स्थळ : अमेरिका. लोणकढी तुपाचा अमेरिकन साइझचा सातवा चमचा तिसऱ्या पुरणपोळीवर खसाखसा घासत टॉम कपाळावर आठय़ा चढवून म्हणाला, ‘‘तुम्ही इंडियन लोक खूपच फॅटी आणि हाय-कॅलरी पदार्थ खाता.’’
मी पहिल्या तूपविरहित पुरणपोळीचा तुकडा मोडत विचारलं, ‘‘आम्ही इंडियन तर तू कोण?’’
‘‘अमेरिकन! हा टाऽम डॅडफॉल्स गेली पंधरा वर्ष अमेरिकन सिटीझन आहे.’’
‘‘तरीपण तू त्र्यंबक धांदरफळे या नावानंच भारतात जन्मलास आणि वाढलास हे विसरू नकोस.’’
‘‘तो मुद्दा नाही. दोनच दिवसांपूर्वी श्रीखंडपुरी केली होती वहिनींनी. गुड पाडवा होता म्हणून.’’
‘‘पाडव्याच्या आधी गुढी येते टाऽमभावजी. गुडनंतर फ्रायडे येतो.’’
‘‘तो मुद्दा नाही, वहिनी. मी जेव्हा इथं येतो तेव्हा तुमच्याकडे चहाबरोबर चकली, बेसन लाडू किंवा गोड शिरा असतो. हे पदार्थ तब्येतीला किती डेंजरस आहेत याची कल्पना आहे का तुम्हाला?’’
‘‘लहानपणापासून तेच खात आलोय आम्ही. आणि तसं मी तेलबिल जपूनच वापरते.’’
‘‘ते काही नाही. यू मस्ट बिकम हेल्थ कॉन्शस. या रविवारी माझ्यासोबत जेवा. बी माय गेस्ट! ओके?’’
पंधरवडाभर आपल्या हातचं हादडणारा नवऱ्याचा मित्र स्वत:च्या घरी जेवायला बोलावतोय म्हटल्यावर माझी बायको खूश झाली. डॅडफॉल्स मॅन्शनमध्ये भोजन करण्याचं आमंत्रण स्वीकारताक्षणी टॉम म्हणाला, ‘‘गुड! संपूर्णपणे हेल्दी फूड खिलवतो तुम्हाला.’’
‘‘अरे वा!’’ आम्ही जिभल्या चाटल्या.
‘‘सूप आणि सलॅड.’’
आम्ही हिरमुसलो, ‘‘चालेल.’’
‘‘मी सात वाजता पिक अप करतो तुम्हाला. कोणत्या सलॅड बारमध्ये जाऊया? फ्रेश चॉईस की स्वीट टोमॅटो?’’
सिलॅबसबाहेरच्या त्या प्रश्नाला आम्ही काय उत्तर देणार? मग टॉमनंच निवड केली आणि रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही अमेरिकेतल्या स्वीट टोमॅटोत प्रविष्ट झालो. टॉम उत्साहात म्हणाला, ‘‘आतापर्यंत तुम्ही खूप अनहेल्दी इंडियन फूड खाल्लंय. आता या एका रात्रीत तुमची बॉडी डिटॉक्स होईल.’’
‘‘म्हणजे नक्की काय होईल?’’ बायकोनं घाबरून विचारलं.
मी दिलासा दिला, ‘‘डिटॉक्सीफिकेशन म्हणजे शरीरशुद्धी होईल.’’
समोरच्या काचपात्रांमध्ये अगणित पालेभाज्या, फळभाज्या आणि फुलभाज्या ठेवल्या होत्या. त्या चिमटय़ानं उचलून आमच्या ट्रेमधल्या बशीत ठेवायला आम्ही सुरुवात केली.
बायकोनं विचारलं, ‘‘ही पालकाची पानं कच्ची आहेत की शिजवलेली?’’
टॉम उत्तरला, ‘‘अर्थातच कच्ची! बी हेल्थ कॉन्शस, वहिनी!’’
नसर्गिक खजिना तोंडात टाकणार इतक्यात टॉम किंचाळला, ‘‘हे काय? ड्रेसिंग विसरलात?’’
मी आमच्या ड्रेसकडे पाहिलं. सगळे कपडे ठीकठाक होते. टॉमनं शेजारच्या काउंटरकडे बोट दाखवलं, ‘‘चला. सलॅडवर ड्रेसिंग घ्यायलाच हवं. कोणतं पाहिजे?’’
‘‘आम्हाला यातलं काही कळत नाही. तूच सांग.’’
‘‘हे ब्ल्यू चीज ड्रेसिंग घ्याच.’’
मी सटपटले, ‘‘चीज?’’
‘‘हो. चार मोठे चमचे घ्या. पण अगोदर दुसरं हे किसलेलं चीज सलॅडवर भरपूर पसरून टाका. या बाऊलमध्ये अंडय़ाचा पिवळा बलक उकडून ठेवलाय. तो वर घाला. शेजारी अमेरिकन लोण्यात शिजवलेले आणि उत्कृष्ट प्रतीच्या फ्रेंच चीजमध्ये घोळवलेले तीन प्रकारचे इटालियन पास्ता आहेत. तिन्ही घ्याच. या पेपरकपामध्ये रँच ड्रेसिंगही घेऊन ठेवा. पलीकडे लो-फॅट ड्रेसिंगसुद्धा आहेत. पण ती आपण कधी घेत नाही. बेचव असतात.’’
सलॅडची हाय-फॅट ड्रेसिंगसंपन्न बशी टेबलावर ठेवून आम्ही सूप काउंटरपाशी गेलो.
बायको चित्कारली, ‘‘इतकी सुपं?’’
‘‘हो. हे क्लॅम चाउडर सूप. त्यात बेकन आणि िशपल्या असतात. हे चिली सूप. चिली म्हणजे मसालेदार बीफ. तुम्हाला रेड मीट चालत नसेल तर स्वीट कॉर्न चिकन किंवा ब्रोकोली चीज सूप घ्या.’’
त्यापकी कोणतं सूप निरुपद्रवी आणि सात्त्विक असेल याचा विचार करतोय तोच टॉम वळून म्हणाला, ‘‘सुपासोबत ब्लॅक फॉरेस्ट मफीन्स आणि चॉकोलेट चिप कुकीज नक्की उचला.’’
मी भांबावून विचारलं, ‘‘अरे, मफीन्स आणि कुकीजमध्ये फॅट आणि कॅलरीज तर ठासून भरलेल्या असतात ना? शरीरशुद्धीसाठी ते कसं चालतं?’’
‘‘तो मुद्दा नाही. एकरकमी डॉलर भरून आत शिरलं की हवं तितकं खायचं. ‘ऑल यू कॅन ईट’ असा बोर्डच लावलाय वर. वहिनी आइसक्रीम स्वीट डिशच्या आधी घेणार की नंतर?’’
‘‘म्हणजे हेही सगळं आहेच का?’’
‘‘अर्थातच! नाहीतर अमेरिकन लोक इथं पाय ठेवणारच नाहीत.’’
मी सभोवताली नजर फिरवली. एकाहून एक तगडे अमेरिकन बाप्ये, तितक्याच धष्टपुष्ट बाया आणि मॅचिंग पिल्लं सलॅडची बशी किंचितशी बाजूला सरकवून इतर गमतीजमतीच्या पदार्थावरच तुटून पडली होती. स्वीट टोमॅटोचा खरा नायक म्हणजे सुरुवातीचा सलॅड बार. पण तिथं फारसं कोणी सेकंड हेिल्पग घ्यायला जात नव्हतं.
टॉमनं माझ्या पोटात त्याचं बोट खुपसून सांगितलं, ‘‘पलीकडे पुिडग आणि केक आहेत. नुसती व्हरायटी पाहिली तरी तोंडाला पाणी सुटेल.’’
‘‘अरे हो. पण मग आमच्या घरगुती पुरणपोळीच्या डिटॉक्सीफिकेशनचं काय?’’
‘‘त्यासाठी डिकॅफ कॉफी प्यायची. त्यात कॅफीन नसतं. तब्येतीला चांगली. आफ्टर ऑल, हेल्थ इज वेल्थ.’’
मी चहा-कॉफीच्या काउंटरवर नजर फिरवली. टॉम म्हणाला, ‘‘कॉफी किंवा चहा काहीही घे. पण त्यात दूध आणि साखर घालू नकोस. तब्येतीला खराब.’’
‘‘पण आम्हा दोघांनाही दुधासाखरेशिवाय चहा चालत नाही.’’
‘‘मग कठीण आहे बाबा तुमचं. दुधासाखरेत किती कॅलरीज असतात माहीत आहे का तुला? या वाईट सवयी सोडा रे आता.’’
इतक्यात त्याचं लक्ष माझ्या बायकोकडे गेलं. आश्चर्यचकित होऊन तो म्हणाला, ‘‘हे काय, वहिनी? नुसतंच व्हॅनिला आइसक्रीम घेतलंत? बटरस्कॉच सिरप घाला की वरून. मी ओतू का? नंतर चॉकलेट आइसक्रीमसुद्धा चाखून बघा. त्याच्यावर सुकामेवा पसरायला मात्र विसरू नका. पसे टिच्चून भरले आहेत. ते संपूर्णपणे वसूल करून घ्यायचे.’’    
मग माझ्याकडे वळून त्यानं फुशारकी मारली, ‘‘मी पुिडगसोबत नेहमी डाएट कोक घेतो. नो फॅट. नो कॅलरीज. मी हेल्थ कॉन्शस आहे. तू काय घेणार?’’
मी अवाक् झालो. माझ्या अल्पमतीनुसार तिथला खुद्द सलॅडचा विभाग सोडला तर इतर सगळे जिन्नस आमच्या भारतीय शरीराला पुरणपोळीपेक्षा कित्येक पटीनं अपाय करणारे होते.
बायकोनं बिनधास्तपणे खणखणीत आवाजात झापलं, ‘‘काय हे टाऽमभावजी? खरं तर एखाद्या दिवशी नुसत्या पालेभाज्या खाण्याची आयडिया अत्यंत उत्तम आहे. पण अमेरिकन बकासुरांनी त्यातही चीजबिज घालून परत वाट्टोळं केलंच की.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा