मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचे ‘हे सांगायला हवं..’ आणि ‘I must say this’ हे आत्मकथन ग्रंथालीतर्फेप्रकाशित होत आहे. त्यातील संपादित अंश..

कोल्हापूरला जेव्हा मी रुजू  झाले तेव्हा तिथे जिल्हा न्यायाधीशाला गाडी नव्हती. त्यामुळे तालुक्याच्या गावी जाण्यासाठी व रोजचे कोर्टात यायला रमेशने त्याची ‘मरिना’ गाडी माझ्यासाठी ठेवली. तो पुण्याहून लगेचच मुंबईस रवाना झाला. त्याची जी दोन-तीन नाटक-सिनेमांची कामे होती ती तो करत होता. पण त्याच्या मनात ही सतत व्याकुळता असायची की नाटकाचा प्रयोग सुरू असताना कोणी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यां आत येऊन घोषणाबाजी करतील, प्रयोग बंद करतील. ‘माझ्यामुळे निर्मात्याला घाटा  नको. सहकलाकार आणि बॅकस्टेज कामगारांचे आर्थिक नुकसान व्हायला नको. त्यांना कोणताच त्रास व्हायला नको’ असे सतत त्याच्या मनात असे. कधी कोणी प्रेक्षक ‘बघू हा बलात्काराचा गुन्हा असलेला आरोपी कसा अभिनय करतो?’ अशा विकृत उत्सुकतेपोटी नाटकाला आला तर..? असेही त्याला वाटत राही.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन

दर पंधरा दिवसांनी कोर्टाची तारीख पडायची. तशी त्यानं पुण्यात ८-१० तारखांना हजेरी लावली. त्याने त्या काळात कोणताही ड्रायव्हर ठेवला नाही. स्वत:च तो गाडी चालवत कोर्टात जात असे. मुंबई ते पुणे किंवा कोल्हापूर ते पुणे. त्यावेळी तो ५८ वर्षांचा होता. माझं कोल्हापुरातलं काम सुरळीत चालू होतं. मला तिथे तिथल्या वकिलांकडून, कर्मचाऱ्यांकडून बरंच काही शिकायला मिळत होतं. तितक्यातच दि. १६ मार्च २००८ रोजी मुख्य न्यायमूर्तीचे मुख्य सचिव शाम जोशींचा मला फोन आला की, ‘माझी लेखी संमती उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक होण्यासाठी मागितली आहे व नेमणुकीसाठी महाराष्ट्राव्यतिरिक्त दोन राज्यांची निवड करण्यास सांगितले होते. हा संमती पत्रकाचा नमुना ईमेल केला आहे,’ असेही त्यांनी सांगितले व मी त्याप्रमाणे लेखी संमती पाठवली.

मार्च महिन्याच्या  शेवटाला माझ्या ताब्यात असलेल्या ‘४१ यशोधन’ या सरकारी निवासस्थानाचा ताबा सरकारला देणे भाग होते. माझी परत रजिस्ट्रार जनरल म्हणून बदली मुंबईला होणार होती. या अपेक्षेने मी तो ताबा जास्तीत जास्त तीन महिने ठेवू शकत होते.

मला ते घर ४ एप्रिल २००८ ला खाली करणे भाग होते. म्हणून मी रजिस्ट्रार जनरल यांना घर खाली करत आहे हे कळवले. त्यांनी होकार दिला. त्यामुळे माझ्या रजिस्ट्रार जनरल म्हणून नेमणुकीचा विचार मुख्य न्यायमूर्तीनी बदलला असेल किंवा लांबणीवर पडला असेल असा विचार करून मी घरातले सर्व सामानसुमान दोन दिवसांत आवरून त्याचा ताबा दिला. आमच्या मनाची तयारी झाली होती की ७ एप्रिलपासून आता कोल्हापुरात नव्या आयुष्याची सुरुवात करायची. सर्व सामान कोल्हापूरला ५ एप्रिलला सकाळी पोहोचले. मी आणि रमेशही ट्रेनने कोल्हापूरला पोचलो. ५ व ६ एप्रिल शनिवार-रविवार असल्याने मी व रमेशने सर्व शिपायांच्या मदतीने खोकी सोडून सामान काढले. सर्व घर लावले. कपडे लावले. पुस्तके झटकून कपाटात लावली. संध्याकाळी बंगल्याच्या हिरवळीवर बसून पुढील कामाची आम्ही आखणी केली. मी दुसऱ्या दिवसापासून माझे काम सुरू करेन म्हणाले. आता सामान, पुस्तकं सगळंच कोल्हापूरच्या घरात असल्याने मला चांगले वाटत होते. रमेशने ठरवले होते की तो कोल्हापूर-मुंबई व्हाया पुणे प्रवास करेल आणि मुंबईत तो शूटिंग, प्रयोगाच्या वेळेस आमच्या दादरच्या घरी (अण्णा आणि आईच्या घरी) एकटा राहील. परत जळगाव वासनाकांडाच्या वेळेसचीच परिस्थिती उद्भवली होती. दुसऱ्या दिवशी ७ एप्रिल २००८ ला सोमवारी मी कोर्टात आले. शांतपणे सकाळच्या सत्राचे काम केले. चेंबरमध्ये गेले. गेल्या गेल्याच फोन वाजला. मी रिसिव्हर उचलला. पलीकडून रजिस्ट्रार जनरल न्या. रेखा सोंडूर बलदोटा फोनवर होत्या.

आर. जी. न्या. रेखा :  मृदुला, तुला चीफ जस्टिस यांनी तातडीने विशेष अधिकारी म्हणून हायकोर्टात रुजू होण्याचा आदेश दिला आहे. तू माझ्या हाताखाली माझं न्यायमूर्तीपदाचं वॉरंट येईपर्यंत काम करशील व नंतर तुला रजिस्ट्रार जनरल म्हणून काम करायचे आहे.

मी : ठीक आहे. मी कधी यावं अशी अपेक्षा आहे?

न्या. रेखा : लगेच निघ. रात्रीच रिपोर्ट कर.

मी : मला कमीत कमी आवरायला, कोर्टातल्या ऑर्डर पाहायला ५ ते ६ तास तरी हवे आहेत. रात्रीच्या महालक्ष्मीने निघून सकाळी येते.

न्या. रेखा : पाच मिनिटांत सांगते.

पाच मिनिटांत परत रजिस्ट्रार जनरल रेखा बलदोटा यांचा ‘चालेल’ म्हणून निरोप आला आणि मी कोल्हापूर सोडण्याच्या तयारीला लागले. सामानसुमान कोल्हापूरच्या बंगल्यातच ठेवायला २-३ महिन्यांची सवलत होती. पण त्याच दिवशी मुंबईला निघायचं होतं. सुदैवाने माझ्या त्या दिवशीच्या सर्व ऑर्डर्स वगैरे सह्य केलेल्या होत्या. मी काही काम बाकी ठेवत नसे. मला काकांनी रोखठोकपणे  सांगितलं होतं की, ‘सर्व पुरावे, ऑर्डर्सवर सह्य करूनच कोर्ट सोडावे. पुराव्यावर तर लगेच तपासून सह्य करून जावे.’ काका म्हणाले होते- ‘‘समज- आपण आपल्यासमोर साक्ष नोंदवली आणि रात्री मेलो, तर सही कोण करणार? परत साक्षीदाराला का त्रास द्यायचा?’’

स्टेनोची एकच ऑर्डर टाईप होणे बाकी होते. मी ती ऑर्डर शक्य तितक्या लवकर सहीला आणावी म्हणून सांगितले. २ तासात ऑर्डर तयार होईल असे स्टेनोने सांगितले. मला मुंबईला येण्याबद्दल तोंडी आदेश होते म्हणून मी माझे सहकारी न्यायाधीश आर. व्ही. कुलकर्णी यांना बोलावून त्यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवला व तसे लेखी टिपण केले. प्रत्येक न्यायाधीशाने मिळालेल्या प्रशासकीय तोंडी आदेशांची त्या, त्या तारखेला रोजनाम्यात लेखी नोंद करून ठेवणे आवश्यक असते. मी संपूर्ण पदभार पुढे नंतर ९/ ४/ २००८ ला त्यांना दिला. कारण मला ९ एप्रिल २००८ ला ‘ रजिस्ट्रार जनरल- हायकोर्ट’ म्हणून बदलीची लेखी ऑर्डर मिळाली

मी कोर्टातून घरी येऊन रमेशला मला जे तोंडी आदेश मिळाले त्याची सर्व कल्पना दिली. त्याने माझी बॅग भरायला, माझा डबा भरायला मदत केली. मी अगदी मोजकेच कपडे घेऊन कोल्हापूर सोडलं. रमेश मात्र त्याच्या चित्रीकरणाच्या  निमित्ताने कोल्हापूरमध्येच थांबला.

दुसऱ्या दिवशी मुख्य न्यायमूर्तीच्या मी भेटीस गेले. न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांची व माझी ही दुसरी भेट होती. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि  मला विचारले, ‘हायकोर्टाची रजिस्ट्रार जनरल म्हणून तुला पुढे काम करायचे आहे. त्यात तुला काही अडचण?’ मी त्यांना विनंती केली- ‘शहर दिवाणी न्यायालयात मुंबईला मी १२-१३ वर्षे काम केल्यामुळे मुंबईमधील उच्च न्यायालयातील बऱ्याच वकिलांनी माझ्यासमोर काम केले आहे. तेव्हा मला कोणत्याही न्यायमूर्तीनी कोर्ट हॉलमध्ये बोलावू नये. मी त्यांच्या खासगी दालनात (चेंबरमध्ये) नक्कीच जाईन. नव्हे तर त्यांनी बोलावल्यास माझे तिथे जाणे कर्तव्यच आहे. फक्त कोर्ट हॉलमध्ये नको.’ स्वतंत्रकुमार म्हणाले, ‘ये चिंता मत करना. मेरी रजिस्ट्री, मैं अकेले चलाता हूं.  ठीक है?’’ मी ही अट घालण्याचे कारण न्यायाधीशपदाचा- मग तो कोणत्याही श्रेणीतला असो- सन्मान ठेवणे हेच होते.

मी त्यानंतर जवळजवळ २० दिवस विशेष अधिकारी म्हणून रेखा बलदोटा यांच्या हाताखाली त्यांचे वॉरंट येईपर्यंत काम केलं. त्यांनी शपथ घेतल्यानंतर पुढे रजिस्ट्रार जनरल म्हणून ९ फेब्रुवारी २००९ पर्यंत मी काम केले.

यादरम्यान रमेश कोल्हापूर-मुंबई, नंतर पुणे-मुंबई प्रवास कामासाठी, तपासासाठी, कोर्टातल्या तारखांसाठी करत असे. एकदा रमेश पुण्याला गेला असताना आमच्या ‘अनुश्री’ या फ्लॅटच्या बंद दरवाजावर नोटीस चिकटवलेली त्याला दिसली. तपास अधिकारी मििलद ठोसर यांनी ती स्वत:च्या व पंचांच्या सहीने चिकटवली होती. तपास अधिकारी आमच्या घराचा पंचनामा करायला पंचांना घेऊन आले होते. पण रमेश नसल्यामुळे व घर बंद असल्यामुळे त्यांनी नोटीस लावली की रमेशनी तपासकामी साहाय्य करावे व पोलीस स्टेशनला यावे. रमेशने आमच्या घरासमोरचे अनेक वर्षांचे शेजारी व आमचे जवळचे मित्र अन्वरभाई कुरेशी यांच्या घराची बेल वाजवली. अन्वरभाई प्रसिद्ध गझल गायक आहेत. आम्ही तिथे राहायला गेलो तेव्हापासून त्यांचे आणि आमचे खूप जवळचे संबंध होते. अगदी कुटुंबाप्रमाणे. आमचा हर्षवर्धन आणि त्यांचा मुलगा अली लहानपणी बरोबर खेळले आहेत. पद्माताई- त्यांची बायको- कित्येकदा त्यांच्या फ्रीजमध्ये जागा नसायची तेव्हा आमच्या फ्रीजमध्ये त्यांच्याकडच्या नॉनव्हेज गोष्टी ठेवायची. आम्ही १९९३ साली मी सिटी सिव्हिल कोर्टात न्यायाधीशाची नोकरी स्वीकारल्यावर मुंबईस राहायला गेलो तर घराची एक किल्ली अन्वरभाई यांच्याकडे असायची- इतका घरोबा.

अन्वरभाई घरीच होते. त्यांना रमेशला बघून आनंद झाला. ते म्हणाले की, त्यांना ठोसरांनी रमेश कुठे आहे म्हणून विचारले होते. त्यावेळी अन्वरभाईंनी ‘रमेशच्या बायकोसोबत रमेश मुंबईतच राहत आहे, तसेच त्यांच्या व्यवसायामुळेही रमेशचे वास्तव्य मुंबईत आहे आणि क्वचितच तो पुण्यात येतो,’ असे सांगितले. तसेच त्यांनी, ‘रमेशला फोनवर बोलवून घ्या. तो लगेचच मुंबईहून येईल. पण नोटीस लावू नका’ अशी विनंती केली. पण ठोसर यांनी अन्वरभाईंकडे दुर्लक्ष करून दारावर नोटीस लावली. रमेश नहार सरांना भेटून पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्याला भेटायला त्याच्या एका मित्रासोबत जाणार होता, तसा गेला. रमेश वानवडी पोलीस ठाण्यात लोंढे नावाच्या हवालदारास भेटला. त्यांचं रमेशशी वागणं अत्यंत उद्धटपणाचं होतं. रमेशला गुन्हा सिद्ध झालेल्या गुन्हेगाराप्रमाणेच त्यांनी वागणूक दिली होती. रमेशला त्यांनी बराच वेळ दूरच उभं करून थांबवून ठेवलं. रमेशला मी या गोष्टीची पूर्ण कल्पना दिली होती की, पोलीस स्टेशनला त्याला वेगवेगळ्या मानहानीला तोंड द्यावे लागेल, विचित्र प्रश्न विचारले जातील.. तर अगदी शांत राहणे. रमेश मनावर संयम ठेवून थांबला होता. येणारे-जाणारे सर्व लोक त्याच्याशी बोलत, त्याच्या सह्य घेत. कारण तो त्यांचा लाडका ‘हॅलो इन्स्पेक्टर’ किंवा ‘कमांडर’ होता. थोडय़ा वेळाने रमेशला तपास अधिकाऱ्यांनी आत बोलावले व त्याला सांगितले की, रमेश घरी सापडत नसल्यामुळे त्यांना तपास पुढे नेता येत नाही. वास्तविक मी आधी म्हटल्याप्रमाणे रमेशला पोलिसांकडून याआधी फोन करून कधीही बोलावले गेले नव्हते. रमेशचा सेल नंबर तसेच माझा मुंबईचा निवासस्थानाचा फोन नंबर पोलिसांकडे  उपलब्ध होता. परंतु पोलीस अधिकाऱ्यांना रमेशविरुद्ध तो पोलिसांना सहकार्य करत नाही असं रेकॉर्ड तयार करायचं होतं. दुर्दैवाने अनेक वेळा पोलीस तपासकामी असे वागतात हे मला वकिली व्यवसायातील अनुभवाने माहीत होते.