आ नंदमय जीवन जगताना दोन गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. एक म्हणजे नशीब आणि दुसरे म्हणजे प्रयत्न. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असेही म्हणून चालत नाही आणि मनगट वापरून काहीही करून दाखवीन, अशी मस्तीही कामाला येत नाही. केव्हा चालायचे आणि केव्हा थांबायचे याचे भान सतत असायला लागते. सामान्यपणे ‘नशीब’ याचा अर्थ दोन प्रकारे घेता येतो. एक म्हणजे- जे अजिबात बदलता येत नाही असे. उदाहरणार्थ आपण पुरुष अथवा स्त्री असणे, आपले आई-वडील इत्यादी. दुसरे म्हणजे आपण ज्या परिस्थितीत जन्माला आलो ती परिस्थिती. पहिली गोष्ट बदलायचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे ठरते, पण दुसरी गोष्ट मात्र बदलण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते.
‘प्रयत्ना’चेही दोन भाग असतात. एक म्हणजे- स्वत:ला बदलवणे आणि दुसरे म्हणजे बाहय़ परिस्थितीला बदलवणे. यात स्वत:ला बदलवणे जास्त सोपे आणि आनंददायी असते. परिस्थिती बदलवणे अवघड तर असतेच, पण ते नशिबावर जास्त अवलंबून असते. काही जण परिस्थिती बदलण्याचा सोपा मार्ग निवडतात, म्हणजे देश सोडून परदेशात जातात. काहीही असले तरी कोणतीही गोष्ट पूर्णपणे प्रयत्नाने अगर नशिबाने होत नाही. दोन्हीही गोष्टींचा त्यात वाटा असतो.
आपण मोठय़ा लोकांच्या गोष्टी वाचतो की, नशीब काढायला ते कोकणातून देशावर आले. म्हणजे असे पहा की, ते नशीब बदलायचा प्रयत्न करत होते. आता असे अनेक लोक कोकणातून देशावर आले असतील. जे मोठे झाले त्यांचे कौतुक आपल्याला कळले, पण जे फाफलत धुळीला मिळाले त्यांच्याबद्दल आपल्याला काहीही कळलेले नाही आणि कळणारही नाही. काही मोठय़ा कलाकारांविषयी आपल्याला असे सांगितले जाते की, ते अठरा अठरा तास रियाझ करत असत. म्हणजे आपल्याला असे वाटते की हे अठरा तास त्यांना अतोनात त्रास आणि कष्ट होत होते. परंतु याच्याइतके दुसरे खोटे विधान नाही. म्हणजे रवी शंकर रियाझ करताना मधून मधून घडय़ाळाकडे पाहून ‘अरे बाप रे अजून तीन तास शिल्लक आहेत, काय नशिबाला आले आहे!! वाजवा सतार. काय करणार? नशीबच खोटे’, असे अजिबात म्हणालेले नसणार. याउलट अत्यानंदात विहरत असताना अत्यंत समाधानाने सतार खाली ठेवल्यावर अठरा तास झाले, असे त्यांना समजले असणार. असे नसते तर कोणीही अठरा तास रोज सतार वाजवून रवी शंकर झाला असता.
आनंदात असणारे लोक अफाट प्रयत्न करताना दिसतात, पण त्यामध्ये दु:खाचा लवलेश नसतो. काही लोकांच्या नशिबात प्रसिद्धी असते तर काही तितकेच गुणी असून त्यांच्या नशिबात प्रसिद्धी नसते. आणि ती मिळावी म्हणून ते काही धडपडही करत नाहीत. ही सहजता प्रयत्न आणि नशीब यांची योग्य सांगड घालणाऱ्याकडे असते. त्याशिवाय आनंदमय आयुष्य शक्य नाही. आपल्या सर्वाच्या आयुष्यात अशा गोष्टी घडलेल्या असतात की आटोकाट प्रयत्न केले तरी दरवाजा उघडत नाही आणि कधी कधी सारे दरवाजे एकापाठोपाठ भराभर उघडत जातात. स्कूटरला पन्नास किका मारल्यावर एक्कावन्नाव्या किकला स्कूटर चालू होते, पण एकदम एक्कावन्नावी किक मारता येत नाही. या साऱ्या किका मारत असताना मनात एक आशा असते की, आता या किक ला नक्की चालू होणार, पण तसे होत नाही. निराश न होता आपण पुढची किक मारतो आणि कुठल्या तरी एका किकला ती चालू होते आणि आनंद होतो. हे जर रोज होत राहिले तर स्कूटरची काळजी घेतलेली नाही, हे सांगायला कुणी ज्योतिषी लागत नाही.
वाटेत आलेला दगड हा अडथळा आहे की पायरी, हे समजणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते. ज्यांना ते नीट समजते ते आनंदात राहतात; नाही समजत ते पायरीसमोर उभे राहून ‘माझ्या आयुष्यात अडथळे फार’ असे म्हणत बसतात. किंवा अडथळा असताना पायरी समजून चढायचा प्रयत्न करत बसतात. याकरता थोडा मार खाल्ल्यावर प्रयत्न कधी थांबवायचे ही अक्कल आपोआप येऊ लागते. अजगर जसा भक्ष्य टप्प्यात येईपर्यंत सुस्त वाटावा इतपत शांत असतो, पण एकदा टप्प्यात आल्यावर क्षणात झडप घालतो; तशी सजगता सतत आवश्यक असते. निर्णय घेणे आणि तो धकवणे किंवा नवीन निर्णय घेणे हाही एक निर्णयच असतो, हे समजणे फार इष्ट असते.आनंदमय राहण्यासाठी सजगता ही अशी आवश्यक ठरते. काय केले की आपण आनंदात असतो, काय केले की आपल्याला दु:ख होते हे आपल्याला नीट कळले पाहिजे. म्हणजे नशिबावर हवाला ठेवून स्वस्थ बसायचे की काही हातपाय हलवायचे ते कळते.
प्रयत्न करायचेच तर स्वत:ला बदलण्यापासून सुरुवात करावी. आपण कसे आहोत हे अगदी शांतपणे तपासून पाहणे ही पहिली पायरी. जे काय आपल्यात चांगले-वाईट असेल ते पाहायचे. त्यावर कोणतीही टीका करायची नाही. मग बदलण्यासारखी जी सोपी गोष्ट असेल ती करायला सुरुवात करायची. कोणतीही डेडलाइन ठेवायची नाही म्हणजे विनाकारण निराश व्हावे लागत नाही. उदाहरणार्थ आपल्याला थुंकण्याची सवय आहे आणि ती सोडायची आहे. पहिली पायरी म्हणजे थुंकल्यावर बऱ्याच वेळाने कळणे, दुसरी पायरी म्हणजे थुंकता थुंकता कळणे, तिसरी पायरी म्हणजे थुंकण्यआधीच कळणे, चौथी पायरी म्हणजे थुंकावेसे न वाटणे. हे व्हायला जो वेळ लागेल तो योग्यच आहे असे समजावे, पण प्रयत्न मनापासून करावेत. नुसत्या सवयी बदलणे एक भाग झाला. त्याबरोबर वृत्ती बदलणे, वागणूक बदलणे अशा अनेक गोष्टी आपल्याला आनंदमय जीवन प्राप्त करून देतात.
आपल्या सुख-दु:खाला आपण जबाबदार असतो. म्हणजे रहदारीत आपण नियमांचे पूर्ण पालन करत असताना कुणी चुकीच्या बाजूने येऊन आपल्यावर आदळला तर कमीत कमी आपण तिथे होतो एवढी आपली जबाबदारी असतेच.
प्रयत्न आणि नशिबात किंचित जास्त महत्त्व प्रयत्नाला आहे, कारण ते आपल्या हातात असतात. नशिबाने साथ दिली तर फारच छान, पण जर नाही दिली तर ती मिळेपर्यंत उत्साहाने लढणे हे तर आपण करू शकतो. काय सांगावे, आपले प्रयत्न आपले नशीब पालटवू शकत असतीलसुद्धा.
प्रयत्न आणि नशीब
निर्णय घेणे आणि तो धकवणे किंवा नवीन निर्णय घेणे हाही एक निर्णयच असतो, हे समजणे फार इष्ट असते. आनंदमय राहण्यासाठी सजगता ही आवश्यक ठरते. काय केले की आपण आनंदात असतो, काय केले की आपल्याला दु:ख होते हे आपल्याला नीट कळले पाहिजे; म्हणजे नशिबावर हवाला ठेवून स्वस्थ बसायचे, की काही हात-पाय हलवायचे, ते कळते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
आणखी वाचा
First published on: 10-02-2013 at 12:11 IST
मराठीतील सर्व आयुष्य मजेत जाईल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hard try and luck