– डॉ. हेमंत पाटील

‘स्थापत्य कलाविष्कार’ हे सप्तरंगात मुद्रित केलेले, इंकिंग इनोवेशन्सद्वारे प्रकाशित केलेले डॉ. हेमंत पाटील यांचे पुस्तक आज (११ऑगस्ट) मुंबईत प्रकाशित होत आहे. या पुस्तकाविषयी लेखकाचे मनोगत..

मी लिहिले त्यात अजस्र पूल आहेत. गगनचुंबी इमारती आहेत. जगावेगळी मंदिरे, भव्य चर्चेस, अद्भुत भुयार आणि विलक्षण वास्तूही आल्यात. जे जे अफलातून आहे, जगभरातील लोक दुरून दुरून पैसे जमवून सुट्टी काढून खास बघायला येतात ती सगळी स्ट्रक्चर्स आलीत. यावर लिहिले. ते कसे शक्य झाले? तर या सगळया वास्तूंच्या एक एक करून प्रेमात पडल्यानंतर!

हेही वाचा – व्रणभरला ऋतू…

आता एखाद्या मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर ती आपल्याला आवडली आहे असे वाटल्यानंतर एक मुलगा काय करतो? तिच्या आवडीनिवडी, तिचे छंद, या सगळ्यांबद्दल माहिती काढतो. भेटीची संधी शोधतो. मग त्यांच्या प्रेमाचा सिनेमा सुरू होतो. यथावकाश, हा सिनेमा रंगतो. तसाच मी या नयनरम्य, भव्यदिव्य वास्तूंच्या प्रेमात पडलो. त्यांचे आर्किटेक्ट, इंजिनीयर, फायनान्सर याबद्दल माहिती काढली. कोणी, कसे, कुठे, त्यांना आधी कागदावर आणि नंतर प्रत्यक्षात उतरवले ते जाणून घेतले. इंटरनेट, पुस्तके, जर्नल यामधून त्यांचे वर्णन वाचले. हे सगळं होता होता, एक एक वास्तू माझ्याशी बोलू लागली. प्रत्येक वास्तूच्या मागे एक सुरसरम्य कहाणी आहे हे कळले. आणि मग एके दिवशी ‘नाइट अ‍ॅट द म्युझियम’सारखा चमत्कार झाला. या सिनेमात एका वस्तुसंग्रहालयातील एक एक मोलाची जतन केलेली वस्तू रात्रभरासाठी जिवंत होते. त्यांच्यात भावभावना उतरतात. प्रेम आणि स्वार्थ जागृत होतात. पाहता पाहता ड्रामा चांगलाच रंगतो. सिनेमा संपल्यानंतर आपल्यालाही हे वस्तुसंग्रहालय, त्यातील प्रत्येक वस्तूसकट आवडू लागतं. असंच काहीसं माझ्या आणि जगातील विस्मयचकित करून सोडणाऱ्या ४६ वास्तूंबद्दल झालं. प्रत्येक वास्तूची कहाणी आहे. ती जिवंत होऊन जणू मला सांगू लागली तिच्या निर्मितीमागील प्रेरणा. ती तयार होतानाचे नाट्य. ती तयार झाल्यानंतर तिला पाडण्यासाठी करण्यात आलेली कटकारस्थाने.. सगळं काही माझ्या डोळयांसमोरून तरळून गेले. प्रत्येक वास्तूचा एक सिनेमा आहे. त्याचा सारांश या पुस्तकात मांडलेला आहे. काय काय आहे यातील वास्तूंच्या सिनेमात? आयफेलचे त्याच्या टॉवरवरील अतोनात प्रेम आहे. तसेच पॅरिसवासीयांचा सुरुवातीचा द्वेषही आहे. तेव्हाच्या जगाच्या पुढे जाऊन ‘बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर’च्या कल्पनेची मुहूर्तमेढ आहे. स्लीप फॉर्म टेक्निकची सुरुवात आहे. गाय द मोपांसा या सुप्रसिद्ध लेखकाचा, खलनायक म्हणून आविष्कार आहे.

हेही वाचा – लोकउत्सव

सिडनी ऑपेरात साध्या संत्र्याच्या फोडीवरून सुचलेला शेलचा आकार आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या, तेव्हाच्या सत्ताबदलामुळे घडलेले आर्किटेक्ट जॉन उटझॅनच्या मानापमानाचे नाट्य आहे. एवढेच काय, सिडनी हार्बर ब्रिजचा, सव्वाशे वर्षांपूर्वीचा ब्रिटनमधल्या एका तडीपार आर्किटेक्ट गुन्हेगाराने दिलेला पहिला आराखडाही आहे. आपल्या देशातील मनमोहक मंदिरे, भव्य लेणी, दगडांमधील मूर्ती आणि शिल्पे यांचा उगम कसा झाला, कोणी त्यांना बांधायचा घाट घातला, त्यासाठी लागणारा अमाप पैसा कोणी दिला, हे प्रश्न उत्सुकतेपोटी मनात डोकावलेच. यातूनच विलक्षण निर्मितीच्या वेडाने पछाडलेल्या आर्किटेक्टच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करावासा वाटला. वास्तूंबाबत कुतूहल असणाऱ्यांसाठी या ग्रंथात ५६ लेखांची मेजवानी आहे.