जोशी कुटुंबातील चारही सदस्य एकाच वेळी रुग्ण बनून माझ्याकडे आले. पैकी पती-पत्नी आणि लेक गार्गी यांच्या समस्या सारख्याच होत्या. म्हणजे भूक लागत नाही, खाल्लेलं पचत नाही, अन्न खूप वेळ पोटात
‘‘ती आंबट चवच शरीराला कमी पडतेय,’’ मी म्हटलं.
‘‘म्हणजे?,’’ समस्त जोश्यांनी आश्चर्यानं विचारलं.
‘‘म्हणजे आपल्या पोटातला अग्नी प्रज्ज्वलित करणं, खाल्लेल्या अन्नाचं पचन करणं, तोंडाची चव वाढवणं, अन्नाची योग्य हालचाल करणं, मलप्रवृत्ती वेळच्या वेळी आणि सुखपूर्वक करणं, पोटातल्या वायूला बाहेरचा रस्ता दाखवणं- या सर्व कामांसाठी आहारात आंबट चवीचे पदार्थ असणं गरजेचं आहे. स्वत: चविष्ट असून जिभेची चव वाढवणारा हा एकमेव रस आहे. हा रस हृदयालाही हितकर आहे.’’
वैद्य आंबट पदार्थ खायला सांगू शकतात, यावर कितीतरी वेळ त्यांचा विश्वासच बसत नव्हता. बराच वेळ समजावून सांगितल्यावर त्यांना पटलं.
त्या तिघांचं औषध देऊन झाल्यावर गौरवच्या समस्या सुरू झाल्या. त्याच्या अंगावर झालेली कुठलीही जखम, फोड, तोंडातले फोड पिकल्याशिवाय बरेच होत नाहीत म्हणे. जखमा नेहमी चिघळतात.
‘‘तुम्ही तर म्हणता की, तुम्ही आंबट अजिबात खात नाही. मग याला हा त्रास व्हायचं कारण काय?,’’ मी आश्चर्यानं विचारलं.
‘‘मी स्वयंपाकात नाही वापरत काही आंबट; पण हा खातो. किंबहुना, आमच्या चौघांच्या वाटणीचं आंबट हाच खातो. एका वेळी याला र्अध लिंबू लागतं. लोणचं असेल तरी एका फोडीत समाधान नाही. बोरं, कैरी, संत्री, रायआवळे, चिंच ही फळं भरपूर खातो. दही आंबट असलं की हा खूश! तुपाची बेरी खातो- आंबट असते म्हणून. काहीच नाही तर tomato saus तरी लागतोच याला..’’ गौरवच्या आईनं माहिती पुरवली.
‘‘अति प्रमाणात आंबट खाल्ल्यानंच त्याला हा त्रास होतोय. त्याचं आंबट कमी करावं लागेल.’’
आंबट चवीचं हे वैशिष्टय़ आहे. ज्यांना ती आवडते ते अति खातात आणि ज्यांना आवडत नाही त्यांना त्याची कमतरता भासते. आंबट पदार्थामध्ये पृथ्वी आणि अग्नी या दोन महाभुतांचं प्रमाण जास्त असतं. हा रस उष्ण असल्यानं पित्त आणि रक्त यांना बिघडवणारा आहे. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी, रक्ताचे/ त्वचेचे विकार असणाऱ्या व्यक्तींनी शरद ऋतूत (पावसाळा व हिवाळा यामधील काळ), मध्यरात्री या चवीचे पदार्थ खाऊ नयेत. जेवणाच्या ताटात हे पदार्थ डाव्या हाताला कमी प्रमाणात वाढले जातात. कारण त्यांचं जेवणातलं प्रमाण कमीच असायला हवं. बहुतेक आंबट पदार्थामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असतं आणि ते एक महत्त्वाचं antioxidant असल्यानं आहारात आंबट पदार्थाचा समावेश असावा, हे खरं आहे. पण त्यातही आपण श्रेष्ठ पदार्थ का निवडू नयेत? म्हणजे ‘क’ जीवनसत्त्व खायचं तर टोमॅटोपेक्षा आवळा निवडावा. कारण आवळा पाच रसांचा आहे. त्यामुळे त्याचा आंबटपणा शरीराला घातक नसतो. शिवाय शिजवल्यानंतरही यातलं ‘क’ जीवनसत्त्व इतर पदार्थाच्या मानानं जास्त टिकून राहतं. कोकम पित्तशामक आहे. ताक उत्तम पाचक आहे. डाळिंब उत्तम पाचक, पित्तशामक आणि बल देणारं आहे. पण आजकाल सगळ्या पदार्थामध्ये टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी घातली जाते. टोमॅटो सूप, वेगवेगळे आंबट सॉसेस, व्हिनिगर यांचा अतिरेकी वापर केला जातो. गंमत म्हणून तोंडात टाकायच्या चण्यादाण्यांनाही चटपटीत चव येण्यासाठी आंबट, खारट पदार्थ वापरले जातात.
आंबट चवीचे पदार्थ अति प्रमाणात खाण्यानं दात शिवशिवतात (आणि आपण अलगद sensetive toothpaste च्या जाळ्यात अडकतो. याला म्हणतात- आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी!), जखमा चिघळतात, सांधे आणि स्नायू शिथिल होतात (जास्त वापरून प्रसरण पावलेल्या रबरबँडसारखे कार्यक्षमता हरवून बसतात), सांधे आणि अंग दुखू लागते, घशात आणि छातीत जळजळ होते, कफाचे आजार बळावतात.
आंबट आणि खारट हे जोडीनं खाल्ले जाणारे रस. कवीमनाचे खवय्ये लवणाला ‘लावण्य’ म्हणतात. (कारण स्वयंपाकातील चवीचं सौंदर्य या रसाच्या योग्य वापरावर अवलंबून असतं.) बडोद्याचं शहा हे आमचं मित्रकुटुंब अशा खवय्यांपैकीच. एक दिवस अचानक त्यांच्या मुलीचा- नेहाचा मला फोन आला, ‘‘दीदी, मला गेलं वर्षभर गळवांचा त्रास होतोय. एका जागी आलेलं बरं होईपर्यंत दुसरं येतं. खूप औषधं झाली. बरं वाटेल असं वाटून तुला फोन नाही केला, पण आता मी कंटाळलेय गं.’’
मला तातडीनं डोळ्यांसमोर आलं ते नेहाच्या घरातलं लोणच्याचं पाळं! आठ कप्पे असलेल्या या पाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची चटकदार लोणची कायम भरलेली असतात. कैरी, लिंबू, आवळा, मिरची, हळद, मुळा, गाजर, वाटणा, करवंद, भाज्या.. कशाचंही लोणचं! गोड, तिखट, गुजराती, जळगावी असेही प्रकार! पाहुण्यांना याचं अप्रूप असतं. घरातल्या सगळ्यांना त्याची सवय झाली आहे.
‘‘आधी लोणचं बंद कर. त्यामुळे रक्त खराब होऊन अशी गळवं होतात. आणि मिठाचं प्रमाण एकदम कमी कर. वाटल्यास आठवडय़ातून एकदा बिनमिठाचा उपवास कर,’’ मी म्हटलं.
‘‘अय्या! माझ्या मराठी आजीनं (आईच्या आईनं) मला कालच बिनमिठाचे मंगळवार करायला सांगितलंय.’’ नेहाला आश्चर्य वाटत होतं.
‘‘अगं, आपल्याकडचे खाण्यापिण्याचे धार्मिक नियम आरोग्यासाठीच ठरवले आहेत.’’ (परंपरांचा पाईक होण्याची आणि समोरच्याला करून घेण्याची संधी कुणीही वैद्य कशी सोडेल?)
खारट चवीच्या पदार्थामध्ये जल आणि तेज या महाभुतांचं प्रमाण जास्त असतं. हा रस सगळ्यात जास्त उष्ण आहे. अन्नपदार्थाना चव देणं, अन्नपचन, अग्नीवर्धन, पाचक तसेच शरीरातील अन्य स्रवांचं स्रवण करणं, अन्न पचेपर्यंत ते ओलसर ठेवणं, शरीरातील यच्चयावत मार्ग (channels) मोकळे करणं, शरीर-अवयव मृदू करणं.. या कामांसाठी शरीराला खारट पदार्थाची गरज असते. पण ती दिवसाला फक्त ३.७५ ग्रॅम्सच. म्हणून मीठ पानात समोर वाढतात. जमिनीवर मांडी घालून जेवायला बसल्यावर मिठापर्यंत हात पोचायला कष्ट पडतात. आपण रोजच्या जेवणात लोणचं घेत नाही. कधीतरी घेतो, तेही पानात डाव्या बाजूला आणि अगदी कमी.
पापडखार, पालेभाज्यांमधील क्षार, अजिनोमोटो, सैंधव, काळं मीठ या सगळ्यांचे गुणधर्म सारखेच असतात. यात सैंधव श्रेष्ठ. पांढऱ्या मिठापेक्षा खडामीठ चांगलं.
लोणची, पापड, चायनीज पदार्थ, चाट मसालायुक्त पदार्थ यांतून मोठय़ा प्रमाणात शरीरात खारट पदार्थ जातात. आजकाल पराठा, थालीपीठ, पुरी, सूप, खिचडी, इतकंच काय- शेवेतसुद्धा ‘पालक’ घातला जातो. यामुळे शरीरात क्षार जास्त जातात.
अति झाले की हे पदार्थ आपले प्रताप दाखवतातच. केस गळणं, केस पांढरे होणं, अंगाला खाज येणं, त्वचेचे विविध आजार, सूज, तोंड येणं, डोळे येणं, सांधेदुखी, शरीरात आत वा बाहेर होणारा रक्तस्राव, डोळे-नाक-कान-जीभ-त्वचा या इंद्रियांची कार्यक्षमता कमी होणं, त्वचेचा वर्ण बिघडणं, आम्लपित्त, उच्च रक्तदाब हे अतिखारट खाण्याचे दुष्परिणाम आहेत. आज अगदी लहान वयात मुलांचे केस पांढरे होतात, त्यांना मोठय़ा अंकांचे चष्मे लागतात. ही म्हातारपण लवकर येत असल्याची लक्षणे आहेत.
एकीकडे ‘तरुण’ भारताच्या जिवावर विकासाच्या स्वप्नासाठी अहोरात्र झटत असताना आपली पिढी अशी अकाली वृद्ध झालेली आपल्या देशाला कशी परवडावी?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा