कलेचा इतिहास आणि समकालीन दृश्यकला यांमधून दिसणाऱ्या प्रतिमांना स्त्रीवादी नजरेतून पाहण्याच्या प्रयत्नातून तरी ‘पुरुषी नजर’ बदलू शकते का, याचा शोध घेणारं पाक्षिक सदर…

युअर बॉडी इज अ बॅटलग्राउण्ड

स्त्रीदेहाचं रूपांकन करण्यामागच्या धारणा कशा बदलल्या, हा काही कूटप्रश्न वगैरे नाही. ‘संस्कृतींच्या प्रगती’चा इतिहास हाच स्त्रियांच्या दमनाचाही इतिहास असल्यामुळे स्त्रीच्या देहाविषयी पुरुषांच्या कल्पनाच शिरजोर ठरणार होत्या, तशा त्या ठरत गेल्या. स्त्री ही कर्ती असू शकते, याची सारी उदाहरणं मिथककथांमध्ये गाडली गेली. पुरुषी व्यवस्थेचा तुरुंग स्त्रियांभोवती रचला गेला. एकोणिसाव्या शतकापासून हा तुरुंग फोडण्याचं भान स्त्रियांना येऊ लागलं. तोवर आणि त्यानंतरही, स्त्रियांच्या प्रतिमा पुरुषी नजरेतूनच साकारत होत्या…

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Image of Dr. Manmohan Singh
World On Manmohan Singh Death : “आर्थिक सुधारणांचे शिल्पकार ते अनुत्सुक पंतप्रधान”, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जागतिक माध्यमांची प्रतिक्रिया
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली

इनाना

व्हीनस ऑफ विलेन्डॉर्फ

मोहंजोदडोची मातृदेवता

म जकुराआधी चित्रांकडेच लक्ष गेलं असेल, असं गृहीत धरून सुरुवात करू… इथल्या तीन प्रतिमांपैकी एक आहे इसवी सनापूर्वी २८,००० ते २५,००० वर्षांपूर्वीची. तिला कलेच्या इतिहासात ‘व्हीनस ऑफ विलेन्डॉर्फ’ या नावानं ओळखलं जातं. बाकीच्या दोन प्रतिमांपैकी जी मूर्ती आहे ती आपल्या हडप्पा- मोहंजोदडो संस्कृतीतली, म्हणजे इसवी सनापूर्वी किमान अडीचशे वर्षांपूर्वीची. तिसरी ‘मूर्ती’ नाही… ती साच्यातून मातीचा चौकोनी छाप काढून, तो भट्टीत भाजून बनवलेली मुद्रा आहे. मोहंजोदडोत जशा मातीच्या मुद्रा (पशुपती, बैल वगैरे प्रतिमांच्या) सापडल्या, तशीच ही मुद्रा सुमेरियन संस्कृतीतली- पण मोहंजोदडोच्या नंतरची, म्हणजे इसवी सनापूर्वी २३५० ते २१५० या दोनशे वर्षांच्या कालखंडातली. थोडक्यात, ‘व्हीनस ऑफ विलेन्डॉर्फ’ ही आजपासून कमीतकमी साडेसत्तावीस हजार वर्षं जुनी आहे.

हेही वाचा – क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर

याचा अर्थ, मानवजात किमान साडेसत्तावीस हजार वर्षं स्त्रीचं ‘माता’ हे रूप महत्त्वाचं मानते आहे. तेव्हापासून आजतागायत मातृृप्रतिमांची पूजा तरी होते किंवा त्यांना इच्छापूर्ती करणाऱ्या मानलं जातं. ही इच्छा अर्थातच मूल होण्याची. वंशसातत्याची. त्या कामासाठी स्त्रीनं धष्टपुष्ट असलं पाहिजे, ही अपेक्षा साडेसत्तावीस हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगात तरी सर्वमान्य असावी- हीच अपेक्षा आजही आफ्रिकन जमातींच्या संस्कृतींत आढळू शकते. स्त्रीच्या पुष्टपणाला त्या जमाती जाडेपणा मानत नाहीत, तर त्या स्त्रीची जनन-पोषण शक्ती अधिक आहे, असं मानलं जातं (या सांस्कृतिक समजाचं अमेरिकी विद्रुपीकरण म्हणजे ‘यो मम्मा सो बिग’चे तथाकथित विनोद). ‘व्हीनस ऑफ विलेन्डॉर्फ’ ही आजच्या ऑस्ट्रियात (१९०८ सालच्या उत्खननात) सापडलेली मूर्ती. ती विलेन्डॉर्फ गावाजवळ सापडली हे ठीक, पण तिला ‘व्हीनस’ असं नाव कशासाठी? तर रोमन काळात (म्हणजे विलेन्डॉर्फ मातृकेनंतर किमान २४ हजार वर्षांनी) ‘व्हीनस’ ही प्रेम, सौंदर्य, विजय आणि प्रजनन यांची देवता मानली जायची म्हणून! रोमन साम्राज्याच्या काळात (इसवी सनाआधी सत्तावीसच वर्षांपासून पुढल्या दोन-तीनशे वर्षांचा काळ) मानवी देहाचं रूपांकन ज्या प्रकारे झालं, ते तमाम पाश्चात्त्य कला-इतिहासात महत्त्वाचं मानलं जातं, त्यामुळे रोमन प्रतिमेचं नाव या अश्मयुगीन मातृकेला मिळालं. पण याच पाश्चात्त्य कलेच्या इतिहासात गाजलेलं सँड्रो बोतिचेली याचं ‘व्हीनसचा जन्म’ (सन १४८५-८६) हे चित्र पाहा… त्यातली व्हीनस आजच्याही काळातल्या ‘हॉलीवूड मदनिकां’ना जणू प्रेरणा देणारी आहे. कमनीय शरीर, गोरेपणा, नाजूकपणा असे स्त्रीला भोग्यवस्तू आणि ‘बाहुली’ समजण्यासाठी पुरेसे ठरणारे सारे दृश्यगुण बोतिचेलीनं जन्मास घातलेल्या त्या व्हीनसमध्ये आहेत.

इतर दोन प्रतिमा जरी चारेक हजार वर्षांपूर्वीच्याच असल्या, तरी त्यांनी स्त्रीच्या ‘शक्ती’ला दृश्य-रूपांकनातून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोहंजोदडोच्या मातृकेनं डोक्यावर जे काही शिरोभूषण घातलंय, ते त्याच संस्कृतीतल्या ‘पशुपती’पेक्षा अजिबात कमी नाही. याच हडप्पा- मोहंजोदडो संस्कृतीतली ‘नर्तकी’सुद्धा आठवून पाहा… तिच्या डोक्यावर कुठलंही शिरोभूषण वगैरे नाही, एवढं तरी चटकन आठवेल. त्याऐवजी त्या नर्तिकेच्या हातांमध्ये बांगड्या आहेत भरपूर. मोहंजोदडोच्या मातृदेवतेचं शिरोभूषण हे तिचं सामाजिक स्थान नर्तिकेपेक्षा वरचं असावं याचंही निदर्शक असावं. या शिरोभूषणाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या वरच्या भागात दोन वाट्यांसारखे आकार दिसतात – हे आकार प्रजननाशी, बीजधारणेशी संबंधित आहेत का असा प्रश्न पडतो; कारण ते आकार आजही मंगळसूत्राच्या वाट्या असतात, तसेच आहेत… पण हा प्रश्न अभ्यासकाचा नसून, तो केवळ कुतूहलातून आलेला आहे.

तिसरी प्रतिमा सुमेरियन संस्कृतीतली, ‘इनाना’ या नावानं ओळखली जाणारी आणि पंखधारी आहे. तीसुद्धा ‘प्रेम, विजय आणि प्रजनन’ यांची देवता मानली जाई, असं विकिपीडिया सांगतो… पण सुमेरियन संस्कृतीचे अभ्यासक, पुरातत्त्वशास्त्रज्ञ पॉल कॉलिन्स यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये (शिकत) असताना ‘इनाना’बद्दल जो शोधनिबंध लिहिला, त्यात तिच्या ‘प्रजनन’गुणांचा उल्लेख नाही. त्या अर्थानं, तिला मातृदेवता मानण्याचं कारण नाही. पण स्त्री-शक्तीचं प्रतीक म्हणून मात्र या प्रतिमेकडे नक्की पाहता येईल. ‘इनाना’च्या खांद्यावरली शस्त्रं, तिनं सिंहावर ठेवलेला पाय हे सारं पाहून हिंदू देवतांची आठवण कुणाला होईल. ती व्हावी की होऊ नये, हा प्रश्न या मजकुरापुरता सोडून दिलेला बरा.

‘पुरुषी व्यवस्था’ ते ‘पुरुषी नजर’

जाडेपणा, पुष्टपणा यांच्याबद्दलच्या कल्पना ‘आधुनिकतावादी’ काळाच्याही आधीच बदलल्या होत्या, असं आपल्याला बोतिचेलीची व्हीनस सांगते. मात्र आजपासून चार हजार वर्षांपूर्वीच्या काळात या कल्पना तशा नसाव्यात, हे इथल्या तीन प्रतिमा पाहून म्हणता येतं. स्त्रीदेहाचं रूपांकन करण्यामागच्या धारणा कशा बदलल्या, हा काही कूटप्रश्न वगैरे नाही. ‘संस्कृतींच्या प्रगती’चा इतिहास हाच स्त्रियांच्या दमनाचाही इतिहास असल्यामुळे स्त्रीच्या देहाविषयी पुरुषांच्या कल्पनाच शिरजोर ठरणार होत्या, तशा त्या ठरत गेल्या. स्त्री ही कर्ती असू शकते, याची सारी उदाहरणं मिथककथांमध्ये गाडली गेली. पुरुषी व्यवस्थेचा तुरुंग स्त्रियांभोवती रचला गेला. एकोणिसाव्या शतकापासून हा तुरुंग फोडण्याचं भान स्त्रियांना येऊ लागलं. तोवर आणि त्यानंतरही, स्त्रियांच्या प्रतिमा पुरुषी नजरेतूनच साकारत होत्या. रविवर्म्याची शकुंतला, दमयंती, सरस्वती असो की पिकासोची रडवेली डोरा मार (‘द वीपिंग वुमन- १९३७) असो… या साऱ्याजणी पुरुषांना हव्या तशा शरीराच्या किंवा मनाच्या असल्याखेरीज त्यांना प्रतिमा म्हणून दृश्यकलेत स्थानच मिळत नव्हतं जणू.

पुरुषी नजरेची व्याप्ती याहीपेक्षा मोठी आणि मारक असू शकते, हे आपणा सर्वांना माहीत आहेच. त्या नजरेशीच तर स्त्रीवाद लढतो आहे. स्त्रीवादी विचार अनेक समाजांत, अनेक देशांत विविध प्रकारे प्रकटत राहिला. १९७५ पासून तर स्त्रीवादी जाणिवांना अधिमान्यता मिळाली. १९७५ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून जगानं नुसतं साजरं न करता, त्यानंतरच्या वर्षांतही महिलांच्या प्रश्नांची चर्चा होत राहील, इतकं काम केलं. यातून कलाकृतींकडे स्त्रीवादी नजरेनं पाहण्याची सुरुवात झाली, अनेक स्त्री-चित्रकारांनी त्यांना त्या-त्या वेळी भावलेल्या स्त्रीवादी जाणिवांतून कलाकृती केल्या.

या कलाकृतींकडे पाहाणं, त्या कलाकृतींतून पुरुषी नजरेला आव्हान मिळालं याची कबुली देणं आणि स्त्रीवादी जाणिवांचा इतिहास हा आपणा सर्वांचा इतिहास आहे हे कलाकृतींमधून साजरं करणं, या उद्देशांशी प्रामाणिक राहाण्याचा प्रयत्न ‘दर्शिका’ या सदरातून केला जाईल.

हेही वाचा – शांत काळोखाचे तुकडे

स्त्रीवादी विचाराला ‘याच्यानंतर ते’ अशी एकरेषीय पुरुषी इतिहासाची मोजपट्टी लावता येणार नाही (उदा.- सिमॉन द बूव्हा हिनं ‘द सेकण्ड सेक्स’मध्ये स्त्रीवर पुरुषी समाज ‘इतरत्व’ कसं लादतो हे सांगण्याआधीच, आपल्या फुले-आंबेडकरांनी कोणत्याही आर्थिक स्तरातल्या स्त्रीची ‘शूद्र’ अवस्था ओळखली होती), तसंच स्त्रीवादी जाणिवेच्या दृश्यकलेचा इतिहासही ‘आधी हे, मगच ते’ अशा निव्वळ क्रोनोलॉजीतून सांगणं योग्य नाही. म्हणूनच तर, पुष्ट- शक्तिशाली अशा अतिजुन्या प्रतिमांची उजळणी करता-करताच इथं बार्बरा क्रूगर यांनी १९८९ मध्ये गर्भपात आणि प्रजनन-हक्कांच्या अमेरिकेतल्या आंदोलनासाठी केलेल्या ‘युअर बॉडी इज अ बॅटलग्राउण्ड’ या पोस्टरवजा कलाकृतीलाही मध्यवर्ती स्थान आहे.

विलेन्डॉर्फची व्हीनस, मोहंजोदडोची मातृ-देवता, सुमेरियातली ‘इनाना’ या साऱ्याजणींनी बार्बरा क्रूगरचं ते पोस्टर पाहावं आणि अनंतकाळ आपल्यावर लादल्या गेलेल्या बाळंतपणांची आठवणही काढावी आणि म्हणावं, ‘होय गं पोरी, आपलं शरीर हेच या लढाईचं रणांगण… ही लढाई आम्हाला कळलीच नसेल असं वाटतं का तुला?’

… त्या तिघींचा हा प्रश्न वाचकांनाही लिंगभावनिरपेक्षपणे ऐकू येणं, हा ‘दर्शिका’ या सदरामधून अपेक्षित असलेला कला-प्रत्यय आहे.

abhijeet.tamhane@expressindia.com

Story img Loader