धाडसी, कुशल, न्यायप्रिय आणि राष्ट्रवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व उलगडणारं चरित्र ज्येष्ठ पत्रकार बलराज कृष्णा यांनी इंग्रजीमध्ये लिहिलं. त्याचा मराठी अनुवाद (अनुवाद : भगवान दातार) काल (१५ डिसेंबर रोजी) रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. पटेलांचे अपरिचित पैलू पुढे आणणाऱ्या या चरित्राला बलराज कृष्णा यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील संपादित अंश..

स्वा तंत्र्योत्तर काळात भारतीय नागरी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये एक वाक्य नेहमीच बोललं जात असे- ‘सरदार पटेलांचा मृतदेह जतन करून ठेवला आणि तो खुर्चीवर बसवला तर तोदेखील उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवेल.’ वल्लभभाई पटेल यांच्या चेहऱ्यातच तेवढी जरब होती. त्यांचा चेहराच तितका करारी होता. वल्लभभाई पटेलांविषयी आजही एवढा आदरभाव लोकांच्या मनात आहे. बडे बडे संस्थानिक, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांना त्यांच्या नजरेतील जरबेची भीती वाटत असे. त्यांच्या तिखट जिभेचा धाक वाटत असे. भारताचे त्या वेळचे हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल सर थॉमस एल्महिर्स यांना त्यांच्या डोळ्यांत कमाल अतातुर्क किंवा विन्स्टन चर्चिल यांची भेदक नजर दिसत असे. वल्लभभाईंची जरब त्या वेळचे लष्करप्रमुख सर रॉय बुचर यांनी एकदा अनुभवली होती. त्यांनी लिहिलंय, ‘‘देशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर त्यांचं पूर्ण नियंत्रण होतं आणि तिच्या रक्षणाचा त्यांचा निर्धार होता. पक्षावर त्यांची मजबूत पकड होती. पक्षाची संपूर्ण यंत्रणाच त्यांनी उभी केलेली असल्यामळे पक्षीय राजकारणावर त्यांचा कमालीचा प्रभाव होता. त्यांचे सहकारी त्यांच्या आज्ञेत किती आणि कसे होते ते मी स्वत: पाहिलेलं आहे.’’ पक्षावर पटेलांचं निर्विवाद प्रभुत्व होतं. त्यांना आव्हान देण्याची कुणाची क्षमता नव्हती आणि कुणी दिलंच तर त्याला त्याची किंमत मोजावी लागत होती. वल्लभभाईंच्या मृत्यूपूर्वी आठ महिने आधी लॉर्ड माऊंटबॅटन त्यांना म्हणाले होते, ‘‘तुमचा पाठिंबा असेल तर जवाहरलाल नेहरू अयशस्वी होणार नाहीत.’’
पटेलांना माणसांची उत्तम पारख होती. एखाद्याला त्याच्या चुकीबद्दल चार शब्द सुनावण्याची त्यांच्यात धमक होती. पण हे काम त्यांनी अत्यंत न्यायबुद्धीने केलं आणि ते करताना त्यांनी सर्वाना समान निकष लावले. याला फक्त दोन अपवाद होते – गांधीजी आणि नेहरू. त्या दोघांबाबत ते नेहमीच वेगळा विचार करत असत. गांधीजींना तर ते गुरुस्थानी मानत होते. गांधीजींबद्दल त्यांना अपार आदर होता. नेहरूंकडे ते देशाचे पंतप्रधान म्हणून पाहत होते. राष्ट्रीय प्रश्नांबाबत ते पोलादापेक्षाही कठीण होते; पण खासगी आणि व्यक्तिगत बाबतीत ते फुलापेक्षाही कोमल होते.
शरण आलेल्या शत्रूवर त्यांनी कधीही हल्ला केला नाही. स्वातंत्र्योत्तर काळात स्वत:ची ‘लढाई’ हरल्यानंतर शरण आलेल्या संस्थानिकांच्या बाबतीत ही गोष्ट विशेषत्वानं दिसून आली. या संस्थानिकांमध्ये जीनांच्या चालीने चालणारे अत्यंत बलशाली असे भोपाळचे नवाब होते, जीनांच्या चिथावणीमुळे भारताविरुद्ध ‘स्वातंत्र्ययुद्ध’ पुकारणारे हैदराबादचे उन्मत्त निजाम होते, तर सर्वोच्च सत्ता न राहिल्यामुळे ‘आमचं संस्थान आपोआपच स्वतंत्र झालं,’ असं जाहीर करून बंडाचं निशाण उभारणारे त्रावणकोरचे दिवाण सी. सी. रामस्वामी अय्यर होते. ब्रिटिशांच्या राजकीय व्यवहार खात्याचे ताकदवान आणि प्रभावशाली सेक्रेटरी सर कोनार्ड कोलफिल्ड यांनी टाकलेल्या जाळ्यात नवानगरचे जामसाहेब काही काळ अडकले होते. प्रस्तावित भारतीय संघराज्यात सामील न होता काठीयावाडमधल्या राज्यांनी त्यांचा स्वतंत्र महासंघ बनवावा, असं गाजर त्यांनी जामसाहेबांना दाखवलं होतं. पण पटेलांबरोबर त्यांची एकच बठक झाली आणि पटेलांनी अशी काही जादू केली की, त्या एका बठकीत त्यांचं पूर्ण मतपरिवर्तन होऊन ते त्यांच्या योजनेचे कट्टर समर्थक बनले. या सर्व संस्थानांना भारतीय प्रजासत्ताकात विलीन करण्याच्या कार्यात त्यांनी हिरिरीने पुढाकार घेतला. पटेलांबरोबरच्या एकाच बठकीत ‘हे कसं घडून आलं,’ याचं आजही अनेकांना आश्चर्य वाटतं.
पटेलांच्या उमद्या मनाचा अनुभव मीही एकदा घेतलेला आहे. लाहोरमध्ये त्या वेळी दंगल भडकली होती. माझा धाकटा भाऊ युवराज कृष्णा त्या वेळी आयएएसच्या परीक्षेला बसला होता. आयसीएस या ब्रिटिशकालीन प्रशासकीय सेवेचे आयएएसमध्ये रूपांतर झाल्यानंतर १९४७ जुलमध्ये प्रथमच ती परीक्षा होत होती. मे महिन्यात मला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षांनी पत्र लिहून लाहोरमधील तणावपूर्ण स्थितीची कल्पना दिली. या परीक्षेचं केंद्र इस्लामिया कॉलेज असल्याचं मला जूनमध्ये समजलं, तेव्हा मला धक्काच बसला. त्या वेळी या कॉलेजच्या परिसरात ७२ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. अगदी ऐनवेळी हे समजल्यामुळे काय करावं, ते मला सुचेना. सगळे नेते सत्तांतराच्या विविध कामांमध्ये गुंतले होते. या संदर्भात सरदार पटेलांशी संपर्क साधावा, असं मला मनोमन वाटलं. पटेल काही मिनिटं तरी वेळ काढू शकतील किंवा नाही, याची मला खात्री वाटत नव्हती. मी भीतभीतच पटेलांना पत्र लिहिलं आणि सुखद आश्चर्य म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी अन्यत्र, सुरक्षित भागात परीक्षा केंद्र बदलून दिल्याची पटेलांच्या कार्यालयाची तार मला मिळाली. एवढंच नव्हे, तर गृहखात्यातर्फे प्रत्येक विद्यार्थ्यांला तार करून तो परीक्षा लाहोरमध्ये देणार की सिमल्यामध्ये याविषयी विचारणाही करण्यात आली.
पटेलांच्या या कृतीने मी भारावूनच गेलो. मी मनात म्हटलं की, हा खरा कृतिशील माणूस आहे. सर्वसामान्यांसाठीही तो तितक्याच तत्परतेने धावून जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात आम्ही लाहोरमध्ये राहत होतो. त्या वेळी आम्हा तरुणांचं पटेलांकडे फारसं लक्ष नव्हतं. गांधी, नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्याच प्रतिमेचा आमच्यावर प्रभाव होता. गांधीजींना आम्ही महात्मा मानत होतो. सुभाषचंद्र आमच्या दृष्टीने क्रांतिकारक होते. पंडित नेहरू तर आमच्यासाठी अनभिषिक्त सम्राट होते. त्यांच्यावर आमचं जिवापाड प्रेम होतं. देशभक्तीच्या भावनेनं प्रेरित होऊन नेहरू वापरत तसं जाकीट वापरून आम्ही त्यांच्याशी जवळीक असल्याचं दाखवून देत होतो. पटेलांच्या या एका कृतीने माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराचं स्थान निर्माण झालं. फाळणीनंतरच्या काळात पंजाब आणि सरहद्द प्रांतातील हजारो लोकांकडून त्यांना असंच प्रेम आणि आदर मिळाला. पश्चिम पाकिस्तानात अडकलेल्या लाखो लोकांना भारतात सुखरूप परत आणून त्यांचे प्राण वाचवणारा हा एकमेव नेता होता.
स्वातंत्र्योत्तर काळात दोन ऐतिहासिक घटनांमुळे पटेलांना जागतिक कीर्ती मिळाली. देशातील संस्थानं विलीन करून त्यांनी एकसंध भारत उभा केला आणि आयसीएस ही ब्रिटिशकालीन प्रशासकीय परीक्षा बदलून त्यांनी आयएएस ही भारतीय परीक्षा-पद्धती लागू केली. या दोन्ही गोष्टी त्यांनी विजेच्या वेगानं केल्या. कम्युनिस्ट नेते एम. एन. रॉय यांनी त्यांच्याविषयी म्हटलं आहे, ‘‘काश्मीर प्रश्न जर पटेलांकडे असता तर तो फाळणीनंतर अल्पावधीत सुटला असता. पटेलांनी मृत्यूपूर्वी दिलेला सल्ला जर नेहरूंनी मानला असता तर चीनकडून १९६२मध्ये झालेली भारताची मानहानी टळली असती.’’
भारतात आलेल्या काही ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही पटेलांविषयी नितांत आदर होता. आयसीएस अधिकारी ह्यू गॅरेट यांचा तर या संदर्भात विशेष उल्लेख करायला हवा. मी १९६८मध्ये, ‘डेली टेलिग्राफ’मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात पटेलांविषयी एक पत्र लिहिलं होतं. ८८ वर्षांच्या सर गॅरेट यांनी ते पत्र वाचून मला एक छोटं पण सुंदर उत्तर लिहिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, ‘‘मी त्यांना खूप जवळून ओळखत होतो. मी त्यांना ‘वल्लभभाई’ म्हणत असे. ते काँग्रेस पक्षाचे मुख्य आधारस्तंभ होते, पण त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणत्याही गर भावना नव्हत्या आणि माझ्याविषयी त्यांच्या मनात कुठलेही पूर्वग्रह नव्हते. ते माझ्या विरोधी आहेत, असं मला कधीही वाटलं नाही. ते प्रामाणिक आणि अतिशय उमद्या स्वभावाचे होते. मला भेटलेल्या सर्व भारतीयांमध्ये मी त्यांना सर्वोच्च स्थान देतो.’’
फिलिप मॅसन यांनी ‘डिक्शनरी ऑफ नॅशनल बायोग्राफी’ (ऑक्सफर्ड) या पुस्तकात सरदार पटेलांची तुलना बिस्मार्कशी केली आहे. पण हे साम्य काही फार ताणता येत नाही. पटेल धाडसी, प्रामाणिक आणि वास्तववादी होते. पण ते क्रूर आणि हेकेखोर नव्हते. त्यांच्या मृत्यूनंतर ‘मँचेस्टर गाíडयन’नं त्यांच्याविषयी लिहिलं, ‘‘ते कुशल संघटक आणि शिस्तप्रिय नेते होते. अमेरिकन ज्याला ‘कुऱ्हाड चालवणारा माणूस’ म्हणतात, तसं त्यांचं पक्षातलं स्थान होतं. एका अर्थानं ही फार सन्माननीय भूमिका नव्हती. पण कोणताही क्रांतिकारी पक्ष त्याच्या प्रमुखपदी अशा प्रकारचा निश्चयी आणि वास्तववादी नेता असल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. पटेलांशिवाय गांधीजींच्या कल्पनांचा व्यावहारिक परिणाम दिसला नसता आणि नेहरूंच्या आदर्शानाही फारसा वाव मिळाला नसता. ते केवळ स्वातंत्र्यलढय़ाचे संघटक नव्हते, तर स्वातंत्र्योत्तर नव्या भारताचे शिल्पकार होते. एकाच व्यक्तीने बंडखोर क्रांतिकारक आणि राजकीय मुत्सद्दी अशा दोन्ही पातळ्यांवर यश मिळवणं तसं दुर्मीळ असतं. पटेल याला अपवाद होते.’’
पटेल हे गांधींचे आणि काँग्रेसचे शक्तिकेंद्रं व आशास्थान होते. १९१७च्या खेडा सत्याग्रहात पटेल गांधींचे उपकप्तान होते. १९२८च्या बाडरेली सत्याग्रहातील त्यांचे नेतृत्वगुण पाहून ब्रिटिशांनी त्यांना लेनीनची उपमा दिली होती. १९३०च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांना गांधीजींचे ‘जॉन द बाप्टीस्ट’ अशी उपमा देण्यात आली होती. १९३७च्या प्रांतिक निवडणुकांनंतर ते काँग्रेसला दिशा देणारे आणि तिच्या कार्यावर लक्ष ठेवणारे पक्षाचे सर्वोच्च नेते होते. त्यांची गांधीजींवर एवढी निष्ठा होती की, सुभाषबाबूंनी गांधीजींपुढे आव्हान उभं केलं तेव्हा पटेलांनी त्यांचा पराभव केला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी झालेल्या प्रत्यक्ष सत्तांतरापूर्वी पटेलांनी काश्मीरचा आणि हैदराबादचा अपवाद वगळता बाकी सर्व संस्थानांना भारतात विलीन करून घेतलं होतं. हैदराबादच्या विलीनीकरणासाठी त्यांनी केलेली अंतर्गत कारवाई अभूतपूर्वच म्हणायला हवी. या कारवाईचा सविस्तर तपशील या पुस्तकात दिला आहे. १५ ऑगस्टपूर्वीच सर्व संस्थानं भारतात विलीन झाल्यामुळे सत्तांतरानंतर ही संस्थानं स्वतंत्र होण्याचा प्रश्नच उरला नाही. ही राज्यं स्वतंत्र झाली असती, तर पाकिस्तानबरोबर झाला त्यापेक्षा कितीतरी मोठा आणि गंभीर संघर्ष देशाला करावा लागला असता.
विनोबा भावे पटेलांना गांधींच्या लढय़ातले धनुर्धारी म्हणत असत. ते गांधीजींचे शिष्य होते आणि त्यांचे सेनापतीही होते. त्यांना माघार घेणं ठाऊकच नव्हतं. युद्धकाळात ब्रिटनसाठी जसे चर्चिल होते, तसे सुमारे तीन दशकं भारतीयांसाठी पटेल होते. त्यामुळेच एम. एन. रॉय त्यांना ‘मास्टर बिल्डर’ म्हणत असत. ‘हा मास्टर बिल्डर नसेल तर भारताचं काय होईल,’ याची कल्पनाही त्यांना करवत नव्हती.
कॅबिनेट मिशनच्या काळात १९४६मध्ये एका जैन मुनींनी पटेलांची भेट घेतली. सरदारांची मुक्त कंठानं प्रशंसा करून ते जैनमुनी म्हणाले, ‘‘सरदारसाहेब, तुम्ही भारताचा इतिहास लिहायला हवा.’’ त्यावर पटेल मनमोकळेपणे हसले. ते त्यांना म्हणाले, ‘‘आम्ही इतिहास लिहीत नाही, आम्ही इतिहास घडवतो,’’ आणि खरोखरच पटेलांनी इतिहास घडवला. तोच इतिहास प्रामाणिकपणे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी केला आहे.

Story img Loader