सकाळची वेळ. वाडय़ाचं पुढचं आणि मागचं दार घट्ट लावून घेतलंय. वाडय़ातल्या खोल्यांतून, माडीवर शोध सुरू आहे. शोध घेणारी वाडय़ातलीच वडीलमाणसं आहेत. शोध कुणाचा घेतला जातोय? तर या वाडय़ातलाच एक १२-१३ वर्षांचा मुलगा आहे. घडलंय काय एवढं भयंकर? तर विशेष असं काही नाही. थोडय़ाफार फरकानं lok01दर महिन्याला हा प्रसंग या वाडय़ात घडतो. म्हणजे हजामत करणारे कोंडबामामा स्वत:ची धोकटी सावरत वाडय़ात प्रवेश करतात आणि गब्बरसिंगवाल्या माणसांच्या चाहुलीनं गाववाल्यांचा थरकाप उडावा तशी वाडय़ातल्या लहान पोरांची लपालप सुरू होते. पण धान्याच्या कणगीमागे लपलेलं किंवा देवघरातल्या कोपऱ्यात समईच्या मंद प्रकाशात अंधूक झालेलं किंवा जिन्याखालच्या अंधारात दडलेलं किंवा परसातल्या कडब्याच्या आडोशाला लपून बसलेलं पोर, मोठी माणसं एखादा उंदीर धरून आणावा तसं आणून कोंडबामामाच्या पुढय़ात सहज हजर करीत. पोराची प्रचंड आरडाओरड, रडारड, हातपाय झाडणं, अंग टाकून देणं सुरू असे. ही धरपकड सुरू असताना वाडय़ाची दोन्ही दारं बंद करण्याची प्रथा पडली. त्यालाही एक कारण आहे. एकदा कोंडबामामाच्या चाहुलीनं हे पोर उघडय़ा दारातून चक्क पसार झालं. नुस्तं पसार झालं नाही, तर थेट पोचलं वेशीजवळच्या कोंडबामामाच्या घरासमोर. रागापोटी कोंडबामामाच्या घरावर दगड भिरकावले. पत्र्यावर दगड पडतायत म्हणून कोंडबामामाची बायको ओरडत सुटली. तिला हा भुताटकीचा प्रकार वाटला. या भुताटकीच्या मागे असणारं पोर नंतर वाडय़ातच दार लावून कोंडलं जाऊ लागलं.
एखाद्या पशुवैद्यकानं गायी-म्हशीला उपचारासाठी लोखंडी सापळ्यात अडकवावं तसं या पोराला कोंडबामामाच्या पुढय़ात ठेवलं जाई. निसटला तर मोठे भाऊ-बहीण सावध उभे असत. आईचा प्रत्यक्ष सहभाग नसे, पण तिचं तोंड मात्र सुरू असे- ‘‘काय वाढलंय ते टारलं, त्या केसांना तेल नको, फणी नको. सगळे भिकारी लक्षणं. गल्लीला आयता तमाशा. लपूलपू बसतं घरात. जसं काय कोणी याचा मेंदू काढून घेतंय.’’ या सगळ्यांचं म्हणणं त्यांच्या दृष्टीनं असेल बरोबर. पण कटिंग म्हणलं की लहान पोरं प्रचंड घाबरायचे. कारणंही तशीच होती. कोंडबामामा अंगणातल्या पोत्यावर बसून त्यांच्या दोन्ही गुडघ्यांत डोकं गच्च दाबून धरायचे. जराही हलू द्यायचे नाहीत. त्या कचकच वाजणाऱ्या कात्रीने आणि चिमटे बसणाऱ्या करकर मशीनने केसांना होत्याचं नव्हतं करायचे. सुंदर काळ्याशार केसांचे पुंजके पोत्यावर पडायचे. रडू आल्यामुळं ते पुंजकेही अंधूक दिसायचे. अशा वेळी विजयी उन्मादानं कानाजवळ कात्री कचकच वाजत असायची. एखादं गुबगुबीत मेंढरू लोकरीसाठी भादरून काढावं तसा कटिंग केलेला चेहरा गरीब दिसायचा. बरं, आरसा नसल्यामुळं कोंडबामामा कशी कट मारतायत ते कळायला मार्ग नव्हता.
एखादा हुकूमशहा हातातल्या धारदार शस्त्राने माणसं कापीत सुटावा तसा आविर्भाव कोंडीबामामांचा असे. उभी असलेली वडीलमाणसं चेअरिंग केल्यासारखे कोंडबामामाला, ‘अजून बारीक करा, अजून बारीक करा’ असं म्हणत राहायचे. धारदार वस्तरा, कचकच कात्री, चिमटे घेणारी मशीन शिवाय गुडघ्यात गच्च पकडलेलं डोकं यात कंगवा थोडा मवाळ होता. पण यांच्या संगतीत राहून कंगव्यालाही भरपूर दात फुटलेले होतेच. कटिंग म्हणजे या सर्वाची भीती तर होतीच. पण दुसरं एक दु:ख होतं. त्या काळात हिंदी सिनेमाच्या प्रभावामुळं प्रत्येक पोराला हिप्पी कट ठेवण्याची इच्छा असे. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यासारखे कानावर येणारे केस ठेवण्याची फॅशन होती आणि इथं तर पार पैलवान कट मारला जाई. कटिंग केल्यानंतर काही दिवस तर फारच लाजिरवाणं वाटे.
कातडय़ाच्या पट्टय़ावर घासून वस्तरा धारदार ठेवणारे कोंडबामामा स्वत: मात्र शांत होते. मोठय़ा माणसांशी काहीतरी गुपितं सांगितल्यासारखं बोलायचे. याशिवाय त्यांच्याकडं गावात आवतन (जेवण्याचं आमंत्रण) सांगण्याचं काम होतं. बारसं, लग्न, तेरवी असं काहीही असू द्या, कोंडबामामा आवतनं सांगत फिरायचे. अशा वेळी त्यांची जुनाट सायकल सोबत असायची. पण फार कमी वेळा ते सायकल चालवत असत. बरेचदा सायकल हातात धरून पायी चालत असत. त्यांच्या सायकल चालवण्यात एक गंमत होती. गावातल्या अरुंद गल्ल्या. सायकलसमोर कुणी आलं नाही तरी कोंडबामामा सारखं ‘सरकाऽऽ.. सरकाऽऽ’ असं जोरजोरात ओरडत राहायचे. कारण सायकलला घंटी नव्हती. त्यापेक्षा गंमत म्हणजे, कोंडबामामाला सायकल चालवताना वळवता येत नव्हती. मग अशा वेळी वळणावर ते चक्क सायकल थांबवायचे, खाली उतरून, सायकल उचलून तिचं हवं त्या दिशेला तोंड करून ठेवायचे आणि पुन्हा सायकलवर बसून पायडल मारीत पुढं जायचे.
पुढं काही वर्षांनी गाव बदलू लागलं. गावात सलूनचं एक दुकान झालं. हे नवं कटिंगचं दुकान म्हणजे गावभर चर्चेचा विषय होता. त्या दुकानातल्या मऊ गाद्यांच्या उंच खुच्र्या, फुसफुस करीत चेहऱ्यावर पाण्याचे तुषार उडवणारी बाटली, आख्खा माणूस दिसेल एवढे मोठ्ठाले चकचकीत आरसे, भरमसाठ लावली जाणारी सुगंधी पावडर, नेहमी सुरू असणारी हिंदी सिनेमाची गाणी, भिंतीवर अमिताभ बच्चन, राजेश खन्नाचे लावलेले फोटो, फुकट चाळायला मिळणारा ‘मायापुरी’चा फिल्मी अंक. त्यातले नट-नटय़ांचे रंगीत फोटो अशी मौज होती. इथं कटिंग करायला जाणं पोरांनाही आवडू लागले. बरेचदा तर उगीच त्या दुकानासमोर थांबून दुकानातल्या घडामोडी पाहत शाळेत जाणारी-येणारी पोरं थांबत. या सलूनमध्ये कटिंग करणं घरच्यांना आवडणं शक्य नव्हतं. पोरं मात्र हट्टाने या सलूनमध्ये जाऊ लागले. कोंडिबामामाचं काम कमी झालं. तरीही जुनाट सायकलचा काठीसारखा आधार घेत आवतनं देताना कोंडबामामा दिसायचे. पुढं कोंडबामामाही थकले. तरी आम्ही गाव सोडेपर्यंत वडिलांसाठी आणि आजीसाठी ते येत गेले. त्यांना कटिंग करताना बघून आम्हा सलूनमध्ये जाणाऱ्यांना मोटारीत बसून बैलगाडी पाहिल्यासारखं वाटू लागलं.
परवा फेसबुकवर प्रकाश आमटे हे बाबा आमटेंची कटिंग करतानाचा एक सुंदर फोटो पाहिला आणि कोंडबामामाची कचकच कात्री कानात ऐकू येऊ लागली. हे केस वाढवणे आणि कापणे याला आपल्याकडे अनेक संदर्भ आहेत. आई-वडील वारल्यानंतर केस काढण्याची प्रथा, विधवा स्त्रीचे केशवपन, याउलट जोगतिणीच्या जटा, पोतराजाच्या जटा, जटा वाढवून झालेले  साधुसंत, तिरुपती बालाजीला जाऊन केशदानासाठी केलेलं मुंडण, मौंजीत शेंडी ठेवून केलेला चमनगोटा, बाळाचे जावळं काढण्याचा कार्यक्रम, असे केस कापण्यासाठीचे अनेक संदर्भ आजही भोवताली दिसतात. पूर्वी तपोवृद्ध ज्ञानवृद्ध साधूच्या जटा वाढायच्या, पण पुढे नुस्त्या जटा वाढवूनही काहीजण साधू झाले. अशांसाठी तुकारामाने खडे बोल सुनावले आहेत..
डोई वाढवूनि केश। भुते आणिती अंगास।
तरी ते नव्हती संतजण। तेथे नाही आत्मखूण।
सानेगुरुजींच्या ‘श्यामची आई’मध्येही केस कापण्यासंबंधीचा संदर्भ एक विचार पेरून जातो. वसतिगृहामध्ये राहणारा श्याम घरी येतो. तेव्हा त्याचे डोक्यावरचे केस वाढलेले असतात. त्यामुळे वडील श्यामला खूप रागावतात. धर्म पाळला नाही, म्हणून खूप बोलतात. श्यामला वाईट वाटतं. रडू येतं. श्यामला वाटतं, केस वाढवण्यात अधर्म कसला? श्यामची शंका आई दूर करते. आईच्या मते, केस न कापणं म्हणजे केसांचा मोह होणं. कुठल्याही मोहाच्या आहारी जाणं म्हणजे अधर्मच होय. थोडक्यात काय तर केस कापणं आणि वाढवणं ही काय सहज साधी गोष्ट नाहीय. डोक्यावरच्या केसांएवढे त्याला संदर्भ आहेत.
कच्कच कात्री चालवणाऱ्या आमच्या कोंडबामामासारखा लक्षात राहिलेला दुसरा न्हावी म्हणजे विंदा करंदीकरांचा धोंडय़ा न्हावी! करंदीकर म्हणजेसुद्धा एखाद्या अनुभवाची सुंदर कटिंग करून पेश करणारा कवी. या कवितेतला धोंडय़ा न्हावी हलाखीत जीवन जगतोय. देणेकऱ्याचा त्याच्यामागे तगादा आहे. उपचाराविना त्याची चार पोरं मेलेली आहेत. या धोंडय़ाची एक मनातून इच्छा आहे. गांधीबाबा त्याच्या भागात आले तर धोंडय़ाला त्यांची हजामत करायची होती. पण गांधींची हत्या होते आणि धोंडय़ा न्हाव्याची इच्छा अपूर्णच राहते. कटिंगबद्दल इच्छा अपूर्ण राहतात याचा मलाही चांगलाच अनुभव आहे. हिप्पी कट करण्याची आमची इच्छा अपूर्णच राहिलीय ना! त्या काळात या अपूर्ण इच्छेला पूर्ण करू पाहणारा गण्या नावाचा आमचा एक मित्र होता. कटिंगला नव्या सलूनमध्ये जाताना, ‘चांगली बारीक कटिंग करून ये’ अशी त्याच्या आईने दिलेली सूचना दुर्लक्षून गण्याने परस्पर चक्क हिप्पी कट मारला होता. पण तो आम्हाला काही बघायला मिळाला नाही. कारण हिप्पी कट मारलेला गण्या घरी पोचला तर त्याच्या आईने त्याला घरातही घेतले नाही. उलट त्याच पावली त्याच्यासोबत सलूनच्या दुकानात स्वत: जाऊन थयथयाट केला. सलूनवाल्याचा उद्धार केला. शेवटी त्या सलूनवाल्याने बारीक पैलवान कट मारून दिला तेव्हा गण्याची आई शांत झाली. गण्याचा हिप्पी कटमधला चेहरा पाहण्याचा योग आम्हाला आला नाही. कारण उद्घाटनापूर्वीच पूल कोसळावा तसा हा हिप्पी कट अल्पायुषी ठरला. तरीही आमच्यात गण्याला भाव होता. कारण १५-२० मिनिटे का होईना गण्याच्या वाढलेल्या केसांना हिप्पी कटचा आकार लाभला होता. आमच्या केसांना ते भाग्य लाभले नाही. आमचे केस वडीलधाऱ्यांच्या धाकात वाढले आणि धाकातच कापलेही गेले. स्वतंत्र वळण त्यांना मिळालेच नाही.
हा विषय कटिंगसारखा कितीही वाढू शकतो. पण कुठे तरी कचकच कात्री लावून त्याला थांबवायला हवं. या कटिंग प्रकरणात पुरुषच अडकलाय. बाई आपले केस हवे तसे वाऱ्यावर सोडू शकते. त्यांना कसलीच अडचण नाही असा समज असताना एक छोटीशी घटना घडली. रयत शिक्षण संस्था दरवर्षी फार दर्जेदार वक्तृत्व स्पर्धा घेते. एके वर्षी परीक्षक म्हणून वेगवेगळ्या स्पर्धकांना ऐकत होतो. तिसऱ्या दिवशी, अंतिम फेरीच्या उत्स्फूर्त भाषणात एक शेवटची स्पर्धक मुलगी बोलायला उभी राहिली. या शेवटच्या मुलीचं ऐकून ताबडतोब स्पर्धेचा निकाल लावायचा होता. त्या मुलीनं उचललेल्या चिठ्ठीत विषय निघाला, ‘आजच्या स्त्रीसमोरील आव्हाने.’ त्या स्पर्धक मुलीनं बोलायला सुरुवात केली. प्रभाव पाडण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता. सहज स्वाभाविक संवाद साधणं होतं ते. तिचं पहिलं वाक्य तिच्या स्वत:च्या लांब वेण्यांवर होतं. ती म्हणाली, ‘‘मी खूप पुस्तकी समस्या सांगत बसणार नाही. मी बी.एड. करते. माझं सकाळी सात वाजता कॉलेज असतं. एवढय़ा सकाळी या लांब केसांची मला खूप अडचण होते. गडबडीत या केसांची साधी वेणीही घालू शकत नाही. म्हणून मला हे केस कापायचे आहेत. पण केस कापायला माझ्या घरच्यांचा विरोध आहे.’’ स्वत:चे केस कापण्याच्या समस्येपासून तिनं पुढं अनेक समस्यांचा डोंगरच मांडला. पण मला मात्र, तिच्या केस कापण्याच्या समस्येत कोंडबामामांच्या कचकच कात्रीचा आवाज येत राहिला.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा