नरेंद्र भिडे
narendra@narendrabhide.com
मराठी बालमनावर सगळ्यात पहिला सांगीतिक संस्कार कुठला होत असेल तर तो बालगीतांचा. अगदी ‘अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं’ किंवा ‘एक पाय नाचव रे गोविंदा’ किंवा ‘इथे इथे बस रे मोरा’सारख्या गाण्यांनी किंवा कवितांनी मराठी मूल हळूहळू भवतालाशी मिळूनमिसळून घेत असतं. त्या गीतांचे शब्द आणि त्याचा अर्थ त्या वयात मुलाला कळेलच असं अजिबात नाही. किंबहुना, तो कळण्याची शक्यता दुरापास्तच. पण तरीही त्याचा ताल आणि त्यातल्या शब्दांचे यमक आणि छंद यामुळे बालमन या गाण्यांकडे आकर्षित होतं. मराठी संगीतसृष्टीत अनेक गीतकारांनी आणि संगीतकारांनी बालमनाला भावतील अशी एकाहून एक अप्रतिम गाणी तयार केली आहेत. त्यापैकी काही गाणी ही चित्रपटांकरता होती. पण चित्रपट सोडूनसुद्धा अशी अनेक गाणी तयार झाली; जी आजसुद्धा अनेकांच्या लक्षात आहेत.
या सर्व गाण्यांमध्ये अग्रमानांकन जर कोणाला द्यायचं झालं तर माझ्या मते ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ या गीताला द्यावं लागेल. आज जवळजवळ ६० हून अधिक वर्षे झाली तरीही या गाण्याची लोकांशी नाळ जोडण्याची क्षमता थोडीसुद्धा कमी झालेली नाही. काही काही स्वराकृतींना काळाचा एक स्टॅम्प असतो. त्या स्वराकृती ऐकल्या की ते गाणं कुठल्या काळातील आहे हे लगेच लक्षात येतं. पण ‘नाच रे मोरा’ हे गाणं सांगीतिकदृष्टय़ा इतके सार्वकालिक आहे की त्याचा आस्वाद आपण आजही त्याच तन्मयतेने घेऊ शकतो. आणि असे झाले तरच गाण्याची रेकॉìडग क्वालिटी आणि इतर तांत्रिक गोष्टी एखादे गाणे आणि त्याचा आस्वादक यांच्यामध्ये येऊ शकत नाहीत. अत्यंत गतिमान अशी वाद्यरचना, सुंदर छोटे छोटे interludes आणि अत्यंत सोपी चाल- जी ऐकायलाही सोपी आहे आणि सादर करायलाही सोपी आहे- हे या गाण्याचं खरं यश आहे.
बालगीतांमध्ये असं आणखी एक मलाचा दगड ठरेल असं गाणं आहे, ते म्हणजे दत्ता डावजेकर यांचं ‘शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा..’ विविध प्राण्यांचे गुणधर्म, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत आणि त्यानुसार स्वरांचा आणि तालांचा केलेला सुंदर उपयोग हे या गाण्याचं प्रमुख वैशिष्टय़ आहे. दत्ता डावजेकर यांची प्रतिभा किती विलक्षण होती याचं हे अप्रतिम उदाहरण आहे. पु. ल. देशपांडे
आणि डावजेकर यांनी दुर्दैवाने नंतर फार बालगीते लिहिली नाहीत; परंतु हीच दोन गाणी त्यांनी एवढय़ा उंचीची केली आहेत की त्यांना तोड नाही.
असेच अजून एक गाणे आठवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ते म्हणजे ‘श्यामची आई’मधील ‘छडी लागे छम छम..’ मास्तरांची अत्यंत खोडसाळ पद्धतीने केलेली थट्टा या गाण्यामध्ये फारच परिणामकारकरीत्या ऐकू येते. दाक्षिणात्य शास्त्रीय संगीतामध्ये ऐकू येणारे मोरचंग हे वाद्य या गाण्यात मस्त वापरलेले आहे आणि ते या गाण्याच्या खोडसाळपणामध्ये मोलाची भर टाकते. सगळे अंतरे Major Scale मध्ये आणि फक्त ध्रुवपद Minor Scale मध्ये अशी वैशिष्टय़पूर्ण संगीतरचना या गाण्यात आपल्याला ऐकायला मिळते.
हिंदी संगीताप्रमाणे मराठी संगीतातही बालगीतांचा एवढा मोठा खजिना आहे की त्या सगळ्यांचा परामर्श एका लेखात घेणे शक्य नाही. पण तरीही ‘बालगीत’ या क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम केलेल्या काही संगीतकारांचा आणि त्यांच्या गाण्यांचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जेव्हा आपण बालगीतांचा विचार करतो तेव्हा एक नाव ठळकपणे आपल्यासमोर येते, ते म्हणजे मीना खडीकर! मीनाताईंनी बालगीतांव्यतिरिक्त इतरसुद्धा सुंदर गाणी केलेली आहेत, पण तरीही मीना खडीकर म्हटलं की सर्वप्रथम आठवतात ती बालगीते. ही बालगीते चित्रपटांमधील नाहीत, पण तरीही त्यांच्यातील दृश्यात्मकतेमुळे आजही ती आपल्या स्मरणात आहेत. यातील बहुतेक सर्व गाणी त्यांच्या मुलांनी- म्हणजे योगेश खडीकर आणि रचना खडीकर यांनी गायलेली आहेत. ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, ‘कोणास ठाऊक कसा’, ‘सांग सांग भोलानाथ’ किंवा ‘ए आई, मला पावसात जाऊ दे’ ही अत्यंत बालसुलभ चाली असलेली गाणी. ती
त्याच पद्धतीने अत्यंत निरागसतेने गायली गेल्यामुळे अतिशय प्रसिद्ध झाली. अत्यंत खोडकर मुलाची अभिव्यक्ती या गाण्यांमध्ये आहे. यात कुठेही फार उपदेशाचे डोस नाहीत. त्यामुळे या गाण्यांचं झालेलं उं२३्रल्लॠ हे इतकं चपखल आहे, की ती गाणी मुलांच्या तोंडी पटकन् बसतात. याशिवाय ‘आम्ही कोळ्याची पोर’ किंवा ‘काडकीच्या टोकावर’ ही लोकसंगीतावर आधारित बालगीतेसुद्धा मीनाताई आपल्याला देऊन जातात.
बालगीतांच्या खजिन्यामध्ये आणखीन एक मोलाची भर टाकली ती प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. खळे यांची बालगीते त्यांच्या बाकी गाण्यांपेक्षा इतकी वेगळी आहेत, की ही गाणी त्यांनीच केली आहेत का, अशी शंकासुद्धा येऊ शकते. एरवी त्यांच्या रचनांमधून दिसणारा खास अभिजातपणा इथे कुठेही नाही. त्यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाला मुरड घालून त्यांनी केलेली ही कामगिरी अत्यंत थक्क करणारी आहे. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ किंवा ‘काळ देहासी आला’सारखी गाणी करणारा हा माणूस ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ किंवा ‘चंदाराणी चंदाराणी’ किंवा ‘विहिणबाई उठा’सारखी गाणी करतो तेव्हा त्यांची प्रतिभा किती उत्तुंग आहे याचा खरा अंदाज येतो. आज विविध श्रवणसाधने उपलब्ध असताना आणि जगातील सर्व संगीत हाताच्या बोटावर ऐकायला मिळत असताना हे कदाचित एवढं अवघड वाटणार नाही; पण त्या काळी अत्यंत भिन्न प्रकृतीच्या चाली एका वेळेस करणे हे फार सोपे नव्हते. पण ही भिन्न प्रकृतीची गाणी करूनसुद्धा चालीतला घट्टपणा आणि त्याच्यावर खळे यांची असलेली हुकमत याही गाण्यांमध्ये प्रकर्षांने जाणवते. अंतरा झाल्यानंतर परत मुखडय़ावर येताना संगीतकार काय पद्धतीने येतो, ही त्याची सगळ्यात मोठी कसोटी असते. आणि त्यामध्ये खळ्यांची जी मास्टरी आहे ती कुठेही लपून राहत नाही.
गीतकार, संगीतकार आणि गायक या तिन्ही भूमिकांमध्ये उठून दिसणारे शरद मुठे यांचेही योगदान विसरता येण्याजोगे नाही. त्यांचे ‘छान छान छान मनी माऊचे बाळ’ हे गाणंसुद्धा फार श्रवणीय आहे. वसंत प्रभू यांचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’, वसंत पवार यांचे ‘झुक झुक झुक झुक अगीनगाडी’ आणि भास्कर चंदावरकर यांचे ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ ही गाणीसुद्धा उल्लेखनीय आहेत.
बालगीतांचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे मोठय़ांनी लहान मुलांकरिता म्हटलेली गाणी. मन्ना डे यांनी गायलेले आणि राम कदम यांनी संगीतबद्ध केलेले ‘अ आ आई म म मका’ हे गाणे किंवा ‘बिनिभतीची उघडी शाळा’सारखी गाणी ठळकपणे आपल्याला आठवतात. शरद मुठे यांचेच ‘आला रे आला, आला आला फेरीवाला’ हे गाणे गंमतजंमत करत शेवटी मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगून जाते.
लहान मुलांच्या शाळेमध्ये म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थना यासुद्धा एका वेगळ्या अर्थाने बालगीते या सदरातच मोडतात. त्यात मला सगळ्यात आवडणारे गाणे म्हणजे वसंत देसाई यांचे फैय्याज यांनी गायलेले ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ किंवा अगदी अलीकडच्या काळातील कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हे गाणे!
अलीकडच्या काळात सलील कुलकर्णी या संगीतकार मित्राने बालसंगीतामध्ये केलेले काम मोठे आहे. ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ किंवा ‘मी पप्पांचा ढापून फोन’ आणि ‘एका माकडाने काढले दुकान’सारखी गाणी खूप प्रसिद्ध आहेत आणि ती लहान मुलांबरोबर त्यांच्या पालकांनासुद्धा अतिशय मोहित करतात. नवीन काळानुसार त्यांच्या चालींत आणि शब्दांमध्येसुद्धा केलेला बदल हा निश्चितच सुखावणारा आहे.
अलीकडच्या काळात काऊ, चिऊ, झुकझुक गाडी, चॉकलेटचा बंगला, चांदोबा इत्यादी गोष्टींचं आकर्षण वाटणं आणि त्यानुसार तशी गाणी तयार होणं हा प्रकार थोडासा कालबा होत चालला आहे. कम्प्युटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स-अॅप, विविध अॅप्स आणि इतर गॅझेट्स हीच लहान मुलांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहेत. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या बालगीतांची संख्या आता खूप रोडावली आहे. नवीन काळाला सुसंगत अशी बालगीते तयार होणं ही आज काळाची गरज आहे. कालचा बाल आणि आजचा बाल यांच्यात झालेलं स्थित्यंतर उमजून आणि त्याप्रमाणे नवीन गाणी लिहून आणि संगीतबद्ध करून ती लोकांसमोर आणणं अत्यंत आवश्यक आहे. तशी सुरुवात हळूहळू होताना दिसते आहे आणि निश्चितच बालगीतांचा एक ताजा प्रवाह पुन्हा सुरू होईल अशी आशा वाटायला जागा आहे.