पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’ कादंबरीतली नायिका मुक्त, निर्व्याज, सहजतेनं उमललेलं फूल असावं तशी जगत असते. पण एका टप्प्यावर तिला भवतालाची समज आल्यावर ती म्हणते, ‘‘इथून पुढे मी चारचौघींसारखी वागायला शिकेन.’’ आता हे विधान मला खूपच महत्त्वाचं वाटतं. (‘कोसला’मधला नायकही अखेरीस इथेच येतो.) आपल्यापैकी बरेचजण बऱ्याचदा चारचौघांसाखे वागत असतात. त्यामुळे चारचौघांसारखेच आपण बऱ्याचदा बोलतो, वागतो, खातो-पितो, पेहेराव करतो आणि ऐकतो! मग यो-यो हनी सिंग जीममध्ये रोज सगळे ऐकताहेत ना; मग आपणही राजीखुशीनं ऐकतो. त्याचं रॅप आपल्याला खरोखरीच आवडत असेल असं नाही; तरी आपण ते ऐकतो. आणि मग खूपदा ऐकल्यावर अभावितपणे गुणगुणतोदेखील. आणि त्याहून खूपच वरच्या स्तरावरचं, खरंखुरं शक्तिशाली हिप-हॉप मात्र दूरच राहतं. ‘आपण काही बुवा इंग्लिश गाणी ऐकत नाही!’ यामागे भाषिक दुरावा तर असतोच, पण ‘चारचौघांसारखं ऐकण्याची’ उबळही असतेच. पण चांगली कला जनमानसाला ढुशा देत देत अखेरीस त्याच्यावर राज्य करतेच. समाजातले मोजके लोक नव्या सुरांचा वेध घेतात, त्यांचा प्रसार करतात. बघता बघता ते नवं संगीत सारे ऐकू लागतात. ते बऱ्याचजणांचं संगीत बनल्याचं बघून अजूनही बरेचजण धीर चेपून ते ऐकू लागतात!
आपण गेले अर्धा वर्ष बघत असलेले संगीतप्रकार भारतात पाय रोवण्याच्या ईष्र्येने आले असावेत असं कधी कधी तरुणाईची आवड न्याहाळताना वाटून जातं. ते नवं संगीत तरुण मुलं भारतात रुजवत आहेत, वाढवत आहेत. त्याचा प्रसार करता करता त्याला कळत-नकळत भारतीय पारंपरिक संगीताची जोडही ही मुलं देताहेत. आणि हे नवं रसायन आनंदानं नाचत नाचत हुंगणारा एक मोठ्ठा आश्वासक श्रोतृवर्गही तयार होताना मला दिसतो आहे. त्या तरुणांना आणि त्यांच्या संगीताला स्वीकारार्हतेची आस लागलेली आहे. ही बघा मला आलेली एक ई-मेल.. मागच्या वेळचा हिप-हॉपवरचा लेख वाचून ठाण्यातला विराट पवार हा युवक लिहितो आहे- ‘‘मला तुमचा लेख वाचून फार आनंद झाला. हिप-हॉप गाणाऱ्या आम्हा तरुणांना असा लेख मराठीत बघून आश्चर्यच वाटलं. आताही हे टाईप करताना माझ्या अंगावर काटे आले आहेत आणि डोळय़ांत पाणी!’’ (अर्थातच या ओळी मूळ इंग्रजीमध्ये आहेत, हे सांगणे न लगे!) मला त्या ओळी वाचताना वाटलं की, म्हटलं तर हे नेहमीचं पिढय़ांमधलं भांडण! पुढची पिढी काहीतरी नवीन शोधत असते, जुन्यांना ते पटत नाही किंवा कळतच नाही. वरकरणी नवीन पिढी बेदरकार असते खरी; पण आत तिला वडीलधाऱ्यांच्या स्वीकाराची मनोमन ओढ असते. ‘अ‍ॅक्सेप्टन्स’ अखेरीस बंडखोरालाही हवासा असतोच! हा विराट पवार हिप-हॉपच्या प्रेमात पडला. त्या रॅप गाण्यानं, डान्सनं त्याच्यावर जादू केली असावी. कारण तो उतरलाच थेट मैदानात. मुंबईमधले हिप-हॉपर्स ठाण्याच्या परिघाच्या गायकांना झुकतं माप देताना बघून त्यानं ‘ठाणे हिप-हॉप मूव्हमेंट’ नावाची संस्था चालू केली. कधी रस्त्यावर, कधी कॉलेजात, कधी व्हीव्हीएना मॉलसारख्या जागांवर हिप-हॉपची मैफल रंगू लागली. बघता बघता गर्दी वाढू लागली. दोनशेजण सुरुवातीला यायचे हिप हॉप ऐकायला- ते दोन हजार येऊ लागले. (अजूनही काही वाचक मला ‘खरोखर हे संगीत भारतात आलं आहे का?’ वगैरे विचारतात. त्यांनी हा आकडा लक्षपूर्वक वाचावा!) विराटशी फोनवर बोलताना मी त्याला मधेच विचारलं, ‘‘मराठी कुटुंबांमध्ये त्याला विरोध असतो, असं तू का बरं लिहिलं आहेस मेलमध्ये?’’ तो सांगू लागला, ‘‘माझ्याच घरापासून सांगतो. आईचा आधी विरोधच होता. मी वाया जाईन, ड्रग्ज वगैरे करीन अशी भीती होती तिला. हे सगळं होण्याचं कारण म्हणजे जे ‘सोशल रॅप’ आहे- जे सामाजिक संदेश देतं, ते टी.व्ही.वरचे म्युझिक चॅनेल्स दाखवीत नाहीत. टी.व्ही.वर जे हिप-हॉप दिसतं ते हिंसक असतं, मादक असतं. जे हिप-हॉप आपण सादर करतो, ते लोकांना आशा देणारं, धीर देणारं असतं. आणि ते सगळ्यांसाठी असतं. केवळ श्रीमंतांसाठी नव्हे. आम्ही रस्त्यावरही खूपदा हिप-हॉप, बीटबॉक्सिंग करतो तेव्हा सगळ्या तऱ्हेचा प्रेक्षकवर्ग उपस्थित असतो. कलाकारदेखील लोखंडवाला ते धारावी अशा सगळय़ा आर्थिक स्तरांमधले असतात.’’ विराटचं सगळं बोलणं मला आश्वासक वाटलं. त्याची हिप- हॉपप्रती असलेली निष्ठा त्यातून दिसत होती, तसेच भारतातल्या नव्या पिढीची खुली, सर्वसमावेशक मांडणी पुन्हा एकदा प्रत्ययाला येत होती. भारतात हिप-हॉप (रॉकसारखंच) वाढत आहे. क्रिस्ना (ङ१्र२ल्लं) हा रॅपर चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याचा ‘सेलआऊट’ हा अल्बम नुकताच ‘युनिव्हर्सल म्युझिक’, ‘व्ही. एच. वन’ आणि ‘हार्ड रॉक कॅफे’ या तीन माध्यमांनी एकत्र येऊन बाजारात आणलाय. लंडनच्या साऊथहॉल सेंटरमध्ये नुकतंच हिप-हॉप आणि भरतनाटय़म् या दोन नृत्यशैली एकवटून काही रचना सादर झाल्या. तिथे उपस्थित असलेली नूपुर ताकवले म्हणते, ‘‘या फ्युजनमुळे अभिजात नृत्यशैलीला जराही इजा झाली नाही! किंबहुना, नव्या कुतूहलानं लोकांनी भरनाटय़म्कडे वळून बघितलं.’’
मला वाटतं, भारतीय हिप-हॉप हे सौम्य असावं. काळय़ा नीग्रो हिप-हॉपची रग भारतीय मातीत जिरून जात असावी! ही भारतीय माती मोठी चलाख आहे. नवं कुठलंही बियाणं ती सहजपणे उदरात सामावते. पण जे रोपटं वरती येतं, ते मात्र भारतीयच असतं!  हिप-हॉप, रॉक या साऱ्यांमधली आक्रमकता, असंतोष आपल्या इथल्या वंचितांच्या संगीतात का दिसत नाही, हा एक प्रश्नच आहे. ‘दलित साहित्य’ नावाची ताकदीची अभिव्यक्ती जशी सर्व भारतीय भाषांमध्ये अवतरली, तसं ‘दलित संगीत’ तयार झालं का? असं संगीत- जे मुख्य धारेतल्या संगीतावरही परिणाम करेल! आणि केवळ दलितच नव्हे, तर कुठल्याही समाजामधला जो गरीब, दाबल्या गेलेल्या माणसांचा साधासुधा आणि जगताना कडवट बनत गेलेला श्वास आहे, तो कुठल्या भारतीय गाण्यात आहे? सारे गरीब माळकरी तर पावसात, आनंदात अभंग गात इरावती कव्र्याच्या ‘बॉयफ्रेंड’ला-अर्थात विठ्ठलाला भेटायला जाताना आपण सध्या बघतो आहोत!
सुदैवानं नेमक्या वेळेस यासारख्या प्रश्नांवर अधिकारानं बोलणारं पत्र माझ्या ई-मेलवर आत्ताच आलं आहे. शशी व्यास हे अनेक उत्तमोत्तम शास्त्रीय संगीताच्या मैफलींचे संयोजक आहेत, हे तर त्या संगीताचे चाहते जाणतातच; पण महत्त्वाचं म्हणजे त्यांची नजरही व्यापक, खुली आहे. ते लिहितात, ‘‘आशुतोष, तुझा लेख वाचून मला बाबांची (पं. सी. आर. व्यास) एक आठवण झाली. त्यांच्या नातवाशी बोलताना रॅपबद्दल ते म्हणाले की, हे आपल्याला परकं नाही.’’ आणि डग्ग्यावर ठेका देता देता ‘चला चला, तुम्ही लग्नाला चला.. काका आले, काकू आली, मामाची गाडी आली..’ हे गाणं त्यांनी रॅप लयीत गाऊन दाखवलं! आता तुझ्या प्रश्नाकडे : असंतोषाची अभिव्यक्ती आपल्या संगीताच्या माध्यमातून होते का?- तर उत्तर ‘नाही.’ पण त्याला वेगळी कारणं आहेत. कृष्णवर्णीय किंवा स्थलांतरित माणसं आणि आपल्या इथली वंचित माणसं यांच्यावरच्या अन्यायाचे परिणाम कदाचित समान असतील; पण कारणं वेगळी आहेत. त्यांची सांस्कृतिक जडणघडण वेगळी आहे. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ अशी तत्त्वज्ञानाची बैठक निर्माण करणाऱ्या, जोपासणाऱ्या भारतीय समाजाची नाळ हजारो वर्षांपासून उच्च-नीच भेद स्वीकारण्याकडे झुकली. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या भक्तिसंगीताचा. आजही गरीब, कष्टकरी मंडळी (बायाबापडय़ासुद्धा) अतिशय श्रद्धेने (किंवा अंधश्रद्धापूर्वक) मंदिरात भजन, अभंग गातात. ‘काला कौआ काट खाएगा’ या गाण्यावर बेभान होणारा तरुण ‘घालीन लोटांगण’देखील तेवढय़ाच मनस्वीपणे आणि प्रखर भावनेने म्हणतो. अत्यंत उत्सवप्रिय अशा आपल्या देशात इतके सण आणि उत्सव आहेत, की बंडखोरीच्या भावना व्यक्त करायला लोकांना सुचतच नसेल.’
शशी व्यासांची मांडणी ही लयपश्चिमेचीच वेगळी लयकारी दाखविणारी असल्यानं ती इथे मी विस्तृतपणे मांडली आहे. संगीत नावाच्या सामाजिक घटनेचे हे नाना पैलू आपण रॉक, हिप-हॉप वगैरे रूपांमधून बघतो आहोत. आणि दोन आठवडय़ांनंतर आक्रमकतेचं रणांगण सोडून संधिप्रकाशातली हंबरणारी गाय बघणाऱ्या ‘कंट्री म्युझिक’ नावाच्या अति-तरल संगीताकडे आपल्याला वळायचं आहे.
कुसुमाग्रजांनी त्यांच्या ‘आगगाडी आणि जमीन’ या कवितेत हिप-हॉपचा ठेकाच उपयोजित केलेला मला तोवर स्मरतो आहे. म्हणजे कुसुमाग्रजांना हिप-हॉप ठाऊक नसणार; पण ती रॅप-लय या मातीत होतीच. तिला जणू सशक्त पुनर्जन्म देत कुसुमाग्रज लिहू लागले..
‘नको ग नको ग, आक्रंदे जमीन,
जाळीत जाऊ तू,बेभान होऊन..’
विराट पवार आणि नव्या दमाच्या गायकांनो, ऐकताहात ना हे? कुसुमाग्रजांची कविता इलेक्ट्रॉनिक ठेक्यावर मंत्रोच्चारित करायला तुमच्या पुढय़ात थांबली आहे! संगीताच्या या निरंतर पळणाऱ्या आगगाडीमध्ये शास्त्रीय संगीतापासून रॉकपर्यंतचे
अनेक डबे आहेत. कुठल्याही डब्यामध्ये बसलं तरी चहू
दिशांनी रोरावत येणारा आणि मनाला स्फुरण चढवणारा ठेका तुमच्या कानी पडणारच आहे! अन् तो ठेका काही चारचौघांसारखा नाही!                       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा