मनोहर पारनेरकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
samdhun12@gmail.com
या लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही चक्रावून गेला असाल ना? मीदेखील एकदा असाच चक्रावून गेलो होतो. भारतात जन्मलेल्या एका अमेरिकन मित्राने याच शीर्षकाचा एक फॉरवर्ड साधारण दोन वर्षांपूर्वी मला पाठवला होता. तेव्हा तो नुकताच अर्जेटिनाला भेट देऊन आला होता. पुढे जाण्यापूर्वी प्रथम या शीर्षकाचं रहस्य तुम्हाला उलगडून सांगतो.
अर्जेटिनामध्ये दुसरं हस्तिनापूर कसं असू शकेल? पटकन् मनात येणारा हा अतिशय योग्य प्रश्न आहे. त्याचं थोडक्यात उत्तर असं : अर्जेटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्समध्ये साधारण बारा एकराच्या परिसरात हे हस्तिनापूर नावाचं मंदिरांचं संकुल उभं आहे. इथलं वातावरण ‘शांग्री-ला’सारखं स्वर्गीय आहे. या संकुलाचं स्थापत्य अतिशय शोभिवंत असून एकूणच परिसर विश्वास बसणार नाही इतका स्वच्छ आहे. या संकुलात शिव, विष्णू, गणपती आणि सूर्याची मंदिरं आहेत. आणि संकुलाचं नाव ‘हस्तिनापूर’ असल्यामुळे तिथे पांडवांचंदेखील एक मंदिर आहे. हस्तिनापूरच्या संस्थापकांना अभिप्रेत असलेला भक्त हा देवांना साकडं घालणारा याचक नसून, तो कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करणारा ज्ञानमार्गी साधक असावा असं मला वाटतं. आणि हाच त्यांचा विचार त्यांनी ‘दि सिटी ऑफ विज्डम’ या संकुलाला दिलेल्या नावात व्यक्त झालेला दिसतो.
हिंदू देवतांच्या या विलक्षण मंदिर संकुलाचा कारभार हस्तिनापूर फाऊंडेशन ही संस्था चालवते. इथे सगळ्या गोष्टी अगदी वेळेबरहुकूम केल्या जातात. अडा आल्ब्रेख्त या महिलेनं १९८१ साली याची स्थापना केली. अडा ही अर्जेटिनाची नागरिक असून, अध्यात्माच्या ओढीने ती भारतीय संस्कृतीची निस्सीम चाहती बनली आणि तिने काही वर्षे भारतात वास्तव्यदेखील केलं. हिंदू जीवनशैली आणि जीवनाबद्दलचा हिंदू दृष्टिकोन यांनी ती खूपच प्रभावित झाली होती आणि म्हणूनच तिला आपल्या मातृभूमीत हे भव्य संकुल उभारण्याची प्रेरणा मिळाली. अशा प्रकारचं संकुल उभारण्यासाठी करावं लागलेलं प्रचंड संशोधन, नियोजन, कष्ट, काळजी, प्रेम आणि अर्थातच लागणारा पसा या सगळ्याची नुसती कल्पना जरी केली तरी दडपून जायला होतं.
प्रामुख्यानं रोमन कॅथलिक धर्म असलेल्या एका लॅटिन अमेरिकन देशात हे जे हिंदू देवतांचं आध्यात्मिक मंदिर संकुल आहे, त्याबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर इंटरनेटचा उपयोग करून तुम्ही जाणून घेऊ शकता.
वाचकांना रस वाटेल अशा अर्जेटिनाशी निगडित तीन घटना मित्राने मला फॉरवर्ड केल्या होत्या. त्या वाचून मला स्वत:ला अर्जेटिनासंबंधित तीन ठळक, पण महत्त्वाच्या घटना आठवल्या. त्यातल्या दोन नजीकच्या भूतकाळातल्या आहेत, तर तिसरी जवळजवळ शतकापूर्वीची आहे. यातली पहिली घटना आनंददायी आहे, दुसरी अर्जेटिनासाठी द:ुखद आहे. आणि ज्यांचा आधुनिक राष्ट्रांच्या सार्वभौमत्वावर आणि विश्वशांतीवर विश्वास आहे, त्यांना तर ती जास्तच दु:खद वाटेल. आणि तिसरी घटना ही बहुतेक वाचकांसाठी खूपच आश्चर्यकारक ठरेल.
‘Don’t cry for me Argentina’ १९७९ साली लंडनमध्ये ‘एव्हिता’ या ब्रॉडवे संगीतिकेचा ब्रॉडवेवर पहिला प्रयोग झाला. या संगीतिकेतील ‘Don’t cry for me Argentina’ हे अविस्मरणीय गाणं आठवणं ही अनेकांसाठी सुखद घटना असेल. हे गाणं अॅन्ड्र लॉइड वेब्बरनं लिहिलं आहे. तुमच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून सांगतो की, ही संगीतिका ईव्हा पेरॉन (१९१९-१९५२) हिच्या आयुष्यावर आधारित आहे. ईव्हा ही अर्जेटिनाचा हुकूमशहा अध्यक्ष जुआन पेरॉनची (१८९५-१९७४) दुसरी पत्नी असून, तिने तिच्या वादळी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले होते. माझ्या एका मित्राने मूळ ‘एव्हिता’चा प्रयोग लंडनमध्ये बघितला होता. आणि अलेक पदमसी यांनी निर्मिलेला या संगीतिकेचा प्रयोगही मुंबईत बघितला होता. (शारॉन प्रभाकरनं हे गाणं त्या संगीतिकेत गायलं होतं.) माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार (त्याच्या मताला मी महत्त्व देतो.), शारॉन प्रभाकरनं ते गाणं मूळ ब्रिटिश गायिकेपेक्षा कितीतरी जास्त चांगलं गायलं होतं. (त्या मूळ गायिकेचं नाव माझ्या लक्षात नाही.)
जेव्हा मार्गारेट थॅचरने अर्जेटिनाला रडवलं..
ईव्हा पेरॉन आपल्या गाण्यात ‘अर्जेटिना, माझ्यासाठी अश्रू ढाळू नकोस’ असं सांगते. पण मार्गारेट थॅचरने मात्र १९८२ साली सबंध अर्जेटिनाला अक्षरश: रडवलं. ७४ दिवस चाललेल्या फॉकलंड लढाईत ग्रेट ब्रिटनने या छोटय़ाशा लॅटिन अमेरिकन देशाला नमवलं. ही लढाई म्हणजे आधुनिक काळातली एक प्रकारे डेव्हिड-गोलायथची लढाई होती. फक्त इथे विजय झाला तो गोलायथचा. या लढाईवर अर्जेटिनाच्या एका लेखकानं उत्तम भाष्य केलं आहे. तो म्हणतो, ‘दोन टक्कल पडलेल्या माणसांनी एका फणीवर कब्जा मिळवण्यासाठी एकमेकांवर प्राणघातक हल्ला करावा अशी काहीशी ही लढाई होती.’
या लढाईबद्दल काही वर्षांपूर्वी मी लंडनमध्ये असताना एका ब्रिटिश माणसाकडून ऐकलेली ही प्रतिक्रिया : पूर्व लंडनमधील NHS हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी आम्ही दोघं रांगेत उभे होतो. तासभर रांगेत उभं राहिलो असताना साहजिकच आम्ही एकमेकांशी गप्पा मारू लागलो. हा गडी अत्यंत उत्साहानं आणि भरभरून बोलत होता. (अशा प्रकारच्या वल्ली फक्त वूडहाऊस यांच्या कादंबरीमध्येच असतात असा माझा समज झाला होता.) मी त्याला विचारलं , ‘फॉकलंडची लढाई ही ब्रिटिशांकरता एक शरमेची गोष्ट होती असं तुम्हाला वाटत नाही का?’ तर त्याने त्वरित उत्तर दिलं , ‘‘सर , तुमच्या गांधीजींच्या इंडियाने १९६१ साली गोव्यावर केलेलं आक्रमण ही जितकी शरमेची बाब होती, तितकीच ही आहे.’ त्यावर ‘ब्रिटिश बुलडॉगने लचका तोडलेला हा शेवटचा घास ठरो..’ असं काहीसं मी पुटपुटलो.
१९८६ सालच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेटिनाने या पराभवाचा वचपा काढला का? हो. काढला. पण फारच थोडय़ा प्रमाणात. आपल्यापैकी जे फुटबॉलवेडे नाहीत, त्यांनीदेखील अर्जेटिनाच्या विश्वविख्यात, पण काहीसा कुप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू दिएगो मॅराडोनाचं नाव ऐकलं असेलच. अत्यंत निर्णायक अशा डावात त्याने इंग्लंडविरुद्ध दोन गोल केले होते. त्यातला पहिला बॉलला हात लागून (किंवा लावून) गोलपोस्टमध्ये गेला. फुटबॉलच्या इतिहासात हा एक अत्यंत कुप्रसिद्ध गोल समजला जातो. आणि दुसरा अप्रतिम गोल मात्र त्याने त्याच्या सर्वागसुंदर खेळाच्या जोरावर केला होता. या घटनेबद्दल एका फुटबॉल कॉमेंटेटरने म्हटलंय, ‘‘हे दोन गोल मॅराडोनाच्या व्यक्तिमत्त्वातील प्रचंड विरोधाभास दर्शवतात. एक फसवणूक करणारा आणि दुसरा असामान्य प्रतिभावान असा. म्हणूनच त्याच्यावर लोक प्रेमही करतात आणि त्याचा द्वेषही करतात.’’
टागोर अन् त्यांची अर्जेटिअन स्फूर्तिदेवता
आणि आता तिसरी व शेवटची घटना. व्हिक्टोरिया ओकॅम्पो (१८९०-१९७९) ही एक दक्षिण अमेरिकेतील तिच्या काळातली अत्यंत महत्त्वाची लेखिका होती. ती अतिशय बुद्धिमान लेखिका आणि दिसायला सुंदर होतीच; शिवाय एका वाङ्मयीन नियतकालिकाची प्रकाशकही होती. टागोरांच्या (१८६१-१९४१) ‘गीतांजली’चा आंद्रे जिदे (Andre Gide) यांनी केलेला फ्रेंच अनुवाद व्हिक्टोरियाने वाचला आणि ती त्यांच्या कवितेनं मंत्रमुग्ध झाली. त्या काळात टागोर एक अथक आंतरराष्ट्रीय प्रवासी होते. व्हिक्टोरिया ओकॅम्पोच्या निमंत्रणावरून त्यांनी १९२४ साली अर्जेटिनाला भेट दिली. ब्युनॉस आयर्सच्या पराना नदीकिनारी अत्यंत अद्भुतरम्य वातावरणात व्हिक्टोरियाचा व्हिला होता. टागोरांनी दोन महिने व्हिक्टोरियाच्या जादूई सहवासात व्यतीत केले. (कालांतराने त्यांनी तिचं टोपणनाव ‘बिजोया’ असं केलं.) टागोरांना १९१३ साली नोबेल पारितोषिक मिळालं होतं. त्या दोघांची जेव्हा भेट झाली तेव्हा ते ६४ वर्षांचे होते आणि व्हिक्टोरिया ३४ वर्षांची. (गूगल सर्च केलं तर त्या दोघांचा फोटोदेखील बघायला मिळेल.) त्यांचं प्रेम प्लेटॉनिक, गाजावाजा नसलेलं, तरल आणि आत्मिक होतं. ‘आमी चीनी गो चीनी तोमारे ओगो बिदेशिनी/ तुमी थाको शिंधू पारे, ओगो बिदेशिनी’ या टागोरांच्या अतिशय लोकप्रिय गाण्यातली ‘बिदेशिनी’ म्हणजे बिजोया ऊर्फ त्यांची ही लॅटिन अमेरिकन स्फूर्तिदेवता होती असं समजलं जातं. (सत्यजित रे यांच्या ‘चारुलता’ या प्रसिद्ध चित्रपटातील हे गीत किशोरकुमारनं उत्तमरीत्या गायलं आहे.) ‘पुरबी’ या टागोरांच्या कवितासंग्रहातील जवळजवळ एक-तृतीयांश कवितांची स्फूर्तिदेवता बिजोया होती असं मानलं जातं. बिजोया ही प्रेरणा असलेल्या एका कवितेतील या चार ओळी..
Exotic blossom, I whisper again in your ear
What is your language dear?
You smiled and shook your head
And the leaves murmured instead
आणि या लेखाच्या शेवटी अर्जेटिना आणि महाराष्ट्र यांच्यातला ओढूनताणून आणलेला, पण एक मजेशीर दुवा..
जर तुम्ही यूटय़ूबवर गेलात आणि जितेंद्र अभिषेकींचे शिष्य राजा काळे यांनी गायलेला संत चोखामेळा यांचा ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हा अभंग पाहिलात/ ऐकलात तर तुम्हाला एक सुखद धक्का बसेल. राजा काळेंना साथ देणारा एक उंच, दाढीवाला, पांढरा कुर्ता घातलेला गोरा पाश्चात्त्य तरुण त्यात दिसेल. अभंगाच्या मधेच राजा काळे त्या तरुणाची ओळख ‘हा माझा अर्जेटिनामधला शिष्य’ अशी करून देतात. मला विचाराल तर हे म्हणजे ब्युनॉस आयर्समधल्या एखाद्या कॅथलिक चर्चच्या कॉयर कोरसमध्ये हान्डेल या जर्मन-ब्रिटिश रचनाकाराचं प्रसिद्ध धार्मिक ‘Hallelujah’(हालेलुईया) गीत पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या एखाद्या तरुणाने गाण्यासारखं आहे.
शब्दांकन : आनंद थत्ते
गेल्या आठवडय़ाच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘सांगतो ऐका..’ सदरात ‘दुनिया ना माने’ चित्रपटातील शकुंतला परांजपे यांच्याऐवजी शांता आपटे यांचे छायाचित्र अनवधानाने प्रसिद्ध झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व.