगर वाढत गेला तशी दरवाजावर देणेकऱ्यांची वर्दळही. वफादार कसंबसं समजावून, बाबापुता करून त्यांना परत पाठवायचा प्रयत्न करी. एकदा अशीच देणेकऱ्यांना टाळण्याचा प्रयत्न करत वफादार सांगत होती.. ‘हजलत, मिर्झासाब महलौलीला गेलेत. पलत यायला उशील होईल त्यांना. तुम्ही आला होतात असं सांगेन मी साहेबांना. लवकलच आमच्या हुजुरांना जहागिरी मिलायचीय..’
उधारी वसूल करायला आलेल्या वाण्यानं आपला निर्धार जाहीर केला. म्हणाला, ‘आम्हाला आमचे पैसे हवेत बिबीजी.. जहागीर नकोय. मिर्झाना म्हणावं, स्वत:च पैसे घेऊन या दुकानावर. खरं तर पैशासाठी तगादा लावणं आम्हाला नको वाटतं. पण..’ बनिया नाइलाजानं स्वत:शीच बडबडत निघून गेला.
परंतु तितक्यात दुसरा समोर उभा ठाकला. त्यालाही मिर्झाजींच्या परत येण्याची प्रतीक्षा होती. वफादारनं एका देणेकऱ्याला कसंबसं टाळलं होतं, तोच हा दुसरा समोर हजर!
हे दुसरे गृहस्थ होते- सईदसाहेब. कापडाचे व्यापारी.
‘तुम्हीही निघा म्हणते मी सईदसाहेब. एका शायलला पलेशान कलून तुम्हाला काय मिलणालंय?’ वफादारनं सईदसाहेबांना गोड बोलून कटवायचा प्रयत्न केला.
‘आम्ही कुठं परेशान करतोय बिबीजी? तूच तर बोलावलं होतंस ना? म्हणूनच आलो होतो मी.’
‘आम्हाला कुठं ठाऊक होतं, की मिर्झासाहेबांना सकाली सकालीच महलौलीला जायला लागेल?’
‘मग कधी यावं आम्ही?’
‘साहेबांशी बोलून कलवेन मी. खुदा हाफिज.’
ब्याद एकदाची टळली म्हणत वफादार घरात गेली.. आणि सईदसाहेब परत निघण्यासाठी वळले तोच त्यांना समोरून मिर्झासाहेब येताना दिसले. तसे सईदसाहेब एकदम थांबले.
‘तसलीम..’
‘तसलीम. फरमाईए..’
‘त्याचं असं आहे मिर्झाजी.. की वफादार गेल्या महिन्यात आमच्याकडून कापड घेऊन गेली होती. तुमच्या पत्नीनं मागवलंय असं सांगून. तुमचा अंगरखा बनवण्यासाठी!’
मिर्झासाहेब हसले. म्हणाले, ‘कर्ज घेण्यात मी कमी पडलो होतो म्हणून की काय, आता आमच्या पत्नीनंही उसनवारी करायला सुरुवात केलीय..’
‘पण मला तर सांगितलं होतं की..’
मिर्झानी त्यांना मधेच थांबवलं. म्हणाले, ‘सईदसाहेब, चांगली पेन्शन येत होती मला. ती थांबलीय. हिरालाल वकील आहेत ना- त्यांच्याकडे माझ्या या मुकदम्याचं काम सोपवलंय. आजच त्यांना भेटून पेन्शनीचं काय होतंय ते विचारतो..’
‘मिर्झाजी, मला शरमिंदं नका करू. मी काही तगादा लावायला नव्हतो आलो. बोलावलं नसतं तर कधी आलोही नसतो. आदाब.’
सईदसाहेब एवढं बोलले आणि सरळ निघून गेले. मिर्झाना एकाएकी लाज वाटली स्वत:ची. सईदसाहेब काही लागट, झोंबणारे बोल सुनवून गेले असते तर तितकं वाईट नसतं वाटलं. पण ते काहीच न बोलता निघून गेले, हे मिर्झाना खूप जिव्हारी लागलं. मिर्झा सईदसाहेबांना जाताना पाहत राहिले. अन् एक शेर आपसूक त्यांच्या तोंडून बाहेर पडला..
‘काबा किस मूंह से जाओगे गालिब
शर्म तुमको मगर नहीं आती..’
मिर्झा गालिब तिथून सरळ आपले वकील हिरालालजी यांच्या कचेरीत गेले आणि त्यांनी त्यांना सारी हकिकत ऐकवली. हिरालालांचाही संयम आता संपत आला होता. मिर्झा गालिबना खरं-खोटं काय ते एकदाच सांगून टाकण्याविना आता गत्यंतर उरलं नव्हतं. त्यांनी सरळ मिर्झाना सवाल केला-
‘हे एवढं सारं कर्ज कसं काय फेडणार आहात तुम्ही मिर्झा? नको इतका पाण्यासारखा पैसा रोज खर्च करताहात. एवढे कोर्टकज्जे कसे काय लढवणार आहात तुम्ही?’
मिर्झा गप्प झाले.
‘इकडे मथुरादास तुमच्यावर टाच आणू बघताहेत. तिकडे देणेकऱ्यांची घरी रांग लागलीय. आणि पेन्शनचं तर अजून कशात काही नाही. कधी मिळणार, कोण जाणे! खुदा करे.. निर्णय तुमच्या बाजूनंच लागो. पण..’
हिरालालना मधेच अडवीत मिर्झानी विचारलं, ‘कोर्टकचेरीच्या प्रकरणांतही जर खुदाच फैसला करणार असेल तर मग तुम्ही कसली वकिली करताहात हिरालालजी? माझा हक्क मिळावा म्हणून तर खटला तुमच्या हाती सोपवलाय..’
हिरालाल हसले. म्हणाले, ‘आणि माझा हक्क? तो कधी मिळणार?’
मिर्झा मोजडी चढवू लागले. परंतु हिरालालना त्यांच्याकडून उत्तर हवं होतं.
‘सगळी गझल चांगली होती- हिरालाल.. पण शेवटचा शेर मात्र आवडला नाही आम्हाला. माझी पेन्शन तेवढी मिळवून द्या आणि आपला हक्क काय तो घेऊन जा तुम्ही.. त्यासाठी हवं तर माझ्याकडून तक्रार-अर्ज लिहून घ्या. पाहिजे तर काम करणाऱ्या साहेबांची स्तुती करणारं एखादं काव्य लिहून देतो मी. याउप्पर त्यांच्याकडून काम कसं करवून घ्यायचं, ती तुमची जबाबदारी!’ मिर्झा म्हणाले.
मिर्झा तिथून जाण्यासाठी म्हणून उठून उभे राहिले. इतक्यात हरगोपाल ‘तफ्ता’ तिथे आले. हरगोपाल ‘तफ्ता’ हे गालिबच्या काळातले एक समकालीन शायर होते. आणि गालिब यांचे शागीर्दही. मिर्झाना तिथे बघून तफ्तांना आश्चर्य वाटलं.
‘तुम्ही इथं काय करताय उस्ताद?’
गालिबने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, ‘आतापर्यंत सर्वात सुरक्षित जागा आहे ही असं मला वाटत होतं. पण आता हिरालालजीही भरपाई मागायला लागलेत. निघतो मी. आदाब..’ असं म्हणून मिर्झा तडकाफडकी निघून गेले.
तफ्ता त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर बसले.. आणि मिर्झानी जिथे वाक्य अधुरं सोडलं होतं तिथूनच सुरुवात करत म्हणाले, ‘आदाब हिरालालजी. असा दिलवाला माणूस अख्ख्या जगात दुसरा पाहिला नाही मी. पायाच्या अंगठय़ापासून डोक्याच्या टाळूपर्यंत फक्त काळीजच काळीज आहे या माणसाला.’
हिरालालनी त्यावर काहीसं चिडूनच उत्तर दिलं.. ‘फक्त काळीज असून चालत नाही ना आजकाल यार हिरालाल. डोकंसुद्धा लागतं माणसाला. दहाची पाच हजारावर आली मिर्झाची पेन्शन. पाचचे तीन हजार झाले. अन् आता तर केवळ साडेसातशेवर. त्यात ह्य़ांचा वाटा किती? तर फक्त बासष्ट रुपये आठ आणे, इतकाच. म्हणजे बघा- मिर्झा जे पेन्शनचे खरेखुरे हकदार आहेत, ते तसेच राहिले.’
‘काही मिळेल अशी आशा वाटतेय..?’
‘सगळं काही रीतीनं मिळालं तर मालेमाल होतील ते. पण.. पण नाहीच मिळाली पेन्शन, तर उरलेलं आयुष्य कंगालीत कंठावं लागेल.’
‘परंतु काही मिळण्याची खरोखरीच आशा आहे?’ तफ्तांनी पुन्हा विचारलं.
‘सगळं काही कंपनी बहाद्दूरच्या मर्जीवर अवलंबून आहे. खरं सांगू? आपल्या बादशहाचं आता काहीएक चालत नाही.’
तफ्ताने तोच प्रश्न तिसऱ्यांदा विचारला.. ‘पण काही मिळण्याची आशा..?’
‘मला वाटतं, जनरल मटकाफच याबाबतीत काहीतरी करू शकेल. परंतु हल्ली तो कलकत्त्याला असतो.’
‘म्हणजे मिर्झाना कलकत्त्याला जावं लागेल?’
हिरालालने होकारार्थी मान हलवली.
गालिब कलकत्त्याला गेले. मात्र, दीड वर्ष अथक पाठपुरावा करूनही त्यांना निराश होऊन तिथून परतावं लागलं. गालिबचे मित्र मुफ्तीसाहेब यांनी गालिबना दिल्ली कॉलेजात प्रोफेसरकी मिळत होती, ती त्यांनी घ्यावी म्हणून खूप प्रयत्न केले. परंतु निव्वळ इगोखातर गालिबनी त्यास साफ नकार दिला. आणि ते घरी परत आले.
मुफ्तीसाहेबांचा पिच्छा सोडवणं कसंतरी शक्य होतं; परंतु वकील हिरालाल असे तसे मानणारे नव्हते. त्यांनी मिर्झाना चांगलंच फैलावर घेतलं. वकीलसाहेब आपल्या कचेरीत कायद्यांच्या पुस्तकांच्या गर्दीत बसले होते. त्यांनी गालिबना संतापून म्हटलं, ‘नोकरीधंदा तुम्ही काही करणार नाही. पेन्शन तुम्हाला मिळणार नाही. आणि खर्चही तुम्ही कमी करणार नाही. मग काय करणार काय तुम्ही? आयुष्यभर जुगार खेळून पोट भरणार? विसरा- की बादशहा तुम्हाला कधीतरी दरबारात सन्मानाने राजकवी म्हणून बोलावतील. कवी इब्राहिम जौक जोवर तिथे आहेत, तोवर बादशहा तुम्हाला बोलावणं शक्यच नाही..’
वकिलाला गप्प कसं करायचं? त्यात आणखीन जर का तो तुमचा मित्र असेल, आणि वर घुश्श्यातही असेल, तर..? गालिबना काय करावं कळेना.
एवढय़ात वकीलसाहेब पुन्हा बरसले..
‘जेवढं म्हणून कर्ज घेता येणं शक्य होतं तेवढं तर तुम्ही घेतलेलं आहेच. वर इतकं कर्ज केलंयत, की जितकं तुम्ही खरं तर घेताच कामा नये होतं. कुठून आणि कसं फेडणार आहात हे सारं कर्ज? तुमच्यापाशी विकायला आणि गहाण टाकायलाही आता काही उरलं नाहीए. भाडय़ाच्या घरात राहता. आणि..’
गालिब निमुटपणे सगळं ऐकत होते.
‘काही समजतंय का, की मी काय बोलतोय ते?’
गालिब अतिशय शांत स्वरात म्हणाले, ‘तुम्ही जे काही सांगताहात ते मला आधीच ठाऊक आहे. जे मला माहीत नाही ते हे, की उद्या जेव्हा मथुरादास माझ्या घरावर जप्ती घेऊन येईल तेव्हा नेमकं काय होणार?’
हिरालाल आतापर्यंत गांभीर्याने मिर्झासमोर वस्तुस्थिती मांडत होते. त्यांच्या या शांत स्वरातील उत्तरानं ते आणखीनच भडकले. म्हणाले, ‘कोर्टाचे चार शिपाई तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला धरून नेऊन कोर्टात उभं करतील.’
मिर्झानी काहीशा दबल्या आवाजात विचारलं, ‘बेडय़ाही घालतील मला?’
‘नाही. तो अधिकार नाहीए त्यांना. परंतु दोन शिपाई पुढे आणि दोन मागे अशा थाटात तुमची रस्त्यातून मिरवणूक काढतील ते. मान खाली घालून तुम्हाला तुमच्या गल्लीतून जावं लागेल. लाज व शरमेनं तुम्ही जमिनीत गाडले जाल. तुम्हाला कोर्टात नेऊन ते थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतील.’
..आणि खरंच, प्रत्यक्ष जेव्हा कोर्टाचे शिपाई मिर्झाना घरातून घेऊन जात होते तेव्हा हरगोपाल ‘तफ्ता’ दूर गल्लीच्या तोंडावर दु:खभरल्या चेहऱ्यानं त्यांना पाहत उभे होते.
गालिबना कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. समोर मॅजिस्ट्रेट. कोर्टातील इतर सेवकगण. मिर्झाचे वकील हिरालाल यांनी काही कागदपत्रं आदरपूर्वक कोर्टाच्या कारकुनाकडे सुपूर्द केली आणि ते मॅजिस्ट्रेटना सलाम करून आपल्या जागेवर येऊन बसले. कारकुनाने मॅजिस्ट्रेटना ती सादर केली. कोर्टात बरेच लोक उपस्थित होते. काहींना या खटल्यात रस होता, तर काही तमाशा बघायला मिळेल म्हणून आले होते. गालिबची नजर झुकलेली होती. ते आपल्याच तंद्रीत मग्न होते. त्यांना आपल्या आतला धिक्कारणारा आवाज ऐकू येत होता. बस्स.. आपण फक्त एक तमाशा बनून राहिलोय आज. अत्यंत अपमानित होऊनही निलाजरेपणी उभे आहोत इथं. स्वत:लाच सांगतो आहोत.. घे.. गालिब, तुला आणखीन एक सणसणीत पायताण खावी लागलीय. खूप मिजास करत होतास ना, की माझ्यासारखा महान शायर दूर दूपर्यंत नाही. मग आता घे.. देणेकऱ्यांना काय ते उत्तर दे. निर्लज्ज.. बेशरम.. कोठीवरून शराब, मजारवरून कपडा.. फळविक्याकडून आंबे.. सावकाराकडून पैसे.. कर्जावर कर्ज घेत राहिलास. याचाही विचार केला असतास कधी.. की हे कर्ज आपण कसे फेडणार आहोत?
गालिब पश्चात्तापानं स्वत:लाच दूषणं देत होते. त्यांच्या तोंडून नकळत एक शेर बाहेर पडला..
ग़म-ए-हस्ती का ‘असद’ किस से हो जुज़्ा मर्ग इलाज।
शमा हर रंग में जलती हैं सहर होने तक।
lokrang@expressindia.com