चार दिवसांपूर्वीचीच घटना! संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी सोसायटीच्या बागेत फिरायला गेले होते. फिरत असतानाच लहान मुलांचा एकमेकांना पाण्याने भरलेले फुगे मारण्याचा खेळ चालला होता. आपल्या आजूबाजूला माणसांची ये-जा चालू होती याची जाणीवही त्यांना नव्हती. त्या लहान मुलांच्यात चौदा-पंधरा वर्षांची शाळकरी मुलंही सामील झालेली दिसली. बागेत इतर मुले, स्त्रिया, पुरुषही बाकांवर गप्पा मारीत बसले होते. तेवढय़ातच आरडाओरडा झाला. ‘‘काय झालं? काय झालं?’’
बघतात तो काय? सत्तरीच्या दिघे आजोबांच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या अगदी जवळ एक फुगा लागला होता. ते त्या धक्क्याने खालीच पडले होते. लोकांनी त्यांना उठवून जवळच्याच एका बाकावर बसविले. नंतर लगेचच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांचा डोळा वाचला होता. पण चेहऱ्यावर जबरदस्त मार लागला होता.
इकडे घाबरून सगळी मुलं आपले फुगे, पाण्यांच्या बादल्या, पंप घेऊन पळून गेली होती. काही मुलांच्या आयांचे बोलणे कानावर पडले, ‘‘अहो, होळी जवळ आली आहे. होळीनिमित्त मुले फुगे उडवत होती. मुलांनी दिघे आजोबांना काही मुद्दाम फुगा मारला नव्हता. दिघे आजोबांनी तरी तिकडे जायचेच कशाला?’’
इतक्यात आमच्याच सोसायटीमधील जाधवकाका तेथे आले. जाधवकाका नेहमी मुलांना एकत्र जमवून गोष्टी सांगतात. त्यामुळे ते मुलांचे आवडते काका. त्यांनी घडलेला प्रकार समजून घेतला. सर्व मुलांना निरोप पाठवून एकत्र केले आणि विचारले, ‘‘मुलांनो, काय गडबड केलीत? काय झालं?’’
‘‘मुले फुगे खेळत होती. त्यातला एक फुगा दिघे आजोबांना लागला. त्यांचा डोळा सुजलाय. त्यांना डॉक्टरकडे नेलं आहे. दिघे आजोबांच्या डोळ्याजवळ लागल्याने मुलेही घाबरून गेली आहेत. जाधवकाका तुम्ही मुलांना जरा समजवा ना!’’ अन्वयची आई जाधवकाकांना म्हणाली.
‘‘काका, होळी पौर्णिमा जवळ आली ना? म्हणून आम्ही एकमेकांना फुगे मारून खेळ खेळत होतो. यावर्षी आम्ही झाडांची फांदी तोडून होळीही पेटवणार आहोत. आपले सण-उत्सव आपण साजरे करायला हवेत ना?’’ संदीप म्हणाला.
जाधवकाकांच्या भोवती मुले होतीच. शिवाय काही पालकही जमले होते.
जाधवकाका सांगू लागले, ‘‘हे पहा, मुलांनो! होळी पौर्णिमेला पाण्याचे फुगे मारायचे असे कुठेही सांगितलेले नाही. होळी पेटविण्यासाठी झाडाची फांदीही तोडायची नाही. होळी पौर्णिमेचा सण का आणि कसा साजरा करायचा ते आधी तुम्ही समजून घ्या. भारतात होळी हा सण वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी आपण साजरा करीत असतो. बंगालमध्ये होळीला ‘होरी’ म्हणतात. कोकणात होळीला ‘शिमगा’ म्हणतात. गोव्यात तर होळीला ‘शिग्मा’ म्हणतात. ‘हुताशन’ म्हणजे अग्नी! म्हणूनच होळी पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. हुताशनी महोत्सव म्हणजे होलिका दहन, दोला यात्रा, काम दहन! हे सारे वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ स्वागतासाठी करावयाचे असते. तुम्हाला आपल्याकडील सहा ऋतूंची नावे माहीत आहेत का?’’
‘‘मला माहीत आहेत. मी सांगतो. वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, वर्षां ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू!’’ आदित्यने ऋतूंची नावे सांगितली.
‘‘शाब्बास आदित्य! आपले सण हे ऋतूंवर आधारित आहेत. ऋतूप्रमाणे आहार घेतला तर आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहते. म्हणूनच उपवासाचा श्रावण महिना हा पावसाळ्यात म्हणतेच वर्षां ऋतूमध्ये येतो. होळीला थंडी असते. पुरणपोळीचे पचन सुलभ होते. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात आणि सण हे चंद्रावर अवलंबून असतात. म्हणूनच आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे.
शिशिर ऋतूच्या थंडीमध्ये बऱ्याच झाडांची पाने गळून जमिनीवर पडतात. गावातील झाडांची जमिनीवर पडलेली पाने एकत्र करून होळीच्या निमित्ताने ती जाळण्याची प्रथा पडली. त्यामुळे गावातील परिसर स्वच्छ होऊन गावात रोगराई पसरत नाही. अस्वच्छतेची ढुंढा राक्षसीण आजारपणाचा त्रास गावातील मुलांना देत नाही. म्हणूनच होळीला झाडांची फांदी किंवा झाड तोडायचे नाही तर पालापाचोळा एकत्र करून तो जाळावयाचा! वसंत ऋतूमध्ये या झाडांना नवीन पालवी येते. वसंत ऋतूचे आपण स्वागत करायचे.’’
‘‘पण मग रंगपंचमी का साजरी करतात?’’ निखिलचा प्रष्टद्धr(२२४)्ना.
‘‘हे पहा, वसंत ऋतूचे स्वागत रंग उधळून करायचे असते. मनातील विकृत भावना घालवून मनात सात्विक निर्मळ आनंद निर्माण करायचा. सध्या होळीच्या वेळी बाजारात जे रंग मिळतात ते सर्व रासायनिक असतात. ते रासायनिक रंग आपल्या शरीराच्या त्वचेला खूप घातक असतात. डोळ्यांना, कानांना तर अपायकारच असतात. बाजारात मिळणारा लाल रंग त्यात मक्र्युरी सल्फाइड असते. निळ्या रंगात नीळ असते. ती त्वचेला खूप घातक असते. चांदीच्या रंगात अॅल्युमिनियम ब्रोमाइड असते. हिरव्या रंगात कॉपर सल्फेट असते. ते तर डोळ्यांना खूपच घातक असते. आणि काळय़ा रंगात ऑक्साइड असते, हेही शरीराच्या आरोग्यास घातक असते. पण आपण रासायनिक रंग न वापरता घरीही नैसर्गिक रंग तयार करू शकतो.’’
‘‘पण हे नैसर्गिक, रंग घरी कसे करायचे? मुक्तानं कुतूहलानं विचारलं.
जाधवकाका म्हणाले, ‘‘हे पहा. होळीला अजून चार दिवस अवकाश आहे. आपणच या वेळी नैसर्गिक रंग आपल्या घरीच तयार करू या.’’
हिरवा रंग हा हिरव्या पानांपासून तयार करता येतो. पालक भाजी तुम्ही पाहिली असेल. पालकाच्या पानांपासून हिरवा रंग तयार करू या. लाल रंग हा जास्वंद, पळस किंवा गुलाबाच्या फुलांचा कुटून लगदा करून तयार करू या. आवळ्याचा कीस लोखंडी तव्यावर टाकून, पाण्यात उकळविल्यानंतर गडद काळा रंग तयार करता येईल. पिवळा रंग तयार करणे अगदीच सोपे! एक भाग हळद पावडर आणि दोन भाग पीठ यांचे मिश्रण पाण्यात ढवळले की झाला पिवळा रंग तयार! लाल-जांभळा रंग आपणास बिटापासून तयार करता येईल. किंवा जांभळाचा गर पाण्यात टाकून ढवळला तर मस्त लालसर जांभळा रंग तयार करता येईल. आणि हो! बेलफळाची साल पाण्यात टाकून उकळविल्यास छान नारंगी रंग तयार करता येईल! मग आपण यावर्षी असेच नैसर्गिक रंग तयार करू या. फुगे वापरायचेच नाहीत. मस्तपैकी रंग एकमेकांना लावायचे. मस्तपैकी वडापावचा बेत करू या. आणि बरं का! होळीच्या दिवशी सर्वानी साफसफाई करून पालापाचोळा एकत्र करून त्याची होळी करू या. मग काय? तुम्ही तयार आहात ना? घरी तुमची आई पुरणपोळीचा बेत करीलच! मग, या वर्षीपासून होळीला झाडाची फांदी तोडणे बंद! रासायनिक रंगाचा वापर करणे बंद! एकमेकांच्या अंगांवर फुगे मारणे बंद! आता माझ्याबरोबर म्हणा-
होळी रे होळी! पर्यावरणाला सांभाळी!
साफसफाई करू या! नैसर्गिक रंग वापरू या!
वसंत ऋतूचे स्वागत करू या! आनंदाने होळी खेळू या!’’
हे गीत गातगातच सर्व मुले दिघेकाकांच्या घरी ‘सॉरी’ म्हणायला गेलीसुद्धा!
वाचावे नेमके
हेरंब कुलकर्णी
‘आनंद वाटे मनी..’
आज मोबाइल, संगणक हेच लहान मुलांचे खेळ व खेळणी झाले आहेत. त्यामुळे पारंपरिक खेळण्यांकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. दुकानातून चायना बनावटीची किंवा इतर चकचकीत खेळणी आणली जातात; पण खरंच ती खेळणी मुलांना आनंद देतात का? आपल्या भारतीय परंपरेत खूप खेळणी आहेत. विशेष म्हणजे त्यातील बहुतेक खेळणी ही टाकाऊ वस्तूंपासून बनवता येतात. त्याला खर्चही येत नाही व ती खेळताना आनंद यासाठी होतो की, ती स्वत: बनवलेली असतात.
भारतीय परंपरेतील खेळणी कशी बनवावीत याविषयीचे पुसतक आहे- ‘आनंद वाटे मनी.. बनविता भारतीय खेळणी’. सुदर्शन खन्ना या प्रसिद्ध रचनाशास्त्रकाराने मुलांसाठी लिहिलेले हे पुस्तक आहे. हाताने सहज बनविता येणारी १०१ खेळणी या पुस्तकात दिली आहेत. विशेष म्हणजे आकृती काढून समजावून सांगितले आहे. यातून मुलांना निर्मितीचा आनंद मिळतो व विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख होते.
या पुस्तकात १०१ खेळण्यांचे वर्गीकरण केले आहे. नाद आणि सूर या प्रकारात पिपाणी, शिट्टी, फटाका, खुळखुळा अशी २९ खेळणी तयार करायला शिकविली आहेत. सनातन साधने या प्रकारात धनुष्य, गोफण, पंखा अशा वस्तू, तर भुरळ पाडणाऱ्या गती या प्रकारात पवनचक्की, हेलिकॉप्टर, कप्पी, बेडूक तयार करण्यास शिकविले आहे. छोटय़ा गूढगोष्टी या प्रकारात चेंडू, पाकीट, पोपट, शिवणयंत्र अशी खेळणी आहेत. परिशिष्टात कोणत्या वयोगटाला कोणती खेळणी उपयुक्त ठरतील, हे वर्गीकरण दिले आहे. चित्रकला, हस्तकला, कार्यानुभव या तासिकांसाठी व पालकांनाही हे पुस्तक उपयुक्त आहे.
‘आनंद वाटे मनी..’ : सुदर्शन खन्ना, अनुवाद : उल्हास ढुमणे, नॅशनल बुक ट्रस्ट
आकृती
हाताच्या बोटांनी चित्र काढता येते. पण हाताच्या बोटाच्या बाह्यरेखा काढून त्यापासून चित्र काढण्याची कल्पना किती सुंदर असते. केवळ हाताच्या व पायाच्या बोटांभोवती रेघा काढून, हातापायाचे ठसे काढून किती प्रकारची चित्रे होऊ शकतात याची आपण कधी कल्पना केली नसेल; पण चक्क केवळ एवढय़ा एकाच विषयावरचे एक पुस्तक आले आहे. पुस्तकाचे नाव आहे- आकृती. चित्रकार आभा भागवत यांनी बोटांपासून ९५ चित्रे काढली आहेत.
या पुस्तकातील प्रस्तावना व नावे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत आहे. यात मधमाशी, कबूतर, मेंढी, बदक, वाघ, उंट, मांजर, कासव, कुत्रा, डायनासॉर, कार, ट्रॅक्टर, जहाज अशी मुलांच्या भावविश्वातली सर्वच मंडळी आहेत. त्या चित्रांकडे बघताना प्रथमदर्शनी यात हाता-पायांची बोटे व ठसे आहेत, हे खरेच वाटत नाही. हे पुस्तक बघताना मुलांना अनेक कल्पना सुचत राहतात व यादी वाढतच जाते. मुलांना सृजनात्मक कामासाठी हे पुस्तक अगदीच उपयुक्त आहे. ‘माझ्या बोटात जादू किती छान छान छान..’ या गाण्याचा वेगळाच अर्थ उमगतो..
‘आकृती’ : आशा भागवत,
कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन, पुणे
कुतूहल
रात्री येते उमलून ब्रह्मकमळ फूल
तोंड पूर्वेकडे दिवसा फुलते सूर्यफूल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा