वडाखालच्या मारोतीजवळ चांगलंच ऊन चमकतंय. या उन्हात पदरानं डोकं झाकून बायका केव्हाच्या बसल्यात. मधेच वेशीकडच्या वाटेवर धुरळा उडतो. बायकांच्या माना आशेनं रस्त्याकडं वळतात. कुणाचंतरी तोडलेलं झाड घेऊन जाणारी ट्रॅक्टरची ट्रॉली खडखडत असते. घरची कामंधामं तशीच पडून आहेत. म्हाताऱ्या, तरण्या, संसारी, परकरी पोरी, बायका वाट पाहत बसल्यात. एवढी वाट तर माहेराहून घ्यायला येणाऱ्या गाडीचीही पाहिली नव्हती. आज मात्र चार-चार घंटे अंगातलं रक्त तापवीत बसून राहावं लागतंय. रात्री-बेरात्रीसाठी पुरुष मंडळी कंदील-बॅटऱ्या घेऊन तयार असतात. कालपासून टँकर आलेलाच नाहीये. चारशे उंबऱ्याचं तहानलेलं गाव. दुष्काळी गाव म्हणून निर्माण झालेली नवीन ओळख. नेते आले. तळमळीने बोलले. त्यांचे बोल हवेत विरले. गाव कोरडाच. विहिरी आटल्या. नदीत तर वाळूही शिल्लक नाहीये. प्लेगच्या साथीपेक्षाही भयंकर अशी आत्महत्येची साथ आलीय. रानात उगवलेलं वाळून गेलं. बंद पडलेल्या हापशाजवळ भांडे, कळशा, बघोन्यांची रांग लागलीय. त्या रांगेतल्या नंबरवरून भांडाभांडी, तर कधी मारामारीही झाली. बायकांनी एकमेकींच्या झिंज्या धरल्या. पण टँकर काही वेळेवर येईना. परवा तर एका बाईला रांगेत घेरी आली. तिच्या तोंडावर पाणी मारावं तर पाण्याची बोंब. कुणीतरी घरातला रांजण खरवडून ग्लासभर पाणी आणलं म्हणून भागलं. नुस्तंच आभाळ भरून येतं. मधेच कधीतरी उंदीर मुतल्यासारखा पाऊस पडतो. एखाद्या कंजूष दानशूरानं पाखरासाठी स्वत:चा खरकटा हात झटकावा तसे चार शिंतोडे पडतात.
चिंताक्रांत बायका बसल्यात ओटय़ावरच्या तुटपुंज्या सावलीत. बोलणार तरी काय? बोडख्या कपाळासारखी शांतता. न बोलावं तर वेळ कसा कटणार? म्हणून बायका बोलतायत. चार बायका खोदून खोदून विचारतायत प्रयागाबाईला. घडाघडा बोलतायत प्रयागाबाई.. ‘‘असा वंगाळ वकत. तरीबी ट्रॅक्स करून आम्ही आठ-धाजण पोरगी पाहायाला गेल्तो. पाव्हणेबी आपल्यासारखेच. पन पाऊसकाळ बरा असलेले. खाऊनपिऊन सुखी. तरतरीत पोरगी. नाकीडोळं देखणी. चांगली बारावी शिकल्याली. दाखवायाचा कार्येक्रम यवस्थित झाला. आम्हाला पोरगी पसंद पडली. खरं तर तिथंच कुंकाचा कार्येक्रम उरकायचा; पन हे दुष्काळाचं घोडं मधीच आलं. पार दिवाळीपतुर सारं लांबलं. गोडाधोडाचं जेवण झालं. आम्ही गावाची वाट धरली. कधी नव्हं ते आमच्या पोराला पोरगी पसंद पडलेली. त्यामुळं पोरगं खुशीत व्हतं. सुनबाईला पुढी शिकवायाचा त्याचा इचार होता. दोघाचा जोडा लक्ष्मी-नारायणाचा..’’ तेवढय़ात न राहवून एक बाई बोललीच- ‘‘मंग माशी शिंकली कुठं?’’ प्रयागाबाई गहिवरल्या. ‘‘कशान् की काय माय, कुण्या चांडाळाची नजर लागली. चार रोजानी पाव्हण्याचा कागुद आला. ठरलेलं लगीन मोडलं. काय तर म्हणं आमचं ठिकाण पसंद न्हाई.’’ जमलेल्या बायकांना टँकरच्या प्रतीक्षेतही ठिकाण का पसंत नाही याची उत्सुकता होतीच. नाकारण्याचं नेमकं कारण ऐकायला उत्सुक असलेली एक म्हातारी बोललीच, ‘‘एवढं राजबिंडं, हुश्शार पोरगं. ठोकरून लावायला काय धाड बडवली त्या तालेवारायला. काय काळ आला रं देवा!’’ तेवढय़ात रस्त्यावरचा धुरळा उडाला. आता मात्र पाण्याचा टँकर आलेला होता. बायका सावध झाल्या. शत्रूची चाहूल लागताच सैनिकांनी शस्त्र रोखून सज्ज व्हावं तशा हांडे-कळशा घेऊन बायका तय्यार झाल्या. भांडय़ाला भांडी लागली. गावात गलका झाला.. ‘टँकर आलाय, टँकर आलाय.’ या गोंधळात प्रयागाबाईच्या पोराची सोयरीक मोडण्याची गोष्ट पूर्ण झाली नाही. पण त्या मोडलेल्या सोयरिकीची सल कायम होती. खरं तर प्रयागाबाईचा पोरगा चांगला धट्टाकट्टा. डी. एड. झालेला. शिक्षकाच्या नोकरीसाठी दहा लाख देणं शक्य नव्हतं, नाहीतर आयत्या पगाराच्या नोटा मोजत बसला असता. घरात दहा एकर शेती. शेवटी बापाबरोबर शेती करू लागला. तीन वर्षांपासून पाऊस नाही. परिस्थिती बिघडली. गाव कंगाल झालं. प्यायलासुद्धा पाणी नाही. कुणाच्या घरी दिवसा पाहुणा आला तर घरात बाई दिसणार नाही. हांडे-कळशा घेऊन बाई बसलेली टँकरच्या रांगेत. नाहीतर दूरवरच्या विहिरीतलं पाणी खरडण्यासाठी पायपीट करायला गेलेली. शेत ओसाड झालेलं. तिथं काही काम नाही. मग बापे माणसं अंगणातल्या खाटेवर बिडय़ाचा धूर काढीत, नाहीतर तंबाखू चघळत बसलेले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा