किरण गुरव
मेघना पेठे यांचे ‘हंस अकेला’ (१९९७) आणि ‘आंधळ्यांच्या गायी’ (२०००) हे दोन कथासंग्रह सुप्रसिद्ध आहेत. या दोन्ही संग्रहात मिळून १२ कथा आहेत. ‘प्रेमस्वरूप आई’ ही, आणि यांसारख्या त्यांच्या इतर काही कथा अद्यापि संग्रहित झालेल्या नाहीत. पेठे यांची कथा संख्यार्थाने फार नाही. परंतु त्यांच्या कथालेखनाने, कथेसंबंधी रूढअसणाऱ्या अनेक धारणांना जबरदस्त आव्हान दिले. तेही त्या काळात, ज्यावेळी कथा हा फार चिंचोळा साहित्यप्रकार आहे अशी वदंतासाहित्यविश्वात होती. त्यांच्या ‘हंस अकेला’ या कथासंग्रहातील कथांचा आपण याठिकाणी विचार करणार आहोत.
‘हंस अकेला’ संग्रहातल्या कथा दीर्घ आहेत. या कथांचा तिक्ष्ण संवेदन-स्वभाव तात्काळ लक्ष वेधून घेतो. कथेच्या दीर्घत्वामुळे हे संवेदन विरल न होता, उलट वेगाने वेग वाढावा तसे उत्तरोत्तर तीव्र होत जाते. या संवेदन-स्वभावात कथेत वारंवार भेटणारासल्फ्युरिक विनोद, काटय़ासहित गुलाबाची आठवण करून देणारी टोचरी आणि टवटवीत काव्यात्मता, निवेदकाने अथवा पात्रांनी मांडलेला सातत्यपूर्ण‘स्व’संवाद, कथनाची हुबेहूब अंगलट धारण करणारी भाषा आणि कथारूपाचेतीव्रतम भान या बाबींचा समावेश करावा लागेल. पेठे यांच्या कथेची ही जणू पंचेंद्रिये आहेत. या इंद्रियांनी घेतलेला जीवनाचा ‘अनुभव’ कोणता आहे? त्याचा लावलेला अर्थ काय आहे? हे ध्यानी घेणे आवश्यक आहे.
‘समुद्री चहुकडेपाणी..’ ही संग्रहातील पहिलीच कथा एखाद्या जहाजासारखी स्त्री-पुरुष संबंधातील रहस्याच्या मागावर निघालेली आहे. कथेची निवेदिका या जहाजाची कप्तान आहे. कथेतील नेरूरकर, सुभद्रा, पाठक, त्याची पत्नी, त्यांची लव-कुश ही मुले, नेरूरकरची पत्नी हे अन्य सगळे निवेदिकेचे ‘हमसफर’ आहेत. आपापल्या जीवन जाणिवांनिशी आणि प्रकृती धर्मानिशी ही पात्रे या कथा प्रवासात अग्रेषित आहेत. खरे तर हे प्रत्येक पात्र म्हणजे कथा ज्या रहस्याच्या मागावर निघालेली आहे, त्याकरिता कथाविधीने नियुक्त केलेले एक स्वतंत्र तपासणी पथक आहे. त्यांनी नेमून दिलेला शोध लग्न, कुटुंब, समाज यांच्या मान्यता-तपासणीच्या अधीन राहून करायचा आहे. परंतु नेणिवेतील नैसर्गिक आणि प्रबळ ऊर्मी हाच या प्रवासाचा, शोधाचा अढळ ध्रुव आहे.
आणखी वाचा-आदले । आत्ताचे : अधोविश्वाची ऊर्ध्वगामी दास्तान
देखणा, धडाडीचा नेरूरकर हे कथेतले एक टोक आहे, तर दुबळा, दारूडा पाठक हे त्याचे विपरीत टोक. ‘हाडांना साडी गुंडाळल्यासारखी’ दिसणारी नेरूरकरची पत्नी हे एक टोक आहे, तर ‘ऐनाच्या पानासारखे गाल आणि त्यावर खळी’ असणारी पाठकची देखणी पत्नी हे दुसरं टोक. या दोन अनामस्त्रिया कथेत खूप ताकदीनं आलेल्या आहेत. सुभद्रामध्ये या दोघींचेही गुणधर्म आहेत. लग्न, कुटुंबाच्या पातळीवर ती नेरूरकरच्या पत्नीसारखी परंपराश्रयी आहे. देहमनाच्या पातळीवर पाठकच्या पत्नीसारखी बंडखोर, ऊर्मीशरण. कथेची संहिता पाठकला त्याची नसलेली (त्याच्या पत्नीची) तीन मुलं अर्पण करते. त्याच वेळी नेरूरकरच्या मुलांची पाटी कोरी ठेवते. हा विरोध आणि तोल या प्रवासी जहाजाचा झोक जाऊ देत नाही.
ज्या रहस्याच्या मागावर ही कथा निघालेली आहे, ते कितीही उत्कंठावर्धक असले तरी मानवनिर्मित नाही. त्यामुळे कथेने तिच्या प्रवासाअंती एखाद्या खुनाचा किंवा दरोडय़ाचा रहस्यभेद केल्यासारखा छडा लावण्याची अपेक्षा ठेवता येत नाही. ही कथा त्या दृष्टीने वाचकांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे सुपूर्द करते आणि करुण, श्रंगाररसप्रचुर राग ‘काफी’ आळवत आपला प्रवास थांबवते. अशा प्रवासात बहुतांशी साधन हेच साध्य ठरते. परंतु नेणिवेतील प्रबळ, अनिवार शक्तींचा रेटा आणि त्यावर लग्न, कुटुंब या सामाजिक बाबींसह नैतिक मान्यता-अमान्यता इत्यादी जाणीवकेंद्रित बाबींचा असलेला खडा, दक्ष पहारा यांच्यातीलअटीतटीचा प्रत्यय ही कथा वाचकांना देते. ‘समुद्री चहुकडेपाणी..’ हे कथेचे शीर्षक असले तरी प्रत्यक्षात ‘पिण्याला थेंबही नाही’ हेच तिचे ‘सांगणे’ आहे. अर्थात जाणिवेनेचनेणीव समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे मेंदूनेच अफाट मेंदू समजून घेण्याचा प्रयत्न.
‘एक दिवस ‘स्ट्र’ चा’ ही संग्रहातली कथाही असाधारण आहे. एका नटाच्या कला प्रवासाचे हे टोकदार संघर्षविश्व आहे. ‘स्ट्र’वर त्याच्या आतूनच अभिनयाचे कलात्म बल कार्यरत आहे. त्यामुळे तो छोटय़ा शहरातून मुंबईकडेआपणहून खेचला गेलेला आहे. दिसामासाने या शहरातील एक प्रमाणित स्ट्रगलर बनलेला आहे. ही कथा म्हणजे ‘स्ट्र’रूपी ‘क्षणाक्षणानं फुलणाऱ्या फुलाचा किंवा दिसामासानंबदलणाऱ्याऋतूचा अदृश्य प्रवास’ आहे. हा प्रवास दृश्य, डोळस करण्यासाठी कथेत अवी, उजगरे सर, कालिंदी, माई आठवले, बेबीप्रियंवदा, ‘पेशावर’ साने इत्यादी महत्त्वाची पात्रे येतात. जातात. ‘स्ट्र’ चा कला प्रवास मात्र सुरूच राहतो. ही सगळी पात्रे ‘स्ट्र’समोर आपापल्या मापाचे आरसे घेऊन उभी आहेत. माणूस म्हणून, कलावंत म्हणून ‘स्ट्र’ला आपली छबी त्यांच्यात बघावी लागते.
आणखी वाचा-आदले । आत्ताचे : अमुकच्या व्याकूळतेचा तळशोध
‘स्ट्र’च्या छोटय़ा शहरातल्या अवीला किंवा उजगरे सरांना ‘स्ट्र’चास्वप्नदंश नाही. नाटक झालं की ते आपापल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्येसहजीविरघळून जातात. त्याच शहरातली कालिंदी स्वत:ची आयडेंटीटी‘स्ट्र’मध्ये विरघळून टाकण्यासाठी आतुर आहे. परंतु ‘स्ट्र’साठी एव्हाना अभिनय हा ‘एडका मदन’ झालेला आहे. त्याला शांत करण्यासाठी ‘स्ट्र’ला मुंबईला येऊन, माई आठवलेंच्यावरणभातप्रचुरवात्सल्यभावाचीवरवरची नोंद घेत पुढं सरकावं लागतं. ‘बेबी’ प्रियंवदाचा मसालेदार भूतकाळ आणि त्याचे सतत करपट ढेकर देणारा तिचा निरस वर्तमानकाळ यांच्यातील जीवघेणी तफावत दुर्लक्षित करावी लागते. ‘स्ट्र’च्या भविष्यकाळाच्या दृष्टीने बेबीप्रियंवदा हा जणू धोक्याचा सिग्नल आहे. ‘पेशावर’ सानेच्या रूपाने एक व्याज अभिनेता ‘स्ट्र’च्या आयुष्यात एन्ट्री घेतो आणि ‘स्ट्र’च्या मूळ कला प्रेरणांचे सातत्याने अग्नीपरीक्षण चालवतो. त्यात पास झाल्यासारखा ‘स्ट्र’ कसाबसा शेवटी रंगभूमीवर, म्हणजे त्याच्या ईप्सित भूमीवर प्रविष्ट होतो.
‘स्ट्र’ला अभिनयाकडून किंवा त्याच्या कलेकडून काय हवे आहे ?कथा संहिता ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते. ‘हजारो डोळे आपल्यावर खिळलेले आहेत, हजारो कान आपला शब्द ऐकण्यास आतुरलेआहेत.. स्पर्शानी आणि तऱ्हेतऱ्हेच्याहुंकारचीत्कारांनी खुलत जाणाऱ्या, संथपणेप्रमोत्कटतेकडे वाहत जाणाऱ्या संभोगाच्या प्रवाहासारखे ते फुललाइट्समधले तीन तास’ ‘स्ट्र’ ला हवे आहेत. त्या तीन तासांसाठी तत्पूर्वीचा ‘कित्येक वर्षांचा वनवास’ ‘स्ट्र’ने आपखुशीने पत्करलेला आहे. त्या वनवासातला एकटेपणा, भकासलेपणा, वणवण, अघोरी वाट पाहणं, सारंच चुकलं असं वाटून शंकित होणं हे सगळं ‘स्ट्र’नं त्या तीन तासांसाठी स्वेच्छेनंनिवडलेलं आहे. ही कथा कला आणि कलावंत यांच्यातीललेन-देन अत्यंत समर्थपणे चित्रित करते. या परस्पर व्यवहारात जीवन स्वत: मध्यस्थ म्हणून कार्यरत असते. जीवनाची मागणी अनेकदा रोखठोक एजंटसारखी असते. कलावंताला जीवनाचे ‘एजंटमूल्य’ चुकते करावे लागते.
‘कोल्ह्याचं लगीन’ ही कथासंग्रहातील वरवर साधी वाटणारी कथा. विजोड परिस्थिती असलेल्या स्त्री आणि पुरुषामध्ये घडू शकणारे नैसर्गिक घटित हा या कथेचा विषय. परंतु त्या घटिताचे गहन अंत:स्तर हे खरे कथन आहे. अशुतोषबॅनर्जी आणि त्याची कामवालीमंजुळाबाई, आपापल्या स्वतंत्र वर्तुळात व्यापतापानिशी जगत आहेत. मंजुळाबाईच्या घरकामाच्या निमित्ताने या दोन वर्तुळांचा काही भाग वर्तुळपाकळीसारखा एकत्र येतो. परस्परांना अंशत: छेदतो. या छेदनकाळात विजातीय ध्रुवांचे आकर्षण त्यांच्यात फारसे दिसून येत नाही. पण तरीही शेवटी ते ‘कोल्ह्याचं लगीन’ त्यांच्यात पार पडतं. कारण चूक-बरोबरच्या पलीकडं असलेला निसर्ग. खरे तर हा संपूर्ण कथाविधी आरंभापासून त्याच्याच देखरेखीखाली आहे.
आणखी वाचा-आदले । आत्ताचे: गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा शोध..
मंजुळाबाईंचा नैसर्गिक स्त्री-देहधर्म त्यांचा देह सोडून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यांना मूलबाळ नाही. त्यांच्या मृत सवतीच्या सदानंद या मुलावर त्यांची माया होती. पण सदानंदचा अपघाती मृत्यू होतो. मंजुळाबाईंच्या मालकांना, म्हणजे पतींना लकवा मारतो. चार घरची धुणीभांडी करत सलग आठ वर्ष त्या पतीची आई बनून सेवा करत आहेत. मंजुळाबाईंच्याविटलेल्या आयुष्यातील एकमेव मौज म्हणजे तंबाखूचे बार भरणे. त्या जादूद्वारे शरीराच्या भुका तात्पुरत्या मारून टाकणे. पण मंजुळाबाईंचंबाईपण मारून टाकण्याची ताकद तंबाखूत नाही. एकांतप्रियअशुतोषच्या घरी जाताना त्यांना ‘विचित्र’ हुरूप येतो. त्यांच्याकडं ढुंकूनही न बघणाऱ्याअशुतोषशी‘एका तुटक, सामंजस्याचा दुवा’ आपल्याला जखडतो असं वाटतं. ‘खडकावरउमेदीनं गुलाब लावावे तोच हा मोह आहे.’
दुसरीकडंकोलकात्यातील भरल्या घरातून मुंबईला आलेल्या अशुतोषचं विश्वही उदास आहे. एकटं, रितं, शून्य आणि कुमारिक. ‘द्याल तर घ्याल’ हा जगाचा विनिमय नियम त्याला उमगलेला आहे, परंतु फारसा मान्य नाही. अशुतोषचे एकाकी विश्व त्याच्या आईशी मानसिक स्तरावरून नित्य बांधले गेलेले आहे. या विश्वाची मांडणी हा या कथेचा गहनतम भाग आहे. आईची परंपरागत, जैव माया आणि तिच्यातले वाटेकरी अशुतोषला टोचतात. याचा व्यत्यास आई आणि तिची माया केवळ आपल्यासाठीच असावी असा होईल. आईपासून दूर मुंबईला एकाकी राहाणे हा अशुतोषचाच दुराग्रह. पण त्यालाही ‘भाजलेल्या जागी गार वाऱ्याची झुळूक यावी’ तसा कुणाची तरी स्पर्श हवा आहे. कुणाचा तरी आवाज आपल्या ‘उजाड माळासारख्या घरात’ यावा ही अपेक्षा आहे.
मंजुळाबाई आणि अशुतोष यांच्या एकत्र येण्यातील शारीरिक ऊर्मी खऱ्या असल्या तरी मानसिक ऊर्मी वेगळय़ा दिसून येतात. त्यांच्या शरीरनाटय़ाच्याविंगेत सदानंद आणि अशुतोषची आई यांची अदृश्य उपस्थिती आहे. अनेकार्थी. उत्प्रेरक. पेठे यांची कथा जीवनाचा माग काढत अनेकदा ‘आई’ या उगमस्थानापाशी पोहोचते आणि तिथला निसर्ग धीटपणे अवलोकनी घेते. ही कथा त्याचे ठळक उदाहरण आहे. जीवनातील यांत्रिकता, एकाकीपणा, उबग, रूक्षता यांनी मेघना पेठे यांची कथा तुच्छतावादी, निष्ठुर होत नाही. उलट त्याच्या प्रवासावर आपले ध्यान केंद्रित करते आणि स्वत: एक प्रवास होते. ‘स्मरणाचा उत्सव जागुन.’, ‘सी सॉ’, ‘काया.. माया.. छाया..’ या अन्य कथाही याला अपवाद नाहीत. या प्रवासातील अनिश्चितता, धोके, व्यापताप, एखाद्या वळणावर मिळणारा सुखद ‘दे धक्का’ या सर्वाचेच ही कथा सहर्ष स्वागत करते. जीवनाचा आहे तसा आत्मस्वीकार हे पेठे यांच्या कथानुभवाचे महत्त्वाचे वैशिष्टय़. नकार साहण्याचे बळ या कथेने त्यातूनच मिळवलेले आहे. एक रचना म्हणून पदार्थाच्या लहानात लहान कणांनी जसे त्या पदार्थाचे सर्व गुणधर्म धारण केलेले असतात, तसे पेठे यांच्या कथेतील लहानात लहान कणांनी ती कथा उचलून धरलेली असते. त्या कथेचे सर्व गुणधर्मआत्मसात केलेले असतात. ही कथा आपल्या कथारूपाचेहीतीव्रतम भान बाळगते. हे भान थोडे जरी सुटले तरी एका समृद्ध प्रवासाच्या शेवटी वाचकांना वाटमारी झाल्याचा अनुभव येऊ शकतो. पण पेठे यांची कथा हे कदापि घडू देत नाही.
आणखी वाचा-आदले । आत्ताचे: वर्चस्वयुद्धाची शोकांतिका..
पेठे यांची कथा मानवी मनातील भय, एकाकीपणा, हतबलता यांच्या विरुध्दचाएल्गार ठरते. कारण ती जीवनवत्सल आहे. जोपर्यंत मानवी मनात भय, एकाकीपणा, हतबलता या गोष्टी राहतील तोपर्यंत ही कथा वाचकांची सहप्रवासी बनून त्यांची समजूत काढत राहील. त्यासाठी धारधार विनोद, टोचरीकाव्यात्मता, कला-माणूस संबंध यांची उजळणी घेत राहील. त्यामुळे या कथेला प्रसव काळाशी जखडून ठेवता येणार नाही. ही कथा संख्येने कमी आहे. पण काही हरकत नाही. जंगलात वाघ-सिंहही तुलनेने कमीच असतात. पण ज्या जंगलात ते असतात, ते जंगल समृद्ध मानलं जातं. पेठे यांची कथा आणि ज्या मराठी कथा विश्वात या कथेची उपस्थिती आहे, वावर आहे, दबदबा आहे, ते कथा विश्व.. या दोन्हींसाठी हा सूचकार्थ आहे.
कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक. गेल्या दोन-अडीच दशकांपासून प्रामुख्यानेकथालेखक म्हणून ओळख. ‘राखीव सावल्यांचा खेळ’ हा पहिला लघुकथांचा संग्रह प्रकाशित. ‘श्रीलिपी’ या पुस्तकानंतर दीर्घकथा लेखन. ‘बाळूच्याअवस्थांतराची डायरी’ या संग्रहास साहित्य अकादमी. ‘जुगाड’, ‘क्षुधाशांती भुवन’ ही आणखी दोन कथात्म साहित्याची पुस्तके प्रसिद्ध.
kirangurav2010@gmail.com